रत्नाकर-जगन्नाथदास : (१४ सप्टेंबर १८६६ – २१ जून १९३२). ब्रज भाषेत काव्यरचना करणारे आधुनिक काळातील एक श्रेष्ठ कवी. वाराणसी येथे एका सधन वैश्य कुटुंबात त्यांचा जन्म झाला. बनारस येथील क्वीन्स कॉलेजमधून १८९२ मध्ये ते बी. ए. झाले. आईच्या निधनामुळे त्यांना पुढील शिक्षण (एल् एल्‌. बी. व एम्‌. ए.) घेता आले नाही. १९०२ मध्ये अयोध्यानरेश प्रतापनारायण सिंह यांचे व १९०६ पासून प्रतापनारायणांच्या निधनानंतर, महाराणीचे खाजगी सचिव म्हणून त्यांनी काम केले. भारतातील बहुतांश प्रमुख स्थळे त्यांनी पाहिली होती. संस्कृत-प्राकृतादी प्राचीन भाषा बंगाली, पंजाबी, मराठी ह्या आधुनिक भारतीय भाषा आयुर्वेद, संगीत, पुरातत्त्व, इतिहास, योग इ. विषयांचा त्यांचा सखोल व्यासंग होता. धर्म व साहित्य यांत त्यांना विशेष रुची होती. विद्यार्थिदशेतच ‘जकी’ (बुद्धिमान) या टोपणनावाने ते उर्दू-फार्सी कविता रचू लागले तथापि नंतर मात्र केवळ ब्रज भाषेतच त्यांनी काव्यलेखन केले.

साहित्य सुधानिधि सरस्वती या हिंदी पत्रांचे संपादनही त्यांनी केले. वाराणसी येथील ‘नागरी प्रचारिणी सभा’, प्रयाग येथील ‘रसिक मंडल’ ह्या संस्थांच्या स्थापनेस व विकासास त्यांनी मोठाच हातभार लावला. १९२२ मध्ये कलकत्ता येथे भरलेल्या अखिल भारतीय हिंदी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद १९२५ मध्ये कानपूर येथे भरलेल्या अखिल भारतीय कविसंमेलनाचे अध्यक्षपद १९२६ मधील चौथ्या प्राच्यविद्या परिषदेच्या हिंदी विभागाचे अध्यक्षपद ही बहुमानाची पदे त्यांनी भूषविली.

त्यांनी विपुल काव्यलेखन तसेच अभ्यासपूर्ण गद्यलेखनही केले. नागरी प्रचारिणी सभेने त्यांच्या बहुतांश कृतींचे संग्रह (रत्नाकर-२ भागांत, १९४६ आणि रत्नाकर के संपूर्ण काव्योंका संग्रह, १९५०) प्रसिद्ध केले आहेत. त्यांच्या काही महत्त्वपूर्ण काव्यकृती अशा : हिंडोला (१८९४), समालोचनादर्श (पोपच्या एसेज ऑन क्रिटिसिझमचे रोला छंदात भाषांतर, १९१९), कलकाशी, शृंगार-लहरी, गंगावतरण (१९२७), वीराष्टक (१९२८), उद्धव शतक (१९२९) इत्यादी.

सुधाकर (१८८७), कविकुल कंठाभरण (१८८९), दीपप्रकाश (१८८९), हम्मीरहठ (१८९३), समस्यापूर्ती (१८९४), नखशिख (१८९६), सुजानसागर (१८९७), बिहारी रत्नाकर (१९२२) इ. ग्रंथांचे संपादन त्यांनी केले. यांव्यतिरिक्त्त भाषा, व्याकरण, छंद, काव्यशास्त्र, कविचरित्र इ. विषयांवर तसेच काही ऐतिहासिक विषयांवरही त्यांनी सखोल अभ्यासपूर्ण लेख लिहिले. त्यांची प्रतिभाशक्त्ती, सखोल अध्ययन व मर्मग्राही दृष्टी यांचा प्रत्यय त्यांच्या या सर्वच लेखनातून येतो. हरिद्वार येथे त्यांचे निधन झाले.

संदर्भ : १. जायस्वाल, उषा, रत्नाकर और उनका काव्य, वाराणसी, १९५६.

२. भट्ट, विश्वंभरनाथ, रत्नाकर : उनकी प्रतिभा और कला, दिल्ली, १९५७.

३. शुक्ल, कृष्णशंकर, कविवर-रत्नाकर, वाराणसी, १९५०.

दुबे, चंदूलाल द्रविड, व्यं. वि.