पपनस: (बंपारा इं. शॅडॉक, प्युमेलो लॅ. सिट्रस ग्रॅंडिस, सि. डिकुमाना, सि. मॅक्सिमा कुल-रूटेसी). लिंबू वंशातील [→सिट्रस] हे फळझाड सु. साडेचार मी. उंच (चकोतऱ्यापेक्षा लहान) वाढणाऱ्या झुडपासारखे असते. ते मूळचे मलेशिया आणि पॉलिनीशिया येथील आहे. भारतामध्ये व श्रीलंकेत त्याचा प्रवेश जावामधून झाला आहे. याला गर्द हिरवी, सपक्ष देठाची व मोठी पाने येतात.

याला हवामान, जमीन, लागण, खतपाणी वगैरे संत्रा-मोसंबीप्रमाणे लागतात [→ संत्रे]. याची लागवड मोठ्या प्रमाणावर केली जात नाही फळबागेत याची थोडीफार झाडे लावतात. ही झाडे भारतात पंजाब, महाराष्ट्र, कर्नाटक, तमिळनाडू, कूर्ग या प्रदेशांत लहान प्रमाणावर लावतात. द. भारतातील कॉफीच्या मळ्यांत पपनस लावतात द. भारतात एकूण सु. २,२५० हेक्टर जमीन या वनस्पतीकरिता वापरात आहे.

गोल आणि थोड्या लंबवर्तुळाकार आकाराची १५ ते २० सेंमी. व्यासाची (चकोतऱ्यापेक्षा मोठी) फळे झाडाच्या फांद्यांवर एकेकटी लागलेली असतात. मोठ्या फळाचे वजन चार-साडेचार किग्रॅ. पर्यंत भरते. अपक्व फळे हिरव्या रंगाची असतात. पिकल्यावर त्यांचा रंग पिवळा क्वचित किरमिजी होतो. फळाची साल चकोतऱ्यापेक्षा जाड असते. ती मोसंबीच्या सालीसारखी मगजापासून (गरापासून) सोडवून घेता येते. याचा मगज अधिक घट्ट असतो. जरा मोठ्या आकाराच्या सुट्या, पांढऱ्या अगर तांबड्या अनेक कुड्या (रसाळ केस) मिळून मगज बनलेला असतो. भारतामध्ये हा आंबटगोड मगज साखर घालून खातात. पाश्चात्त्य देशांत जेवणानंतर मुखशुद्धीसाठी तो खातात. त्यात अ, ब आणि क ही जीवनसत्त्वे असतात. तो पौष्टिक तसाच ज्वरशामकही असतो. त्याच्यापासून मुरंबे, मार्मालेड हे खाद्यपदार्थही बनवितात. डांग्या खोकला, बालकंपवात, अपस्मार इत्यादींवर याची पाने उपयुक्त आहेत.

भारतामध्ये महाराष्ट्रातील पपनस पातळ सालीचे आणि उत्तम प्रतीचे समजले जातात. पपनसामध्ये चपट्या आणि गोल फळांचा, पांढऱ्या किंवा गुलाबी मगजाच्या फळांचा व बिनबियांच्या फळांचा असे बरेच रूढ न झालेल्या नावांचे प्रकार आढळतात. पपनसापेक्षा निम्मा लहान असा ‘अत्तनी’ नावाचा एक प्रकार लागवडीत आहे त्यात रसाळ व आंबूस मगज असतो त्याला सि. रुगुलोजा हे नाव दिले आहे बहुधा तो संत्रा व लिंबू यांपासून निघालेला संकरज असावा, असे म्हणतात.

पपनसाच्या दर झाडापासून सु. शंभर फळे मिळतात. फळे सप्टेंबर ते नोव्हेंबर या महिन्यांत पिकून तयार होतात.

पपनसावर डिंक्या, खैरा हे रोग पडतात व जंबीर फुलपाखरू ही कीड आढळते. 

पहा : चकोतरा मोसंबे लिंबू संत्रे सिट्रस. 

संदर्भ : C. S. I. R. The Wealth of India, Raw Materials, Vol. II, New Delhi, 1950.

पाटील, ह. चिं.