कांदळ : (इं.ट्रु मॅनग्रोव्ह कं.कांदले लॅ.ऱ्हायझोफोरा मक्रोनेटा कुल ऱ्हायझोफोरेसी). हा सदापर्णी लहान वृक्ष (४.५-७.५ मी. उंच)  समुद्रकिनारी दलदलीच्या जागी, भारत (मुंबई, तमिळनाडू, अंदमान व बंगाल), श्रीलंका, सिंध ब्रह्मदेश व मलाक्का येथे शिवाय आफ्रिका व ऑस्ट्रेलिया येथेही आढळतो. साल पिंगट व त्यावर उभ्या भेगा असून खोडाला खाली अनेक आधारमुळे असतात. पाने साधी, समोरासमोर, मोठी, वरुन गर्द हिरवी, चकचकीत व खालून फिकट असून, टोकास बारीक काटा असतो. पानांच्या बगलेत दोन-तीन फुलांची वल्लरी [→पुष्पबंध]  असते फुले (ऑगस्ट-डिसेंबरमध्ये) फिकट पिवळी देठ लहान, संदले चार, पिवळट जाडसर, तिकोनी, पुढे फळावर अंशतः वेष्टन करणारी पाकळया चार, संदलापेक्षा लहान व लवदारकेसरदले आठ [→ फूल] फळ २.५-५ सेंमी. लांब, गडद पिंगट, लोंबते व त्यातून (बीज रुजल्यामुळे) बाहेर डोकावणारे लांब आदिमूळ (वनस्पतीच्या गर्भाच्या अक्षाचा खालचा भाग) असते (अपत्यजनन). याचे लाकूड जळण व कोळसा यांकरिता उपयुक्त साल त्यातील टॅनिनामुळे कातडी कमाविण्यास व रंगविण्यास आणि कोळयांची जाळी बळकट करण्यास पावरतात. किरकोळ व साध्या घरबांधणीस लाकूड बरे असते. साल स्तंभक (आकुंचन करणारी) व मधुमेहावर गुणकारी, फळांतील रसापासून सौम्य मद्य बनवितात. पाने व फळे गुरे खातात.

कांदळ : (१) पाने, फूल व फळासह फांदी, (२) फलावरण, (३) दलिका, (४) फळात बी रुजून बाहेर आलेला अधराक्ष, (५) फळ, (६) फुलाचा उभा छेद : अ - संदल, आ - प्रदल, इ. केसरदल, ई - किंजपुट, (७) केसरदल.

पहा : ऱ्हायझोफोरेसी वनरी (कच्छ वनश्री).

नवलकर, भो. सुं.