हरभरा : (हिं. चणा गु. चना क. कारी, कडले, केंपुकडले सं. वाजिभक्ष्य, बलभोज्य, चणक इं. बेन्गॉल ग्रॅम, चिक पी लॅ. सिसर ॲरिएटिनम कुल-लेग्युमिनोजी). फुलझाडांपैकी [→ वनस्पति, आवृतबीज उपविभाग] एक प्रसिद्ध व सर्वत्र पिकविले जात असलेले कडधान्य असून ते रानटी अवस्थेत आढळत नाही. मूलस्थान निश्चित माहीत नाही, तथापि कॉकेशस व हिमालय पर्वतांमध्ये विकास होऊन नंतर दक्षिण यूरोप, इराण, ईजिप्त व भारत येथे त्याचा प्रसार झाला आहे. तसेच मध्य व दक्षिण अमेरिका, ऑस्ट्रेलिया व आफ्रिका येथेही त्याचा प्रसार झाला आहे. याच्या सिसर या प्रजातीमध्ये एकूण २४ जाती असून त्यांपैकी भारतात फक्त दोन जाती आढळतात. हरभरा हे भारतातील खूप महत्त्वाचे कडधान्य पीक असून ते सर्वत्र सामान्यपणे पिकविले जाते.

हरभरा वनस्पती ही लहान वर्षायू ओषधी असून ती स्वपरागणव द्विगुणित वनस्पती आहे. ती ⇨ वाटाणा आणि ⇨ भुईमूग यांच्या उपकुलातील असल्याने काही लक्षणे यांसारखी आहेत. हिची उंची सु. ०.५ मी., फांद्या अनेक, पाने संयुक्त व पिच्छाकृती असून दले फार लहान व सर्वांवर प्रपिंडधारी (ग्रंथियुक्त) केस असतात. फुले पानांच्या बगलेत, लहान, फिकट जांभळी व पतंगरूपी [→ अगस्ता गोकर्ण] असतात. फळ (शिंबा) लहान, लंबगोल, १.५–२.० सेंमी. व टपोरे बिया (हरभरे) १-२, काळ्या, पिंगट गुलाबी, पांढऱ्या किंवा पिवळ्या, सुरकुतलेल्या, एकीकडे टोकदार व ०.५-१ सेंमी. व्यास असलेल्या असतात. फुलांची संरचना व इतर सामान्य शारीरिक लक्षणे ⇨ लेग्युमिनोजी कुलातील (शिंबावंत कुलातील) पॅपिलिऑनेसी उपकुलात (पलाश उपकुलात) वर्णन केल्याप्रमाणे असतात.

परांडेकर, शं. आ.

 आ. १. हरभरा (सिसर ॲरिएटिनम) : (१) पाने, फुले व फळे (घाटे) यांसह फांदी, (२) फूल, (३) किंजमंडल आणि संवर्त, (४) बी, (५) पर्णक.हरभऱ्याचे आकार व रंग यांवरून त्याचे देशी, काबुली, गुलाबी व हिरवा असे प्रकार आहेत. देशी वाणाचा रंग पिवळसर तपकिरी असून दाणे सुरकुतलेले असतात. यातील काही वाण हिरव्या व काळ्या रंगाचे आढळतात. काबुली वाण पांढऱ्या रंगाचा असून दाण्याचा आकार मोठा असतो. हा वाण मुख्यतः उत्तर भारतात घेतला जातो. गुलाबी हरभऱ्याचा रंग फिक्कट असून दाणे गोल व गुळगुळीत असतात. हिरव्या हरभऱ्याचा रंग वाळल्यानंतर सुद्धा हिरवा राहतो.

हरभरा हे महाराष्ट्र राज्यातील रबी हंगामातील एक महत्त्वाचेकडधान्य पीक आहे. याचे बागायती क्षेत्र थोडेच आहे. हे शाकाहारी लोकांची प्रथिनांची गरज मोठ्या प्रमाणावर भागविणारे आणि कमीतकमी पाण्यावर येणारे पीक आहे. कडधान्य पिकांचे शेतीकरिता आणि मानवी आहारात अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. जमिनीचा कस सुधारण्यात व तो टिकवून ठेवण्यात कडधान्य पिकांचे मोठे योगदानअसते. या पिकाच्या मुळांवरील ग्रंथीतील र्‍हायझोबियम जीवाणू हवेतील नायट्रोजन शोषून घेत असल्याने या पिकाची नत्राची गरज बऱ्याचशा प्रमाणात परस्पर भागविली जाते. शिवाय कडधान्य पिकानंतर घेण्यात येणाऱ्या पिकासाठी उत्तम बेवड तयार होते.

हरभरा हे जगातील तिसरे महत्त्वाचे कडधान्य असून आशिया खंडात भारत हा प्रमुख हरभरा उत्पादक देश आहे. जगातील ६८% हरभरा भारतात उत्पादित होतो. मर रोगप्रतिकारक जातींच्या वाढत्या लागवडीमुळे १९९९ पासून भारतात त्याची उत्पादकता वाढली आहे. देशातील कडधान्याच्या एकूण क्षेत्रफळापैकी ५०% उत्पादन या पिकाचेआहे. सन २००७-०८ मध्ये महाराष्ट्र राज्यात या पिकाचे क्षेत्र१३.२४ लाख हेक्टर, उत्पादन १२.१४ लाख टन, तर उत्पादकता ९१७ किग्रॅ./ हे. अशी होती. देशाच्या एकूण हरभरा उत्पादनामध्ये महाराष्ट्राचा वाटा २१% आहे. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश व राजस्थान या राज्यांमध्येया पिकाचे सर्वांत जास्त क्षेत्र आहे. अलीकडील काही वर्षांत पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा भागात हे पीक बागायती क्षेत्रातही घेतले जाते.त्यामुळे या विभागात त्याचे हेक्टरी उत्पादन वाढले आहे. तथापि, ८०% क्षेत्र जिरायत असल्याने राज्यातील सरासरी उत्पादन हेक्टरी ६ क्विंटलआहे. राज्यात अहमदनगर, परभणी, नासिक, औरंगाबाद, उस्मानाबाद, पुणे, जळगाव व सोलापूर या जिल्ह्यांत या पिकाखालील क्षेत्र जास्त आहे.

उत्तर भारतात थंडीचा काळ जास्त असल्यामुळे तेथे पीक तयारहोण्यास पाच महिने लागतात. तुलनेने महाराष्ट्रासह दक्षिण भारतात ३ – ३ ½ महिन्यांत पीक तयार होते. त्यामुळे मध्य व दक्षिण भारतात या पिकाखालील क्षेत्र वाढले आहे. कमी कालावधीचे व मर रोगप्रति-कारक जातींची निर्मिती करण्यात भारतातील इंटरनॅशनल क्रॉप रिसर्च इन्स्टिट्यूट फॉर द सेमीॲरिड ट्रॉपिक्स (ICRISAT) या संस्थेचे विशेष योगदान आहे.

जमीन व हवामान : हरभरा या पिकासाठी मध्यम ते काळी, कसदार व चांगल्या निचऱ्याची जमीन लागते. जमिनीत पाणी साठून राहिले तर संपूर्ण पीक उमळते. हलक्या जमिनीत लागवड टाळतात, कारण अशा जमिनीत पाणी धरून ठेवण्याची क्षमता कमी असल्याने उत्पादन कमी येते.

कोरड्या व थंड हवामानात हरभऱ्याचे पीक चांगले येते. पीकफुलोऱ्यात असताना किंवा घाटे भरण्याच्या वेळेस धुके पडल्यास पिकाचे फारच नुकसान होते. पीक तीन आठवड्यांचे झाल्यानंतर किमानतापमान १°– १५° से. आणि कमाल तापमान २५°– ३०ॅ से. असेल, तर पिकाची वाढ झपाट्याने होते आणि पिकास फांद्या, फुले व घाटेभरपूर प्रमाणात लागतात.

पूर्व मशागत : खरीपाचे पीक निघाल्यानंतर खोल नांगरट करतात. कुळवाच्या दोन पाळ्या देतात. काडीकचरा वेचून जमीन स्वच्छ करतात. खरीपामध्ये शेणखत दिले नसेल तर हेक्टरी पाच टन चांगले कुजलेले शेणखत जमिनीमध्ये मिसळतात. साधारणतः गव्हास जी मशागत केलीजाते तीच हरभऱ्यास केली जाते. सप्टेंबरच्या अखेरीस पेरणीसाठी शेत तयार ठेवतात.


पेरणी : हरभरा हे रब्बी हंगामाचे पीक असल्याने कोरडी व थंड हवा त्याला चांगली मानवते. कोरडवाहू क्षेत्रामध्ये जेथे सिंचनाची सोयअजिबात नसेल तेथे हस्त नक्षत्राच्या पहिल्या चरणानंतर म्हणजे २५ सप्टेंबर नंतर जमिनीची ओल उडून जाण्यापूर्वी पेरणी करतात. यासाठी प्रामुख्याने विजय व दिग्विजय हे वाण वापरतात. जिरायती क्षेत्रात खरीप पीक निघाल्याबरोबर शक्यतो सप्टेंबरच्या दुसऱ्या पंधरवड्यातच पेरणी करतात. बागायती हरभरा २० ऑक्टोबर ते १० नोव्हेंबर या दरम्यान पेरल्यास चांगले उत्पादन येते. पेरणीची वेळ लांबल्यास किंवा डिसेंबरनंतर पेरणी केल्यास थंडीचा काळ कमी मिळतो. त्यामुळे उत्पन्न फार कमी मिळते. काबुली हरभऱ्याची पेरणी सिंचनाची सोय असेल तरच करतात. याचीपेरणी मिश्रपीक पद्धतीनेही करतात. गहू-हरभरा मिश्रपिकांत गव्हाच्याबारा ओळीनंतर आठ ओळी हरभऱ्याच्या असतात. पेरणीपूर्वी प्रतिकिग्रॅ. बियाण्यास २ ग्रॅ. थायरम व २ ग्रॅ. बावीस्टीन किंवा ५ ग्रॅ. ट्रायकोडर्मा यांची बीजप्रक्रिया करतात. यानंतर २५ ग्रॅ. र्‍हायझोबियम व पीएसबी प्रति-किग्रॅ. बियाण्यास गुळाच्या थंड द्रावणामध्ये मिसळून चोळतात. असे बियाणे तासभर सावलीत सुकवितात आणि नंतर पेरणी करतात. यामुळे पिकाचे रोपावस्थेत बुरशीजन्य रोगांपासून संरक्षण होते. मुळांवरील नत्राच्या ग्रंथी वाढतात आणि पिकाची वाढ चांगली होते.

सुधारित वाण : चाफा, अन्नेगिरी असे जुने वाण रोगाला बळी पडतात, म्हणून जुने अथवा स्थानिक वाण न वापरता सुधारित वाण वापरतात. देशी वाणामध्ये विजय, विशाल व दिग्विजय हे वाण रोग-प्रतिकारक्षम असून जिरायत व बागायत तसेच उशिरा पेरणीस योग्य आहेत. काबुली वाणामध्ये विराट, विहार, पीकेव्ही-२ (काक-२) हे वाण अधिक उत्पादन देणारे आहेत. यांपैकी विजय व दिग्विजय हे देशी वाण कोरडवाहूसाठी अतिशय चांगले आहेत. पाण्याची उपलब्धता असेल तर खतमात्रा व पाण्यास ते चांगले प्रतिसाद देतात. विशाल हा टपोरा दाण्याचा वाण आहे. विराट हा काबुली वाण अधिक उत्पादनशील व मर रोगप्रतिकारक्षम आहे. गुलाबी हरभऱ्यामधील गुलक-१ आणि हिरवा चाफा हरभऱ्याचा एकेजीएस-१ हे वाण डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकोला येथून प्रसारित झाले आहेत. गुलक-१ हा वाणमूळकूज व मर रोगांना प्रतिकारक आहे. गुलाबी हरभऱ्याची लागवड वरूड (जि. अमरावती), नरखेड (जि. नागपूर), दाभा (जि. यवतमाळ) व एरंडोल (जि. जळगाव) या परिसरात आढळते. एकेजीएस-१ हा वाण मर रोगप्रतिबंधक आणि लवकर तयार होणारा आहे तसेच तो कोरडवाहूव ओलिताखालीसुद्धा चांगला प्रतिसाद देतो. हरभऱ्याचा महाराष्ट्रातील लागवडीसाठी प्रसारित झालेला हिरवा हरभरा हा एकमेव प्रकार आहे.

पश्चिम महाराष्ट्राकरिता महात्मा फुले कृषि विद्यापीठाने विजय, विशाल, दिग्विजय, विराट आणि पीकेव्ही-२ या वाणांची शिफारस केली आहे. विदर्भाकरिता नागपूर कृषि संशोधन केंद्राने वरंगळ व डी-८ या वाणांची, तसेच मराठवाडाकरिता निफाड कृषि संशोधन केंद्राने एन-५९ आणि बदनापूर कृषि संशोधन केंद्राने बीडीएन ९-३ या वाणांची शिफारस केली आहे. विजय वाण मध्य प्रदेश व गुजरात राज्यांत प्रसारित आहे. पिकाचा कालावधी, हेक्टरी उत्पादन व वैशिष्ट्ये यांसह काही सुधारित वाणांची माहिती खालील तक्त्यात दिली आहे.

पेरणीची पद्धत आणि बियाण्याचे प्रमाण : सामान्यतः देशी हरभऱ्याची पेरणी पाभरीने किंवा तिफणीने करतात. दोन ओळींतील अंतर ३० सेंमी. व दोन रोपांतील अंतर १० सेंमी. ठेवतात. या प्रकारे पेरणी करावयाची असल्यास विजय वाणाचे हेक्टरी ६५-७० किग्रॅ., तरविशाल, दिग्विजय, विराट किंवा पीकेव्ही-२ या वाणांचे हेक्टरी १०० किग्रॅ. बियाणे लागते.

हरभरा सरीवरंब्यांवरही चांगला येतो. भारी जमिनीत ९० सेंमी. रुंदीच्या सऱ्या सोडतात आणि वरंब्यांच्या दोन्ही बाजूंना १० सेंमी. अंतरावर १-२ दाणे टाकतात. काबुली वाणासाठी जमीन ओली करून वापशावर पेरणी केली असता उगवण चांगली होते.

हरभऱ्याचे सुधारित वाण

अ.

क्र.

 

पिकाचा कालावधी

(दिवसांमध्ये)

हेक्टरी उत्पादन

(क्विंटलमध्ये)

 

वाण

जिरायत

बागायत

जिरायत

बागायत

वैशिष्ट्ये

१.

विजय

८५–९०

१०५–११०

१५–२०

३५–४०,

१६–१८ (उशिरा पेर)

अधिक उत्पादनक्षमता, मर

रोग व अवर्षण प्रतिकारक्षम, जिरायत, बागायत तसेच उशिरा पेरण्यास योग्य. १०० दाण्यांचे वजन १९-२० ग्रॅ.

२.

विशाल

१००–१०५

११०–११५

१४-१५

३०–३५

पिवळसर तांबूस टपोरे दाणे, मर रोगप्रतिकारक, प्रथिनांचे प्रमाण अधिक.

३.

दिग्विजय

९०–९५

१०५–११०

१४-१५

३५–४०, २०–२२

(उशिरा पेर)

पिवळसर तांबूस टपोरे दाणे, मर रोगप्रतिकारक, जिरायत, बागायत तसेच उशिरा पेरणीस योग्य.

४.

विराट

१००–१०५

११५–१२०

१०–१२

३०–३२

पिवळसर सफेद टपोरे दाणे, मर रोगप्रतिकारक. १०० दाण्यांचे वजन ३७ ग्रॅ.

५.

पीकेव्ही -२ (काक -२)

१००–१०५

११०–११५

९-१०

२६–२८

पिवळसर सफेद टपोरे दाणे. १०० दाण्यांचे वजन ३८–४२ ग्रॅ.

६.

वरंगळ

१००–१०५

९–१२

१०० दाण्यांचे वजन १३-१४ ग्रॅ., प्रथिने २४.८०%.

७.

डी-८

१३०–१३५

९–१२

१०० दाण्यांचे वजन २२-२३ ग्रॅ., प्रथिने २३.३१%.

८.

एन-५९

९५–१०५

११०–११५

९–१२

१०० दाण्यांचे वजन २२-२३ ग्रॅ., प्रथिने २६.६०%.

९.

बीडीएन-९-३

१००–१०५

११०–११५

१५–१८

२०–२२

१०० दाण्यांचे वजन १५-१६ ग्रॅ., प्रथिने २५.१०%.

१०.

एकेजीएस-१

१०५–११०

११०–११५

१०–१४

१८–२२

मर रोगप्रतिकारक. १०० दाण्यांचे वजन १५-१६ ग्रॅ.

खते : खरीप हंगामात शेतामध्ये शेणखत किंवा कंपोस्ट खत दिलेअसल्यास रबी हंगामात हरभऱ्याला पुन्हा शेणखत देण्याची गरज नसते. हेक्टरी २५ किग्रॅ. नत्र व ५० किग्रॅ. स्फुरदाची आवश्यकताअसते. यासाठी हेक्टरी १२५ किग्रॅ. डीएपी पेरणीच्या वेळी बियाण्यालगत पडेल या पद्धतीने दुचाडी पाभरीने पेरून देतात. खत विस्कटून टाकतनाहीत. पीक फुलोऱ्यात असताना आणि घाटे भरण्याच्या अवस्थेमध्ये२% यूरियाची फवारणी करतात. तण नियंत्रणासाठी पेरणी करतानावापशावर बॅसेलीन हे तणनाशक २–५ लि. प्रतिहेक्टर याप्रमाणे ५००लि. पाण्यातून फवारतात.


पाणी व्यवस्थापन : हरभरा पीक पाण्यास अतिशय संवेदनशील असे पीक आहे. या पिकाला २५ सेंमी. पाणी लागते. पेरणी झाल्यानंतर एक हलके पाणी देतात, त्यामुळे उगवण चांगली होते. जिरायत क्षेत्रात जमिनीतील ओलावा फारच कमी असेल आणि एखादे पाणी देणेशक्य असेल, तर पिकाला फुले येऊ लागताच पाणी देतात.बागायत क्षेत्रात मध्यम ते भारी जमिनीत शक्यतो जमीन ओलावून वापसा येताच पेरणी करतात. त्या नं त र २०, ५० व ७० दिवसांनी अनुक्रमे पहिले, दुसरे व तिसरे पाणी जमिनीच्या खोली- नु सा र व पि का च्या आवश्यकतेनुसार देतात.

आंतर मशागत : पिकाच्या जोमदार वाढीसाठी शेत सुरुवाती-पासूनच तणविरहित ठेवतात.पीक २० दिवसांचे झाल्यानंतर पहिली कोळपणी करतात आणिएक महिन्याचे असताना दुसरी कोळपणी करतात. कोळपणीमुळे जमिनीत हवा चांगली खेळतीराहते आणि पिकाची वाढ चांगली होते. नंतर एक खुरपणी करतात.

काढणी, मळणी आणि साठवण : हरभरा पीक ११०-१२० दिवसांमध्ये तयार होते.पीक ओलसर असताना काढणी करीत नाहीत. घाटे कडक वाळल्या नंतरच हरभऱ्याची काढणी करून मळणी करतात. यानंतर ५-६ दिवस कडक ऊन देतात. हरभरा कोठीमध्ये साठवून ठेवतात. त्यामध्ये कडुनिंबाचापाला (५%) घातल्यास साठवणीत कीड लागत नाही.

उत्पादन : सुधारित वाण आणि तंत्रज्ञान वापरून हरभऱ्याची शेती केल्यास सरासरी २५-३० क्विंटल प्रतिहेक्टर उत्पादन मिळू शकते.

रोग : (१) ग्रॅम ब्लाइट : हा रोग मायकोस्फिरिला रॅबेआय यासूक्ष्मजंतूमुळे होतो. हा रोग पंजाबमध्ये खूप गंभीर स्वरूपाचा आहे. या रोगामुळे हरभऱ्याच्या संपूर्ण पिकावर गडद तपकिरी रंगाचे ठिपके येतात.

उपाय : रोगप्रतिबंधक जातींचे बियाणे वापरतात. बीजप्रक्रिया व पिकांची फेरपालट करतात.

(२) तांबेरा : इतर पिकांप्रमाणे याही पिकाच्या पानांवर तपकिरी रंगाचे ठिपके आढळतात. हा रोग यूरोमायसिज वर्गातील सिसरिज ॲरिएटिनी या जातीच्या कवकामुळे होतो. [→ तांबेरा].

उपाय : रोगट तणांचा नायनाट करतात आणि ५०० ग्रॅ./ हे. बावीस्टीन किंवा टिल्ट १ लि./ हे. याची फवारणी करतात.

(३) मर रोग : फ्युजेरियम ऑक्सिस्पोरम उपजात सिसरी याबुरशीमुळे हा रोग होतो. या रोगामुळे २५-४५% उत्पादनामध्ये घटझाल्याचे आढळते. हा रोग वाढीच्या अवस्थेमध्ये आढळून येतो. फांद्या, उपफांद्या, पानांची देठे कोमेजतात व खोडाच्या आतील भागात काळ्या रंगाच्या रेषा आढळतात. जमिनीत ६०–८०% ओलावा व तापमान २०°–२५° से. असताना रोग जास्त आढळतो. या रोगाचा प्रादुर्भावजमिनीतून होतो. रोगाची बुरशी ही आधीच्या पिकांच्या अवशेषांवर (धसकटे, फांद्या व पाने यांवर) जिवंत राहते व त्यापासून रोगाचा प्रादुर्भाव होतो. [→ मर].

उपाय : बीजप्रक्रिया व रोगप्रतिबंधक जातींचा उपयोग करावा.

(४) मूळकूज : हा रोग र्‍हायझोक्टोनिया बटाटिकोला या बुरशीमुळे होतो. रोगट रोपे कोमेजतात व त्यांची पाने पिवळी पडतात. खोडावर मुळाच्या जोडापासून करड्या रंगाचे चट्टे आढळतात. मुळे सडतात वझाड (रोप) उपटले असता सहज निघून येते. जमिनीतील ओलाव्याचेप्रमाण २५% पेक्षा कमी तसेच तापमान ३०°–३५° से. झाल्यास रोगाची तीव्रता अधिक असते.

(५) खोडकूज : हा रोग स्क्लेरोशियम रोल्फसाय या बुरशीपासून होतो. रोगामुळे कुजण्याची लक्षणे दिसून जमिनीलगत करड्या रंगाच्या राईप्रमाणे आढळणाऱ्या स्क्लेरोशिया बुरशीचे पांढरे तंतू आढळतात. जमिनीचे तापमान ३०°-३१° से. व ओलावा ४०–५०% असतानाप्रादुर्भाव अधिक आढळतो.

उपाय : मूळकूज व खोडकूज या दोन्ही रोगांसाठी पेरणीपूर्वी बियाण्यास बुरशीनाशक (३ ग्रॅ. थायरम प्रतिकिग्रॅ. प्रमाण) किंवा ट्रायकोडर्मा बुरशी संवर्धक लावून पेरणी करतात. शेतातील रोगटफांद्या, धसकटे इ. वेचून त्यांचा नायनाट करतात.

(६) करपा : हा रोग अल्टरनॅरिया अल्टरनॅटा या बुरशीमुळे होतो. प्रथम पानांवर तेलकट रंगाचे ठिपके दिसतात. नंतर ते करड्या रंगाचे होऊन सभोवती तांबडी कडा तयार होते. रोगाचा प्रसार प्रथम रोगट बियाण्याद्वारे होतो व नंतर हवेद्वारे तो फैलावतो. आर्द्र व पावसाळी हवामानात रोग झपाट्याने वाढतो.

उपाय : पेरणीपूर्वी बियाण्यास ३ ग्रॅ. थायरम प्रतिकिग्रॅ. प्रमाणे चोळतात. रोग दिसताक्षणी ७८% झायनेब २.५ ग्रॅ. प्रतिलि. पाणी या प्रमाणात फवारतात.

कीड : हरभरा वनस्पतीवर घाटे अळी ही कीड महाराष्ट्र, बिहार,उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, तमिळनाडू , आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, गुजरात, पंजाब व आसाम ह्या प्रदेशांत फार मोठ्या प्रमाणावर आढळून येते.

हरभरा पिकावर नोव्हेंबर ते मार्च दरम्यान मोठ्या प्रमाणात घाटेअळी दिसून येते. घाटे अळीमुळे पिकाचे ३०–४०% नुकसान होते.पीक तीन आठवड्यांचे झाले की, त्यावर बारीक अळ्या दिसू लागतात. पानांवर पांढरे डाग दिसतात आणि शेंडे खाल्लेले दिसतात. लहानलहान अळ्या सुरुवातीला कोवळी पाने कुरतडून खातात. घाटे आल्यानंतर ते कुरतडून त्यास भोक पाडतात व आत डोके खुपसून आतील दाणा फस्त करतात. एक घाटे अळी एकावेळी ३०–४० घाट्यांचे नुकसान करते.

घाटे अळी नियंत्रण व कीड व्यवस्थापन : (१) परिसरातील हरभरा पिकाची पेरणी एकत्रित पद्धतीने १५ दिवसांच्या कालावधीत करतात.(२) हरभरा पिकात ठिकठिकाणी बांबू मचाण प्रत्येक २० मी. अंतरावर पिकाच्या उंचीपेक्षा ३० सेंमी. उंच लावतात. ज्यायोगे पक्षी त्यावर बसून अळ्या वेचून खातील. (३) मोठ्या अळ्यांचे प्रमाण वाढले, तर सकाळी किंवा संध्याकाळी हरभरा पिकाच्या बाजूस आलेल्या अळ्या वेचून रॉकेल मिश्रित पाण्यात टाकतात. (४) घाटे अळीच्या पतंगांना आकर्षित करण्यासाठी प्रकाश सापळ्यांचा (लाइट ट्रॅपचा) वापर करतात. तसेचकामगंध प्रलोभन सापळे (फेरोमोन ट्रॅप) हेक्टरी १२–१५ बसवितात.(५) ट्रायकोग्रॅमा या परोपजीवी कीटकांचे अंडीपुंज असलेली कार्डेहरभरा पिकांत २० मी. अंतरावर अडकवून ठेवतात. त्यातून निघालेले कीटक आपली अंडी घाटे अळीच्या अंड्यांत घालतात आणि आतील अळ्या नष्ट करतात. (६) घाटे अळीच्या बंदोबस्तासाठी एन्.पी.व्ही. या विषाणूचा अवलंब करून कीड नियंत्रणात आणता येते. (७) वनस्पतिजन्य कीटकनाशकांतर्गत ५% कडू निंब अर्काची फवारणी पिकावर केल्यास उपयोगी ठरते.

वरील सर्व उपायानंतरही घाटे अळीचे यशस्वी रीत्या नियंत्रण झालेनाही, तर रासायनिक कीटकनाशकांचा वापर करावा. त्यामध्ये १५ मिलि. ३६% मोनोक्रोटोफॉस किंवा २० मिलि. २५% क्विनालफॉस १० लि. पाण्यात मिसळून सकाळी किंवा सायंकाळी पिकावर फवारणी करतात. जमिनीवरील घाटे अळीचे कोष नष्ट करण्यासाठी पीक काढणीनंतर लगेचच खोल नांगरट केल्यास पक्षी पृष्ठभागावर आलेले कोष खातात व काहीकोष सूऱ्याच्या प्रखर उष्णतेनेही नष्ट होतात.


अन्नघटक : १०० ग्रॅ. हरभऱ्यामधील पोषण मूल्ये पुढीलप्रमाणे असतात : प्रथिने १७.१ ग्रॅ., स्निग्ध पदार्थ ५.३ ग्रॅ., कार्बोहायड्रेटे ६०.९ ग्रॅ., कॅल्शियम २०२ मिग्रॅ., फॉस्फरस ३१२ मिग्रॅ.,लोह १०.२ मिग्रॅ. जीवनसत्त्वे : अ ३१६ आं. ए., ब१ ०.३० मिग्रॅ., ब२ ०.४१ मिग्रॅ. निकोटिनिक अम्ल २.१ मिग्रॅ. ऊष्मांक ३६० कॅलरी.

उपयोग : हरभरा वनस्पतीचे सर्व भाग उपयुक्त असून बियांत प्रथिने व कार्बोहायड्रेटे तसेच जीवनसत्त्वे भरपूर प्रमाणात असतात. जेवणामध्ये हरभऱ्याचा कोवळा पाला, पीठ व डाळ यांचे भरपूर उपयोग करतात. हरभरा हे घोड्याचे पौष्टिक व महत्त्वाचे खाद्य असून टरफले व पाल्याचा उपयोग गुरांच्या चाऱ्यासाठी करतात.

हरभरा थोडा कच्चा असताना भाजून खातात. त्याच्या कोवळ्याशेंड्यांचा (पानांचा) उपयोग भाजीसाठी करतात. फूल येण्याच्या सुमारास त्याच्या पानांवर एक प्रकारचे अम्ल तयार होते. पहाटे त्याच्यावर पातळ कापड दीड-दोन तास पसरून ठेवले की, ते दवाने ओले होते व पानांवरील अम्ल त्यांत उतरते. कापड पिळून अम्ल बाटलीत गोळा करतात.त्यापासून उत्तम आम किंवा खारी तयार होते. ती उत्तम औषधी असून त्यामध्ये मॅलिक अम्ल (९०–९५%) व ऑक्झॅलिक अम्ल (५–१०%) असतात. त्यापासून हेक्टरी ४-५ किग्रॅ. आम मिळते. वांत्या (ओकारी), अग्निमांद्य, अपचन, पटकी, आमांश इत्यादींवर ती गुणकारी असते. लचकणे व संधिभंग होणे यांवर शिजविलेल्या पानांचा लेप गुणकारी असतो.

देशी चण्याची डाळ करतात. डाळीच्या पिठाचे गोड व खारे खमंगपदार्थ लोकप्रिय आहेत. उदा., पिठले, भजी, शेव, खारी, डाळ, वड्या, बेसन लाडू इत्यादी. काबुली चणा खाण्यास गोड व नरम असतो. काबुलीचण्याची डाळ करीत नाहीत, तो छोले भटोरे बनविण्यासाठी वापरतात. तसेच तो ओला असतानाच त्याची उसळ करतात. देशी व काबुली हरभऱ्यापासून फुटाणे तयार करतात. गुलाबी हरभरा फुटाण्यासाठी आणि हिरवा हरभरा उसळ व पुलाव करण्यासाठी उत्कृष्ट आहे.

मगर, सुरेखा अ.

 

संदर्भ : 1. C. S. I. R. The Wealth of India, Raw Materials Vol. II, Delhi 1950.

            २. कृषि आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, हरभरा : माहिती पुस्तिका, पुणे, ऑक्टोबर, १९९६.

            ३. महात्मा फुले कृषि विद्यापीठ, कृषिदर्शनी, राहुरी, २००९.