तंबाखू : (तंबाकू हिं., गु., बं. तमाकू क. होगेसोप्पू इं. टोबॅको लॅ. निकोटियाना टाबॅकम  व नि. रस्टिका कुल-सोलॅनेसी). फार पुरातन काळापासून मनुष्याने निरनिराळ्या वनस्पतींच्या पानांचा उपयोग खाण्यासाठी (चघळण्यासाठी), तपकिरीसाठी, धूम्रपानासाठी वा औषधासाठी केला आहे त्यांपैकी तंबाखूसारखा दुसऱ्या कोणत्याही वनस्पतीचा जगभर प्रसार झालेला नाही. किंबहुना तंबाखूएवढी लोकप्रियता दुसऱ्या कोणत्याही वनस्पतीला लाभली नाही. तंबाखूच्या मूलस्थानाविषयी व इतिहासाविषयी जी माहिती उपलब्ध आहे ती काहीशी अपुरी व परस्परविरोधी आहे. कोलंबस आणि त्यांच्या खलाश्यांनी १४९२ च्या सुमारास वेस्ट इंडीज बेटांत स्थानिक लोकांना तंबाखूचा वापर करताना पाहिले. त्या अगोदर कित्येक वर्षे अमेरिकेतील रेड इंडियन लोक तिचा औषधासाठी व समारंभांत उपयोग करीत असावेत, असे काही लोकांचे मत आहे. काहींच्या मते बाराव्या शतकात आशियात तंबाखूची वनस्पती अस्तित्वात होती आणि काही जमातींमध्ये ती पवित्र मानली जात असे. भारतातील पौराणिक कथांतील तंबाखूसंबंधी पुष्कळशा उल्लेखांवरून व आयुर्वेदीय पद्धतीने तयार करावयाच्या काही औषधांच्या कृतींवरून या देशात ही वनस्पती फार प्राचीन काळापासून माहीत होती असे दिसते. अलीकडील काळात पोर्तुगीज लोकांनी सतराव्या शतकात ही वनस्पती भारतात आणली आणि तेव्हापासून तिची व्यापक प्रमाणावर लागवड झाली, असे अधिकृतपणे मानले जाते. सुरुवातीच्या काळात तंबाखूच्या वापराला सामाजिक प्रतिष्ठा नसल्यामुळे या वनस्पतीच्या लागवडीकडे दुर्लक्ष झाले, तरीसुद्धा ती तग धरून राहिली. आज भारतात एकूण लागवडीखालील क्षेत्राच्या सु. ०·३% एवढ्याच क्षेत्रावर तंबाखूचे पीक पिकविले जात असले, तरी हे महत्त्वाचे पीक आहे. दर वर्षी तंबाखूचे सु. साडेतीन ते चार लक्ष टन उत्पन्न होते. सु. ६६ अब्ज सिगारेट व २,५०,००० अब्ज विड्या दर वर्षी तयार केल्या जातात आणि सु. ४२ लक्ष लोक तंबाखूची लागवड व प्रक्रियांच्या आणि इतर संबंधित कारखान्यांत गुंतले आहेत. तंबाखूपासून भारत सरकारला दर वर्षी अंदाजे २२८ कोटी रुपये अबकारी कराच्या रूपाने मिळतात व निर्यातीमुळे १९७२ साली ५७ कोटी रुपयांचे परकीय चलन मिळाले.

आ. १. देशी तंबाखूचे झाड : नि. टाबॅकम : (१) पान व फुलोरा, (२) फुलाचा उभा छेद, (३) फळाचा उभा छेद, (४) फळ, (५) बी.

वनस्पतिवर्णन : ही परिचित वस्तू ज्या वनस्पतीपासून मिळवितात ती आणि तिच्यासारख्या (तिच्या वंशातील) इतर जाती मूळच्या उ. आणि द. अमेरिकेतील असून काही ऑस्ट्रेलियातील आहेत. त्या सर्व निकोटियाना या शास्त्रीय नावाने ओळखल्या जाणाऱ्या फुलझाडांच्या वंशातील व धोत्रा कुलातील [⟶सोलॅनेसी] असून निकोटियाना टाबॅकम (देशी) आणि नि. रस्टिका (विलायती किंवा कलकत्तिया) या जाती तंबाखूकरिता लागवडीत आहेत. ह्या दोन्ही जाती रानटी अवस्थेत आढळत नाहीत. इतर काही जाती बागेत शोभेकरिता लावतात (भारतात नि. ॲलाटानि. प्लंबॅजिनिफोलिया). निकोटियाना हे नाव झां नीको (१५३०–१६००) ह्या फ्रान्सच्या लिस्बन (पोर्तुगाल) येथील राजदूतांच्या नावारून दिले आहे, कारण त्यांनी बेल्जियममधील (फ्लँडर्स) एका व्यापाऱ्याकडून तंबाखू घेऊन ती प्रथम पोर्तुगालच्या राजदरबारी सादर केली व नंतर फ्रान्सला परत आल्यावर राणीला (कात्रिअन द मेदेसेस) भेट म्हणून दिली (१५६०). कोलंबस यांच्या पूर्व काळात वेस्ट इंडीज, मेक्सिको, म. अमेरिका व द. अमेरिकेचा उत्तर भाग येथे तंबाखू लागवडीत होती. कोलंबस यांचे खलाशी प्रथम (१४९२) वेस्ट इंडीजमध्ये उतरले त्या वेळी त्यांनी तेथील कॅरीब इंडियन लोकांना तंबाखूच्या पानांचे सिगार ओढताना आणि तंबाखूची पाने विस्तवावर टाकून नाकाने वाय (Y) या इंग्रजी अक्षराच्या आकाराच्या नळीच्या साहाय्याने धूर ओढताना पाहिले. त्या नळीला किंवा सिगाराला ‘टोबॅकोस’ हे नाव होते व पुढे तेच नाव तंबाखूला  दिले गेले. स्पॅनिश भाषेत टोबॅको, इंग्रजीत टोबॅको व मराठीत तंबाखू ही रूपे मूळच्या टोबॅकोसवरून आली असावीत हे उघड आहे लॅटिन नावातील टाबॅकम हा शब्द तसाच आला आहे. निकोटियाना वंशात एकूण साठ जाती असून त्यांची विभागणी तीन उपवंशांत (टाबॅकम, रस्टिका आणि पिटुनिऑइडीस) केली जाते. नि. टाबॅकम या जातीचा अंतर्भाव टाबॅकम उपवंशात व नि. रस्टिका या जातीचा रस्टिका उपवंशात करतात.

निकोटियाना टाबॅकम : तंबाखूची ही जाती विशेषेकरून उष्ण प्रदेशांत तंबाखूकरिता लागवडीत आहे ती सध्या जंगली अवस्थेत आढळत नाही. नि. सिल्व्हेस्ट्रिस व नि. ऑटोफोरा यांच्या संकरापासून पूर्वी तिचा उगम झाला असावा, तसेच संकरानंतर तिच्या शरीरातील रंगसूत्रेही (एका पिढीतील आनुवंशिक लक्षणे पुढच्या पिढीत नेणारे सुतासारखे सूक्ष्म घटकही) द्विगुणित (रंगसूत्रांची संख्या नेहमीच्या दुप्पट होणे) झाली असावीत [⟶बहुगुणन]. वायव्य अर्जेंटिना व जवळचा बोलिव्हिया हे क्षेत्र तिचे मूळचे प्रसारस्थान असावे कारण तेथेच तिचे हे पितर होते आणि आजही आहेत. तिचे अनेक (सु. ६९) प्रकार व संकरज आज उपलब्ध आहेत त्यांची दोन गटांत विभागणी केली असून त्यांमध्ये त्यांचा फुलोरा, पानांचे देठ आणि त्यांचा आकार व वनस्पतींचे स्वरूप विचारात घेतले जाते. ही वनस्पती मजबूत, वर्षायू (एक वर्ष जगणारी), एक ते तीन मी. उंच असून तिच्या सरळ खोडावर थोड्या फांद्या व सर्वत्र प्रपिंडयुक्त (चिकट ग्रंथियुक्त) केस असतात. पाने लांबट, अंडाकृती  किंवा कुंतसम (भाल्यासारखी) व सु. १०० सेंमी. लांब असतात देठ कधीकधी आढळतो व पात्याला तळाशी कानाच्या पाळीसारखा विस्तार असतो. परिमंजिरी फुलोरा [⟶पुष्पबंध] फुले द्विलिंगी, नियमित, पंचभागी, नसराळ्यासारखी, फिकट लाल किंवा पांढरी किंजदले दोन [⟶फूल] फळ (बोंड) शुष्क, लंबगोल किंवा गोलसर सु. १५–२० मिमी. लांब बी गोलसर अथवा लांबट गोलसर, ०·५ मिमी. लांब, पिंगट (तपकिरी) असून त्यावर उभे पंखयुक्त कंगोरे असतात. या बियांची अंकुरणक्षमता २० वर्षांपर्यंत टिकते असे म्हणतात परंतु भारतात ती सर्वसाधारणपणे ३ वर्षांपेक्षा जास्त नसल्याचे आढळून आले आहे. इतर सामान्य शारीरिक लक्षणे धोत्रा कुलात [⟶सोलॅनेसी] वर्णिल्याप्रमाणे असतात. नि. रस्टिका या जातीपेक्षा ही जात अधिक कणखर व सोशिक असल्याने अमेरिकेतही विशेषेकरून लागवडीत आहे.


आ. २. तंबाखूचा सुरती प्रकार (नि. टाबॅकम) : फुलोऱ्यासह झाड.

 निकोटियाना रस्टिका :  ही जातीही रानटी अवस्थेत आज आढळत नाही तंबाखूकरिता लागवडीत आहे. नि. अंड्युलॅटानि. पॅनिक्युलॅटा या जातींच्या नैसर्गिक संकरापासून आणि नंतर रंगसूत्रे द्विगुणित होऊन ही बनली असावी, असे मानतात. हिचे अनेक प्रकार आणि संकरज (भारतात एकूण सु. वीस) आढळतात, हिची लागवड हल्ली रशिया, बाल्कन राष्ट्रे, भारत, पाकिस्तान, ब्रह्मदेश, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया ह्या देशांत आहे. अमेरिकेत हिच्याऐवजी वर दिलेली जाती पिकवतात. हिचा उगम पेरूच्या मध्य उत्तरेस असावा. ही काहीशी चरबट, सु. ०·५–१·५ मी. उंच, वर्षायू ओषधी असून तिचे खोड जाड व केसाळ आणि फांद्या बारीक असतात. पाने सवृंत (देठ असलेली), गर्द हिरवी, सु. ३० X २० सेंमी., बहुधा अंडाकृती, लंबगोल अथवा हृदयाकृती असून तळाशी विषम असतात. परिमंजिऱ्या आखूड फुले हिरवट पिवळी, १·२–१·५ सेंमी. लांब बोंड लंबगोल ते गोलसर, ७–१६ मिमी. लांब बिया ०·७–१·१ मिमी. लांब, धुरकट तपकिरी, नि. टाबॅकमच्या बियांपेक्षा मोठ्या व तिप्पट जड असतात.

 

नि. टाबॅकम व नि. रस्टिका यांची तुलना : नि. टाबॅकम ही जाती अर्ध–मरुवनस्पती (कमी पाण्याच्या जागी वाढणारी) अथवा मध्यवनस्पती (पाणी कमी नाही अगर फार नाही अशा जागी वाढणारी) या वर्गात मोडते परंतु नि. रस्टिका ही फक्त मध्यवनस्पती आहे. नि. टाबॅकमचे प्रकार नि. रस्टिकाच्या प्रकारांपेक्षा जास्त काष्ठमय असून त्यांच्या पानांच्या जाडीच्या बाबतीत निरनिराळ्या प्रकारांत नि. रस्टिकांपेक्षा जास्त विभिन्नता असते. नि. टाबॅकमच्या पानांवरील त्वग्रंध्रे (बाह्य त्वचेतील सूक्ष्म छिद्रे) नि. रस्टिकाच्या पानांवरील त्वग्रंध्रांपेक्षा लहान असतात. त्यामुळे या जातीमध्ये डोंगराळ प्रदेशांत वाढू शकणारे ‘टर्किश’ सारखे प्रकार आहेत. काही प्रकार ४३° से. पर्यंत तापमान सहन करू शकतात, तर काही प्रकार पाण्याच्या गोठणबिंदूइतके कमी तापमानही सहन करतात.

आ. ३. तंबाखूचा मोतीहारी प्रकार (नि. रस्टिका) : फुलोऱ्यासह झाड.

भारतातील नि. टाबॅकमचे प्रकार बहुतांशी उंच वाढणारे असून खोडावरील कांडी फार आखूड अथवा २२·५ सेंमी. पर्यंत लांब असतात. झाडांची उंची ७० सेंमी. पासून २०० सेंमी. पर्यंत असते. पाने अंडाकृती अथवा कुंतसम सवृंत अगर अवृंत असतात. झाडावरील पानांची संख्या १२ पासून ४० पर्यंत असते. प्रत्येक पानाची लांबी प्रकाराप्रमाणे १० ते १२ सेंमी. पासून १०० सेंमी. पर्यंत असते. क्वचित १२० सेंमी. लांब पानेही आढळून येतात. देठ असल्यास तो अगदी लहान व चिंचोळा अथवा २२·५ सेंमी. पर्यंत लांब असतो. फुलोरा काही प्रकारांत आखूड आणि पानांनी गुच्छाप्रमाणे झाकलेला असतो अथवा काही प्रकारांत झाडाच्या एकूण उंचीच्या ३/४ एवढा लांब असतो. फुले पांढरट गुलाबी रंगापासून भडक लाल रंगाची असतात.

नि. रस्टिका जातीचे प्रकार विशिष्ट तापमानात आणि आर्द्रतेत वाढू शकतात. ते सर्व प्रकार बागाईताखालीच असतात. जिरायती प्रकार आढळून येत नाहीत. झाडे ठेंगणी व जोमदार असून पाने मऊ, जाड आणि रसयुक्त असून हृदयाकृती व टोकाशी वाटोळी असतात. सर्व पाने सवृंत असून देठाची लांबी ४ ते ९ सेंमी. असते. पानावरील त्वग्रंध्रे मोठी असतात. फुले पिवळी असतात.

जागतिक क्षेत्र आणि उत्पादन : जगातील तंबाखू पिकविणाऱ्या प्रमुख देशांतील लागवडीखालील क्षेत्र व उत्पादन कोष्टक क्र. १ मध्ये दिलेले आहे.


कोष्टक क्र. १. तंबाखू पिकविणाऱ्या प्रमुख देशांतील लागवडीखालील क्षेत्र व उत्पादन (१९७३). 

देश 

क्षेत्र (हजार हे.) 

उत्पादन (कोटी किग्रॅ.) 

अमेरिकेची संयुक्त संस्थाने 

अर्जेंटिना 

इंडोनेशिया 

कॅनडा 

ग्रीस 

चीन 

जपान 

तुर्कस्तान 

थायलंड 

पाकिस्तान 

फिलिपीन्स 

बल्गेरिया 

ब्रह्मदेश 

ब्राझील 

भारत 

मालावी 

रशिया 

३५८·५ 

७९·७ 

१५३·८ 

४९·॰ 

८४·६ 

७७२·९ 

५९·१ 

३५॰·॰ 

९८·७ 

४॰·५ 

८७·॰ 

१३३·९ 

५४·६ 

२॰४·४ 

४३३·९ 

६॰·७ 

१८४·१ 

८१·॰९ 

७·३६ 

७·५५ 

१२·३७ 

९·१६ 

९५·३९ 

१५·३५ 

१५·९॰ 

४·५२ 

७·२६ 

७·७६ 

१३·५॰ 

४·३५ 

१७·४॰ 

३६·३६ 

३·२७ 

२५·७५ 

एकूण जग (इतर देशांसह) 

४,॰२७·४ 

४५४·॰४ 

वरील कोष्टकावरून दिसून येईल की, तंबाखूच्या एकूण उत्पादनात अमेरिका व चीननंतर भारताचा क्रमांक लागतो. जगातील एकूण उत्पादनाच्या १७·३% उत्पादन अमेरिकेत, १६·९% चीनमध्येआणि ९% भारतात होते. चीनमधील तंबाखूचे क्षेत्रअमेरिकेतील क्षेत्रापेक्षा सु. दुप्पट असले, तरी त्या देशातील उत्पादन अमेरिकेच्या उत्पादनापेक्षा कमी आहे. तसेच भारतात तंबाखूचे क्षेत्र अमेरिकेपेक्षा १·३ पटीने जास्त आहे परंतु उत्पादन मात्र अमेरिकेच्या जवळ जवळ निम्म्यानेच आहे. याचे कारण अमेरिकेत दर हेक्टरी तंबाखूचे उत्पादन सु. २,४०० किग्रॅ. आहे. तर भारतात ते फक्त सु. ८०० किग्रॅ. आहे.

भारतातील क्षेत्र व उत्पादन :१९७२–७३ मध्ये भारतात तंबाखूखालील एकूण क्षेत्र ४,३३,९०० हे होते आणि उत्पादन ३६·३६ कोटी किग्रॅ. होते. तंबाखूचे उत्पादन करणाऱ्या भारतातील प्रमुख राज्यांची आकडेवारी कोष्टक क्र. २ मध्ये दिली आहे.

कोष्टक क्र. २. भारतातील निरनिराळ्या राज्यांतील तंबाखूखालील क्षेत्र व उत्पादन(१९७२–७३).

राज्य 

क्षेत्र (हजार हे.) 

उत्पादन (कोटी किग्रॅ.) 

आंध्र प्रदेश 

उत्तर प्रदेश 

ओरिसा 

कर्नाटक 

गुजरात 

तमिळनाडू 

प. बंगाल 

बिहार 

महाराष्ट्र 

२१२·३ 

१२·४ 

१५·॰ 

३७·॰ 

८७·२ 

१२·५ 

१३·१ 

१३·३ 

१॰·६ 

१५·५९ 

१·२४ 

१·२१ 

२·॰३ 

११·॰१ 

१·८६ 

१·॰॰ 

॰·५४ 

॰·४४ 

एकूण भारत(इतर राज्यांसह) 

४३३·९

३६·३६


भारतातील तंबाखूखालील एकूण क्षेत्रापैकी निम्म्यापेक्षा जास्त क्षेत्र एकट्या आंध्र प्रदेशात असून एकूण उत्पादनाच्या ४३% उत्पादन त्या राज्यात होते. या खालोखाल गुजरात (२०% क्षेत्र) आणि कर्नाटक (८% क्षेत्र) या राज्यांचा क्रमांक लागतो. बिहार, ओरिसा, तमिळनाडू, उ. प्रदेश, प. बंगाल आणि महाराष्ट्रात ते प्रत्येकी सु. ३% आहे. आंध्र प्रदेशातील क्षेत्र बहुतांशी सिगारेट तंबाखूखाली असून ते मुख्यतः गुंतूरच्या आसपासच्या प्रदेशात आहे. भारतातील सिगारेट तंबाखूचे ९०% उत्पादन या राज्यात होते. गुजरात आणि कर्नाटक या दोन राज्यांत विडीच्या तंबाखूचे एकूण उत्पादनाच्या ९०% उत्पादन होते (गुजरात ५०%, कर्नाटक ४०%). हुक्क्याचा तंबाखू बहुतांशी उत्तरेकडील राज्यांत पिकतो सिगार व चिरुटाच्या तंबाखूचे उत्पादन तमिळनाडू आणि आंध्र प्रदेशात होते. महाराष्ट्रात कोल्हापूर व सांगली या दोन जिल्ह्यांत राज्यातील ८०% तंबाखूचे क्षेत्र आहे. अहमदनगर व सोलापूर जिल्ह्यांत मिळून १०% क्षेत्र आहे. या सर्व जिल्ह्यांत विडीच्या तंबाखूचेच उत्पादन होते. आंध्र प्रदेशातील गुंतूर जिल्ह्याला लागून असलेल्या चंद्रपूर जिल्ह्याच्या दक्षिण भागात ३०० ते ४०० हे. क्षेत्रात सिगारेट तंबाखूची लागवड होते.

भारतातील लागवडीखालील प्रकार : भारतात तंबाखूची लागवड सिगारेट, सिगार आणि चिरूट, सिगारसाठी वेष्टन, विडी, हुक्का, तपकीर, खाण्यासाठी आणि इतर खास उपयोगांसाठी केली जाते. जगातील इतर कोणत्याही देशांत भारताइतके तंबाखूचे लागवडीखालील प्रकार, लागवडीच्या निरनिराळ्या पद्धती आणि पानांवरील प्रकियांचे (क्युअरिंगचे) प्रकार नाहीत. भारतातील तंबाखूखालील एकूण क्षेत्रापैकी सु. ९०% क्षेत्रात नि. टाबॅकम या जातीची लागवड केली जाते व राहिलेल्या १०% क्षेत्रात नि. रस्टिका जातीची लागवड केली जाते. नि. टाबॅकम जातीमध्ये वर उल्लेख केलेल्या सर्व निरनिराळ्या उपयोगांसाठी खास प्रकार लागवडीत आहेत. ते ‘देशी’ या सर्वसाधारण नावाने ओळखले जातात. नि. रस्टिका जातीची सु. ९०% लागवड भारताच्या उत्तर आणि ईशान्य भागांत केली जाते. कारण या जातीला थंड हवामान मानवते. या जातीच्या तंबाखूमध्ये निकोटिनाचे प्रमाण जास्त असल्यामुळे ती हुक्का, तपकीर, खाणे (जर्दा) व काही वेळा विडीसाठी उपयोगात आणली जाते. इतर उपयोगांसाठी ती उपयुक्त नाही. यांतील प्रकारांना ‘विलायती’ अगर ‘कलकत्तिया’ असे संबोधण्यात येते. वरील दोन्ही जातींचे भारतातील व्यापारी आणि लागवडीखालील प्रमुख प्रकार कोष्टक क्र. ३ मध्ये दिले आहे.

कोष्टक क्र. ३. भारतातील तंबाखूचे व्यापारी आणि लागवडीखालील प्रमुख प्रकार 

व्यापारी प्रकार 

लागवडीचे प्रमुख प्रदेश 

लागवडीखालील प्रमुख प्रकार 

सिगारेटची तंबाखू 

नि. टाबॅकम 

व्हर्जिनिया आणि परदेशी प्रकार. 

आंध्र प्रदेश, कर्नाटक. 

हॅरिसन स्पेशल, हॅरिसन स्पेशल–९,चॅथॅम, हिक्स, डेलक्रेस्ट, व्हाइट बर्ले व टर्कीश [शेवटचे दोन प्रकार सिगारेट तंबाखूत मिसळण्यासाठी (ब्लेंडिंगसाठी) आहेत]. 

नाटू अथवा देशी प्रकार. 

आंध्र प्रदेश

थोक्काकू, देसावली आणि दक्षिणाधी.

विडीची तंबाखू 

नि. टाबॅकम 

गुजरात  

केळीयू–२॰ आणि ४९, गांडियू–६, साजिपुरीयू–५७,पिलियू–९८ आणि रामोल–४३.

कर्नाटक (निपाणी भाग), महाराष्ट्र

सुरती–२॰, मिरज, निपाणी, सांगली आणि जवारी.

नि. रस्टिका

कर्नाटक, महाराष्ट्र, गुजरात.

पंढरपुरी, कलकत्तिया.

सिगार व चिरुटाची तंबाखू 

नि. टाबॅकम 

आंध्र प्रदेश 

चेब्रोलू, लंका–२७, नाटू, जापालम, सुराकट्टी, देसावली. 

तमिळनाडू 

वेल्लाइवझाई, करिंगकप्पल, करुवझाई, ऊसीकप्पल. 

पं. बंगाल

जाती भेंगी, डिक्सी शेड व रंगपूर सुमात्रा (फक्त वेष्टनासाठी).

हुक्का तंबाखू 

नि. टाबॅकम 

पंजाब 

नोकी, कक्का, घोरा, गिद्री, टी–१७ आणि टी–२३. 

बिहार

बोरी प्रकार 

उत्तर प्रदेश

देशी प्रकार

प. बंगाल, आसाम. 

जाती प्रकार (चामा, भेंगी)

नि. रस्टिका

पंजाब 

गोभी, टी–२१८, टी–२३८, ए. पी. एस.–२१९. 

उत्तर प्रदेश

कलकत्तिया

बिहार

विलायती

प. बंगाल

मोतीहारी

खाण्याची व तपकिरीची तंबाखू 

नि. टाबॅकम 

उत्तर प्रदेश, बिहार, आसाम. 

देशी (बोन्हरी, केलिया आणि कोन्निया) आणि एन. पी.–७॰.

तमिळनाडू

वलमोन्नाई, मीनाम्पलायम आणि शिवपुरी.

कर्नाटक (द. कारवार)

पुचक्कड आणि पानन (खास तपकिरीचा प्रकार) 

गुजरात

काली चोपडिया आणि जुडी

प. बंगाल

जाती 

नि. रस्टिका

प. बंगाल

मोतीहारी 

आसाम, बिहार. 

विलायती 

पंजाब

कलकत्तिया


खाण्याच्या तंबाखूचे आणि तपकिरीसाठी वापरावयाच्या तंबाखूचे खास प्रकार (काही उपवाद वगळता) लागवडीत नाहीत. तंबाखूचा एकच प्रकार निरनिराळ्या प्रकारे वापरण्यात येतो. सर्वसाधारणपणे मध्यम ते जाड पानांचे आणि तिखट स्वादाचे प्रकार खाण्यासाठी व तपकिरीसाठी वापरतात. स्वस्त प्रकारची तपकीर तंबाखूच्या कोणत्याही प्रकारच्या भुकटीपासून बनवितात.

हवामान व जमीन : तंबाखू हे मूळचे उष्ण कटिबंधातील पीक असले तरी ते उष्ण, उपोष्ण व समशीतोष्ण अशा तिन्ही कटिबंधातील हवामानात वाढू शकते. वर्षातून ३ ते ४ महिन्यांपर्यंत सरासरी तापमान २१° ते ३१° से. असल्यास आणि कडाक्याची थंडी नसल्यास हे पीक चांगले येते. उत्तरेस स्वीडन व दक्षिणेस न्यूझीलंडपर्यंतच्या वेगवेगळ्या देशांत वेगवेगळ्या हंगामांत हे पीक घेतले जाते. सरासरी तापमान सु. २७° से. असल्यास हे पीक ८० ते ९० दिवसांत तयार होते यापेक्षा तापमान कमी असल्यास पीक तयार होण्यास जास्त दिवस लागतात. ३८° से.पेक्षा जास्त तापमान फार दिवस असल्यास पिकावर प्रतिकूल परिणाम होतो. पिकाच्या वाढीच्या काळात कमीतकमी ५० मिमी. पाऊस (चांगल्याप्रकारे विभागून) असणे अवश्य आहे १५० मिमी. पेक्षा जास्त पाऊस असलेल्या प्रदेशांत हे पीक घेत नाहीत. पीक तयार होण्याच्या सुमारास पाऊस नसावा नाहीतर पानावरील चिकट पदार्थ वाहून जातात तसेच सर्कोस्पोरा या कवकामुळे (बुरशीसारख्या हरितद्रव्यरहित वनस्पतीमुळे) पानावरील ठिपक्यांचा रोग पसरतो. हवेतील आर्द्रतेलाही फार महत्त्व आहे. भारतात तंबाखूच्या हंगामात हवेतील आर्द्रता (माध्यान्हीपूर्वी) ७४ ते ९० टक्के असते. तंबाखूच्या पिकाच्या बाबतीत दर हेक्टरी उत्पन्नापेक्षा तंबाखूच्या दर्जाला जास्त महत्त्व आहे. योग्य हवामान आणि जमीन ही चांगल्या दर्जाच्या तंबाखूच्या उत्पादनासाठी आवश्यक आहेत. योग्य मशागत करून कोणत्याही चांगल्या निचऱ्याच्या जमिनीत हे पीक घेता येते परंतु या पिकाला मध्यम पोताची व पाण्याचा योग्य निचरा होणारी जमीन चांगली मानवते. वाजवीपेक्षा जास्त साठलेले पाणी हे पीक सहन करू शकत नाही. जमिनीचे PH मूल्य [⟶पीएच मूल्य] ५·० ते ६·० च्या दरम्यान असावे. खत न घातलेल्या हलक्या जमिनीतील तंबाखूची पाने पिवळी आणि पातळ असतात. खताचा योग्य पुरवठा झाल्यास ती तपकिरी रंगाची असतात, परंतु फारशी जाड नसतात. भारी जमिनीतील पाने जाड, वजनदार, काळपट रंगाची असून त्यांना गंध असतो. विशिष्ट जमिनीत विशिष्ट प्रकारच्या तंबाखूचे पीक चांगले येते. यामुळे तंबाखूचे प्रमुख प्रकार देशाच्या विशिष्ट भागांतच आढळून येतात उदा., गरम हवा पद्धतीने प्रक्रिया केलेली (सिगारेट) तंबाखू आंध्र प्रदेशात, सिगार तंबाखू तमिळनाडूत, विडीची तंबाखू दक्षिण महाराष्ट्र व उत्तर कर्नाटकात (बेळगाव–निपाणी भागात) आणि हुक्क्याची तंबाखू पंजाब, उत्तर प्रदेश व बिहारमध्ये गाळवट जमिनीत होते. आंध्र प्रदेशात भारी, काळ्या व पाण्याचा निचरा योग्य न होणाऱ्या जमिनीत सिगारेट तंबाखूचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर होत असले, तरी त्या तंबाखूची प्रत त्याच प्रकारच्या (व्हर्जिनिया) तंबाखूच्या अमेरिकेत पिकणाऱ्या तंबाखूपेक्षा हलकी असते व उत्पन्नही कमी येते. कर्नाटकात चांगल्या निचऱ्याच्या जमिनीत पिकणाऱ्या सिगारेट तंबाखूची प्रत आंध्र प्रदेशातील तंबाखूपेक्षा चांगली असते.

पूर्व मशागत : मातीच्या स्वरूप व संरचनेचा तंबाखूच्या पानांच्या दर्जावर महत्त्वाचा परिणाम होत असल्यामुळे जमिनीची पूर्व मशागत जेवढी चांगली करता येईल, तेवढी करणे आवश्यक असते. जमीन ४ ते ६ वेळा नांगरून आंध्र प्रदेश आणि कर्नाटकात सिगारेट तंबाखूसाठी हेक्टरी ७·५ ते १२·५ टन आणि इतर भागांत २५ ते ३० टन शेणखत घालतात. तमिळनाडूत खाण्याच्या तंबाखूसाठी १२५ टन शेणखत घालतात. उत्तर प्रदेशात जेथे खाऱ्या विहिरीचे पाणी दिले जाते तेथे शेणखत मुळीच घालीत नाहीत. शेणखताच्या जोडीला हेक्टरी ६० ते १७५ किग्रॅ. नायट्रोजन मिळेल अशा प्रमाणात पेंडीचे खत विडी, सिगार आणि चिरूट यांसाठी तंबाखू पिकविणाऱ्या भागांत घालतात. जिरायत पिकासाठी जमीन समपातळीत सपाट ठेवतात.

अभिवृद्धी : तंबाखूची अभिवृद्धी बियांपासून करतात. बियांची शुद्धता फार महत्त्वाची आहे कारण तंबाखूची प्रत व एकसारखेपणा शुद्ध बियांवर अवलंबून असतात. यासाठी बी धरते वेळी झाडे नीट तपासून त्यांत इतर प्रकारांची भेसळ नसल्याची खात्री करून घेणे आवश्यक असते. शुद्ध बियांची अंकुरणक्षमता २४° ते ३०° से. या तापमानात ९०% असते.

रोपे तयार करणे : तंबाखूची रोपे सपाट अगर गादी वाफ्यांत तयार करतात. वाफ्याची रुंदी सव्वा ते दीड मीटर व उंची ५ ते ७·५ सेंमी. असते. राब पद्धतीने जमीन जाळून तीवर कवकनाशक झारीने शिंपडतात. वाफ्यात खत घालणे आवश्यक असते. हेक्टरी २५ ते १२५ टन शेणखत आणि हेक्टरी ४५–१३० किग्रॅ. नायट्रोजन मिळेल एवढी भुईमुगाची अथवा एरंडीची पेंड घालतात. बी फार लहान असल्यामुळे माती, रेती, राख अथवा खत यांत मिसळून पेरतात. बहुतेक भागांत पेरणीचा हंगाम जुलैच्या पहिल्या आठवड्यापासून सप्टेंबरच्या तिसऱ्या आठवड्यापर्यंत असतो. पंजाबमध्ये तो नोव्हेंबर–डिसेंबर व उत्तर प्रदेशात फेब्रुवारीच्या मध्यापासून मार्चच्या मध्यापर्यंत असतो. पेरणीपूर्वी बी १०°–१२° से. तापमानात १० दिवस ठेवून लागलीच पेरल्यास ते लवकर व जास्त संख्येने उगवते आणि लागणीलायक रोपांची संख्या जास्त असते. एक हेक्टर क्षेत्राला टाबॅकम जातीचे २·७५ ते ३·५ किग्रॅ व रस्टिका जातीचे ४·५ ते ६·७ किग्रॅ. बी लागते. २५ ते ४० चौ. मी. वाफ्याच्या क्षेत्रातील रोपे अर्धा ते एक हेक्टर क्षेत्रात लावण्यास पुरेशी असतात. बी पेरल्यावर ते हाताने अगर लाकडी रुळाने हलकेच दाबून गवत अगर काटक्यांनी झाकतात. वाफ्यात बेताची ओल राहील अशा बेतानेच पाणी देतात कारण पाणी जास्त झाल्यास रोपे मरण्याची भीती असते. उगवून येणारी रोपे पिवळी दिसून आल्यास १०० चौ.मी. क्षेत्राला २·७ किग्रॅ. या प्रमाणात सोडियम नायट्रेट दिल्यास रोपांचा रंग सुधारतो. नि. टाबॅकम जातीची रोपे पेरणीपासून ७–९ आठवडयांनी आणि नि. रस्टिका जातीची रोपे ५-६ आठवड्यांनी लागणीलायक होतात पंजाबमध्ये थंडीमुळे १०–११ आठवडे लागतात. लागणीसाठी रोपे उपटण्याआधी आठ दिवस पाण्याचे प्रमाण कमी करतात. यामुळे रोपे थोडी काटक बनतात आणि लागणीनंतर मर कमी होते.


वरखत : पानांच्या वाढीसाठी नायट्रोजनाची आवश्यकता असते, परंतु तो जास्त प्रमाणात दिला गेल्यास तंबाखूचा स्वाद आणि रुची कमी होते. फॉस्फेटामुळे पानांचे आकारमान वाढते आणि पीक एकाच वेळी तयार होते. तंबाखूच्या पिकाला पोटॅश हा फार महत्त्वाचा खताचा घटक आहे. पोटॅशमुळे उत्पन्न वाढते, प्रत सुधारते, पानांना रंग व स्वाद चांगला येतो आणि झाडांमध्ये रोगप्रतिकारक्षमता येते.

तंबाखूच्या पिकाला खतांची मात्रा निरनिराळ्या भागांत निरनिराळी देण्यात येते. जमिनीतील पोषक द्रव्ये, तंबाखूचा प्रकार आणि पाणी द्यावयाची सोय यांवर खतांची मात्रा अवलंबून असते. सर्वसाधारणपणे सिगारेटच्या (व्हर्जिनिया) तंबाखूला दर हेक्टरी १७–२२ किग्रॅ. नायट्रोजन, ६७–९० किग्रॅ. फॉस्फरस (P2O5) आणि तितकेच पोटॅश दिल्यास पीक चांगले येते. तंबाखूच्या इतर प्रकारांना दर हेक्टरी ४५–५७ किग्रॅ. नायट्रोजन आणि फॉस्फरस व पोटॅश प्रत्येकी ३५–४५ किग्रॅ. देतात. अमोनियम क्लोराइड आणि म्युरिएट ऑफ पोटॅश या खतांचा तंबाखूच्या पिकावर अनिष्ट परिणाम होतो. खताची सर्व मात्रा लागणीच्या वेळीच देतात.

लागण : लागणीच्या वेळी जमीन योग्य प्रकारे दबलेली असणे जरूर असते. तंबाखूची रोपे नाजूक असल्यामुळे जमीन चांगली दबलेली नसल्यास ती चांगली वाढत नाहीत व रोगांना लवकर बळी पडतात. रोपे सर्वत्र हाताने लावतात. लागण सपाट वाफ्यांत अगर सऱ्या पाडून करतात. पाणी देण्याची सोय असल्यास पाणी देऊन अथवा हलका पाऊस पडत असताना लागण करतात. जिरायत पिकासाठी सपाट वाफे आणि बागायती पिकासाठी सऱ्या पसंत करतात. ओळींतील आणि झाडांतील अंतर तंबाखूच्या प्रकारावर आणि जमिनीच्या प्रकारावर अवलंबून असते. आंध्र प्रदेश व कर्नाटकमध्ये सिगारेट तंबाखू, कर्नाटक व गुजरातमध्ये विडी तंबाखू आणि तमिळनाडूत सिगार व खाण्याच्या तंबाखूसाठी दोन ओळींमधील व दोन झाडांमधील अंतर ७५ सेंमी. पासून १०० सेंमी. असते. गुजरातमध्ये विडी तंबाखूची रोपे ९० X ९० सेंमी. आणि निपाणी भागात १०५ X ७५ सेंमी. अंतरावर लावतात. पंजाबमध्ये हुक्क्याच्या तंबाखूसाठी २३ X ३७ सेंमी. पासून १५ X ३० सेंमी. आणि प. बंगाल व उत्तर प्रदेशात नि. रस्टिका जातीच्या प्रकारासाठी ५० X ६० सेंमी. अंतर ठेवतात. दर हेक्टरी झाडांची संख्या सिगारेट तंबाखू आणि रुंद पानांच्या खाण्याच्या तंबाखूमध्ये १२,५०० पासून पंजाबमधील हुक्क्याच्या तंबाखूमध्ये १,००,००० एवढी असते. लागणीनंतर रोपे ज्वारीची पाने अथवा तशा प्रकारच्या अन्य साधनांनी झाकतात.

आंतर मशागत : तंबाखूच्या पिकाला लागणीनंतर १५ दिवसांच्या अंतराने ३-४ वेळा कोळपण्या देतात.  प. बंगालमध्ये तंबाखूच्या हंगामात जमिनीतील पाण्याची पातळी वर असल्यामुळे लागणीनंतर पहिल्या महिन्यात दर ३-४ दिवसांनी आणि नंतर दर आठवड्याने कोळपणी करतात. लागणीनंतर २ ते २ / महिन्यांनंतर पिकात कोळपणी करीत नाहीत कारण त्यामुळे मुळांना व पानांना इजा पोहोचण्याचा संभव असतो.

पाणी : आंध्र प्रदेशात सिगारेटच्या तंबाखूचे पीक हे केवळ जिरायती पीक आहे. तमिळनाडूत पाऊस सारख्या प्रमाणात (विभागून) पडत नसल्यामुळे वारंवार पाणी द्यावे लागते. निपाणी भागातील (कर्नाटक) तंबाखूच्या पिकाला सहसा पाणी देत नाहीत परंतु गुजरातमध्ये पावसाचे मान अनिश्चित असल्यामुळे पाण्याच्या काही पाळ्या द्याव्या लागतात. उत्तर बिहार आणि प. बंगालच्या उत्तरेकडील भागात हुक्क्याच्या आणि खाण्याच्या तंबाखूला १-२ वेळा बेताने पाणी देतात. पंजाबमध्ये हुक्क्याच्या तंबाखूचे पीक केवळ पाण्याखाली घेतात.

शेंडा खुडणे आणि फूट (काखा) काढणे : सिगारेट तंबाखू वगळून इतर प्रकारांत लागणीनंतर ५ ते ६ आठवड्यांनी शेंडे खुडतात. शेंडे खुडल्यावर पानांच्या बगलेतून फूट येते, तीही वारंवार काढणे जरूर असते. शेंडे खुडताना झाडावर ठेवण्याच्या पानांची संख्या प्रकाराप्रमाणे वेगवेगळी असते. तळाची ३ ते ४ पाने वगळता नि. रस्टिका जातीच्या हुक्क्याच्या तंबाखूच्या प्रकारामध्ये (प. बंगाल) ५–७ असते तमिळनाडूमध्ये खाण्याच्या तंबाखूमध्ये ६ ते १०, विडी प्रकारांमध्ये ११-१२ आणि रुंद पानांच्या सिगारच्या प्रकारांत व हुक्क्याच्या काही प्रकारांत ती १२–१४ असते.

फेरपालट : बहुतेक भागांत एकाच जमिनीत सतत तंबाखूचे पीक कित्येक वर्षे घेण्यात येत आहे परंतु उत्पादन अथवा तंबाखूच्या प्रतीवर याचा कोणताही प्रतिकूल परिणाम झाला नाही, असे दिसून आले आहे. मात्र सिगारेट तंबाखूच्या भागात त्याच जमिनीत सतत तंबाखूचे पीक कित्येक वर्षे घेतल्याने पानाच्या प्रतीवर प्रतिकूल परिणाम झाल्याचे आढळून आले आहे. काही भागांत तंबाखूबरोबर ज्वारी, भात, नाचणी, ऊस, कापूस, मिरची, हरभरा, तीळ, हळद, कांदा आणि लसूण ही पिके फेरपालटाने घेतात.


रोग : तंबाखूच्या पिकावर वाफ्यातील रोपांची कूज, भुरी, केवडा, पाने वळणे (बोकड्या, मुरडा), पानावरील ठिपके, चित्री, बंबाखू इ. रोग पडतात.

वाफ्यातील रोपांची कूज : हा रोग पिथियम ॲफानिडरमेटम या कवकामुळे उद्‌भवतो. रोपवाटिकेमध्ये रोपे लहान असतानाच त्यांचा जमिनीलगतचा खोडांचा भाग कुजून ती मरतात. वाफ्यात रोपांची फार दाटी असेल व वाफ्यातील पाण्याचा निचरा व्यवस्थित नसेल, तर रोगाची तीव्रता वाढते. म्हणून गादी वाफ्यावर रोपे करून पाण्याचा निचरा व्यवस्थित ठेवतात. रोपवाटिकेमध्ये ०·४ प्रतिशत कसाचे (२:२:५० चे) बोर्डो मिश्रण किंवा ताम्रयुक्त कवकनाशके वापरतात.

भुरी : हा रोग एरिसायफे सिकोरेशियारम कवकामुळे होतो. पीक तयार होण्याच्या वेळी खालच्या पानांवर राखी रांगाचे ठिपके आढळतात. रोगाला अनुकूल हवामान असल्यास भुरकट पांढरी अशी कवकाची वाढ सर्व पानांवर दिसून येते. झाडावरील जमिनीलगतची सर्व रोगट पाने काढून टाकतात व पिकाच्या रांगांमधील जमिनीवर झाडांलगत गंधक भुकटी हेक्टरी ४५ किग्रॅ. प्रमाणे पानांवार न पडू देता पसरतात [⟶ भुरी].

केवडा : (मोझाइक). या व्हायरसजन्य रोगामुळे तंबाखूच्या उत्पन्नावर व प्रतीवर अनिष्ट परिणाम होतो. याच्यामुळे पानांवर हिरवे पिवळे चट्टे दिसतात किंवा पाने संपूर्णपणे पिवळी पडतात. काही वेळा पानाचे आकारमान लहान होते. रोगट झाडे दिसताच लगेच ती काढून नष्ट करतात. शेतात तण वगैरे वाढू न देता स्वच्छता राखतात. हा रोग स्पर्शजन्य–सांसर्गिक असतो म्हणून फार काळजी घेणे जरूर असते.

पाने वळणे : (मुरडा, बोकड्या). हा सुद्धा व्हायरसजन्य रोग आहे. रोगाची लक्षणे प्रथम शेंड्याकडील नवीन पालवीवर आढळतात. पाने लहान राहून वळलेली (मुरडलेली) आढळतात. रोगट झाडे खुरटी राहतात. पानांच्या शिरांवर लहान हिरवे फोड आढळतात. या रोगाचा फैलाव पांढऱ्या माशीमुळे होतो म्हणून कीटकनाशके पिकावर फवारून पांढऱ्या माशीचा बंदोबस्त करावा लागतो.

पानावरील ठिपके : हा रोग सर्कोस्पोरा निकोटियानी या कवकामुळे होतो. पानावर ०·७ सेंमी. व्यासाचे वर्तळाकृती तपकिरी ठिपके आढळतात. रोग निवारण्यासाठी झाडावर बोर्डो मिश्रण किंवा ताम्रयुक्त कवकनाशके फवारतात. हा रोग विशेष नुकसानकारक नाही.

चित्री : हा मूळकुजव्या रोग गुजरातमध्ये विडी तंबाखूच्या पिकात बऱ्याच विस्तृत प्रमाणावर आढळून येतो. फ्यूजेरियमरायझोक्टोनिया या वंशातील कवके आणि सूत्रकृमी यांमुळे हा रोग होतो. रोगामुळे पाने कोमेजून वाळतात व मुळांची बाह्यत्वचा कुजून सुटून येते. मुळांचा रंगही बदलतो व त्यांची वाढ नीट होत नाही. रोगट झाडे उपटून काढणे व तंबाखूचे पीक त्याच शेतात सतत न घेणे हे उपाय आहेत.

बंबाखू : (ऑरोबँकी सर्नुआ). ही परोपजीवी (दुसऱ्या वनस्पतीवर उपजीविका करणारी) वनस्पती तंबाखूच्या मुळांवर वाढून मुळांतून झाडाच्या पोषणासाठी वर जाणारा अन्नरस शोषून घेते. त्यामुळे तंबाखूची झाडे पोषक द्रव्याच्या कमतरतेने खुजी राहतात आणि फिकट व निस्तेज दिसतात. बंबाखूची झाडे लागणीनंतर ५ ते ६ आठवड्यांनी दिसू लागतात व ती १५ ते ४५ सेंमी. उंच असतात. बागायती पिकात अगर ओल धरून ठेवणाऱ्या जमिनीत या वनस्पतीचे प्रमाण जास्त असते. बंबाखूचे बी जमिनीत बरीच वर्षे जिवंत राहू शकते व तंबाखूसारख्या वनस्पतींच्या मुळांच्या सान्निध्यात आल्यावर रुजून वाढू लागते. त्याकरिता बंबाखूला फुले येण्यापूर्वी ती पिकातून काढून नष्ट करतात. हे काम सतत कमीतकमी तीन वर्षे करणे आवश्यक असते.

कीड : तंबाखूवर पाने खाणारी अळी, खोडातील अळी, खोड कातरणारी अळी, मावा इ. कीटकांचा उपद्रव आढळतो.


पाने खाणारी अळी : (प्रोडेनिया लिटुरा). ही तंबाखूची पाने आणि कोवळे शेंडे अधाशीपणाने खाऊन पिकाचे नुकसान करते. तंबाखूव्यतिरिक्त ती वांगे, टोमॅटो, एरंड वगैरे झाडांवरसुद्धा आढळते. अंडी व अळ्या शोधून काढून गोळा करून नष्ट करतात. १०% बीएचसी किंवा ५% डीडीटी हेक्टरी १८–२० किग्रॅ. या प्रमाणात पिकावर पिस्कारतात.

खोडावरील अळी : (नोरिमोश्चेमा हेलिओपा). या अळीच्या खोड पोखरण्यामुळे खोडावर, पानाच्या देठावर गाठीप्रमाणे फुगवटा निर्माण होतो. काही वेळा झाड खुजे राहून शेंड्याजवळ फूट येते. गाठी असलेली रोगट झाडे काढून नष्ट करतात. तसेच रोपवाटिकेमध्ये ०·२%/ डीडीटी द्रावण २५० ते ३०० लि. प्रमाणे दर हेक्टरी फवारतात. लागण करताना निरोगी रोपेच निवडून घेतात.

मावा : ४०% निकोटीन सल्फेटचे १:६०० भाग या प्रमाणात द्रावण करून ते पिकावर प्रतिहेक्टर ६५०–७०० लि. फवारतात [⟶ मावा]. याखेरीज इतरही अनेक किडींमुळे तंबाखूच्या पिकाचे नुकसान होते.

कापणी : पिकाची कापणी कोणत्या अवस्थेत करावयाची हे तंबाखूच्या प्रकारावर अवलंबून असते. गरम हवा पद्धतीने प्रकिया करावयाच्या सिगारेट तंबाखूची फक्त पिवळसर पाने एका वेळी तोडतात. साधारणपणे लागणीनंतर ७०–७५ दिवसांनी पानांची तोडणी सुरू होते. एका वेळी प्रत्येक झाडाची तयार झालेली २ अथवा ३ पाने तोडतात. याला ‘प्रायमिंग’ असे म्हणतात. दर आठवड्याने एकदा याप्रमाणे ५ ते ६ तोडण्यांमध्ये सर्व पानांची तोडणी होते. सिगारच्या वेष्टनाच्या प्रकारात आणि काही भागांत विडी व हुक्क्याच्या तंबाखूची तोडणी याच पद्धतीने केली जाते. इतर सर्व प्रकारांत सबंध झाडे जमिनीलगत कापतात आणि रात्रभर शेतात कोमेजण्यासाठी ठेवतात. पानांवर लालसर ठिपके दिसू लागले म्हणजे विडीच्या तंबाखूचे प्रकार कापणीयोग्य झाले असे समजतात. अशा प्रकारची तंबाखू कडक असते. अपक्व पानांची तंबाखू नरम असते. ही कापणी लागणीनंतर साडे चार ते पाच महिन्यांनी म्हणजे जानेवारी-फेब्रुवारीत करतात. सिगार आणि चिरुटाच्या प्रकारांत पाने पिवळसर हिरवी, लवकर तुकडे होणारी असतात व त्यांवर फोडांप्रमाणे फुगीर भाग अधूनमधून दिसतात, त्या वेळी (लागणीनंतर सु. ९० ते १०० दिवसांनी) पीक कापणीयोग्य झाले असे समजतात. पानांवर पिवळसर तपकिरी मोठे ठिपके दिसतात, त्या वेळी हुक्क्याच्या तंबाखूच्या प्रकारांची कापणी करतात. नि. रस्टिका प्रकारांची मेमध्ये आणि नि. टाबॅकम प्रकारांची जूनमध्ये कापणी करतात. प. बंगालमध्ये प्रायमिंग पद्धतीने पानांची तोडणी करतात. खाण्याच्या तंबाखूची कापणी लागणीनंतर ११० ते १२० दिवसांनी (ज्या वेळी पानावर ठळक फोड दिसू लागतात तेव्हा) करतात.

वाळविणे : (क्युअरिंग). तंबाखूची तोडलेली पाने अगर कापलेली झाडे हलके हलके परंतु विशेष पद्धतीने वाळविणे हा ही प्रक्रिया करण्यामागील हेतू असतो. या प्रक्रियेमध्ये पानांच्या रासायनिक संघटनामध्ये बदल होऊन विशिष्ट उपयोगासाठी उत्तम अशी तंबाखू तयार होते. तंबाखूचा प्रकार, कापणीची पद्धत व कापणीच्या अगर तोडणीच्या वेळी पानाची पक्वता यांवर आधारित अशा वाळविण्याच्या चार प्रमुख पद्धती आहेत (स्थानिक गरजेप्रमाणे आणि तंबाखूच्या विशिष्ट प्रकारासाठी योग्य असे फेरबदल वेगवेगळ्या पद्धतींत आढळून येतात) : (१) गरम हवा पद्धत (फ्लू क्युअरिंग), (२) उन्हात वाळविणे, (३) हवेच्या साह्याने वाळविणे आणि (४) धुरावर वाळविणे.

गरम हवा पद्धत : सिगारेट तयार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या पुष्कळशा तंबाखूवर या पद्धतीने प्रकिया केली जाते. बेताचे तापमान व पुष्कळ प्रमाणात हवेतील आर्द्रता या परिस्थितीत पानांना पिवळा रंग आणणे आणि नंतर तापमान वाढवून व आर्द्रता कमी करून पाने वाळविणे हा या पद्धतीचा उद्देश आहे. यासाठी मजबूत बांधणीच्या ५ मी. X ५ मी. X५ मी. आकारमानाच्या कोठारात एक भट्टी असते व भट्टीपासून कोठारात गरम हवा खेळविण्यासाठी भिंतींच्या बाजूने नळ्यांची योजना केलेली असते. या नळ्यांना फ्लू असे नाव आहे. कोठाराच्या फरशीच्या वर भिंतीतील खिडक्यांच्या उघड-झापाने कोठारातील आर्द्रता कमीजास्त केली जाते. नळ्यांतील गरम हवा कोठाराच्या छपरातून बाहेर सोडली जाते. तंबाखूची पाने ओवून बांबूवर उभी टांगतात व असे टांगलेल्या पानांचे बांबू कोठारात एकावर एक याप्रमाणे ठेवण्याची सोय असते. कोठारातील तापमान आणि आर्द्रता किती आहे, हे बाहेरूनच खिडकीतून पाहण्याची सोय असते.


पाने सकाळी तोडून सावलीमध्ये ती ओवून बांबूवर टांगण्याचे काम केले जाते. पाने टांगलेले बांबू कोठारात ठेवल्यावर कोठार बंद करून भट्टी पेटवितात. पहिल्या २४ ते ४० तासांमध्ये तापमान ३५° से. च्या खाली आणि आर्द्रता ८०–९०% पर्यंत ठेवतात. या मुदतीत पानांचा रंग पिवळा होतो. नंतर तापमान हलके हलके ५२° से. पर्यंत वाढवून ते ७–१० तास ठेवतात. या काळात पानांना आलेला पिवळा रंग पक्का होतो. यानंतर सर्व खिडक्या उघडून तापमान भराभर ६५° से. पर्यंत वाढवितात आणि पटल (पानांचा पसरट भाग) वाळेपर्यंत हे तापमान कायम ठेवतात (सु. ५० तास). नंतर तापमान ७०° सें. पर्यंत वाढवून खिडक्या बंद करतात. या तापमानात पानांच्या जाड शिरा वाळतात. अशा रीतीने १०० ते १२५ तासांच्या अवधीत सर्व प्रक्रिया पूर्ण होते. प्रक्रिया पूर्ण झाल्यावर कोठार थंड होऊ देतात आणि खिडक्या उघडतात. प्रक्रिया केलेली पाने हवेतून आर्द्रता शोषून घेतात आणि मऊ बनतात. नंतर त्यांचे गठ्ठे बांधून त्यांचे लहान ढीग रचून काही दिवस ठेवतात. अधूनमधून हे ढीग दोन–तीन वेळा चाळवून पुन्हा रचतात. पानांमध्ये हिरव्या रंगाचा काही अंश असल्यास तो ढिगामध्ये निघून जातो.

उन्हात वाळविणे : यात निरनिराळे फरक असलेल्या पद्धती आहेत. (अ) सबंध झाडे उन्हात टांगून वाळविणे. प्रथम झाडे शेतात थोडीशी वाळवून मग ती बांबूवर टांगून उघड्यावर वाळवितात. १५ ते २० दिवसांनंतर पाने वाळतात, परंतु देठ हिरवे असतात. तमिळनाडूत खाण्याची आणि सिगारची तंबाखू अशा प्रकारे वाळवितात. (आ) आंध्र प्रदेशातील नाटू या तंबाखूच्या प्रकारात पाने देठासह कापतात आणि सुतळीत ओवून त्या माळा उघड्यावर टांगून दीड ते दोन महिने वाळू देतात. मध्य शीर वाळल्यावर पानांचे ढीग करतात त्यामुळे त्यांत किण्वनाची (एंझाइमाच्या म्हणजे जीवरासायनिक विक्रिया घडवून आणणाऱ्या प्रथिनयुक्त पदार्थांच्या योगाने रासायनिक बदलाची) क्रिया होते. (इ) गुजरात, कर्नाटक आणि महाराष्ट्र या भागांतील विडीची तंबाखू शेतातच वाळवितात. प्रथम तळाकडील पाने कापून ती शेतात वाळू देतात. राहिलेल्या पानांवर लालसर ठिपके दिसू लागले आणि पाने पिवळसर होऊ लागली की, सबंध झाडे कापून पानांची वरची बाजू खाली करून ती शेतात पसरतात. तेथे ती उन्हात ३ ते ७ दिवस वाळू देतात. पाने वाळल्यावर मध्य शिरा वेगळ्या काढतात. मध्य शिरा काढलेल्या पानांच्या भागाला गुजरातच्या चारोटर भागात ‘भूका’ म्हणतात व निपाणी (कर्नाटक) भगात ‘मोतीफूल’ म्हणतात. महाराष्ट्र व कर्नाटकात काही ठिकाणी वरील पद्धतीने शेतात उन्हामध्ये मध्य शीर वाळेपर्यंत वाळविलेली तंबाखूची पाने १८५ सेंमी. लांब, १२० सेंमी. रुंद आणि ९० सेंमी. खोल अशा खड्ड्यात भरतात. खड्डा भरण्याअगोदर तळाला व बाजूला गवत वगैरे लावून नंतर सकाळच्या वेळी त्यात दवाने बेताची ओलसर झालेली पाने भरतात. नंतर गोणपाटाने पाने झाकून त्यावर गवत, पालापाचोळा टाकून आत हवा जाऊ नये यासाठी मातीने वरचा भाग लिंपून टाकतात. हवा थंड असल्यास ४ रात्री आणि उष्ण असल्यास ३ रात्रीपर्यंत पाने खड्ड्यात राहू देतात व मग बाहेर काढतात. या अवधीत पाने मुरून त्यांच्यावर पिवळा रंग चढून त्यांना खुमासदार वास येतो. त्यानंतर या पानांच्या सु. ७·५ सेंमी. जाडीच्या जुड्या बांधतात अथवा पाने संपूर्णपणे वाळवून त्यांचा चुरा करून लहानमोठ्या चाळण्यांनी चाळतात. हिला जर्दा असेही म्हणतात व ती विड्या वळण्यासाठी वापरतात. (ई) बिहारमध्ये हुक्का आणि खाण्याच्या तंबाखूची झाडे कापून शेतात ४ ते ६ दिवस वाळू देतात. नंतर हिरव्या गवतावर ढीग रचून दोन दिवस ठेवतात. नंतर ती पसरून उलट सुलट अशी ६ दिवस वाळवून पुन्हा ढीग रचतात. चार दिवसांनी ढिगातील झाडे पसरून दोन दिवसांनी ती परततात. दिवसा पाने उन्हामध्ये तापतात व रात्री त्यांच्यावर दवाची क्रिया होते. अशा रीतीने ढीग घालणे, पसरणे, परतणे ही क्रिया दीड महिना चालू असते. या मुदतीत पाने काळपट तपकिरी रंगाची होतात. त्यांनतर झाडापासून पाने अलग करून त्यांच्या २५ ते ५० च्या जुड्या बांधतात. (उ) उत्तर प्रदेशात खाण्याच्या व हुक्क्याच्या तंबाखूची झाडे कापल्यावर शेतातच वाळू देतात. (ऊ) पंजाबमध्ये हुक्क्याच्या तंबाखूची झाडे कापण्यापूर्वी पाणी देऊन शेत भिजवितात. झाडे कापल्यावर ती शेतातच २-३ दिवस ठेवतात. नंतर वरची बाजू खाली करून पुन्हा २-३ दिवस ठेवतात. या मुदतीत पाने पिवळी पडतात. झाडे योग्य प्रमाणात ओली असताना खड्ड्यांत ठेवतात अगर जमिनीवर ढीग करतात. पानांत पाण्याचा अंश फार असल्यास खड्डयांत किण्वनाची क्रिया वाजवीपेक्षा जास्त होते व तापमान वाढून पाने खराब होतात. उलट ती कोरडी असल्यास किण्वनाची क्रिया होत नाही. खड्ड्याची खोली ०·८ ते १ मी. असते. खड्ड्यात झाडे एकावर एक थर करून जमिनीवर २४ ते ६० सेंमी. उंचीपर्यंत रचतात आणि प्रथम गवत व नंतर मातीने झाकतात. ६ ते ८ दिवसांनी झाडे खड्ड्यातून काढून पाने देठांपासून वेगळी करतात आणि त्यांच्या दोऱ्या वळतात. (ए) प. बंगालमध्ये हुक्क्याच्या तंबाखूची पाने प्रायमिंग पद्धतीने तोडून झाडाभोवती ठेवतात. झाडावरील इतर पानांमुळे तोडून ठेवलेल्या पानांचे प्रखर उन्हापासून रक्षण होते. पानांची मध्य शीर वाळल्यावर ८–१० पानांच्या जुड्या करून त्या बांबूंवर ४ ते ६ आठवडे वाळवितात.

हवेच्या साहाय्याने वाळविणे : प. बंगालमध्ये सिगारच्या वेष्टनाची तंबाखू आणि आंध्र प्रदेशात लंका तंबाखू यापद्धतीने वाळवितात. (अ) सिगार वेष्टनाची तंबाखू : प्रायमिंग पद्धतीने पाने जरा हिरवी असतानाच तोडतात. पाने सुतळीत ओवून बांबूंना बांधतात. नंतर हे बांबू बंद कोठारात ठेवतात. या कोठारात हवेच्या तापमानात व ७० ते ८०% आर्द्रतेमध्ये ५ ते ६ आठवडे वाळवितात. हवेतील आर्द्रता कमी झाल्यास कोठारात पाणी शिंपडतात व जास्त झाल्यास कोठाराच्या खिडक्या उघडतात. पाने वाळल्यावर त्यांचे उंच माळ्यावर ढीग रचतात. ढीग अधूनमधून चाळवितात. (आ) लंका प्रकाराची तंबाखू : खोडाच्या काही भागासह प्रत्येक पान स्वतंत्र रीत्या तोडतात. पाने दोऱ्यात ओवून दोन ते अडीच महिने सावलीत वाळवितात. या मुदतीत पाने पिवळट तपकिरी रंगाची होतात व खोडाचा भाग संपूर्णपणे वाळतो. यापुढील प्रक्रिया खड्ड्यात केली जाते. याकरिता रेताड जमिनीत दोन वाटोळे खड्डे खणतात. खड्ड्याच्या खोली १ ते १·७५ मी. व व्यास १·७५ ते २·७५ मी. असतो. खड्ड्याच्या बाजू गुळगुळीत करून भेगा बुजवितात. एका खड्ड्यात पाने निम्मा खड्डा भरेपर्यंत भरतात आणि ताडाची पाने व मातीने खड्डा झाकून घेतात. २४ तासांनंतर पाने काढून दुसऱ्या खड्ड्यात ४८ तास व पुन्हा पहिल्या खड्ड्यात २४ ते ४८ तास ठेवतात. खड्ड्यामध्ये किण्वनाची क्रिया होते. ही क्रिया पूर्ण झाल्यावर पानांचा रंग काळपट तपकिरी होतो आणि त्यांना पिकलेल्या फळासारखा वास येतो.


धुरावर वाळविणे : तमिळनाडूत खाण्याची तंबाखू या पद्धतीने वाळवितात. तोडलेली पाने काही तास शेतात ठेवून त्यांच्या जुड्या बांधतात. या जुड्या एका झोपडीत लाकडाच्या पट्टीवर टांगतात. नारळाच्या शेंड्या, पानांचे देठ आणि ताडफळे जाळून त्यांच्या धुरावर पाने १२ तास शेकतात नंतर त्यांचे ढीग रचतात. तीन दिवसांनी ढिगातून पाने काढून पुन्हा धुरावर शेकतात. धुरावर शेकण्याच्या क्रियेत क्रिओसोटासारखे पदार्थ पानांत शोषिले जातात त्यामुळे पानांना विशिष्ट चव येते आणि जंतुनाशक गुणधर्मही त्यांत येतात. धुरावर पाने वाळविल्यावर पानांचे ढीग करून ३–४ आठवडे ठेवतात. या मुदतीत किण्वनाची क्रिया होते. याप्रमाणे प्रक्रिया केलेल्या पानांवर खाऱ्या सरोवरातील पाण्याची अथवा गुळाच्या पाण्याची प्रक्रिया करतात. यामुळे तंबाखूला विशिष्ट प्रकारची चव येते.

वाळविण्याच्या वरील सर्व प्रकारांवरून असे दिसून येईल की, विडीची तंबाखू वगळता इतर प्रकारांच्या तंबाखूची पाने विशिष्ट तऱ्हेने वाळवून व त्याचे उघड्यावर अथवा खड्ड्यांत ढीग करून किण्वनाची क्रिया घडवून आणतात. किण्वनाच्या क्रियेमुळे पानाची प्रत आणि गंध सुधारतात. किण्वनाची क्रिया वाजवीपेक्षा जास्त झाल्यास पाने कुजतात यासाठी पानांचे ढीग अधूनमधून चाळविले जातात.

उत्पन्न : निरनिराळ्या तंबाखूच्या प्रकारांचे सरासरी हेक्टरी उत्पन्न (किग्रॅ.मध्ये) पुढीलप्रमाणे आहे : सिगारेट तंबाखू : आंध्र प्रदेश ७५० नाटू प्रकार : आंध्र प्रदेश ९०० विडी तंबाखू : गुजरात ९००, कर्नाटक ६५० सिगार व चिरूट तंबाखू : तमिळनाडू १,२५० खाण्याची तंबाखू : तमिळनाडू १,६०० हुक्का व खाण्याची तंबाखू : बिहार ८५०, प. बंगाल ८००, उत्तर प्रदेश १,००० हुक्क्याची तंबाखू : पंजाब ६००. १९७२–७३ साली तंबाखू पिकविणाऱ्या प्रमुख राज्यांतील सरासरी हेक्टरी उत्पन्न (किग्रॅ.मध्ये) पुढीलप्रमाणे होते : आंध्र प्रदेश ७३४, बिहार ४०६, गुजरात १२६३, कर्नाटक ५४९, महाराष्ट्र ४१५, ओरिसा ८०७, तमिळनाडू १४८८, उत्तर प्रदेश १०००, प. बंगाल ७६३. सर्व प्रकारच्या तंबाखूचे मिळून १९७२–७३ मधील भारतातील सरासरी उत्पन्न हेक्टरी ८०३ किग्रॅ. व व्हर्जिनिया तंबाखूचे ७०६ किग्रॅ. होते.

रासायनिक संघटन : तंबाखूच्या रासायनिक संघटनावर आनुवंशिक आणि परिस्थितीच्या घटकांचा पुष्कळ परिणाम होतो. निकोटीन आणि सुगंध यांचे प्रमाण तंबाखूच्या प्रकारांवर अवलंबून असते. एकाच प्रकारामध्ये निरनिराळ्या शेतांत आणि निरनिराळ्या वर्षांत उत्पादन केलेल्या तंबाखूत फरक आढळतात. कमी पावसाच्या वर्षांत उत्पादन झालेल्या तंबाखूत निकोटिनाचे प्रमाण जास्त असते, परंतु एकूण कार्बोहायड्रेटांचे प्रमाण कमी असते. जास्त पावसाच्या वर्षांत याच्या उलट परिस्थिती असते. तंबाखूच्या झाडावरील प्रत्येक पानाचे रासायनिक संघटन खोडावरील क्रमाप्रमाणे वेगवेगळे असते. शेंड्यावरील पाने जास्त सुवासिक असतात. सिगारेट तंबाखूच्या प्रकारांत वरच्या भागातील पानांत निकोटिनाचे प्रमाण जास्त असते.

नुकत्याच कापणी केलेल्या पानांत पाण्याचे प्रमाण ८०–९०% असते. वाळवून प्रकिया केलेल्या पानांत ते १०–१५% असते. पाण्याचा अंश नसलेल्या पानांत कार्बनी पदार्थ ७५–९०% असतात. त्यांतील महत्त्वाचे पदार्थ पुढीलप्रमाणे आहेत : (१) कार्बोहायड्रेटे, (२) अल्कलॉइडे व इतर नायट्रोजनयुक्त पदार्थ, (३) कार्बनी अम्ले, (४) पॉलिफिनॉल आणि रंगद्रव्ये, (५) बाष्पनशील (उडून जाणारी) तेले आणि रेझिनाचे प्रकार, (६) एंझाइमे आणि इतर पदार्थ.

कार्बोहायड्रेटे :  तंबाखूमध्ये २५–५०% कार्बोहायड्रेटे असतात. त्यांत स्टार्च, क्षपणकारक शर्करा (मुख्यतः ग्लुकोज आणि फ्रुक्टोज), सुक्रोज (उसातील साखर), सेल्युलोज (तंतुमय भाग), पेक्टीन आणि लिग्निन हे प्रमुख आहेत.

अल्कलॉइडे व इतर नायट्रोजनयुक्त पदार्थ : नि. टाबॅकम जाती मध्ये ४–६% अल्कलॉइडे असतात. नि. रस्टिका जातीमध्ये हे प्रमाण दुप्पट असते. दोन्ही जातींमध्ये निकोटीन हे प्रमुख अल्कलॉइड असते. पक्व बियांमध्ये निकोटीन नसते. परंतु ते रोपांत आढळते. पानांमध्ये निकोटिनाचे प्रमाण सर्वांत जास्त असते. पात्यामध्ये शिरांपेक्षा जास्त निकोटीन असते. झाड फुलावर येण्याच्या सुमारास त्यात निकोटिनाचे प्रमाण सर्वांत जास्ते असते. झाडाच्या निरनिराळ्या भागांत निकोटिनाचे प्रमाण पुढीलप्रमाणे असते : पाने ६४%, खोड १८%, मुळे १३%, फुले ५%. भारतातील तंबाखूच्या निरनिराळ्या प्रकारांत पुढीलप्रमाणे निकोटिनाचे प्रमाण असते : सिगारेट १-२%, सिगार २-३%, विडी ६–८%, चिरूट (लंका) ३–४·७%, हुक्का आणि खाण्याची तंबाखू : नि. टाबॅकम ०·५–१·५ आणि नि. रस्टिका २–३·५%, तपकीर ३·२–४·८% [⟶निकोटीन]. प्रथिने, ॲमिनो अम्ले, अमाइडे, अमोनिया आणि नायट्रेट हे इतर नायट्रोजनयुक्त पदार्थही तंबाखूमध्ये असतात.


कार्बनी अम्ले : मॅलिक (३–१०%), सायट्रिक (०·५–२%) आणि ऑक्झॅलिक (१–२·५%) ही तीन कार्बनी अम्ले तंबाखूच्या प्रक्रिया केलेल्या पानांत आढळतात.

पॉलिफिनॉल आणि रंगद्रव्ये : वाळविण्याच्या प्रक्रियेत पॉलिफिनॉल संयुगांचा हवेतील ऑक्सिजनाशी संबंध येऊन पानांना लाल अगर तपकिरी रंग येतो. हे पदार्थ टॅनिनासारखे आहेत. क्लोरोफिल, झँथोफिल आणि कॅरोटीन ही रंगद्रव्ये तंबाखूच्या पानात असतात.

बाष्पनशील तेले आणि रेझिनाचे प्रकार : हे पदार्थ तंबाखूच्या पानांवरील प्रपिंडीय (ज्यांतून स्त्राव बाहेर पडतात अशा) केसांत असतात त्यामुळे तंबाखूला सुगंध प्राप्त होतो. या पदार्थांबरोबर मेणासारखे पदार्थही आढळून येतात.

एंझाइमे आणि इतर पदार्थ : तंबाखूतील एंझाइमांविषयीचे ज्ञान मर्यादित आहे परंतु प्रोटिएज, लायपेज, ॲमिलेज, इन्व्हर्टेज वगैरे १३ एंझाइमे प्रक्रिया केलेल्या पानांत आढळून आली आहेत. इतर पिकांच्या मानाने तंबाखूच्या झाडात खनिज द्रव्यांचे प्रमाण पुष्कळ असते. तंबाखूच्या राखेमध्ये पोटॅशियम आणि कॅल्शियम यांचे एकत्र प्रमाण ५०% पर्यंत असते. मॅग्नेशियम, फॉस्फरस, सोडियम, सिलिकॉन, क्लोरीन व गंधक या द्रव्यांचेही प्रमाण पुष्कळ असते.

उपयोग : भारतात उत्पादन होणाऱ्या तंबाखूचा पुष्कळसा भाग सिगारेट, विडी, सिगार, चिरूट आणि चुट्टा, हुक्का, चिलीम, पाइप यांच्याद्वारे धूम्रपानासाठी वापरला जातो. तसेच खाण्यासाठी आणि तपकिरीसाठी मोठ्या प्रमाणावर तंबाखूचा वापर करण्यात येतो. सिगारेटची निर्मिती कारखान्यांत होते. भारतात १९७४ मध्ये सिगारेटचे १७ कारखाने होते (महाराष्ट्र ६, आंध्र प्रदेश ३, प. बंगाल २, उत्तर प्रदेश २, कर्नाटक, बिहार, मध्य प्रदेश व गुजरात प्रत्येकी १). त्यांत दर वर्षी ६६ अब्ज सिगारेट तयार केल्या जातात. विडी, सिगार, चिरूट, हुक्क्याची व खाण्याची तंबाखू आणि तपकीर यांचे उत्पादन बहुतांशी कुटिरोद्योगाद्वारे होते. देशात जर्दा तयार करण्याचे १९ व तपकीर करण्याचे ३ मोठे कारखाने आहेत. ते बहुतांशी तमिळनाडू व उत्तर प्रदेशात आहेत. दर वर्षी २,५०,००० अब्ज विड्या तयार केल्या जातात, असा अंदाज आहे [⟶ तपकीर विडी सिगारेट व सिगार]. जर्द्यांचे साधा जर्दा, सुगंधी जर्दा, सुरती, किमाम, डोक्ता व सुखा असे विविध प्रकार आहेत. पहिले पाच प्रकार सामान्यतः विड्याबरोबर आणि शेवटचा प्रकार नुसताच चुन्याबरोबर खातात. सुगंधी, किमाम व डोक्ता या प्रकारांत निरनिराळ्या प्रकारची सुगंधी द्रव्ये व मसाले वापरतात. तंबाखू विविध स्वरूपांत (तपकीर, मिश्री इ.) दात घासण्यासाठीही वापरतात. तंबाखूचा उपयोग एके काळी औषधांमध्ये शामक, आकडीरोधक, कृमिनाशक म्हणून, तसेच पचनाच्या तक्रारी आणि त्वचारोग यांवर केला जात असे परंतु अलीकडे जास्त गुणकारी आणि वापरण्यासाठी जास्त सुरक्षित औषधे उपलब्ध असल्यामुळे या कामासाठी तंबाखूचा वापर मागे पडला आहे. तंबाखूचे प्रमाणाबाहेर सेवन झाल्यास तीतील निकोटिनामुळे मृत्यू येण्याचा संभव असतो. तंबाखूची पूड व अर्क यांचा कीटकनाशक आणि जनावरांच्या अंगावरील उवा व गोचिडी यांचा नाश करण्यासाठी फार वर्षांपासून उपयोग करण्यात येत आहे. तंबाखूच्या उत्पादनातील टाकाऊ मालापासून (खोड, शिरा आणि पानांचा भुगा) निकोटीन काढण्यात येते आणि निकोटीन सल्फेटाच्या रूपात कृषिउत्पादनात ते कीटकनाशक म्हणून मोठ्या प्रमाणावर वापरण्यात येते. निकोटीन काढून घेतल्यावर राहिलेल्या मालाचा खतासाठी वापर करण्यात येतो. त्यामध्ये पोटॅशाचे प्रमाण पुष्कळ असते. तंबाखूचे बी जनावरांसाठी खाद्य म्हणून वापरण्यात येते. बियांपासून तेलही काढण्यात येते व ते शुद्ध करून खाण्यासाठी आणि रंग व व्हार्निश यांमध्ये वापरण्यात येते. पेंडीमध्ये प्रथिन पुष्कळ प्रमाणात असते त्यामुळे शेतजनावरांसाठी ती उपयुक्त खाद्य आहे.

अलीकडे फ्रेंच तंबाखूच्या पानातील सुगंधी द्रव्याचा मद्यार्क आधुनिक अत्तरांत रंगांच्या सूक्ष्म अशा विविध छटा निर्माण करण्यासाठी वापरतात. तंबाखूच्या खोडांचा सुगंधी अर्क हलक्या प्रतीच्या तंबाखूला चांगला वास आणण्यासाठी अथवा तंबाखूपासून तयार केलेला माल बाहेरगावी पाठविण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या कागद, लाकूड अथवा इतर वस्तूंच्या साधनांना उत्तम तंबाखूचा स्वाद देण्यासाठी वापरण्यात येतो. भारतात १९७२-७३ साली ३,६३,६०० टन तंबाखूचे उत्पादन झाले. त्यापैकी ३,४०,२४६ टन तंबाखूचा वापर देशात निरनिराळ्या उत्पादनांसाठी अगर अन्य कारणांसाठी झाला. त्याची वर्गवारी पुढीलप्रमाणे आहे : सिगारेट उत्पादन आणि पाइपसाठी तंबाखू मिश्रण २१·९१%, विडी २३·१%, सिगार आणि चिरूट ४·४%, तपकीर १·४%, हुक्का ८·५%, खाण्याची तंबाखू १४·९%, इतर उत्पादन २·७%, कीटकनाशके व तत्सम कारणांसाठी १२%, देठ व शिरा वगैरे (मुख्यतः खतासाठी) १०·०७%, खास उद्योगासाठी व किरकोळ उपयोग १·०३%.


भारतात तंबाखूच्या लागवडीत ७ लक्ष आणि प्रकिया करण्याच्या उद्योगात ५ लक्ष लोक गुंतलेले आहेत. तंबाखूपासून विविध पदार्थ तयार करण्याच्या उद्योगात सु. ३० लक्ष लोक गुंतलेले असून त्यांतील  २० लक्ष विडी उद्योगात व १४,००० सिगारेट उद्योगात आहेत.

जगामध्ये सर्वत्र तंबाखूचा वापर सर्वांत जास्त प्रमाणात सिगारेटच्या स्वरूपात होतो. तंबाखूचा सिगारेटच्या स्वरूपात वापर मेक्सिको व ब्राझील या देशांत पूर्णपणे, ब्रिटन व इटलीमध्ये /, अमेरिकेची संयुक्त संस्थाने, फ्रान्स, कॅनडा व अर्जेंटिना या देशांत / पेक्षा जास्त आणि डेन्मार्क व नेदर्लंड्समध्ये सु. / होतो. अविकसित देशांत विकसित देशांपेक्षा तंबाखूचा वापर जास्त वेगाने वाढत आहे. कर्करोग व धूम्रपान यांच्या परस्पर संबंधाविषयीचा संशोधन अहवाल प्रसिद्ध झाल्यावर विकसित देशांत काही काळ तंबाखूचा वापर कमी झाला होता, पण पुन्हा तो त्वरेने वाढलेला आहे. भारतात व आफ्रिकेच्या काही भागांत प्रत्येक प्रौढ व्यक्तीमागे दर वर्षी ०·९ किग्रॅ. तंबाखूचा खप होतो तर ब्रिटनमध्ये ३ किग्रॅ., अमेरिकेची संयुक्त संस्थाने ४·८ किग्रॅ. व स्वित्झर्लंड ५·४ किग्रॅ. इतका खप होतो.

शरीरक्रियावैज्ञानिक परिणाम : तंबाखूच्या सेवनामुळे स्थानिक क्षोभ होतो. तपकिरीच्या स्वरूपात उपयोग केल्यास जोराच्या शिंका येऊन श्लेष्मस्राव सुरू होतो. तंबाखू खाण्यामुळे तोंडातील श्लेष्मकलेचा (बुळबुळीत पातळ अस्तराचा) क्षोभ होतो आणि लाळेचा स्राव वाढतो. जास्त प्रमाणात तंबाखूचे सेवन केल्यास अथवा तंबाखूच्या सेवनाची सवय नसलेल्या व्यक्तीने थोड्या प्रमाणात सेवन केल्यास तीव्र मळमळ, कधीकधी भरपूर घाम सुटून ओकाऱ्या व स्नायू कमजोर होणे ही लक्षणे दिसून येतात. तंबाखूचे औषधिविज्ञानीय परिणाम तीतील निकोटिनामुळे होतात. ते प्रभावी आणि त्वरित परिणाम करणारे विष आहे. निकोटिनाच्या विषबाधा उत्पन्न करण्याइतक्या मात्रेमुळे तीव्र मळमळ, ओकाऱ्या, जुलाब, जास्त प्रमाणात मूत्रस्राव, स्नायूंचे कंपन आणि आकडी हे विकार उद्‌भवतात. क्षारकाच्या (अम्लाशी रासायनिक विक्रिया झाल्यास लवण देणाऱ्या संयुगाच्या) स्वरूपात श्लेष्मकलांतून आणि ओरखडे नसलेल्या त्वचेतून ते फार लवकर शोषिले जाते परंतु सल्फेटासारख्या लवणांच्या स्वरूपात ते हलके हलके शोषिले जाते. निकोटिनाचा विशेष परिणाम स्वायत्त तंत्रिका गुच्छिकांवर (अनैच्छिक मज्जापेशींच्या समूहांवर) आणि काही लंबमज्जाकेंद्रांवर (विशेषतः वांतिकारक आणि श्वसनकेंद्रांवर) होतो. अल्प मात्रेमुळे तंत्रिका गुच्छिका आणि लंबमज्जाकेंद्र उत्तेजित होतात व मोठ्या मात्रेमुळे त्यांचे दमन होते. उत्तेजनामध्ये रक्तदाब तात्पुरता वाढणे, नाडी मंद गतीने चालणे, दीर्घ श्वासोच्छ्‌वास आणि लाळ व इतर स्रावांची वाढ ही लक्षणे आढळून येतात दमनाच्या स्थितीत रक्तदाब कमी होतो, नाडी शीघ्रगतीने चालते, श्वासोच्छ्‌वास अनियमित होतो आणि लाळ व स्राव बंद होतात. निकोटिनाच्या प्राणघातक मात्रेमुळे मध्यपटल तंत्रिकेच्या (छाती व पोट यांना विभागणाऱ्या पटलातील तंत्रिकेच्या) अंगघातातून (पक्षाघातातून) उद्‌भवणाऱ्या श्वासरोधामुळे मृत्यू येतो. माफक धूम्रपानामुळे प्रकृतीला अपाय होतो असे मानण्यास पुरावा नाही परंतु अतिधूम्रपान करणाऱ्या व्यक्तींमध्ये हृद्‌-रोहिणीच्या विकारामुळे उद्‌भवणाऱ्या हृदयविकाराचे प्रमाण जास्त असते, असे आढळून आले आहे. तंबाखूच्या दीर्घकालपर्यंत अतिरेकी सेवनाचा, विशेषतः सिगारेट ओढण्याचा, कर्करोगाशी संबंध असल्याचे आकडेवारीवरून सिद्ध करण्यात आले आहे. सिगारेट ओढणाऱ्यांमध्ये फुप्फुसाच्या कर्करोगाचे प्रमाण जास्त असते व पाइप अथवा सिगारेट ओढणाऱ्यांमध्ये ओठाच्या कर्करोगाचे प्रमाण जास्त असते [→ कर्करोग धूम्रपान निकोटीन].

खरेदी–विक्री : भारतात तयार होणारी / तंबाखू खेड्यांतच विकली जाते. प्रत्यक्ष बाजारात तंबाखू नेऊन विकणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या थोडी असते. कर्नाटक राज्याच्या निपाणी भागात आणि उत्तर बिहारमध्ये उभे पीक विकण्याची पद्धत आहे परंतु वाळविण्याची प्रकिया करून खेड्यांतच स्थानिक दलालांना अगर सावकारांना तंबाखू विकण्याची प्रथा जास्त रूढ आहे. घाऊक व्यापारी स्थानिक दलालांकडून खरेदी करतात.

गुंतूर–गोदावरी भागात तंबाखूच्या घाऊक व्यापाऱ्यांनी सु. ७० खरेदी केंद्रे उघडली आहेत. शेतकरी अथवा प्रक्रिया करणारे लोक गरम हवेची प्रकिया केलेली व्हर्जिनिया तंबाखूची पाने ७-८ सर्वसाधारण प्रतींमध्ये वर्गवारी करून त्यांचे गठ्ठे बांधून खरेदी केंद्रांवर नेतात. केंद्रावर प्रत्येक गठ्ठा तपासला जातो व प्रतीप्रमाणे किंमत दिली जाते. त्या भागातील सु. ८०% तंबाखूचे पीक या पद्धतीने विकले जाते.

निरनिराळ्या राज्यांतील तंबाखूच्या प्रमुख व्यापारी पेठा पुढीलप्रमाणे आहेत : गुजरात–आणंद, पेटलाद आणि नाडियाद महाराष्ट्र–सांगली आणि जयसिंगपूर उत्तर कर्नाटक–निपाणी दक्षिण कर्नाटक–गुलबर्गा व रायचूर आंध्र प्रदेश–गुंतूर, राजमहेंद्री, विजयवाडा, ओंगोल आणि वरंगळ तमिळनाडू–कोईमतूर, एरोड, त्रिचनापल्ली आणि मदुराई प. बंगाल–कुचबिहार, जलपैगुरी आणि कलकत्ता बिहार–मुझफरपूर, दरभंगा आणि पाटणा उत्तर प्रदेश–फरूखाबाद, वाराणसी, लखनौ आणि मोरादाबाद.


प्रतवारी खरेदी–विक्री : तंबाखू पिकविणारे शेतकरी सर्वसाधारणपणे आपला माल प्रतवारी करून न विकता निरनिराळ्या आकारमानांची व प्रतींची पाने एकत्र करून व्यापाऱ्यांना विकतात. व्यापारी बाजारपेठेच्या गरजेप्रमाणे आणि मागणीप्रमाणे अंदाजी प्रतवारी करतात. कारखानदार खरेदी केलेला माल त्यांच्या गरजेप्रमाणे वेगवेगळा काढतात. तंबाखू परदेशांत निर्यात करणारे व्यापारी ग्मार्क पद्धतीप्रमाणे प्रतवारी करतात. १९४५ मध्ये खास कायदा करून भारत सरकारने गरम हवेची प्रक्रिया केलेली व्हर्जिनिया आणि इतर काही प्रकारांची तंबाखू नियमाप्रमाणे प्रतवारी केल्याशिवाय निर्यात करण्यास बंदी केली. प्रतवारीची देखरेख करण्यासाठी खास नोकरवर्ग नेमण्यात आला आहे. निर्यात करावयाच्या प्रत्येक तंबाखूच्या गठ्ठ्यावर आणि गठ्ठ्यात ॲग्मार्क लेबले लावणे आवश्यक असते. अशा लेबलांवर तंबाखूचा प्रकार आणि प्रत यांचा स्पष्ट निर्देश करणे जरूर असते. तंबाखूच्या दहा व्यापारी प्रकारांसाठी ॲग्मार्क प्रती निश्चित करण्यात आल्या आहेत. त्यांत गरम हवा पद्धतीने प्रक्रिया केलेली व्हर्जिनिया तंबाखू सर्वांत महत्त्वाची आहे व तिच्या वीस प्रती निश्चित करण्यात आल्या आहेत.

उपयोगावर आधारित अशा निरनिराळ्या व्यापारी प्रकारांच्या तंबाखूच्या खरेदी–विक्रीमध्ये प्रक्रिया केलेल्या तंबाखूच्या विशिष्ट गुणधर्मांना प्राधान्य दिले जाते. निर्यात करण्यासाठी व्हर्जिनिया तंबाखूमध्ये पानांचा रंग, पोत, आकरमान, चिवटपणा, पानावरील डागांचे प्रमाण, स्वाद, एकसारखी जळण्याची क्षमता आणि जळाल्यावर राखेचा रंग यांना प्राधान्य देण्यात येते. पिकलेल्या लिंबाप्रमाणे पिवळ्या रंगाची अथवा नारिंगी रंगाची, आल्हादकारक स्वादाची, एकसारखी जळणारी व जळाल्यावर पांढरी राख देणारी पाने विशेष पसंत करतात (याचबरोबर इतरही गोष्टी विचारात घेतल्या जातात). सिगारसाठी वापरण्यास एकसारख्या तपकिरी रंगाची, पातळ अथवा मध्यम पोताची सहज वळणारी, मोठ्या आकारमानाची मध्यम चिवट, आल्हाददायक स्वादाची, एकसारखी जळणारी व जळाल्यावर पांढरी राख उत्पन्न करणारी अशी तंबाखूची पाने विशेष पसंत केली जातात. विडी तंबाखूच्या बाबतीत विडी ओढल्यावर कडक आणि आल्हाददायक धूर निघणे, हा फार महत्त्वाचा गुणधर्म आहे. पानाच्या रंगाला व जाडीला दुय्यम महत्त्व आहे. पान जाड असावे परंतु भरड नसावे, रंग नारिंगीपासून हिरवी छटा असलेला फिकट तपकिरी असावा व त्यावर विशिष्ट प्रकारचे तपकिरी रंगाचे ठिपके असावेत. हुक्क्याच्या तंबाखूसाठी जाड, भरड व कडक स्वादाची पाने पसंत करतात (पानांचा रंग व आकारमान यांना या तंबाखूच्या बाबतीत दुय्यम स्थान असते). पानांच्या झाडावरील स्थानाप्रमाणे या तंबाखूची प्रत लावतात. खाण्याच्या तंबाखूसाठी मध्यम पोताची पाने पसंत करतात, परंतु जर्दा तयार करण्यासाठी जाड पाने पसंत करतात, तपकिरीसाठी पानांचा रंग तपकिरी अथवा काळपट असावा आणि ती जाड व मोडल्यास सहज तुकडे होणारी असावीत.

निर्यात व आयात : तंबाखू निर्यात करणाऱ्या देशांत अमेरिकेची संयुक्त संस्थाने, तुर्कस्तान आणि ग्रीस या देशांनंतर भारताचा क्रमांक लागतो आणि देशाच्या निर्यात व्यापारात तंबाखूला नववे स्थान आहे. १९७२-७३ मध्ये ८३,००० टन गरम हवा पद्धतीने प्रक्रिया केलेली व्हर्जिनिया तंबाखू ६० देशांना निर्यात करण्यात आली व त्यापासून ५७·२ कोटी रुपयांचे परकीय चलन मिळाले. इंग्लंड व रशिया हे देश भारतातील सर्वांत जास्त तंबाखू खरेदी करणारे देश आहेत. त्याच वर्षी १,०७३ टन सिगारेटी आणि ६४ टन विड्या निर्यात करण्यात आल्या आणि त्यांपासून १·८१ कोटी रुपयांचे परकीय चलन मिळाले. १९७२-७३ मध्ये १६० टन तंबाखू व सिगारेटी आयात करण्यात आल्या. भारतातून १९७३-७४ मध्ये ६८·४ कोटी रु., १९७४-७५ मध्ये ८२ कोटी रु. व १९७५-७६ मध्ये ९१ कोटी रु. किंमतीची तंबाखू निर्यात करण्यात आली.

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत तंबाखू प्रक्रियित पानांच्या स्वरूपात पाठविली जाते. या तंबाखूपासून जेथे तिचा प्रत्यक्ष वापर होतो तेथील कारखानदार सिगारेटी, सिगार, पाइपची तंबाखू इ. तयार करतात. कारखानदारांत होणारा व्यापार तुलनेने फारच थोड्या प्रमाणावर होतो, कारण बहुतेक देशांत देशांतर्गत तंबाखू कारखानदारांना संरक्षण देण्याच्या दृष्टीने कर, आयात निर्बंध व इतर स्वरूपाचे निर्बंध घालण्यात आलेले आहेत. फक्त अगदी लहान देशांखेरीज बाकीच्या सर्व देशांत स्वतःचे कारखाने आहेत. तिसाहून अधिक देशांत तंबाखूचा व्यापार ही सरकारी मक्तेदारी आहे.

जगातील साठाहून अधिक देश तंबाखूची निर्यात करतात आणि त्यांत अमेरिकेची संयुक्त संस्थाने, तुर्कस्तान, ग्रीस, भारत, ब्राझील व ऱ्होडेशिया हे देश प्रमुख आहेत. तुर्कस्तान, ग्रीस, ऱ्होडेशिया आणि मालावी हे देश परकीय चलनासाठी तंबाखूच्या निर्यातीवर मोठ्या प्रमाणावर अवलंबून आहेत. प. जर्मनी व ब्रिटन हे देश तंबाखूच्या पानांची मोठ्या प्रमाणावर आयात करतात. अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांत सिगारेटमधील स्वाददायक मिश्रणासाठी पूर्वेकडील देशांतील तंबाखू मुख्यत्वे आयात करण्यात येते. रशिया, फ्रान्स, जपान, स्पेन, बेल्जियम, लक्सेंबर्ग व नेदर्लंड्स हेही देश तंबाखूची मोठ्या प्रमाणावर आयात करतात.


अबकारी कर व जकात : १९७१–७२ मध्ये भारत सरकारला तंबाखूपासून ३०८·९ कोटी रु. अबकारी कर आणि ४·७ कोटी रु. जकात मिळाली.

भारतातील संशोधन आणि विकास : विसाव्या शतकाच्या आरंभापूर्वीच्या काळात परदेशांतील तंबाखूचे चांगले प्रकार भारतात आणून, त्यांची लागवड करून व त्यांवर वाळविण्याची प्रक्रिया करून ती परदेशांतील बाजारपेठांना निर्यात करण्याच्या हेतूने प्रयत्न झाले परंतु ते सर्व निष्फळ ठरले. विसाव्या शतकाच्या पहिल्या दशकात पुसा येथे हौअर्ड या शास्त्रज्ञांच्या मार्गदर्शनाखाली तंबाखूवर प्रथमच पद्धतशीर संशोधन सुरू झाले. तंबाखूच्या जातींचा वनस्पतिवैज्ञानिक व आनुवंशिकीय अभ्यास आणि एन.पी. २८ व एन. पी ६३ यांसारख्या सुधारित परदेशी प्रकारांची लागवडीसाठी शिफारस ही पुसा येथील सुरुवातीच्या कामगिरीची वैशिष्ट्ये आहेत. यानंतर पुसा येथे गरम हवेच्या साहाय्याने वाळविण्यात येणाऱ्या तंबाखूच्या प्रकारांवर व वाळविण्याच्या या प्रकारच्या पद्धतीवर पुष्कळ संशोधन झाले. एन. पी. ७०, एन.पी. १४२ आणि एन.पी १४७ हे तंबाखूचे सुधारित वाण या संशोधन केंद्रातून लागवडीसाठी दिले गेले. बंगालमध्ये १९०६ मध्ये संशोधन सुरू होऊन त्यातून ‘रंगपूर–सुमात्रा’ आणि गुजरातेत नडियाद येथे १९२४ मध्ये सुरू झालेल्या संशोधन केंद्रातून ‘केळीयू–४९’ व ‘गांडियू–६’ हे सुधारित वाण लागवडीसाठी दिले गेले. तसेच निपाणी येथे १९३९ मध्ये सुरू झालेल्या संशोधन केंद्रातून एस. २० हा सुधारित वाण देण्यात आला. आंध्र प्रदेशातील गुंतूर जिल्ह्यातील लाम येथील संशोधन केंद्रातून व्हर्जिनिया तंबाखूचा एच. एस. ९ हा वाण निवड पद्धतीने तयार करण्यात आला. १९३६ मध्ये त्यावेळच्या इंपीरियल कौन्सिल ऑफ ॲग्रिकल्चरल रिसर्च या संस्थेने गुंतूर येथे तंबाखू संशोधन उपकेंद्र स्थापन केले. या उपकेंद्रात जमिनीचा प्रकार आणि खते यांचा तंबाखूच्या स्वादावर होणारा परिणाम, तंबाखूवरील रोग व किडी आणि तंबाखूचे सुधारित प्रकार यासंबंधी संशोधन करण्यात आले. यांशिवाय व्यापारी क्षेत्रामार्फत व्हर्जिनिया तंबाखूचे प्रकार भारतात आणून त्यांची लागवड करण्याचे काही प्रयत्न झाले. १९४३–४४ पासून भारत सरकारने तंबाखूवर अबकारी कर आकारावयास सुरुवात केली. या करातून दर वर्षी १० लक्ष रु. तंबाखूच्या संशोधनासाठी आणि विकासासाठी बाजूला काढून ठेवण्यात आले. या निधीतून करण्यात येणाऱ्या खर्चावर नियंत्रण ठेवण्यासाठी एक मध्यवर्ती समिती (भारतीय मध्यवर्ती तंबाखू समिती) नोव्हेंबर १९४५ मध्ये स्थापन करण्यात आली. या समितीचे मुख्य कार्यालय प्रथम मुंबई येथे होते. १९४९ मध्ये ते मद्रासला हालविण्यात आले. या समितीतर्फे कार्यान्वित होणाऱ्या बाबींमध्ये तंबाखूच्या सुधारित जातींचे प्रजनन (पैदास) करणे, लागवडीच्या सुधारित पद्धती उपलब्ध करणे, वाळविण्याच्या पद्धतींसंबंधी संशोधन करून सुधारलेल्या पद्धतीचे प्रशिक्षण देणे, देशांतर्गत व निर्यात व्यापाराला प्रोत्साहन देणे आणि त्यासाठी यंत्रणा उभारणे, उभ्या पिकावर तसेच मालाच्या साठवणीमध्ये व वाहतुकीमध्ये आढळून येणाऱ्या रोग व किडींच्या निर्मूलनासाठी संशोधन करणे यांचा प्रामुख्याने अंतर्भाव होतो. तंबाखूवरील सर्व प्रकारच्या मूलभूत संशोधनासाठी आणि सिगारेट व लंका प्रकारच्या तंबाखूवरील अनुप्रयुक्त (व्यवहारोपयोगी) संशोधनासाठी राजमहेंद्री येथे १९४९ मध्ये मध्यवर्ती तंबाखू संशोधन संस्था स्थापन करण्यात आली. सध्या तंबाखू संशोधनासंबंधी सर्व योजना इंडियन कौन्सिल ऑफ ॲग्रिकल्चरल रिसर्च या संस्थेमार्फत कार्यान्वित होतात. संस्थेने अखिल भारतीय पातळीवर तंबाखू संशोधनाचा कार्यक्रम हाती घेतला असून आणंद (गुजरात) येथे या कार्याचे मुख्य ठिकाण आहे. राजमहेंद्री येथील मध्यवर्ती तंबाखू संशोधन संस्था तंबाखूसंबंधी मूलभूत संशोधनाखेरीज देशातील पुढील आठ संशोधन केंद्रांच्या कामामध्ये एकसूत्रता आणण्याचे काम करते : (१) सिगारेट तंबाखू संशोधन उपकेंद्र, गुंतूर (आंध्र प्रदेश) (२) तंबाखू संशोधन केंद्र, हुनसूर (कर्नाटक) (३) सिगार आणि चिरूट संशोधन केंद्र, वेदसंदूर (तमिळनाडू) (४) हुक्का आणि खाण्याचा तंबाखूचे संशोधन केंद्र, पुसा (बिहार) (५) हुक्का तंबाखू संशोधन केंद्र, फिरोझपूर (पंजाब) (६) वेष्टन आणि हुक्का तंबाखू संशोधन केंद्र दीनहाट (प. बंगाल) (७) विडी तंबाखू संशोधन केंद्र, आणंद (गुजरात) व (८) विडी तंबाखू संशोधन केद्र, निपाणी (कर्नाटक).

खाजगी क्षेत्रात इंडियन टोबॅको कं. लि. या सिगारेटच्या कारखान्याने अलीकडे पन्नास लक्ष रु. खर्च करून बंगलोर येथे तंबाखूसाठी संशोधन केंद्र सुरू केले आहे. ही कंपनी व तिच्याशी संबंधित असलेली इंडियन लीफ टोबॅको डेव्हलपमेंट कं. लि. यांच्यामार्फत राजमहेंद्री येथील त्यांच्या संशोधन केंद्रात तंबाखूच्या विविध अंगांसंबंधी संशोधन करण्यात येते.

तंबाखू विकासासंबंधी सर्व योजना भारतीय तंबाखू मंडळ (मद्रास) तयार करते. तंबाखू बाजार, व्यापार आणि किंमतीसंबंधी धोरणे हेच मंडळ ठरविते. या मंडळाने तयार केलेल्या योजना कार्यान्वित करण्याचे काम ‘तंबाखू विकास निदेशालय, मद्रास’ करते. शिवाय हे निदेशालय तंबाखू बाजारासंबंधीच्या कार्यावर देखरेख करते.

इंडियन टोबॅको बुलेटिन (त्रैमासिक) व टोबॅको एक्स्पोर्ट (मासिक) ही दोन्ही तंबाखूविषयक नियतकालिके मद्रासहून प्रसिद्ध होतात.  


पहा : तपकीर धूम्रपान निकोटिन विडी सिगारेट व सिगार.

संदर्भ : 1. C. S. I. R. The Wealth of India, Raw Materials, Vol. VIII, New Delhi, 1966.  

           2. I. C. A. R. Handbook of Agriculture, New Delhi 1966. 

           3. Indian Central Tobacco Committee, Indian, Tobacco, Madras, 1960.

           4. Lehner, E. Lehner J. Fokore and Odysses of Food and Medicinal Pants, New York, 1962.

           5. Poeh।man, J. M. Borthakur, D. Breeding Asian Fie।d Crops, Calcutta, 1969.

           6. Vaidya, V. G. Sahasrabuddhe, K. R. Khuspe, V. S. Crop Production and Field Experimentation, Pune, 1972.

 

सहस्रबुद्धे, कृ. र. परांडेकर, शं. आ. रुईकर, स. के.

तंबाखूच्या पिकाचे सर्वसाधारण दृश्य

सावलीमध्ये हवेच्या सहाय्याने तंबाखूची पाने वाळविण्याची प्रक्रिया.

उन्हामध्ये तंबाखूची पाने वाळविण्यात येत आहेत.

गरम हवेच्या कोठीमध्ये ठेवण्यासाठी तंबाखूची पाने नेण्यात येत आहेत.

गरम हवेच्या साहाय्याने तंबाखूची पाने वाळविण्याची प्रक्रिया (कोठीच्या आतील दृश्य).