हार्‌ग्रीव्ह्‌ज, जेम्स : (बाप्तिस्मा ८ जानेवारी १७२०–२२ एप्रिल १७७८). स्पिनिंग जेनी या सूतकताई यंत्राचे ब्रिटिश संशोधक. त्यांनी प्रथमच व्यवहारोपयोगी बहुविध सूतकताई करता येणारे यंत्र तयार केले.

 

हार्‌ग्रीव्ह्‌ज यांचा जन्म स्टॅनहिल (लँकाशर) येथे झाला. त्यांचे औपचारिक शिक्षण झाले नव्हते, तरी त्यांना यंत्रशास्त्रामध्ये रस होता. ते स्टॅनहिल येथे सुतारकाम व विणकामाचा व्यवसाय करीत होते (१७४०–५०). जेनी या त्यांच्या मुलीने अचानकपणे चरखा जरूरीपेक्षा जास्त वेगाने फिरविला आणि त्यावरून त्यांना हाताच्या साह्याने चालविता येणाऱ्या बहुविध सूतकताई यंत्राची कल्पना सुचली. त्यांनी अनेक चरख्यांची चाती उभ्या दिशेत वळवून ओळीत ठेवण्याचे काम केले. त्यानंतर त्याला चौकट जोडून कापसाचे कच्चे गुंते ओढून धागा तयार होईल अशी योजना केली. त्यांनी १७६४ मध्ये तयार केलेल्या स्पिनिंग जेनी यंत्रात अनेक चात्या घातल्या होत्या आणि त्या सर्व एकाच चक्राद्वारे फिरविल्या जात. हे यंत्र चालविणारा कामगार एका हाताने चाक फिरवून सर्व चात्यांवर सूत एकसारखे गुंडाळण्यासाठी दुसऱ्या हातातील पट्टीचा उपयोग करीत असे. हार्ग्रीव्ह्ज यांना १२ जुलै १७७० रोजी जेनी यंत्राचे एकस्व मिळाले. आपल्या कुटुंबाला मदत करण्याकरिता त्यांनी यंत्रांची विक्री करण्यास सुरुवात केली परंतु स्थानिक सूतकताईदारांनी बेकारीचे संकट पाहून अनेक जेनी यंत्रांची होळी केली व हार्ग्रीव्ह्ज यांना शहराबाहेर हाकलले.

 

हार्‌ग्रीव्ह्‌ज यांनी नॉटिंगहॅम येथे थॉमस जेम्स यांच्याबरोबर भागीदारी-मध्ये सूतगिरणी स्थापन केली व ती भरभराटीस आणली. या गिरणीत होजियरीकरिता धागा तयार करण्यासाठी जेनी यंत्रांचा वापर करण्यात आला. हार्ग्रीव्ह्ज यांच्या संशोधनामुळे विणकऱ्यांना कापड बनविण्यासाठी पुरेसे धागे उपलब्ध झाले. अन्य उत्पादकांनीही जेनी यंत्रांचा वापर केला परंतु हार्ग्रीव्ह्ज यांना त्याबद्दल काहीही मोबदला मिळाला नाही.

 

हार्‌ग्रीव्ह्‌ज यांनी शोधून काढलेल्या यंत्रापासून बनविलेले सूत विणकामामध्ये आडव्या स्थितीत (बाणा) वापरता येत नव्हते, तसेच या यंत्राने सूत कातताना ते वारंवार तुटत होते. हे दोष दूर करण्याचे काम ⇨ सॅम्युएल क्रॉम्प्टन व ⇨ सर रिचर्ड आर्कराइट यांनी केले. त्यांनीजेनी यंत्राच्या कार्यात सुधारणा करून एक नवीन प्रकारचे यंत्र बनविले. त्यामुळे त्यातून निघणारे सूत विविध प्रकारांचे व अतिशय जलद गतीनेमिळू लागले. तसेच सूत बारीक व बळकट असल्यामुळे सुताची उत्पादनक्षमता वाढली.

 

हार्‌ग्रीव्ह्‌ज यांचे नॉटिंगहॅम येथे निधन झाले.

 

  कुलकर्णी, सतीश वि.