डेव्हिसन, क्लिन्टन जोझेफ : (२२ ऑक्टोबर १८८१–१ फेब्रुवारी १९५८). अमेरिकन भौतिकीविज्ञ. इलेक्ट्रॉन विवर्तनाच्या (अडथळ्याच्या कडेवरून जाताना दिशेत बदल होण्याच्या) शोधाबद्दल त्यांना १९३७ चे भौतिकीचे नोबेल पारितोषिक ⇨जॉर्ज पॅजेट टॉमसन यांच्याबरोबर विभागून मिळाले. त्यांचा जन्म ब्लूमिंग्टन (इलिनॉय) येथे झाला. प्रिन्स्टन विद्यापीठातून १९११ मध्ये पीएच्.डी. पदवी मिळविल्यानंतर ते कार्नेजी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये प्राध्यापक (१९११–१७) व नंतर बेल टेलिफोन लॅबोरेटरीजमध्ये (१९१७–४६) संशोधक होते. त्यानंतर व्हर्जिनिया विद्यापीठात भौतिकीचे अभ्यागत प्राध्यापक म्हणून काम करून १९५४ मध्ये ते निवृत्त झाले.

द ब्रॉग्ली यांनी १९२४ मध्ये इलेक्ट्रॉनांना कणात्मक व तरंगात्मक अशा दोनही स्वरूपांचे गुणधर्म असतात, असा विचार सैद्धांतिक दृष्ट्या मांडला. डेव्हिसन यांनी आपले सहकारी एल्.एच्. गर्मर यांच्याबरोबर १९२७ मध्ये इलेक्ट्रॉनांच्या धातुस्फटिकांतील विवर्तनाचा शोध लावून द ब्रॉग्ली यांच्या सिद्धांताला प्रायोगिक पुरावा उपलब्ध करून दिला [⟶ इलेक्ट्रॉन विवर्तन]. त्यानंतर त्यांनी इलेक्ट्रॉन तरंगांच्या स्फटिक भौतिकी व इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शक यांतील उपयोगांसंबंधी संशोधन केले. इलेक्ट्रॉनांचे केंद्रीकरण करण्याचे तंत्रही त्यांनी विकसित केले. तसेच धातूंच्या तापायनिक उत्सर्जनासंबंधी (तापविल्यामुळे पृष्ठभागातून इलेक्ट्रॉन बाहेर पडण्यासंबंधी) त्यांनी संशोधन केले होते.

नोबेल पारितोषिकाखेरीज डेव्हिसन यांना अमेरिकेच्या नॅशनल ॲकॅडेमी ऑफ सायन्सेसचे कॉमस्टॉक पारितोषिक (१९२८) व लंडनच्या  रॉयल सोसायटीचे ह्यूझ पदक (१९३५) हे बहुमान मिळाले. ते शार्लटस्‌व्हिल (व्हर्जिनिया) येथे मृत्यू पावले.

भदे, व. ग.