महसीर : (महासीर, मासीर). सायप्रिनिडी कुलातील गोड्या पाण्यात राहणारा रुचकर खाद्य मत्स्य. याला बंगालीत महसीर असे म्हणतात व तेच नाव सर्वत्र रूढ आहे. मराठीत याला खडवी, म्हसद असेही म्हणतात. याचे शास्त्रीय नाव टॉर टॉर असे आहे. मुस्कटावरील लांब, वचिक केसांमुळे (बार्बल) फ्रान्सिस डे यांनी याचा अंतर्भाव बार्बस वंशात केला असून याला बार्बस टॉर असे शास्त्रीय नाव सुचविले आहे. यूरोप, आशिया व आफ्रिका खंडांतील बहुतेक सर्व नद्या सरोवरे यांमध्ये हा मासा सापडतो. वेगाने वाहणाऱ्या पाण्यात राहणे याला जास्त आवडते. भारतात उत्तर प्रदेश, पंजाब, आसाम, बिहार, हिमाचल प्रदेश, मध्य प्रदेश या भागांत हा सापडतो. गळाच्या साहाय्याने ज्यांची मासेमारी होते, अशा माशांमध्ये याचा प्रथम क्रमांक लागतो.

महसीरचे मुस्कट टोकदार असते. डोळे खूप मोठे व डोक्याच्या दोन्ही बाजूंना असतात. ओठ, जाड, ओठांभोवती चार लांब लवचिक केस असतात. लहान असताना शरीर वरच्या बाजूने (पाठीकडे) जास्त फुगीर, गोलसर असते मोठा झाल्यावर ते निमुळते व शेपटी लांब असते. पृष्ठपक्ष (हालचालीस व तोल सांभळण्यास उपयोगी पडणारी त्वचेची पाठीवरील स्नायुमय घडी पर) अधरपक्षाच्या (खालच्या पराच्या) अगदी समोर असून त्याचा शेवटचा अक्ष लांब व बळकट असतो. अंसपक्ष (छातीवरील पर) डोक्याच्या मागे सुरु होऊन अधरपक्षापर्यंत येतो. पुच्छपक्ष (शेपटीचा पर) दोन पालींमध्ये खोलपर्यंत विभागलेला असतो. गुदपक्ष (ढुंगणावरील पर) अगदीच लहान असतो. शरीराचा रंग अत्यंत आकर्षक व निरनिराळ्या रंगाच्या मिश्रछटांचा असतो. शरीराच्या वरच्या अर्ध्या बाजूचा रंग, हिरवट रुपेरी किंवा गडद काळसर हिरवा, बाजू रुपेरी-सोनेरी रंगाचे मिश्रण असलेल्या व पोटाकडे त्याच रंगाच्या फिकट छटा असतात. खालील बाजूकडील पर भडक लालसर पिवळ्या रंगाचे असतात. सर्व शरीरावर मोठे, चक्रज आणि षट्‌कोणी खवले असतात. त्यांच्या कडा गडद काळसर रंगाच्या असल्यामुळे माशाच्या शरीरावर त्यांची सुंदर नक्षी तयार होते.

पूर्ण वाढ झालेला महसीर जवळजवळ ७० ते ८० सेंमी. लांब असतो परंतु एक मी. पेक्षा जास्त लांबीचे मासेदेखील आढळले आहेत. याचे वजन अंदाजे ३५ ते ४० किग्रॅ. असते. जास्तीत जास्त ४५ किग्रॅ. वजनाचा महसीर सापडला आहे.

महसीरांचे जानेवारी-फेब्रुवारी, मे-जून आणि जुलै-सप्टेंबर वर्षातून तीन विणीचे हंगाम असतात. विणीच्या हंगामात हे मासे प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने नदीच्या उगमाकडे जातात व तेथेच मादी अंडी घालते. अंडी उबून बाहेर आलेली पिल्ले मोठी झाली की, नदीच्या प्रवाहाबरोबर पोहत नदीच्या मुखाच्या दिशेला येतात. सरोवरात राहणारे महसीर अगदी खोल पाण्यात अंडी घालतात. त्याचप्रमाणे पावसाळ्यात आरंभी सर्व मासे नदीच्या उगमाकडे जातात व पाऊस थांबल्यावर पुन्हा खाली परत येतात.

महसीर अत्यंत रुचकर मत्स्य असल्यामुळे याची फार मोठ्या प्रमाणावर शिकार होते. यासाठी मुख्यत्वे गळ-दांडीचा वापर होतो व हे त्यासाठीच प्रसिद्ध आहेत. महसीरमध्ये खाद्य घटक पुढीलप्रमाणे असतात : ७०.३% जलांश, २.२६% वसा, २५.२% प्रथिने, १.२०% लवणे, तसेच प्रत्येक १०० ग्रॅममध्ये १३० मिग्रॅ. कॅल्शियम, २८० मिग्रॅ. फॉस्फरस व ३.८३ मिग्रॅ. लोह असते. याच्या रुचकर चवीमुळे व वाढत्या लोकप्रियतेमुळे पंजाबात याची कृत्रिम पैदास करण्याचे प्रयत्न चालू आहेत.

जोशी, लीना