रामलिंग स्वामिगळ : (१८२३ – ७४). एकोणिसाव्या शतकातील प्रख्यात तमिळ संत व प्रतिभाशाली कवी. दक्षिण अर्काट जिल्ह्यातील मरुदर येथील ते रहिवासी. एका शैव वेळ्ळाल कुटुंबात त्यांचा जन्म झाला. वयाच्या पाचव्या वर्षापासून त्यांचे वास्तव्य मद्रासला होते. चोविसाव्या वर्षी त्यांनी चिदंबरम् इ. धार्मिक स्थानांची यात्रा केली. नंतर काही वर्षे त्यांचे वास्तव्य कारुंगुली येथे होते. चिदंबरम्‌पासून सु. २० किमी. वर असलेल्या वाडळूर या गावी त्यांचे सु. चार वर्षांवर वास्तव्य होते, असे सांगतात. त्यांनी समाधी घेतली, असे मानले जाते.

त्यांनी रचलेली गीते संकलित करून त्या संग्रहास तिरुअरुट्पा म्हणजे ‘ईशकृपेची गीते’ असे नाव दिले गेले. ही सुमधुर गीते साध्या सुबोध भाषेत व सुंदर प्रवाही शैलीत रचलेली व हृदयाचा ठाव घेणारी आहेत. कवीची त्यांत प्रकट होणारी भक्तिभावना सखोल व लक्षणीय आहे. ते एक महान संत होते आणि त्यांना सर्व धर्मांच्या एकत्वाचा साक्षात्कारही झाला होता. जाती, पंथ, धर्मांतील सर्व भेदभावांकडे दुर्लक्ष करून ईश्वरभक्तांचे एकच कुटुंब आहे असे मानून सर्वांनी एकत्र यावे, असा संदेश त्यांनी दिला. त्यांचे अंतःकरण अत्यंत संवेदनाशील तसेच अपार सहानुभूतीने व करुणेने ओतप्रोत भरलेले होते आणि त्यामुळेच त्यांना मानवप्राण्याचे दुःख सहन होत नसे. पाण्याअभावी वाळून चाललेले शेतातील पीक पाहूनही त्यांचे अंतःकरण पिळवटून निघत असे. त्यांनी सर्वांनाच हत्या न करण्याचे तसेच मांसाहार न घेण्याचे आवाहन केले.

त्यांचे काही गद्यलेखनही उपलब्ध आहे पण ते त्यांच्या काव्याइतके सरस नाही. शैव सिद्धांताप्रमाणेच त्यांचीही ह्या जगाकडे पाहण्याची दृष्टी प्रेममय आहे. त्यांचा मंत्र ‘अरुट्पेरुंकोटितानिप्पेरुकरुणै’ (विश्वप्रेमाचा महान प्रकाश आणि महान व वैशिष्ट्यपूर्ण विश्वकरुणा) हा होता. सन्मार्गाबद्दल बोलताना ते सर्व धर्मांना असलेला समान मूलाधार आणि सत्त्वगुण यांवर भर देतात. जाती, पंथ, अंधश्रद्धा, वंश, संप्रदाय, वर्ग यांना त्यांचा विरोध होता. ह्या वैश्विकप्रेमानेच सर्व प्राणिमात्र एकत्र बांधलेले आहेत. ईश्वर हा प्रेम आहे आणि सर्व प्राणिमात्रांबाबत करुणा, सहानुभूती वाटणे हाच उपासनेचा खरा प्रकार आहे, असे ते मानत.

त्यांनी रचलेली गीते अतिशय लोकप्रिय आहेत. स्वतःच्या चुकांची ते उघडपणे कबुली देत आणि म्हणूनच त्यांच्याबाबत कोणासही दुरावा वाटत नसे उलट ते प्रत्येकाला अत्यंत जवळचे वाटत. त्यांच्या ह्या नैतिक-आध्यात्मिक उंची लाभलेल्या व्यक्तिमत्त्वाची अभिव्यक्ती त्यांच्या काव्यातूनही होते. त्यांच्या काव्याचे आवाहन सरळ व थेट हृदयाला भिडणारे आहे. त्यांची प्रासादिक भाषा सर्वसामान्य माणसासही कळते व त्याच्या मनाची पकड घेते. ते आपल्या गूढानुभूती निसर्गातील नेहमीच्या साध्या, सरळ दृष्टांतांनी व्यक्त करतात.

त्यांनी काही कीर्तनेही रचली. त्यांची गद्यशैली ओजस्वी आणि भावनेने ओतप्रोत आहे. मानवी करुणेवर त्यांनी लिहिलेला निबंध फारच हृद्य आहे.

यू. एम्. दुरैस्वामी पिळ्ळै यांनी रामलिंग स्वामींच्या जीवनाचा व काव्याचा चिकित्सक अभ्यास करून रामलिंग स्वामिगळ चरित्रयुम् तिरुवारुट्पा आराय्च्चियुम् (१९४९) तसेच पुदुमै वेट्टल यांनी त्यांच्या तिरुअरुट्पावर रामलिंग स्वामिगळ तिरुवुळ्ळम् (१९२९) हे तमिळ ग्रंथ रचले. त्यांच्या जीवनावर आधारित असे रामलिंग स्वामिगळ चिनिम चरित्रम् (१९३८) हे नाटकही तिरुज्ञानानंदर यांनी लिहिले.

वरदराजन्, मु. (इं.) सुर्वे, भा. ग. (म.)