स्किडमोर, ओविंग्ज अँड मेरिल (एस्ओएम्) : अमेरिकेच्या संयुक्त संस्थानातील आंतरराष्ट्रीय कीर्तीची वास्तुनिर्मिती संस्था. लुई स्किडमोर (१८९७ — १९६२) आणि नथॅन्यल ओविंग्ज (१९०३ — ८४) यांनी १९३६ मध्ये शिकागो ( अमेरिका ) येथे तिची स्थापना केली. पुढे तिची एक शाखा न्यूयॉर्कमध्ये सुरू करण्यात आली (१९३७). जॉन ओ. मेरिल (१८९६ — ७५) हे १९३९ मध्ये कंपनीचे अधिकृत भागीदार झाले. स्किडमोर आणि ओविंग्ज हे कंपनीचे प्रमुख कल्पक रचनाबंधकार आणि सर्वेसर्वा होते. कंपनीचा प्राथमिक उद्देश देखण्या व उपयुक्त वाणिज्य इमारती बांधणे हा होता. अल्पकाळातच या कंपनीची ख्याती ‘ग्लास बॉक्स’ आकृतिबंधाच्या वास्तुपद्धतीमुळे जगभर प्रसृत झाली. या वास्तूचे मानचित्र ( आराखडा ) विशेषत्वाने वाणिज्य इमारतींसाठी बांधलेल्या भव्य व उत्तुंग वास्तूंतून दृग्गोचर होतो. दुसर्या महायुद्धानंतर या कंपनीने काचेचे आवरण असलेल्या पडदींच्या तंत्राचा वापर करून शेकडोंनी ⇨ गगनचुंबी इमारतीं चे बांधकाम केले. या बांधकामासाठी कंपनीने अनेक प्रसिद्ध व तज्ज्ञ स्थापत्य अभियंते, अभिकल्पक अभियंते आणि अंतरंग अभिकल्पक यांच्या नियुक्त्या केल्या. त्यांपैकी गॉर्डन बनशॅफ्ट, नताली दी ब्लॉइस, मिरान गोल्डस्मिथ, ब्रूस ग्रॅहम, फझलूल रेहमान खान, डेव्हिड चाइल्ड्स, बिल बेकर इत्यादींच्या अथक प्रयत्नांतून आणि मौलिक सहकार्यातून विविध उत्तुंग, देखण्या व वैशिष्ट्यपूर्ण वास्तूंची निर्मिती झाली. त्याचे आदर्श उदाहरण गॉर्डन बनशॅफ्ट या अभिकल्पक अभियंत्याने आकृतिबंध केलेल्या न्यूयॉर्क शहरातील ‘ लिव्हर हाउस ’ (१९५२) या वास्तूत प्रथम पाहावयास मिळते. बनशॅफ्ट त्यावेळी कंपनीचा एक भागीदार बनला. अशा प्रकारच्या वास्तू कंपनीने इतरत्रही बांधल्या. त्यांपैकी काही महत्त्वाच्या व प्रसिद्ध वास्तू पुढील होत : इस्तंबूल हिल्टन हॉटेल ( तुर्कस्तान, १९५५), एअर फोर्स ॲकॅडेमी ( कोलोरॅडो, अमेरिका, १९५८), जॉन हँकॉक सेंटर ( शिकागो, १९६९), हाजी टर्मिनल ( जेद्दा, सौदी अरेबिया, १९७२), ऑलिंपिक टॉवर (न्यूयॉर्क, १९७२), सिटी सेंटर स्क्वेअर (कॅनझस सिटी, १९७७), मॅरियट वर्ल्ड ट्रेड सेंटर (न्यूयॉर्क,२००१), बुर्ज खलिफा ( दुबई, २०१० ), अल् हमरा टॉवर ( कु वेत,२०११ ), नाटो हेडक्वार्टर्स (ब्रूसेल्स, बेल्जियम, २०१२). यांपैकी ‘ बुर्ज खलिफा ’ ही सर्वांत उंच इमारत असून तिचे बांधकाम बिल बेकर याच्या मार्गदर्शनाखाली झाले. त्याने मनोर्याला आधार देण्यासाठी पडभित अंतरक टेकूच्या संरचनात्मक पद्धतीचा वापर करून, तीत षट्कोणी अंतरकाला पुन्हा तीन टेकूंचा आधार देऊन वास्तूला इंग्रजी Y ( वाय् ) अक्षराचा आकार दिला आहे तर फजलूल रेहमान खान याने ‘ जॉन हँकॉक सेंटर ’ साठी नियतरीती ( ॲल्गोरिदम ) विकसित करून ही व अन्य वास्तू बांधल्या. एस्ओएम् या कंपनीने सु. ५० देशांत दहा हजारांहून अधिक वास्तुप्रकल्पांचे बांधकाम केले असून त्यांची कार्यालये शिकागो, न्यूयॉर्क, सॅन फ्रॅन्सिस्को, वॉशिंग्टन डी. सी., लंडन, हाँगकाँग, दुबई, मुंबई, शांघाय इ. शहरांतून कार्यरत आहेत. वास्तूबांधकामाव्यतिरिक्त कंपनीने रेल्वेरूळ, रस्ते इ. पायाभूत प्रकल्पांद्वारे सेवा दिली आहे. उत्कृष्ट बांधकामासाठी गुणवत्तेवर आधारभूत १,४०० पुरस्कार या कंपनीलालाभले आहेत. (चित्रपत्र).
देशपांडे, सु. र.