नाताळनिमित्त मुलांना भेट वस्तू देणारा सांटा क्लॉज

नाताळ–२ : ख्रिस्ती धर्मीयांचा एक महत्त्वाचा सण. इंग्रजीतील ‘नेटिव्हिटी’ ही संज्ञा ख्रिस्ताचा जन्म या अर्थी वापरली जाते. इंग्रजीतील ‘नाताल’ शब्दाचा अर्थ अनुषंगाने ख्रिस्तजन्मांसंबंधीचा सण असा होतो. त्याचे ‘ख्रिस्‌मस’ असेही नाव रूढ आहे. जुन्या इंग्रजीतील Christes Maesse किंवा Chrits’s Mass ह्यावरून ‘ख्रिस्‌मस’ शब्द सोळाव्या शतकात रूढ झाला. इसवी सनाच्या सुरुवातीच्या काही शतकांपर्यंत ख्रिस्ती लोक थोर व्यक्तीचा जन्मदिन (जयंती) न पाळता मृत्युदिन (पुण्यतिथी) पाळत. परिणामतः येशूच्या जन्मतारखेविषयी अनिश्चितता निर्माण झाली. असे असले, तरी एका आर्मेनियन चर्चचा अपवाद सोडल्यास जगातील सर्वच चर्चसंस्था २५ डिसेंबर हा ⇨ येशू ख्रिस्ताचा जन्मदिवस म्हणून पाळतात. आर्मेनियन चर्च मात्र हा जन्मदिवस ६ जानेवारीस पाळते. डिसेंबरच्या सुमारास नॉर्स लोक ‘यूल’ नावाचा (हिवाळा संपल्यावर सूर्याचा जणू पुनर्जन्मच होतो या कल्पनेतून) व रोमन लोक ‘सॅटर्नेलिया’ नावाचा (सॅटर्न ह्या कृषिदेवतेचा तसेच सूर्यदेवतेच्या पुनर्जन्माचा) उत्सव साजरा करताना एकमेकांना विविध भेटवस्तू देऊन आनंदोत्सव करीत. येशू ख्रिस्त हाही जगाला प्रकाश दाखवणारा आहे, ह्या कल्पनेतून त्या उत्सवांशी येशूचा संबंध जोडला गेला असावा तसेच नाताळ सण २५ डिसेंबर ह्या दिवसाशी निगडित झाला असावा. त्यावरूनच नाताळ कसा साजरा करावा, ह्याची कल्पनाही सुचली असावी. नाताळ हा सण २५ डिसेंबर रोजी रोम येथे प्रथम चौथ्या शतकाच्या पूर्वार्धात साजरा केला गेल्याची माहिती मिळते. पूर्वेकडील रोमन साम्राज्यात मात्र ख्रिस्ताचा जन्मदिन व त्याचा बाप्तिस्मा झाल्याचा दिवस म्हणून ६ जानेवारी हा दिवस पाळला जाई तथापि तेथे नाताळ सणाची कल्पना नव्हती. नंतर मात्र २५ डिसेंबर रोजी तेथे, जेरूसलेमचा अपवाद सोडता सर्वत्र ख्रिस्ताचा जन्मदिन म्हणून नाताळ साजरा होऊ लागला आणि ६ जानेवारी हा दिवस ख्रिस्ताचा बाप्तिस्मादिन म्हणूनच समजला जाऊ लागला. पुढे दहाव्या शतकात नाताळ साजरा करण्याची २५ डिसेंबर ही तारीख सूर्याच्या अयनान्तावरून (हिवाळा संपतो व दिवस मोठा होऊ लागतो म्हणून) ठरविण्यात आली.

नाताळ-भेटकार्डाचा एक नमुना

ख्रिस्ताचे दुःखसहन, वधस्तंभावरील मरण व त्यानंतर झालेले त्याचे स्वर्गारोहण हे ठराविक पद्धतीने ‘विधी’ म्हणून पाळतात, तसा नाताळ हा सण विधी म्हणून न पाळता, परमेश्वराने मानवरूप धारण केले याबद्दलचा आनंद व्यक्त करण्यासाठी पाळतात. म्हणूनच जगभरच्या चर्चेसमधून हा सण निरनिराळ्या प्रकारे साजरा होत असला, तरीही त्याची सर्वसाधारण रूपरेखा अशी : ख्रिस्‌मसच्या आदल्या संध्याकाळी म्हणजे २४ डिसेंबरला संध्याकाळी (याला ‘ख्रिस्‌मस ईव्ह’ म्हणतात) सजविलेल्या चर्चच्या अंगणात आबालवृद्ध स्त्रीपुरुष रंगीबेरंगी पोषाख करून एकत्र जमतात, गाणी गातात, काही देशांत मद्यपान करतात. नंतर रात्री १२ वाजता चर्चच्या घंटानादात एकमेकांना शुभेच्छा देतात. ख्रिस्‌मस कॅरोल्स (खास नाताळसाठी रचलेली भक्तिगीते) गात गात लहान मुले व तरुण रात्री १२ पासून पहाटे ३-४ वाजेपर्यंत अनेकांच्या घरी जातात व शुभेच्छा व्यक्त करतात. नाताळप्रसंगी कॅरोल्स म्हणण्याची प्रथा तेराव्या शतकात प्रथम इटलीत सुरू झाली. असीझीचा सेंट फ्रांन्सिस ह्याने बालख्रिस्ताच्या सुयशस्तुतिपर कॅरोल्स रचली. या प्रथेचा तोच जनक समजला जातो. त्यानेच बालयेशूच्या संगोपनगृहाचे (क्रेश) दृश्य पहिल्यांदा तयार केले व त्याचा नंतर जगभर प्रसार झाला. २५ डिसेंबरला पहाटे कॅथलिक चर्चमध्ये ‘मास’ नावाचा भक्तिपर उपासनाविधी मोठ्या प्रमाणावर होतो. प्रॉटेस्टंट चर्चमध्ये सकाळी साधारणपणे ८-९ च्या सुमारास उपासना असते. लूककृत शुभवर्तमानातील दुसऱ्या अध्यायात दिलेली ख्रिस्तजन्माची हकिकत किंवा इतर भाग यावेळी वाचून दाखवितात.

डिसेंबर २४ च्या रात्री घरात व चर्चमध्येही ‘ख्रिस्‌मस वृक्ष’ रोषणाई करून सजवतात. फर वृक्षाचा आकार चर्चच्या शिखरासारखा असून तो सदाहरित असल्यामुळे यासाठी फर वृक्षाची निवड झाली असावी. सुफलतेचे प्रतीक म्हणूनही या वृक्षाची पूजा करण्याची प्रथा जर्मनीमध्ये फार पूर्वीपासून रूढ होती. सोळाव्या शतकात मार्टिन ल्यूथरने प्रथम स्वतःच्या घरात मेणबत्त्यांनी सुशोभित केलेला फर वृक्ष उभा केला व तेव्हापासून ही पद्धत झपाट्याने इतरत्र पसरली.

ख्रिस्‌मस ट्री

नाताळच्या दिवशी नवे कपडे करणे, शुभेच्छा पाठवणे, एकमेकांना भेटवस्तू देणे इ. बाबी आंतरराष्ट्रीय पातळीवर चालतात. लहान मुले नाताळच्या आदल्या रात्री (२४ डिसेंबरच्या रात्री) झोपी जाण्यापूर्वी पलंगाला मोजे लोंबत ठेवतात. सकाळी झोपेतून उठल्यावर त्यांत त्यांना भेटवस्तू टाकलेल्या दिसतात. रात्री सांटा क्लॉज म्हणजेच सेंट निकोलस (चौथे शतक) धुराड्यातून घरात उतरून मोज्यांत त्या वस्तू ठेवून गेला, असे मुलांना पालकांकडून सांगण्यात येते. सांटा क्लॉजला इंग्‍लंडमध्ये ख्रिस्‌मस फादर व हॉलंडमध्ये सेंट निकोलस म्हणतात. लांब पांढरी शुभ्र दाढी असलेला व नेहमी आनंदी असणारा असा स्थूल शरीराचा, वृद्ध सांटा क्लॉज हा आशिया मायनरमधील बिशप होता. त्याच्या सत्कृत्यांसाठी तसेच लहान मुले व अविवाहित मुली यांच्याविषयी त्याला वाटणाऱ्या अपार प्रेमासाठी तो प्रसिद्ध आहे. नाताळमध्ये विविध प्रकारचे केक तयार करण्याची प्रथा आहे. प्रत्यक्ष पवित्र शास्त्रात हा सण कसा साजरा करावा, ह्याविषयी उल्लेख नाही परंतु तो साजरा करण्याची पद्धत यूरोपमधूनच जगभर पसरल्यामुळे त्याला पाश्चिमात्त्य स्वरूप प्राप्त झाले. मूल पेगन धर्मातील उत्सवाच्या बऱ्याच प्रथा नाताळमध्येही अंतर्भूत झाल्या. दुसऱ्या महायुद्धानंतर निरनिराळ्या देशांतील ख्रिस्ती चर्चेस त्या त्या देशांतील चालीरीतींचा त्यात समावेश करू लागली. भारतात ‘डेव्हि‌डच्या ताऱ्या’  बरोबरच घरात व घरांवर पणत्या लावणे, आकाशदिवे लावणे, ख्रिस्ती भक्तिपर गाणी भारतीय चालींवर म्हणणे, फटाके उडविणे, केकऐवजी इतर भारतीय मिष्टान्ने तयार करणे इ. पद्धती रूढ झाल्या आहेत. नाताळनंतरच्या पहिल्या आठवाड्यातील पहिला दिवस ‘बॉक्सिंग डे’ म्हणून पाळण्याची प्रथा अजूनही काही देशांत आहे. जे लोक वर्षभर आपल्या उपयोगी पडले, त्यांना या दिवशी काही भेटवस्तू ‘बॉक्स’ मध्ये घालून देतात. नाताळ हा जगातील ख्रिस्ती लोकांचा सर्वांत मोठा व महत्त्वाचा लोकोत्सव झाला आहे.

संदर्भ : 1. Hole, Christina, Christmas and Its Customs, New York, 1957.

            2. McArthur, A. A. The Evolution of the Christian Year, Greenwhich, 1953.

आयरन, जे. डब्ल्यू.