कुरण : पाळीव जनावरांच्या वैरणीसाठी उपयुक्त अशी गवते, द्विदल वर्गातील वनस्पती आणि इतर वनस्पती यांच्या एकत्रित उत्पादनासाठी वापरण्यात येणाऱ्या क्षेत्राला कुरण म्हणतात. अशी कुरणे इ.स.पू.१०,००० वर्षांपासून पाळीव जनावरांबरोबरच उपयोगात आलेली असावीत. पाश्चात्त्य देशांत कुरणांमधील चाऱ्यावर दूधदुभत्याचा धंदा विशेष अवलंबून असे. अजूनही तेथे कुरणाच्या उत्पादनाची जोड त्या धंद्याला आवश्यक समजली जाते. कुरणांखालचे एकूण जागतिक क्षेत्र गहू, मका, कपाशी, ओट, बार्ली (सातू), राय, सोयाबीन, बीट, भात, भुईमूग, बटाटे आणि तंबाखू या सर्व पिकांच्या एकूण क्षेत्रापेक्षाही जास्त आहे. कुरणातील चाऱ्याचे उत्पादन जमिनीच्या मगदुराप्रमाणे कमीजास्त येते.

नैसर्गिकपणे वाढणारी आणि मशागत करून तयार केलेली अशी दोन प्रकारची कुरणे असतात. नैसर्गिक कुरणात सालोसाल मागील सालच्या गवताचे बी तेथेच जमिनीवर पडून पावसाने उगवून वाढते किंवा तेथील गवत वगैरे वनस्पतींच्या ठोंबांना पावसाळ्यात फुटवे येऊन वाढतात आणि चारा तयार होतो. यात मोठमोठी झाडे सहसा वाढत नाहीत. पण अतिरिक्त चराईमुळे गवते कमी होऊन झाडाझुडपांचा शिरकाव होण्याचा संभव असतो. मशागत करून तयार केलेल्या कुरणात जमीन उताराला आडवी नांगरून तिच्यात बी फोकून पेरतात  किंवा वैरणीच्या पिकांचे ठोंब लावतात. अशा कुरणांना जरूरीप्रमाणे पाणी देण्याचीही सोय करतात. अशी कुरणे मध्यम ते जास्त पावसाच्या मुलखात आढळतात. न्युझीलंड, पश्चिम यूरोप, ब्रिटन व उत्तर अमेरिका या भागात अशी कुरणे आहेत. या कुरणांमुळे उत्तम प्रतीच्या पशुधन उत्पादनाला मदत होते. चांगल्या राखलेल्या कुरणांमधील फक्त चाऱ्यावर तेथील दुभती जनावरे, खुराक दिलेल्या जनावरांइतके दूध देतात. या कुरणातील चाऱ्यावर मेंढरेदेखील चांगली पोसतात आणि मांसोत्पादनात वाढ होते.

१९३० पर्यंत कुरणांच्या बाबतीत सुधारणा घडविण्याच्या दृष्टीने संशोधन झालेले नव्हते. तदनंतर कुरणांमधून वाढवावयाच्या चाऱ्यामध्ये (गवते आणि द्विदल वनस्पती) निवड करून आणि संकर घडवून त्याचे पोषणमूल्य वाढविणे, त्यात जनावरांना गोडी वाटेल असे गुण निर्माण करणे वगैरे मुद्यांकडे लक्ष पुरवून संशोधन होऊ लागले. नुसती चाऱ्याच्या राशीत वाढ करण्यापेक्षा या मुद्यांना महत्त्व देणे जरूर असते. कुरणांपैकी जवळजवळ तीनचतुर्थांशापेक्षा अधिक कुरणक्षेत्राचा उपयोग जनावरे,  विशेषतः दुभती जनावरे आणि मांसोत्पादनासाठी पाळलेली जनावरे चारण्यासाठीच केला जातो. त्यांना चराईमध्ये गोडी लागून त्यांनी पोटभर चारा खावा व त्यांचे पोषण चांगल्या प्रकारे होऊन त्यांच्यापासून मिळणारे दूध, मांस वगैरे उत्पादन वाढावे यांसाठी वरील मुद्यांकडे लक्ष पुरविणे अवश्य असते.

१९७० मध्ये जगात एकंदर जवळजवळ ३०० कोटी हे. क्षेत्र कुरणाखाली होते व भारतात सु. १४० लाख हे. क्षेत्र कुरणे व गायरानाखाली होते. कुरणातील चाऱ्याचे हेक्टरी उत्पादन सु. ५ ते१० टन मिळते.

निगा राखणे : कुरणातील उत्कृष्ट जातीच्या गवताचा जोम आणि वाढ किंचितही कमी न होता त्या गवताचा जास्तीत जास्त उपयोग व्हावा हा निगा राखण्याचा मुख्य उद्देश असतो. हा उद्देश साध्य करण्यासाठी त्या कुरणाची निगा पुढे नमूद केलेल्या मुद्यांकडे लक्ष देऊन करावी लागते.

  

(१) कुरणाच्या जमिनीची पावसाने होणारी धूप थांबविणे (२) निरुपयोगी झुडपे, गवते व झाडझाडोरा काढून टाकून त्याची परत वाढ होऊ न देण्याची काळजी घेणे (३) कुरणातील गवताची योग्य वाढ झाल्याखेरीज त्यात गुरे चरावयाला न सोडणे व गुरे चारण्याबाबतच्या सुधारलेल्या पद्धती वापरून त्यात चरावयाला सोडावयाच्या जनावरांची संख्या योग्य प्रमाणात मर्यादित करणे (४) कुरणात चांगल्या जातींची गवते व द्विदल वर्गांतील लसूणघास, रानमटकी वगैरेंसारखी पौष्टिक चाऱ्याची पिके वाढू लागतील अशीदक्षता बाळगणे.

वापर:कुरणातील गवाताचा वापर तीन प्रकारांनी करतात : (१) गवत पूर्ण वाढल्यावर योग्यवेळी ते कापून, वाळवून, बिंडे बांधून साठवून गरजेप्रमाणे गुरांना खाऊ घालतात. (२) मुरघास तयार करतात.  (३) कुरणातील उभ्या ओल्या गवतात गुरे चारतात, त्यामुळे गवतकापून वाहून आणून गुरांना खाऊ घालावे लागत नाही. कुरणात उभे असलेले गवत जनावरांना फार आवडते व पचतेही चांगले. त्यात प्रथिने, कॅल्शियम, फॉस्फरस आणि जीवनसत्त्वे भरपूर असतात. त्याचा इष्ट परिणाम जनावरांवर होतो. पण तो कुरणात चरावयाला सोडण्याच्या जनावरांची संख्या योग्यपणे नियंत्रित केल्यासच दिसून येतो. सध्या गायरानांची निगा योग्य प्रकारे राखली जात नसल्याचे आढळते. पूर्वीच्या काळी गायरानात चरावयाला सोडावयाच्या जनावरांच्या संख्येवर नियंत्रण असे. प्रत्येक जनावरामागे काही कर आकारला जाई आणि कर भरणारांचीच जनावरे गायरानात सोडीत, त्यामुळे त्यात चरणाऱ्या जनावरांची संख्या मर्यादित राही. सध्या कर रद्द होऊन ही राने सर्वांना मोकळी झाल्यामुळे त्यांच्यामध्ये चरणाऱ्या जनावरांची संख्या वाढली आणि गुरचरण क्षेत्राची निगा राखण्याची जबाबदारी सार्वजनिक झाल्यामुळे अकार्यक्षम झाली. परिणामतः गुरचरण क्षेत्रांची परिस्थिती  बिघडली, त्यात चांगल्या प्रकारची गवते नामशेष होऊन निरुपयोगी गवते आणि झारवड वाढू लागले, परंतु सध्या भारतात उत्पादन होणारा चारा देशातील जनावरांना अपुरा पडतो. त्याला जोड म्हणून या रानांची निगा राखून, सुधारणा घडवून चाऱ्याचे उत्पन्न वाढविणे अवश्य आहे.  त्यासाठी जे अनेक मार्ग आहेत त्यांपैकी काही महत्त्वाचे पुढीलप्रमाणे आहेत : (१) गुरचरण क्षेत्रातील मोठमोठे दगडधोंडे काढून घेऊन ते काढलेले दगड उताराच्या विरुद्ध योग्य जागी बांधासाठी वापरून पावसाने गुरचरण क्षेत्राची होणारी धूप थांबविणे (२) बाभळीची झुडपे, टणटणीच्या जाळ्या, निरुपयोगी गवते वगैरे काढून टाकून क्षेत्र स्वच्छ ठेवणे (३) चांगल्या जातींच्या गवतांचे आणि द्विदल वर्गातील चाऱ्याच्या वनस्पतींचे बी जागोजागी लावून त्यांचे प्रमाण वाढविण्याचा प्रघात सुरू ठेवणे (४) या क्षेत्रातील गवताला भरखते आणि वरखते गरजेप्रमाणे घालणे (५) कापीव गवताच्या कुरणातील गवत योग्य वेळी कापून गोळा करणे.

कुरणातील मोठमोठे दगडधोंडे काढून टाकल्यामुळे त्यातील गवताची वाढ चांगली होते व चरणाऱ्या गुरांना निर्वेधपणे चरता येते आणि राखीव कुरणातील गवत कापणीचे काम सुलभ बनते. काढलेले दगडधोडें कुरणातील उताराच्या जागेवर बांध घालण्यासाठी वापरून जमिनीची धूप थांबविता येते आणि ती थांबली म्हणजे गवताचे उत्पादन वाढते. बाभूळ, टणटणीसारखी झुडपे झाडोरा पसरून जमीन व्यापतात. त्यांनी व्यापलेल्या जागेत गवताची वाढ होत नाही. शिवाय त्या व्याप्त जागेच्या आजुबाजूला झुडपांच्या काट्याकुट्यांमुळे जनावरांना चरता येत नाही. हा झाडझाडोरा वेळीच काढून टाकला नाही, तर त्याचे आक्रमण वाढून गवताचे क्षेत्र आणि उत्पादन पुष्कळसे घटते. म्हणून तो काढून टाकणे आवश्यक असते.

गुरचरण क्षेत्राची उपयुक्तता वाढविण्यासाठी त्याचे विभाग पाडून त्या विभागांत आळीपाळीने गुरे चारणे फायदेशीर ठरते. त्यांबद्दल ज्या पद्धती आहेत त्यांपैकी काही खाली वर्णन केल्याप्रमाणे आहेत.

चराऊ राने गुरे चारण्याकरिता वापरावयाची असल्यास आळीपाळी चराई (आळीपाळीने गुरे चारण्याची पद्धत) पाळतात.  ती १५ ते २० हेक्टरच्या सलग कुरणाला उपयुक्त असते. त्याचे ४ ते ६ समान आकारमानाचे भाग पाडून त्याच्यात पहिल्या भागातून दुसऱ्यात,  दुसऱ्यातून तिसऱ्यात अशा पद्धतीने गुरे चारतात. त्यामुळे जनावरे पुढील भागात चरत असतात तेव्हा मागील चारून झालेल्या भागातील गवत वाढत राहते. चांगल्या गवताच्या ठोंबांना वाढ करावयाला अवसर मिळतो व एकंदरीत त्या गुरचरण क्षेत्रातील गवत बऱ्याच काळपर्यंत जनावरांना चरावयाला मिळू शकते. विश्रांतीच्या काळात एकेका भागातील गवताचे बी तयार होऊन जमिनीवर पडते व नैसर्गिक बी पेरणी होते. याप्रमाणे करीत गेल्यास २-३ वर्षात कुरणे–गायराने यांची सुधारणा होऊ शकते.

बहुवर्षायू (अनेक वर्षे जगणारी) गवते असलेल्या कुरणांसाठी त्यांचे दोन समान विभाग करून ते एकामागून दुसरा या क्रमाने चारतात. त्यामुळे त्या दोन्ही भागांना योग्य काळपर्यंत विश्रांती मिळून त्यांतील गवताची वाढ चांगली होते.  

चव्हाण, ई. गो.