सूक्ष्मजंतुजन्य वनस्पतींचे रोग : काही वनस्पतिरोग सूक्ष्मजंतूंमुळे होतात, हे टी. जे. बुरिल यांनी १८७८ मध्ये सिद्घ केले. सूक्ष्मजंतूंचे अस्तित्व सर्वच ठिकाणी (उदा., माती, पाणी, हवा इ.) असते. सामान्यतः सूक्ष्मजंतू लांबट गोल (दंडगोल) किंवा गोल (वर्तुळाकार) आकाराचे असतात. त्यांची पुनरुत्पत्ती कोशिकाविभाजनामुळे होते.

सूक्ष्मजंतूंचा वनस्पतींमध्ये प्रवेश पुढील प्रकारांनी होतो : (१) नैसर्गिक छिद्रे व त्वग्रंध्रे (अपित्वचेतील सूक्ष्म रंध्रे), (२) जखमा, (३) मूलरोम (पाणी व जमिनीतील खनिजे शोषून घेणाऱ्या मुळावरील बारीक नलिकाकार वाढी ) व (४) किंजल्क (ज्यावर पराग पडून रुजतात, तो फुलाचा भाग). सूक्ष्मजंतूंमुळे होणाऱ्या रोगांत पानांवरील ठिपके, अधिवृद्घी व मर हे रोग मुख्यत्वे आढळतात. पानांवरील ठिपक्यांत रोगकारक सूक्ष्मजंतू त्वग्रंध्रे, जलप्रपिंडे (ज्यातून पाणी बाहेर टाकले जाते अशी पानाच्या शिरेच्या टोकाला असलेली रंध्रे) व जखमा यांद्वारे प्रवेश करतात आणि कोशिकांतील अन्नशोषण करुन वाढतात. परिणामी कोशिका मरतात व त्याजागी पानांवर पिवळे ठिपके पडतात. काही रोगांत जंतूंचा पानांत शिरकाव झाल्यावर ते वाहक वृंदात प्रवेश करतात व तेथे त्यांची वाढ झाल्याने झाड मरते (उदा., बटाट्याचा बांगडी रोग). इतर काही रोगांत पानांत शिरलेल्या जंतूंची वाढ शीघ्र गतीने होते आणि संपूर्ण पाने व फांद्या जळून गेल्यासारख्या दिसतात. कूज या रोगाच्या प्रकारात कोशिकांना जोडणाऱ्या मध्यपटलावर रोगकारक सूक्ष्मजंतू हल्ला करतात. त्यामुळे कोशिका अलग होतात व मरतात. इतर सूक्ष्मजंतूंच्या क्रियेमुळे तो भाग कुजून घाण सुटते (उदा., बटाटे, कोबी व फुलकोबी यांची कूज). काही रोगांत रोगट जागी कोशिकांची वाढ झाल्यामुळे गाठी उद्‌भवतात व काही वनस्पतींत अनेक मुळे फुटतात.

सूक्ष्मजंतूंमुळे होणारे काही महत्त्वाचे वनस्पतिरोग पुढीलप्रमाणे आहेतः भातावरील कडा करपा लिंबावरील खैरा कपाशीवरील कोनाकार टिक्का कोबीवरील घाण्यारोग बटाट्यावरील बांगडी, कूज व खवड्या गव्हावरील तुंडू उसावरील लाल रेषेचा रोग सफरचंदावरील करपा व क्राऊन गॉल आणि वाटाण्यावरील कॉमन ब्लाइट व ब्राउन स्पॉट.

भातावरील कडा करपा : झँथोमोनस ओरिझी  या सूक्ष्मजंतूमुळे होणारा भात पिकावरील हा रोग असून तो प्रामुख्याने कोकणात आढळतो. हवेतील सापेक्ष आर्द्रता (सु. ९०%) आणि २८–३० से. तापमान या रोगाला पोषक ठरते. पानावर मध्यशिरेला समांतर असे पिवळसर पट्टे दिसतात. ते पानांच्या दोन्ही कडांनी खाली वाढत जातात. रोगट बी व पेंढा यांच्याद्वारे हा रोग पसरतो.

उपाय : रोगग्रस्त पीक काढून घेतल्यावर शेतातील बुडखे व इतर काडीकचरा गोळा करुन जाळून टाकतात. पेरणीपूर्वी बियांना १% पारायुक्त कवकनाशक लावतात. पिकाला नायट्रोजनयुक्त खत कमी प्रमाणात अथवा उशिरा देतात. रोगग्रस्त शेतातील पाणी कमी केल्याने रोगाचे अंशतः नियंत्रण होते. स्ट्रेप्टोसायक्लीन ७·५ ग्रॅ. व ९०% कॉपर ऑक्सिक्लोराइडे १,२५० ग्रॅ. ही दोन्ही ५०० लि. पाण्यात मिसळून पिकावर फवारतात. रत्नागिरी ६८-१, रत्ना आणि आयआर २० व २२ हे भाताचे प्रकार या रोगास कमी प्रमाणात बळी पडतात.

लिंबावरील खैरा : हा कागदी लिंबाच्या झाडावरील रोग फायटोमोनस सिट्री  नावाच्या सूक्ष्मजंतूमुळे होतो. पानांची खालची बाजू, कोवळ्या फांद्या व फळे यांवर प्रथम लहान वाटोळे, पिवळसर बदामी रंगाचे ठिपके दिसतात. त्यांचे आकारमान मोठे होऊन ते फोडांसारखे वाढतात आणि फुटल्यावर बाजूच्या फोडात मिसळून स्पष्टपणे दिसणारे कठीण व्रण तयार होतात. फोडांचा वरचा पृष्ठभाग खोलगट असतो. पावसाळी किंवा दमट हवामानात या रोगाचे प्रमाण इतर ऋतूंपेक्षा जास्त असते. पावसाच्या थेंबांमुळे फोडातील सूक्ष्मजंतूंमार्फत रोग झाडाच्या सर्व भागांवर पसरतो. रोगाचे प्रमाण जास्त असल्यास पाने गळतात व फांद्या जळतात.

उपाय : हिवाळ्यात सर्व रोगट फांद्या, फळे व पाने गोळा करुन जाळतात. झाडावर प्रथम ०·८% व त्यानंतर दर दोन महिन्यांनी अथवा कमी मुदतीने ०·६% कसाचे बोर्डो मिश्रण फवारतात. या उपायांनी हा रोग पुष्कळसा नियंत्रणाखाली राहतो.

कपाशीवरील कोनाकार टिक्का : हा रोग झँथोमोनस माल्व्हेसिॲरम   या सूक्ष्मजंतूमुळे होतो. तो विशेषतः अमेरिकन (गॉसिपियम हिरसुटम ) व ईजिप्शियन (गॉ. बार्बाडेन्स ) जातींवर मोठ्या प्रमाणावर पडतो. भारतीय कपाशीवर (गॉ. हर्बेशियम  व गॉ. अर्बोरियम ) तो मोठ्या प्रमाणावर आढळतो. या रोगामुळे पानांवर कोनाकार ठिपके पडून खोड, देठ व पर्णशिरा काळ्या पडतात. बोंडे व कळ्यांवर काळसर वाटोळे डाग आढळतात. रोगट पाने, बोंडे व कळ्या गळून पडतात. रोगामुळे झाडाच्या लहान फांद्या काळ्या पडतात, म्हणून त्याला ‘ब्लॅक आर्म’ म्हणतात. रोगप्रतिकारक जाती लावणे इष्ट ठरते.

कोबीवरील घाण्यारोग : हा झँथोमोनस कँपेस्ट्रिस  या सूक्ष्मजंतूमुळे होतो. त्याचा प्रसार बियांद्वारे होतो. या रोगाच्या बंदोबस्तासाठी बियांवर जलविद्राव्य (पाण्यात विरघळणाऱ्या) पारायुक्त कवकनाशकाची २५–३० मिनिटे प्रक्रिया करुन रोप टाकतात. तसेच बियांवर उष्णजल प्रक्रिया (५००से. तापमानाला २५–३० मिनिटे) करतात. रोगाचा प्रादुर्भाव दिसून आल्यावर पिकास कमी व जास्त अंतराने पाणी देतात. तीव्र रोगाने गड्डे अजिबात तयार होत नाहीत.

बटाट्यावरील रोग : बांगडी : हा रोग स्यूडोमोनस सोलॅनेसिॲरम   या सूक्ष्मजंतूमुळे होतो. याचा प्रादुर्भाव रोगग्रस्त बेण्यामधून अथवा रोगग्रस्त शेतामधून होतो. खोड, मुळे, भूमिगत खोड व बटाटे यांमधील वाहक ऊतकांमध्ये (द्रव पदार्थ वाहून नेणाऱ्या कोशिकांच्या समूहांमध्ये) जंतूंची वाढ होते. झाडे कोमेजून मरतात. रोगट बटाटे कापल्यास आत बांगडीच्या आकाराचा काळसर कडा असलेला भाग दिसून येतो. तो दाबल्यावर त्यातून पांढरा चिकट पदार्थ बाहेर पडतो. त्यात रोगाचे जंतू फार मोठ्या संख्येने असतात.

कूज : हा रोग जमिनीतील एर्विनिया कॅरोटोव्होरा  या सूक्ष्मजंतूमुळे होतो. त्यामुळे उभी झाडे वाळतात आणि जमिनीलगतचा खोडाचा रंग काळा पडतो. रोगाचे जंतू खरचटलेल्या जागेतून बटाट्यात प्रवेश करतात. त्यामुळे साठवणीमधील बटाट्यांचे फार नुकसान होते.

उपाय : बटाट्याची काढणी, वाहतूक व साठवण यांमध्ये बटाटे एकमेकांना घासले न जातील अशी काळजी घेणे आणि लागवडीचे /पेरणीचे बेणे निर्जंतुक करणे.

खवड्या : स्ट्रेप्टोमायसीज स्कॅबीज  या सूक्ष्मजंतूमुळे बटाट्यावर १ सेंमी. व्यासाचे व ३ मिमी. खोलीचे खड्डे पडतात, त्यामुळे त्याची प्रत खालावते. अशा बटाट्यांना बाजारात कमी भाव मिळतो.

उपाय : लागवडीसाठी रोगमुक्त बेणे वापरणे. अल्कधर्मी जमिनीत या रोगाचे प्रमाण जास्त असल्यामुळे जमीन अल्कधर्मी होईल अशी वरखते वापरु नयेत.


 गव्हावरील तुंडू : या रोगास यलो इअर रॉट किंवा बॅक्टिरियल रॉट ऑफ इअर व यलो स्लाईम डिसीज अशी नावे आहेत. हा रोग क्लॅव्हीबॅक्टर ट्रीक्ट्री  या सूक्ष्मजंतू मुळे होतो. हा भारतात सर्वत्र आढळणारा रोग असून तो बहुतेक वेळा सूत्रकृमीसोबत पिकांवर पडतो. या सूक्ष्मजंतूचा वनस्पतीच्या शरीरात प्रवेश होण्यासाठी सूत्रकृमीची (नेमॅटोड) गरज असते. एकदा सूक्ष्मजंतूचा वनस्पतीच्या शरीरात प्रवेश झाल्यावर तो स्वतंत्रपणे जीवन जगतो.

तुंडू रोगामुळे गव्हाच्या पानाच्या खालच्या बाजूस वळ्या दिसतात. पाने मध्यभागी दुमडतात. पानावर तांबूस रंगाचा चिकट पदार्थ दिसू लागतो. हळूहळू तो खोड व पान यांवर पसरतो. यामुळे वनस्पतीची वाढ खुंटते. दमट हवामानात या स्रावाचे प्रमाण वाढते. तो झाडावरुन खाली ठिपकू लागतो. कोरड्या हवामानात हा स्राव घट्ट होतो. हा रोग पिकावर ते शेवटच्या अवस्थेत असताना आढळतो.

उपाय : ब्राईनच्या द्रावणात (१८ किग्रॅ. मीठ व ९५ लि. पाणी यांच्या द्रावणात) गव्हाचे बी बुडवावे, यामुळे सूत्रकृमी मरतात. विकृतिजन्य रोपे नष्ट करावीत. शेतामध्ये पाणी साठणार नाही याची काळजी घ्यावी. रोगमुक्त बियाणांचा वापर करावा.

उसावरील लाल रेषेचा रोग : हा रोग झँथोमोनस रुब्रीलिनिआन्स  या सूक्ष्मजंतूमुळे होतो. तो ब्राझील, क्यूबा व अमेरिकेतील लुइझिॲना राज्यात आढळतो. भारतात काही राज्यांत तुरळक प्रमाणात आढळतो. रोगट पानांवर गर्द लाल रेषा दिसतात. या रेषांच्या बाजूंना सूक्ष्मजंतूच्या स्रावाचे गोलाकार पांढुरके बिंदू दिसतात. पाणी किंवा वारा यांच्याद्वारे सूक्ष्मजंतू इतर पानांवर पडून रोगाचा प्रसार होतो. उपाय म्हणून रोगट पाने व शेंडे नष्ट करतात.

सफरचंदावरील रोग : करपा : या रोगास ‘फायर ब्लाईट’ असेही म्हणतात. हा रोग एर्विनिया अमायलोव्होरा  सूक्ष्मजंतूमुळे होतो. याचा परिणाम पाने, फांद्या व मोहर यांवर होतो. यामुळे झाडे जळाल्यासारखी दिसतात. यावर उपाय म्हणून रोगट फांद्या कापून टाकतात. सूक्ष्मजंतूंच्या नियंत्रणासाठी झाडावर औषधी फवारे मारतात. फायर ब्लाईट रोगास प्रतिकार करणाऱ्या जातीचा वापर लागवडीसाठी करतात.

क्राउन गॉल : हा रोग ॲग्रोबॅक्टिरियम ट्युमिफेसियन्स  सूक्ष्मजंतूमुळे होतो. या रोगाचे नियंत्रण करण्यासाठी रोपवाटिकेत प्रतिजैविके तयार करणाऱ्या सूक्ष्मजंतूंचा वापर केला जातो.

वाटाण्यावरील रोग : कॉमन ब्लाईट : हा रोग झँथोमोनस कँपेस्ट्रिस  या सूक्ष्मजंतूमुळे होतो. या रोगामुळे वाटाण्याच्या पानावर पिवळसर रंगाचे ठिपके तयार होतात.

ब्राउन स्पॉट : हा रोग स्यूडोमोनस सिरींगी  या सूक्ष्मजंतूमुळे होतो. या रोगामुळे पानाच्या खालील बाजूस सुकल्यासारखे ठिपके तयार होतात. वरील दोन्ही रोगांच्या नियंत्रणासाठी रोगमुक्त बियाण्यांचा वापर करणे महत्त्वाचे आहे.

पहा : ऊस कापूस कोबी बटाटा लिंबू वनस्पतिरोगविज्ञान.

संदर्भ : 1. Pelczar, M. J. and others, Microbiology, New Delhi, 1982.

    2. Sharma, P. D. Microbiology and Plant Pathology, Meerut, 2000.

पाटील, चंद्रकांत प.