बरसीम :(इं. ईजिप्शियन क्लोव्हर लॅ. ट्रायफोलियम ॲलिक्झांड्रिनम कुल-लेग्युमिनोजी). हे वर्षायू (एका हंगामात जीवनक्रम पूर्ण करणारे) हिरव्या चाऱ्याचे पीक असून त्याचे खोड ३०-६० सेंमी. उंच, सरळ वाढणारे अथवा आरोही (आधारावर चढणारे) व शाखायुक्त असते. पाने बहुसंख्य, दले तीन, आयताकृती अथवा कुंतराम (भाल्यासारखी) व काहीशी दातेरी उपपर्णे कुंतराम अथवा आराकृती (अरुंद लांबट) असून पानांच्या देठापासून अंशतः विलग असतात. स्तबक (फुलांचा झुबका) अवृंत (बिनदेठाचा) अथवा सवृंत (देठ असलेला), अंडाकृती. फुले पिवळसर-पांढरी शिंबा (शेंग) एकबीजी, आयत-लंबगोल याची इतर सामान्य शारीरिक लक्षणे ⇨लेग्युमिनोजीमध्ये (शिंबावंत कुलात) वर्णन केल्याप्रमाणे  असतात [⟶क्लोव्हर].

पंजाब, दिल्ली, राजस्थान, उत्तरप्रदेश आणि पश्चिम व उत्तर भारतातील इतर प्रदेशांतील ओलिताखालील भागांत हे महत्वाचे चाऱ्याचे पीक आहे. ते मूळचे इजिप्तमधील असून त्या देशातील हे चाऱ्याचे मुख्य पीक आहे. सिरियात आणि इराणमध्येही त्याची लागवड होते. १९०४ साली या पिकाची ईजिप्तमधून भारतात आयात झाली व १९१६ पर्यंत त्याचा उत्तर भारतात झपाट्याने प्रसार झाला. दक्षिण भारतात ते फारसे लागवडीत नाही.

कोरड्या व थंड हवामानात हे पीक चांगले येते परंतु ज्या भागात हिवाळ्यात बर्फ पडते त्या भागातील हवामान त्याला मानवत नाही. तापमान वाढू लागताच त्याची वाढ कमी होते.

वाळूचे प्रमाण फार असलेल्या जमिनीखेरीज कोणत्याही जमिनीत हे पीक येते परंतु चांगल्या निचऱ्याच्या गाळवट जमिनीत चुना आणि फॉस्फरस भरपूर प्रमाणात असल्यास त्याची वाढ चांगली होते. उसार (खार) जमिनीतही हे पीक वाढते, त्यामुळे अशा प्रकारच्या जमिनी सुधारण्यासाठी हे पीक उपयुक्त आहे. या पिकाला पाणी भरपूर लागते व पाण्याअभावी ते वाळते.

हे शिंबावंत (शेंगा येणारे) पीक असल्यामुळे त्याच्या मुळांवरील गाठींतील सूक्ष्मजंतू हवेतील नायट्रोजन शोषून घेतात. त्यामुळे जमिनीतील नायट्रोजनचे प्रमाण वाढते. या दृष्टीनेही या पिकाची लागवड उपयुक्त आहे [⟶लेग्युमिनोजी].

मेस्कावी आणि खड्रावी हे दोन ईजिप्शियन प्रकार उत्तर भारतात यशस्वी झाले आहेत. मेस्कावी प्रकाराची झाडे उंच वाढतात व त्यांपासून चाऱ्याखेरीज बियांचेही उत्पन्न मिळते.

लोखंडी नांगराने जमीन नांगरून, कुळवाच्या २-३ पाळ्या घालून एकसारखी नरम करून घेतात. दर हेक्टरी २०-२५ टन शेणखत आणि ४१४ किग्रॅ. सुपरफॉस्फेट जमिनीत मिसळून २.५ X २.५ मी. आकारचे  वाफे तयार करतात.

सप्टेंबरात तिसऱ्या आठवड्यात वाफ्यांत पाणी भरून त्यांत एक रात्र पाण्यात भिजविलेले बी मुठीने फोकतात. दर हेक्टरी २२.५ ते २७.५ किग्रॅ. बी लागते. बी पिवळे व चांगले भरलेले असावे. जमिनीत प्रथमच बरसीमचे पीक घ्यावयाचे असल्यास ऱ्हायझोबियम ट्रायफोली या सूक्ष्मजंतूंचे संवर्धन बियांना पेरणीपूर्वी लावणे आवश्यक असते. सूक्ष्मजंतूंचे संवर्धन न मिळाल्यास पूर्वी बरमीस लावलेल्या शेतातील पृष्ठभागापासून १५ सेंमी खोलीपर्यंतची माती आणून ती नवीन शेतात दर हेक्टरी १२०-१५० किग्रॅ. या प्रमाणात सारखी मिसळत असत.

पिकाला हिवाळ्यात दर ७-८ दिवसांनी आणि उन्हाळ्यात ५-६ दिवसांनी पाणी देतात. पिकाच्या हंगामात एकूण १२ ते १५ वेळा पाणी द्यावे लागते.

बरसमी पिकास चिकोरी नावाचे तण उगवते. हे जनावरांना अपायकारक असते म्हणून बरसमीचे पीक लहान असताना चिकोरीची झाडे उपटून काढणे आवश्यक असते.


पेरणीपासून ५० ते ६० दिवसांनी पिकाची पहिली कापणी करतात. कापणीपूर्वी १० दिवस पिकाला पाणी देणे आवश्यक असते. पुढील कापण्या ३५ ते ४० दिवसांच्या अंतराने झाडे सु. २३-३० सेंमी उंच असताना करतात. सप्टेंबर ते मे या काळात ५ ते ७ कापण्या होतात.

सामान्यतः हेक्टरी ४०,००० ते ४५,००० किग्रॅ. ओला चारा मिळतो. मुबलक खत व पाणी दिलेल्या पिकापासून हेक्टरी ६०,००० ते ८०,००० किग्रॅ पर्यंत ओला चारा मिळतो. बी धरण्यासाठी एप्रिल महिन्यातील कापणीनंतर पिकाला भरपूर पाणी देतात व फुले आल्यावर पाणी बंद करतात. बी पक्क झाल्यावर पीक वाळते त्या वेळी ते कापून खळ्यावर वाळू देतात आणि दांडक्याने बडवून बी मोकळे करतात. हेक्टरी २५०-३०० किग्रॅ. बी मिळते.

ओल्या चाऱ्यात प्रथिन, फॉस्फरस आणि कॅल्शियम यांचे प्रमाण पुष्कळ असते. त्यामुळे तो दुभत्या जनावरांना विशेष उपयुक्त आहे. दुभत्या जनावराला रोज १०-१५ किग्रॅ. ओला चारा, त्याबरोबर थोडा कोरडा भुसा मिसळून देतात. तसेच ते वाळवून त्याचा जनावरांच्या खाद्यासाठी उपयोग करतात.

या पिकाचा हिरवळीच्या खतासाठी चांगला उपयोग होतो. शेवटची कापणी न करता पीक जमिनीत गाडतात. त्यापासून दर हेक्टरी ४५ किग्रॅ. नायट्रोजन जमिनीला मिळतो.

नागपूर भागात भाताच्या पिकात हे पीक मिश्रपीक म्हणून घेतात. भाताला ओंब्या आल्यावर त्या पिकात हेक्टरी २८-३० किग्रॅ. बी ऑगस्टच्या अखेरीस फोकतात. भाताच्या पिकाची कापणी झाल्यावर बरसीमची जोरात वाढ होते.

बरसीमवर तंतुभुरी (डाउनी मिल्ड्यू), तांबेरा, खोडकूज, टिक्का, अँथ्रॅक्‌नोज, क्राऊन-वार्ट हे रोग पडतात. तसेचव्हायरसजन्य, सूक्ष्मजंतुजन्य व सूत्रकृमिजन्य रोगही आढळतात. रोगाच्या प्रथमावस्थेत बोर्डो मिश्रण फवारल्यास रोगनियंत्रण होते. पाने खाणारी अळी व कॉटन वर्म या दोन किडी बरसीमवर सर्वत्र आढळतात. आगाप पिकावर त्यांचे प्रमाण जास्त असते व कधीकधी त्यांच्यामुळे दुसऱ्यांदा पेरणी करावी लागते एवढे नुकसान होते. यांशिवाय बरमसीवर ⇨अमरवेल ही परजीवी (दुसऱ्या वनस्पतीवर जगणारी) वनस्पती वाढते. नियंत्रणासाठी अमरवेल वाढलेल्या वनस्पती संपूर्ण काढून जाळतात.

पहा : वैरण.

संदर्भ : Narayanan, T. R. Dabadghao, P. M. Forage Crops of India, New Delhi, 1972.

चव्हाण, ई. गो.