पडवळ: (हिं. चिचिंडा, चिंचोडा, पुडवल गु. पंडोल क. पडवळकाई सं. पटोल इं. स्नेक गोर्ड लॅ. ट्रायकोसँथस अँग्विना कुल-कुकर्विटेसी). ही वर्षायू (एक वर्ष जगणारी) वेल भारतात बऱ्याच प्रमाणात लागवडीत आहे. अनेक वर्षे लागवडीत असलेला हा जंगली पडवळाचा एक प्रकार असावा. याची फळे ०·५–१ मी. लांब व सु. ७ सेंमी. व्यासाची, दोन्ही टोकांना निमुळती असून कोवळेपणी हिरवी व त्यांवर पांढरे पट्टे असतात. दुसऱ्या प्रकारची फळे गर्द हिरवी असून त्यांवर पिवळसर किंवा फिकट हिरवे पट्टे असतात. फळे सापासारखी दिसतात, म्हणून स्नेक गोर्ड हे इंग्रजी नाव पडले आहे. पडवळ हे कडू (जंगली) पडवळ व ⇨कंवडळ यांच्या वंशातील व ⇨कुकर्बिटेसी कुलातील (कर्कटी कुलातील) असल्यामुळे त्यांची अनेक शारीरिक लक्षणे समान आहेत. पडवळाचे बी शीतक (थंडावा देणारे) असून फळात कृमिनाशक, रेचक व वांतिकारक (ओकारी आणणारा) हे गुण असतात (याच्या आकृतीसाठी ‘कुकर्बिटेसी’ ही नोंद पहावी).

पडवळ हे फळभाजीचे पीक असून त्याला जमीन व हवामान कुकर्बिटेसी कुलातील इतर पिकांप्रमाणे लागते. उत्तम निचऱ्याच्या बागायती जमिनीत तीन मी. अंतरावर तीस सेंमी. व्यासाचे आणि तितकेच खोल खड्डे (आळी) करून त्यांमध्ये ८–१० किग्रॅ. शेणखत घालून मे महिन्यात प्रत्येक आळ्यात ३-४ बिया लावतात व पाणी देतात. ७–१० दिवसांत बी उगवते. पुढे ८–१० दिवसांच्या अंतराने पाणी देतात. वेल मांडवावर चढवितात. फळे लांब व सरळ व्हावीत म्हणून त्यांच्या टोकाला छोटे वजन बांधतात. लागवडीनंतर एक महिन्याने हेक्टरी ४०० किग्रॅ. नायट्रोजन (सल्फेट ऑफ अमोनियाच्या रूपात) देतात. लागवडीपासून दोन-अडीच महिन्यांत फळे काढावयाला येतात. कोवळी फळे तोडण्याचे काम दोन-अडीच महिने चालते. फळांचे उत्पन्न हेक्टरी १२,०००–१४,००० किग्रॅ. येते.

महाराष्ट्र राज्यात लागवडीसाठी क्र. ३०–२–२, २०–५–५ आणि २९–१–९ ह्या पडवळाच्या प्रकारांची शिफारस करण्यात आली आहे. यावरील रोग व किडींसाठी ‘काकडी’ ही नोंद पहावी.

कडू (जंगली) पडवळ: (हिं. जंगली चिंचोडा गु. पतोला क. किरीपोडळाकाई, बेत्तड पडवळ सं. पटोल लॅ. ट्रायकोसँथस कुकुमारिना) ही जंगली वर्षायू वेल झाडाझुडपांवर व कुंपणावर वाढलेली भारतात सर्वत्र व श्रीलंका, मलेशिया, उत्तर ऑस्ट्रेलिया येथे आढळते. तिच्या खोडावर भेगा व तुरळकपणे केस असतात. पाने मोठी व अंशतः विभागलेली असून त्यांच्या कडा दातेरी असतात. फुले पांढरी असतात. मृदुफळ २·५–७·५ सेंमी. लांब व दोन्ही टोकांस निमुळते असते. त्याच्या हिरव्या पातळ सालीवर पांढरे पट्टे असतात पण पिकल्यावर ते शेंदरी होतात. बी लांबट वाटोळे व चपटे असते. फळाची चव अत्यंत कडू असून ते सौम्य रेचक असते. बी कृमिनाशक कोवळ्या फांद्यांचा व वाळलेल्या फुलांचा काढा साखर घालून पचनक्रिया सुधारण्यासाठी देतात. पाने वांतिकारक आणि मुळे तीव्र रेचक असतात. इतर सामान्य शारीरिक लक्षणे ⇨कुकर्बिटेसी कुलात वर्णिल्याप्रमाणे असतात. ही वनस्पती मत्स्यविष आहे.

क्षीरसागर, ब. ग. पाटील, ह. चिं.