खंदकज्वर : रिकेट्‌सिया क्विंटाना या जंतूच्या संसर्गामुळे होणाऱ्या संक्रामक रोगाला ‘खंदकज्वर’ म्हणतात.

पहिल्या महायुद्धात मध्यपूर्वेत आणि फ्रान्समध्ये खंदकात एकत्र रहावे लागलेल्या सैनिकांमध्ये हा रोग प्रथम दिसून आला. या रोगाचे जंतू उवेमार्फत एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीत जातात. उवेच्या शरीरात या ⇨ रिकेट्‌सिया  जंतूची वाढ होते बहुधा ऊ चावल्यामुळे जंतू शरीरात प्रवेश करीत नसावेत, परंतु त्या जागी खाज सुटून खाजविले गेल्यामुळे उवेच्या विष्ठेत असलेले जंतू त्वचेत शिरत असावेत.

लक्षणे : १० ते ३० दिवसांच्या परिपाक कालानंतर (रोग जंतूंनी शरीरात प्रवेश केल्यापासून रोगलक्षणे दिसेपर्यंतचा काळ) एकदम थंडी भरून ताप येतो, तो ३८ ते ४० से. इतका चढतो. डोके दुखणे, घेरी येणे, पायात व पाठीत वेदना होणे, डोळे लाल होणे ही लक्षणे असून रोगी अत्यंत अस्वस्थ होतो. प्लीहावृद्धी (पांथरीची वाढ) होते. वारंवार घाम येऊन पुन:पुन्हा ताप चढतो. छाती व पोटाच्या त्वचेवर लाल पुरळ दिसतो. प्रत्यावर्ती (थांबून थांबून पुन्हा होणाऱ्या) प्रकारात असा पुरळ पुन:पुन्हा दिसतो. ज्वर ५-६ दिवसांनंतर उतरतो पण पुन्हा चढतो. तापाच्या चढउतार कित्येक महिने टिकतो त्यामुळे अशक्तपणा फार येतो.

निदान : आंत्रज्वर (टायफॉइड), टायफस वगैरे ज्वरांपासून व्यवच्छेदक (दोन सारखी लक्षणे दाखविणाऱ्या रोगांतील सूक्ष्म फरक ओळखून) निदान करण्यासाठी पूर्ववृत्ताची मदत होते. विशिष्ट प्रकारच्या रक्त तपासणीनेही निदान करतात.

चिकित्सा : क्लोरँफिनिकॉल आणि टेट्रासायक्लीन या प्रतिजैव (अँटिबायॉटिक) औषधांचा चांगला उपयोग होतो. इतर चिकित्सा लक्षणावर्ती असते. प्रतिबंधासाठी डीडीटीसारखी उवानाशक औषधे वापरतात.

अभ्यंकर, श. ज.