परिहृदयशोथ : (पेरिकार्डायटिस). हृदय ज्या पिशवीसारख्या तंत्वात्मक लसी-कला (पातळ पटलयुक्त अस्तराच्या) आच्छादनात असते त्याला पारिहृदय म्हणतात व त्याच्या दाहयुक्त सुजेला परिहृदयशोथ म्हणतात. अगदी बाहेरच्या ‘तंत्वात्मक परिहृदय’ म्हणतात. या बाह्यावरणाच्या आत लसी-कलेचे पातळ आवरण असून ते बंद पिशवीसारखे असते. त्याचे दोन थर असतात. तंत्वात्मक जाड आवरणाला जो थर तंत्वात्मक परिहृदयाच्या अगदी जवळ म्हणजे त्याला लागूनच असतो, त्याला ‘भित्तीय परिहृदय’ म्हणतात. हृदयाला चिकटून असणाऱ्‍या थराला ‘अंतस्त्यसंबंधी परिहृदय’ म्हणतात. या दोन्हीपैकी कोणत्याही एका किंवा दोन्ही थरांचा शोथ उत्पन्न होऊ शकतो. परिहृदयशोथ नुसताच म्हणजे परिहृदयापुरता मर्यादित किंवा हृद‌्स्नायुशोथासहित किंवा हृदंतस्तरशोथासहितही (हृदयाच्या आतील अस्तराच्या शोथासहितही) असू शकतो. 

शवपरीक्षांच्या अभ्यासावरून या विकृतीच्या जागतिक प्रादुर्भावाचे प्रमाण १% ते १६% या दरम्यान असावे. एके काळी न्यूमोकोकाय आणि क्षयरोगाचे सूक्ष्मजंतू यांमुळे नेहमी उद‌्भवणाऱ्‍या या विकृतीचे प्रमाण प्रतिजैव (अँटिबायॉटिक) औषधे व रसायन चिकित्सा यांच्या वापरापासून एकदमच कमी झाले आहे. प्रतिबंधात्मक इलाजामुळे या रोगांचा संधिवात विकारजन्य प्रकारही कमी झाला आहे. अलीकडे ‘तीव्र सौम्य परिहृदयशोथ’ नावाचा प्रकार अधिक आढळतो.   

परिहृदयशोथाचे निरनिराळ्या प्रकारांनी वर्गीकरण करता येते. त्यांपैकी एक पुढीलप्रमाणे आहे. (१) तीव्र प्रकार : (अ) तीव्र तंतुमय परिहृदयशोथ, (आ) आर्द्र परिहृदयशोथ. (२) चिरकारी प्रकार : (अ)  आसंजक परिहृदयशोथ, (आ) चिरकारी संकोची परिहृदयशोथ.

तीव्र प्रकार : (अ) तीव्र तंतुमय परिहृदयशोथ : इतर सर्व प्रकारांपेक्षा अधिक प्रमाणात आढळणाऱ्‍या या विकृतीतील शोथ शुष्क म्हणजे अत्यल्प द्रवोत्पादन असलेला किंवा संपूर्ण कोरडा असतो. पुष्कळ वेळा संधिज्वरजन्य असलेला हा रोग सूक्ष्मजंतुजन्य, क्षयरोगजन्य किंवा व्हायरसजन्यही असू शकतो. हृद‌्स्नायू अभिकोथ (आकस्मिक रक्तपुरवठा थांबल्या पेशी समूहाचा होणारा मृत्यू), छातीचे आघात, हृदयावरील शस्त्रक्रिया, छातीतील अर्बुदे (नवीन पेशींच्या अत्यधिक वाढीमुळे निर्माण होणाऱ्‍या गाठी) आणी मूत्रविषरक्तता (रक्त्तामध्ये मूत्रातील घटक शिरल्यामुळे निर्माण होणारी विषमय अवस्था) यांमध्येही हा रोग होण्याची शक्यता असते. तरुण वयात अविशिष्ट (कोणतेही विशिष्ट कारण नसलेला ) प्रकारही आढळतो.

 रोगाची सुरुवात ज्वर आणि अंगदुखी यांसारख्या अल्प जाणवणाऱ्‍या लक्षणांनी, तसेच हळूहळू किंवा थडथडून थंडी वाजणे, छातीत पुरोहृद् भागात ( छातीच्या डाव्या बाजूस हृदयाच्या पुढे असलेल्या छातीच्या भित्तीच्या भागात) ताव्र वेदना होणे, अस्वस्थता, जलद व उथळ श्वासोच्छ‌्वास यांसारख्या तीव्र लक्षणांनी होते. कधीकधी हा रोग लक्षणविरहितही असतो. अल्प, मध्यम किंवा जोरदार स्वरूपाच्या छातीतील वेदना हे प्रमुख लक्षण असते. वेदना पुरोहृद् भागात बहुतकरून होत असल्या, तरी डावा खांदा, डावी भुजा, डावी स्कंधास्थी, मानेची डावी बाजू या ठिकाणी त्या जाणवण्याची शक्यता असते. पुरोहृद् भागात श्रवणयंत्राने (स्टेथॉस्कोपने) ऐकल्यास विशिष्ट घर्षणध्वनी ऐकू येणे ही या रोगाची विशेष खूण समजली जाते. विद्युत् हृल्लेखात (हृदयस्नायूंच्या आकुंचनामुळे निर्माण होणारा विद्युत् प्रवाह दर्शविणाऱ्‍या आलेखात) विशिष्ट बदल आढळतात. रक्ततपासणीमध्ये श्वेतकोशिकाधिक्य (पांढऱ्‍या पेशींचे आधिक्य) विशेषेकरून बहुरूप केंद्रक (ज्यांतील केंद्रकाचे–कोशिकेच्या कार्यावर नियंत्रण ठेवणाऱ्‍या जटिल गोलसर पुंजाचे–अनेक खंड पडलेले आहेत अशा) कोशिकांची संख्या वाढलेली आढळते.

आर्द्र परिहृदयशोथ :(अ) प्राकृतिक स्थिति: (आ) आर्द्र परिहृदयशोथ झालेली .स्थिती.

(आ) आर्द्र परिहृदयशोथ : ज्या परिहृदयशोथात परिहृदयाच्या पिशवीत द्रवोत्पादन व द्रवसंचय होतो, त्या शोथाला आर्द्र परिहृदयशोथ म्हणतात. द्रवप्रकार हा रक्तमिश्रित द्रव किंवा पूही असू शकतो. ज्या कारणामुळे तीव्र तंतुमय परिहृदयशोथ उद‌्भवतो, तीच कारणे या रोगासही कारणीभूत होतात. सूक्ष्मजंतूंच्या प्रकारावर द्रवप्रकार अवलंबून असतो. पूयजनक सूक्ष्मजंतू पूमय द्रव तयार करतात. क्षयरोगाचे सूक्ष्मजंतू किंवा कर्करोग बहुतकरून रक्तमिश्रित द्रव तयार करतात. सुरुवातीची लक्षणे तंतुमय प्रकारासारखीच असतात. द्रवसंचय होताच घासणारे परिहृदयाचे भाग एकमेकांपासून अलग होऊन घर्षणध्वनी ऐकू येत नाही परंतु द्रवामुळे अंतःपरिहृदस्थ दाब वाढून हृदयाच्या क्रियेत अडथळा येतो. रोगी सचिंत आणि साशंक बनून अस्वस्थ होतो. ऊर्ध्वस्थ-श्वसन (बसल्या किंवा उभ्या अवस्थेतच सहज श्वसन करू शकणे व इतर कोणत्याही अवस्थेत श्वसन त्रासदायक असणे) करू लागतो. पुरोहृद् भाग परिताडन पद्धतीने तपासल्यास हृदयाच्या नेहमीच्या क्षेत्रात वाढ झाल्याचे आढळते. नाडी विरोधाभासी म्हणजे श्वास आत घेतेवेळी अगदी क्षीण आणि उच्छ्वासात जोराने चालणारी लागते. तिची गती वाढलेली असते. प्रत्येक अंतःश्वसनाच्या वेळी मानेतील नीलांमधील रक्त हृदयात पूर्ण न उतरल्यामुळे त्या फुगलेल्या दिसतात. उदरावर किंवा यकृतावर हाताने दाबून ठेवल्यास मानेतील नीला फुगीर बनतात. या लक्षणाला ‘पाश्चर खूण’ किंवा ‘यकृत-ग्रीवा नीला पश्चवहन’ म्हणतात. यकृताचे आकारमान वाढून ते स्पर्शासह्य बनते. क्ष-किरण तपासणीत प्रौढामध्ये द्रव जर २५० मिलि. पेक्षा जास्त असेल आणि लहान मुलात १०० मिलि. पेक्षा जास्त असेल, तरच तो स्पष्ट दिसतो. विद्युत् हृल्लेख निदानास उपयुक्त असतो. परिहृदयाच्या पिशवीत हवा भरून कृत्रिम वातपरिहृदय तयार करून नंतर घेतलेल्या क्ष-किरण चित्रणात द्रवाचे प्रमाण, हृदयाचे आकारमान वगैरेंबद्दल अधिक स्पष्ट माहिती मिळते.

 तीव्र हृद्संपीडन ही विकृती आर्द्र परिहृदयशोथाचा एक गंभीर उपद्रव ठरण्याची शक्यता असते. अंतःपरिहृदस्थ दाब वाढून निलयात (हृदयाच्या खालच्या कप्प्यात) रक्त भरण्यात अडथळा येतो. तसेच हृदयस्नायूंच्या आकुंचनात व्यत्यय येतो तेव्हा जो लक्षणसमूह उत्पन्न होतो त्याला ‘तीव्र हृदयसंपीडन’ म्हणतात. फुप्फुसे, मध्यावकाशातील अंतस्त्ये (परिफुप्फुसाच्या पिशव्यांच्या मधल्या भागातील इंद्रिये), ऊर्ध्वस्थ महानीला व अधःस्थ महानीला आणि यकृतनीला यांवर दाब पडून आवाजरहित हृदयक्रिया, विरोधाभासी नाडी, आकारमान वाढलेले यकृत आणि नीलारक्तदाब वृद्धी ही लक्षणे उद‌्भवतात. परिहृदय-पारवेध करून द्रव काढून टाकणे हा एकमेव तातडीचा इलाज उपयुक्त असतो.

 वर वर्णन केलेल्या दोन्ही प्रकारच्या परिहृदयशोथांमध्ये मूळ कारण शोधून त्यावर इलाज करणे जरूर असते. योग्य त्या प्रतिजैव औषधांचा चांगला उपयोग होतो. आर्द्र परिहृदयशोथात हृदयावर तीव्र दाब पडणार नाही, याची काळजी घ्यावी लागते. कष्टश्वसन, ऊर्ध्व-श्वसन, नीलविवर्णता (रक्ताचे अपुरे ऑक्सिजनीकरण झाल्यामुळे त्वचेला निळसरपणा येणे), तीव्र हृदयसंपीडन यांसारख्या उपद्रवांकरिता परिहृदय-पारवेध करावा लागतो.


चिरकारी प्रकार : (अ) आसंजक परिहृदयशोथ : परिहृदयाच्या भित्तीय आणि अंतस्त्यसंबंधी थरांमध्ये किंवा परिहृदय आणि त्याच्या जवळपासची अंतस्त्ये, उदा.,परिफुप्फुस, यांमध्ये जेव्हा शोथजन्य बंध तयार होतात तेव्हा त्या विकृतीला ‘आसंजक परिहृदयशोथ’ म्हणतात. अगदी अलीकडील काळापर्यंत अशा प्रकारचे बंध हेच हृदयाच्या मोठ्या आकारमानवाढीचे कारण समजले जात असे. प्राण्यांवरील प्रयोगान्ती आकारमानवाढीचा आणि बंधांचा संबंध नसल्याचे सिद्ध झाले आहे. ही विकृती लक्षणविरहितही असू शकते व जेव्हा लक्षणे दिसतात तेव्हा ती बंधाची जागा, संख्या, आकारमान यांवर अवलंबून असतात. विशिष्ट जागी असलेला एखादाच बंध जेवढा हानिकारक असू शकेल तेवढेच इतरत्र विखुरलेले चारपाच बंधही अनपकारी असू शकतील. रोगनिदानाकरिता काही विशिष्ट लक्षणे, क्ष-किरण चित्रण आणि विद्युत् हृल्लेख उपयुक्त असतात. ही विकृती यांत्रिकीय स्वरूपाची असल्यामुळे औषधी उपचार निरर्थक असतात. हृदयावरणोच्छेदनासारख्या शस्त्रक्रिया उपयुक्त असतात. १९०३ च्या सुमारास या प्रकारच्या शस्त्रक्रियांचे मृत्यु-प्रमाण फार मोठे असावयाचे. अलीकडे ते ५ ते १२% च्या दरम्यान असते. जेवढे लवकर निदान होऊन शस्त्रक्रिया केली जाईल, तेवढा चांगला व टिकाऊ परिणाम लवकर मिळण्याची शक्यता असते.

(आ) चिरकारी संकोची परिहृदयशोथ : १८४२ च्या सुमारास चेव्हर्स नावाच्या शास्त्रज्ञांनी प्रथम वर्णन केलेली ही विकृती अलीकडील नव्या शस्त्रक्रिया तंत्रामुळे पुष्कळ वेळा बरी होणारी आढळल्यापासून तिच्याकडे अधिक लक्ष पुरविले जात आहे. घट्ट आणि दृढ झालेल्या परिहृदयाच्या एका किंवा दोन्ही थरांच्या पिशवीत हृदय आवळले जाऊन त्याच्या प्रसरण क्रियेमध्ये होणाऱ्‍या रक्त भरतीत अडथळा येणे म्हणजे चिरकारी संकोची परिहृदयशोथ किंवा ‘परिहृदयसंपीडन वण’ होय. परिहृदयात तंतुमय ऊतकाचा (समान रचना व कार्य असणाऱ्‍या कोशिकांच्या समूहाचा) जाड, अस्थितिस्थापक (ताण काढून टाकल्यावर मूळ स्थितीत परत न येणारा) थर बनून त्यात पुष्कळ वेळा कॅल्सीकरण (कॅल्शियम लवणे साचून ऊतक कठीण बनण्याची क्रिया) झाल्याचेही आढळते. लक्षणे संपीडनाच्या प्रमाणावर अवलंबून असतात. या विकृतीचे लवकर निदान होणे फार महत्त्वाचे असते, कारण ती शस्त्रक्रिया करून संपूर्ण बरी होऊ शकते. क्ष-किरण चित्रणात कॅल्सीकरण स्पष्ट दिसू शकते. शस्त्रक्रियेनंतरही कित्येक महिन्यांपर्यंत वैद्यकीय देखभाल फार जरूरीची असते.

संदर्भ :1. Beeson, P.B. McDermott, W.,Ed. Texbook of Medicine,Tokyo, 1975.

    2. Davidson, S. McLeod, J., Ed. The Principles and Practice of Medicine, Edinburgh, 1973.

    3. Vakil, R. J. Textbook of Medicine, Bombay, 1969.

ढमढेरे, वा. रा. भालेराव, य. त्र्यं.