टॅपिओका : (हिं. शक्करकंद, टिखूर इं. टॅपिओका, कसावा लॅ. मॅनिहॉट एस्क्युलेंटा, मॅनिहॉट यूटिलिसिमा कुल-यूफोर्बिएसी.). भारतात टॅपिओका हे इंग्रजी नाव झाडाला व त्याच्या मुळांपासून तयार केलेल्या स्टार्चाला असे दोहोंनाही रूढ आहे. परंतु इतर देशांत झाड कसावा या इंग्रजी नावाने ओळखतात व त्याच्या मुळांपासून तयार केलेल्या स्टार्चाला टॅपिओका म्हणतात. याचे मूलस्थान द. अमेरिका असून तेथून त्याचा प्रसार आफ्रिका ,भारत व आग्नेय आशियामध्ये सतराव्या शतकात पोर्तुगीज लोकांनी केला. ब्राझीलमधील मूळचे रहिवासी इतिहासपूर्वकालापासून टॅपिओकाच्या मुळांचा अन्नासाठी वापर करीत आले आहेत.

आ. १. पाने, फुले व फळे यांसह टॅपिओकाची फांदी.

हे २–५ मी. उंचीचे बारमाही झुडूप असून याच्या खोडाच्या बुंध्याशी जमिनीत ग्रंथिल मुळांचा झुबका असतो. स्टार्चाच्या उत्पादनासाठी या मुळांचा मोठ्या प्रमाणावर वापर करतात. भातासहित इतर कोणत्याही लागवडीखालील पिकापेक्षा टॅपिओकाच्या मुळांत स्टार्चाचे प्रमाण जास्त असते. खोडाचा रंग फिकट पांढरा अथवा तपकिरी असतो. गळून पडलेल्या पानांच्या जागी खोडावर पुष्कळ पर्णकिण (पानांचे वण) असतात. पाने एकांतरित (एकाआड एक), लांब देठ असलेली, हस्ताकृती, ५–९ खंड असलेली आणि फिकट हिरव्या रंगाची असतात. पानांच्या दलांची लांबी ७·५ ते २० सेंमी. असते. फुले एकलिंगी पुं-आणि स्त्री-पुष्पे अग्रस्थ (शेंड्यावरील) वल्लरीत असून फळात (बोंडात) एरंडीच्या बियांप्रमाणे तीन बिया असतात.

लागवडीखालील क्षेत्र : १९६९ मध्ये जगात ९६,८४,००० हे. क्षेत्र या पिकाखाली होते. त्यापैकी निम्मे क्षेत्र मध्य आणि पश्चिम आफ्रिका खंडात, सु. २५% क्षेत्र मध्य आणि दक्षिण अमेरिका खंडात आणि सु. २०% क्षेत्र आग्नेय आशियात होते. सर्वांत जास्त क्षेत्र ब्राझीलमध्ये (२०,२९,००० हे.) आणि त्या खालोखाल इंडोनेशियात (१४,३२,००० हे.) होते. नायजेरिया, काँगो, मोझँबीक आणि युगांडा हे टॅपिओकाच्या लागवडीचे आफ्रिका खंडातील मुख्य देश आहेत. भारतातील टॅपिओकाचे क्षेत्र जगातील एकूण क्षेत्राच्या ४ टक्क्यांपेक्षा जास्त नाही. केरळ राज्यातील मलबार भागात या पिकाची लागवड पोर्तुगीज लोकांनी सतराव्या शतकात सुरू केली. सध्या ते मुख्यत्वेकरून केरळ व तमिळनाडू या राज्यांत पिकविले जाते. दुसऱ्या महायुद्धाच्या सुरुवातीनंतर या पिकाच्या लागवडीला विशेष चालना मिळाली. १९७१–७२ साली भारतात सु. ३,५५,००० हे. क्षेत्रात या पिकाची लागवड होती व उत्पादन ५९,३८,००० टन होते. यांपैकी ८५% क्षेत्र आणि ९१% उत्पादन फक्त केरळ राज्यात होते. त्या राज्यातील समुद्रकिनाऱ्यापासून पूर्वेला डोंगराळ भागापर्यंतच्या चढ-उताराच्या अरुंद पट्ट्यांत या पिकाची मोठ्या प्रमाणावर लागवड होते. क्विलॉन, त्रिवेंद्रम, कोट्ट्यम, मलबार आणि त्रिचूर या जिल्ह्यात या पिकाची लागवड ०·४० हे. अथवा त्याहून लहान असलेल्या शेतात मुख्यतः स्थानिक वापरासाठी होते. केरळच्या खालोखाल तमिळनाडू राज्यात या पिकाची लागवड होते. मात्र ती केरळच्या मानाने फारच कमी आहे. या पिकाखालील भारतातील एकूण क्षेत्रापैकी १०% क्षेत्र आणि ७% उत्पादन या राज्यात होते. सालेम, दक्षिण अर्काट आणि कन्याकुमारी हे या पिकाचे लागवडीचे जिल्हे आहेत. केरळ आणि तमिळनाडू राज्यांखेरीज आंध्र प्रदेश, कर्नाटक, मेघालय आणि पाँडेचेरी या राज्यांत थोड्या प्रमाणावर हे पीक पिकविले जाते. महाराष्ट्रात काही प्रगतिशील शेतकऱ्यांनी या पिकाची लागवड सुरू केली आहे.

हवामान : उष्ण व दमट हवा, १५० ते २५० सेंमी. वार्षिक पर्जन्यमान आणि चकचकीत सूर्यप्रकाश या गोष्टी या पिकाला मानवतात. हे पीक अवर्षणाला चांगल्या तऱ्हेने तोंड देऊ शकते. कडाक्याची थंडी मात्र याला मानवत नाही. सर्वसाधारणपणे ९०० मी. पेक्षा जास्त उंचीवरील प्रदेशात या पिकाची वाढ होत नाही.

जमीन : पाण्याचा निचरा होणारी कोणत्याही प्रकारची जमीन याला चालते. मध्यम प्रतीची जमीन जास्त चांगली. फार भारी, खार जमीन अथवा अगदी हलक्या प्रतीची जमीन या पिकाला निरुपयोगी असते. केरळात जांभा दगडापासून तयार झालेल्या दुमट जमिनीत हे पीक घेतात. ही जमीन चिकण प्रकारची असते परंतु पालापाचोळ्याचे खत घालून ती लागवडीस योग्य अशी करतात.

प्रकार : चांगले उत्पन्न देणाऱ्या आणि इतर दृष्टींनी उपयुक्त अशा झाडांची निवड करून नंतर त्यांची शाकीय (एरवी फक्त पोषणाचे कार्य करणाऱ्या कळ्या, कंद, मुळे इ. इंद्रियांपासून वनस्पती निर्माण करण्याच्या) पद्धतीने अभिवृद्धी (लागवड) करून निरनिराळे प्रकार लागवडीखाली आले आहेत. सु. ७५ प्रकार केरळमध्ये लागवडीत आहेत. त्यांतील काही हळवे तर काही गरवे आहेत. झाडाच्या वाढीची लक्षणे, पानांचा रंग, झाडाच्या निरनिराळ्या भागांतील रंजकद्रव्ये, मुळांची संख्या, आकार, लांबी, रंग आणि मुळे शिजण्यास लागणारा वेळ इ. बाबतींत निरनिराळ्या प्रकारांत भेद दिसून येतात. काही प्रकारांची मुळे चवीला कडवट असतात, तर काहींची गोड असतात परंतु एकाच प्रकारच्या मुळांच्या चवीमध्ये स्थलमानाप्रमाणे फरक पडतो, असे आढळून आले आहे. मुळांमधील हायड्रोसायानिक अम्लामुळे कडवट चव येते. खाण्यासाठी कडू चव नसलेल्या आणि स्टार्च व प्रथिने याचे प्रमाण जास्त असलेल्या प्रकारांची लागवड करतात. स्टार्चाच्या व्यापारी उत्पादनासाठी जास्त उत्पन्न देणाऱ्या प्रकारांची लागवड केली जाते. असे प्रकार चवीला कडू असल्यास ते काही दृष्टींनी चांगलेच असतात. कारण अशा प्रकारांना जनावरे तोंड लावीत नाहीत. त्यामुळे जंगलातही त्यांची लागवड कुंपण केल्याशिवाय करता येते. शिवाय जंगलांतील अन्य प्राण्यांपासून अशा प्रकारांचे नुकसान होत नाही व चोऱ्या होण्याचीही शक्यता कमी असते. गरव्या (१०–१२ महिन्यांत तयार होणाऱ्या) प्रकारांची मुळे स्टार्च आणि साबुदाणा यांच्या उत्पादनासाठी वापरतात व हळव्या प्रकारांची मुळे खाण्यासाठी वापरतात. त्रिवेंद्रम येथील संशोधन केंद्राने टॅपिओकाच्या परदेशातील विविध प्रकारांतून निवड पद्धतीने अगर संकर पद्धतीने केरळात लागवडीयोग्य आणि जास्त उत्पन्न देणारे प्रकार उपलब्ध केले आहेत. यांतील काही प्रकारांचे हेक्टरी ७५ टनांपर्यंत उत्पन्न मिळाले आहे.(केरळातील सर्वसाधारण हेक्टरी उत्पन्न ७·२ टन आहे).

मशागत : खणून अगर नांगरून, ढेकळे फोडून शेत तयार करतात. हेक्टरी ५ ते ६ टन शेणखत मिसळतात. सपाट जमीन असल्यास त्यात १ मी. अंतरावर सऱ्या पाडून वाफे करतात. डोंगराच्या उतारावर जमीन असल्यास १ X १ मी. अंतरावर २२·५ सेमी. खोल खड्डे खणतात.

अभिवृद्धी : छाट कलमांनी अभिवृद्धी करतात. पीक काढल्यावर खोडाच्या अगदी वरचा व अगदी खालचा भाग सोडून राहिलेल्या भागाचे १५ ते २२·५ सेंमी. लांबीचे तुकडे जमिनीत ५ सेंमी. खोल पुरून लावतात. यासाठी प्रथम खोडाचे लांब तुकडे मातीत १०–१५ दिवस पुरून ठेवतात. या मुदतीत पर्णकळ्यांचे अंकुर फुटून येतात. नंतर मोठ्या तुकड्यांचे लहान (१५–२२·५ सेंमी. लांबीचे) तुकडे करून लावतात. सऱ्यांत लागण करावयाची असल्यास १ मी. अंतरावर एका जागी १ ते ३ तुकडे लावतात. काही भागांत उसाप्रमाणे तुकडे आडवे जमिनीत पुरतात. पाणी देण्याची सोय असल्यास उन्हाळ्यात लागण करणे फायद्याचे असते. त्यामुळे पावसाच्या सुरुवातीपर्यंत झाडाची पुरेशी वाढ झालेली असते. पाणी देण्याची सोय नसल्यास पावसाळ्याच्या सुरुवातीनंतर केव्हाही लागण करतात. केरळच्या पुष्कळशा भागात वर्षातून केव्हाही लागण करतात. पीक वाढून जमीन झाकली जाईपर्यंत कोळपणी करतात. पीक चार महिन्यांचे झाल्यावर त्याला मातीची भर देतात.


खत : टॅपिओकाचे पीक जमिनीतून मोठ्या प्रमाणावर मूलद्रव्यांचे शोषण करीत असल्यामुळे पिकाला भरपूर खत देणे आवश्यक असते. खत न देता हे पीक त्याच जमिनीत सतत घेत गेल्यास काही वर्षांनंतर जमीन नापीक होते. डोंगराच्या उतारावरील जमीन पावसामुळे धुपून जाते. त्यामुळे धुपून जाणाऱ्या मातीत खताचा अंशही वाहून जातो. केरळातील पुष्कळ शेतकरी कोणतेच खत देत नाहीत अथवा थोडीफार राख टाकतात. काही शेतकरी पेंड, मासळी यांसारखी खते कोळपणीच्या वेळी देतात. हेक्टरी १०० किग्रॅ. नायट्रोजन, १०० किग्रॅ. फॉस्फोरिक अम्ल आणि २०० किग्रॅ. पोटॅशचा पुरवठा खताच्या रूपाने देण्याची शिफारस करण्यात आलेली आहे.

काढणी : आठ महिन्यांपासून पुढे पीक काढणीस तयार होते. झाडाला फुले आली, पाने पिवळी पडली आणि बुंध्याजवळील जमीन फाटली म्हणजे पीक पूर्ण तयार झाले असे समजतात. झाडे उपटून ग्रंथिल मुळे काढून घेतात अथवा झाडे कापून मुळे खणून काढतात. भाजीसाठी मुळे लागणीपासून ६–७ महिन्यांनी काढतात. स्टार्चाच्या उत्पादनासाठी ती २–४ महिन्यांनी उशिरा काढतात. प्रत्येक झाडापासून ५–१० दंडगोलाकृती, ३–५ सेंमी. जाडीची व ३०–४० सेंमी. लांबीची ग्रंथिल मुळे मिळतात. ६०–९० सेंमी. लांबीचीही मुळे मिळतात. एका मुळाचे वजन एक ते सव्वादोन किग्रॅ. भरते. गरव्या प्रकारात ते ११ ते १३·५ किग्रॅ. पर्यंत असते.

आ. २. टॅपिओकाची ग्रंथिल मुळे

उत्पन्न : केरळात टॅपिओकाच्या मुळांचे हेक्टरी उत्पन्न २·५ टनांपासून ३० टनापर्यंत मिळते. सर्वसाधारणपणे ते ७ पासून १२ टनांपर्यंत असते.त्रावणकोरमध्ये हेक्टरी ४९ टनांपर्यंत उत्पन्न मिळाले आहे. मलेशिया आणि इतर देशांत हेक्टरी ६२ टनांपर्यंत उत्पन्न येते. खणून काढल्यावर मुळे ४ ते ५ दिवसांपेक्षा जास्त दिवस टिकत नाहीत. कवकनाशक (बुरशीसारख्या हरितद्रव्यरहित वनस्पतींचा नाश करणाऱ्या) मेणाचा थर दिल्यास १६ दिवस, एथिल डायब्रोमाइड व एथिल ब्रोमाइड यांचे मिश्रण १ : १ प्रमाणात अथवा फॉर्‌मॅलीन १ : ३३ या प्रमाणात पाण्यात मिसळून लावल्यास तीन आठवडे आणि शीतगृहात सहा महिन्यांपर्यत मुळे चांगली राहतात. खणून न काढता जमिनीतच ठेवल्यास ती पुष्कळ दिवस चांगल्या स्थितीत राहतात. परंतु पीक तयार झाल्यावर ती फार दिवस जमिनीत ठेवल्यास त्यांतील स्टार्चाचे प्रमाण कमी होत जाते.

रोग व कीड : या पिकाचे भारतात रोग व कीड यांपासून फारसे नुकसान होत नाही.

पृथक्करण : टॅपिओकाच्या मुळांतील घटक द्रव्ये व त्यांचे शेकडा प्रमाण पुढीलप्रमाणे असते. जलांश ५९·४%, प्रथिने ०·७%, वसा (स्निग्ध पदार्थ) ०·२%, कार्बोहायड्रेटे ३८·७% (यात २०–३०% स्टार्च असून बाकीचा भाग इतर कार्बोहायड्रेटे असतात). ताज्या मुळात खाद्य पदार्थाचे प्रमाण ७७·५ ते ८८·५% असते. खाद्य पदार्थातील पाण्याचा अंश काढून टाकल्यास राहिलेल्या भागात ७८ ते ९०% स्टार्च असतो. कडू प्रकारांच्या ताज्या मुळांत ०·०७७% आणि गोड्या प्रकारांत ०·०१६% पेक्षा कमी एवढे हायड्रोसायानिक अम्ल (विषारी द्रव्य) असते. ते मुख्यतः अंतर्सालीमध्ये असते. खाण्यापूर्वी मुळाची साल काढून धुऊन घेतल्यास पुष्कळसे विषारी द्रव्य निघून जाते. काचऱ्या करून वाळविल्यास सु. ७५% आणि मुळे ५ मिनिटे पाण्यात शिजविल्यावर ८०% विषारी द्रव्य नाहीसे होते.

उपयोग : उष्ण कटिबंधातील पुष्कळ देशांत (विशेषतः मध्य आणि दक्षिण अमेरिका, मध्य आणि पश्चिम आफ्रिका, इंडोनेशिया आणि पॉलिनेशिअन बेटे) टॅपिओका हे गरीब लोकांच्या आहारातील प्रमुख अन्न आहे. रताळ्याप्रमाणे त्याची मुळे उकडून, भाजून, काचऱ्या करून अथवा पीठ करून खातात. मध्य आणि दक्षिण अमेरिकेतील सर्व वर्गांच्या लोकांच्या आहारात रोज कमीत कमी दोन वेळा टॅपिओकाचे पदार्थ असतात. केरळात कामकरी वर्गाचे मुख्य अन्न म्हणजे टॅपिओकाची मुळे व मासे हे होय. त्या राज्यात भाताच्या खालोखाल टॅपिओका हे प्रमुख खाद्य पीक आहे. त्याच्या गोड्या प्रकारांची अपक्व मुळे बटाट्याप्रमाणे भाजून अथवा उकडून अथवा कच्चीदेखील खातात. तसेच गोड्या प्रकारांच्या कोवळ्या पानांची भाजी करतात. भारतासह सर्व टॅपिओका पिकविणाऱ्या देशांत त्याचा मुख्य उपयोग स्टार्च व साबुदाणा करण्यासाठी होतो. गोड्या प्रकारांची पाने व देठ जनावरांना खाऊ घालतात. कडू प्रकारांची पाने व देठ पाण्यात भिजत घालून मग जनावरांना खाऊ घालतात.

टॅपिओकाचे पदार्थ : (१) काचऱ्या : यात दोन प्रकार आहेत : मुळे धुऊन साल काढल्यावर पांढऱ्या चकत्या कापून त्या उन्हात वाळवितात. त्यांना पांढऱ्या काचऱ्या असे म्हणतात. दुसरा प्रकार उकड्या काचऱ्यांचा. यात चकत्या कापल्यावर त्या १० मिनिटे उकळत्या पाण्यात ठेवून नंतर वाळवितात. निकृष्ट प्रकारच्या काचऱ्या जनावरांच्या खाद्यात वापरतात.

(२) पीठ : पांढऱ्या काचऱ्या दळून केलेले पीठ मिठाई, बिस्किटे वगैरे खाद्य पदार्थांत अथवा कणकेत मिसळून त्याचे पाव किंवा चपात्या करतात. कणकेत अगर तांदळाच्या पिठात हे पीठ २५ टक्क्यांपर्यंत मिसळल्यास पोषणमूल्य कमी होत नाही. टॅपिओकाच्या पिठाला लाकूडकामाच्या धंद्यात आणि इतरत्र सरसाप्रमाणे चिकट पदार्थ तयार करण्यासाठी फार मागणी असते. तसेच ओले कुंकू तयार करण्यासाठीही इतर पदार्थांबरोबर या पिठाचा उपयोग करतात.

(३) रवा : काचऱ्या उकडून वाळविल्यावर दळून रवा तयार करतात. ह्याचा उपयोग गोड आणि स्वादिष्ट पक्वान्ने तयार करण्यासाठी करतात.

(४) कृत्रिम तांदूळ व शेवया : म्हैसूर येथील सेंट्रल फूड टेक्नॉलॉजिकल रिसर्च इन्स्टिट्यूटने हे पदार्थ तयार केले आहेत. टॅपिओकाचे पीठ ६० भाग, तेलाचे प्रमाण अल्प असलेली शेंगदाण्याची पेंड (पिठाच्या स्वरूपात) १५ भाग, गव्हाचा रवा २५ भाग एकत्र मिसळून त्यात उकळते पाणी घालून कणकेप्रमाणे मळून ते पीठ साच्यात घालून तांदळाच्या अगर शेवयाच्या आकाराचे तुकडे तयार करतात व ते ४०–५० से. तापमानात उष्णतेच्या झोतात वाळवितात. तांदळापेक्षा यात दुप्पट प्रथिने असतात शिवाय त्यात तांदळापेक्षा जास्त खनिजे व जीवनसत्त्वे असतात.

(५) स्टार्च : टॅपिओकाच्या मुळांची प्रथम साल काढून मुळे पाण्याबरोबर दळतात. नंतर दळलेला माल चाळणीतून गाळल्यावर खाली राहिलेल्या द्रवात स्टार्च तरंगत्या स्थितीत असतो तो टाकीमध्ये तळाला बसू देतात. नंतर तो पुन्हा पुन्हा धुऊन वाळवितात व बारीक चाळणीतून चाळतात. स्टार्च तळाशी बसण्यासाठी सल्फ्युरिक अम्ल आणि विरंजनासाठी (रंग घालविण्यासाठी) सल्फर डाय-ऑक्साइडाचा अथवा क्लोरिनाचा वापर करतात. टॅपिओकाचे कडू प्रकार स्टार्चाच्या उत्पादनासाठी जास्त पसंत करतात. कारण त्यांच्या मुळांत स्टार्चाचे प्रमाण जास्त असते. ह्या स्टार्चाचा उपयोग कापड गिरण्यांत खळीसाठी, तसेच वस्त्रधुलाईसाठी, कागदनिर्मितीत, आसंजक (डिंकासारखा चिकट पदार्थ) तयार करण्यासाठी आणि सौंदर्य प्रसाधनांमध्ये करतात. खीर, बिस्किटे, केक यांसारख्या पदार्थांतही त्याचा उपयोग करतात. स्टार्चापासून डेक्स्ट्रीन आणि अल्कोहॉल, तसेच हायड्रोक्लोरिक अम्लाची क्रिया करून साखरेचा पाक (सिरप) हे पदार्थ तयार करता येतात. सर्वांत चांगल्या प्रतीचा स्टार्च पांढरा शुभ्र असतो व त्यात १२ टक्क्यांपेक्षा जास्त पाण्याचा अंश असत नाही. टॅपिओकापासून स्टार्च तयार करणे हा केरळात कुटिरोद्योग आहे. त्याचबरोबर काही मोठ्या कारखान्यांतूनही त्याचे उत्पादन होते. केरळातून भारतात सर्व ठिकाणी टॅपिओका स्टार्च रवाना होतो.


(६) साबुदाणा : स्टार्च तयार करण्याच्या कृतीमध्ये टाकीमध्ये तळाला बसलेला स्टार्च उन्हामध्ये ५०% पाण्याचा अंश राहीपर्यंत वाळवितात. नंतर कापडी पिशव्यांत घालून त्या हालवून स्टार्चाच्या गोळ्या (बुंद) बनवितात अथवा यंत्राच्या साहाय्याने गोळ्या पाडतात. या गोळ्या (म्हणजेच साबुदाणा) निरनिराळ्या आकारांच्या चाळण्यांतून चाळतात. खोबऱ्याचे तेल चोपडलेल्या कढयांत हा कच्चा साबुदाणा सु. १५ मिनिटे विस्तवावर परततात (भाजतात). यामुळे साबुदाणा गुळगुळीत होऊन त्याला चकाकी येते. नंतर तो उष्ण हवेच्या साहाय्याने ४०–५० से. तापमानात वाळवितात. ताज्या मुळांच्या वजनाच्या सु. २५ टक्के एवढे साबुदाण्याचे उत्पादन मिळते. दुसऱ्या महायुद्धापासून इंडोनेशियातून साबुदाण्याची भारतात आयात बंद झाली. साबुदाणा तयार करण्यासाठी टॅपिओकाचा स्टार्च फार उपयुक्त आहे, असे आढळून आल्यावर टॅपिओकापासून स्टार्च आणि साबुदाण्याच्या निर्मितीला भारतात चालना मिळाली. १९७० मध्ये तमिळनाडूमध्ये स्टार्च व साबुदाणा तयार करण्याचे लहान मोठे ७५० कारखाने होते. त्यांतील पुष्कळसे सालेम जिल्ह्यात आहेत. स्टार्च आणि साबुदाणा वाळविण्यासाठी या जिल्ह्यातील हवामान वर्षातील पुष्कळ महिने अनुकूल असते. कारखान्याच्या क्षमतेप्रमाणे दररोज एक टनापासून १०–१२ टनांपर्यंत उत्पादन होते. वर्षाकाठी १,२५,००० ते २,१५,००० टन उत्पादन होते. यात ६० टक्के साबुदाणा व ४० टक्के स्टार्च असतो. उत्पादनात १०–२० टक्के धागायुक्त लगदा राहतो तो सुकवून त्याचे पीठ करतात आणि ते दुभत्या जनावरांना खाऊ घालतात अथवा हलक्या प्रतीच्या पिठासाठी वापरतात. साबुदाणा तयार करण्यासाठी वापरण्यात आलेल्या स्टार्चाच्या प्रतीवर साबुदाण्याची गुणवत्ता अवलंबून असते. टॅपिओकापासून तयार केलेला साबुदाणा रंग, आकार आणि तो विस्तवावर किती प्रमाणात भाजला गेला आहे यावर आधारित अशा चार प्रकारच्या प्रतींमध्ये वेगवेगळा केला जातो. क्रमांक १ प्रतीचा साबुदाणा दुधासारखा पांढरा आणि चांगला भाजलेला (परतलेला) असतो आणि तो गुणवत्ता आणि पोषणमूल्य याबाबतींत परदेशी (सिंगापुरी अथवा झाडातील चिकापासून तयार केलेल्या) साबुदाण्याच्या तोडीचा असतो. [→ साबुदाणा] .

संदर्भ :

1. C.S.I.R. The Wealth of India, Raw Materials, Vol. VI, New Delhi, 1962.

2. C.S.I.R. The Wealth of India, Industrial Products, Vol. VIII, New Delhi, 1973.

चौधरी, रा. मो. गोखले, वा. पु.