पांढरी तिळवण : (१) फुलाफळांसह फांदी (२) फूल : (अ) संदले, (आ) प्रदले (पाकळ्या), (इ) केसरदले (पुं-केसर), (ई) किंजमंडल (स्त्री-केसर) (३) फळ (४) किंजपुटाचा आडवा छेद (५) सार्षप (तडकलेले फळ) (६) बी.

तिळवण, पांढरी : (कानफोडी हिं. हुलहुल, करेला गु. घोळी तळवणी, अडियाखरण क. शिरिकाळ सं. सूर्यावर्त, अर्कपुष्पिका, कर्णस्फोटा, तिलपर्णी इं. स्पायडर फ्लॉवर लॅ. गायनँड्रॉप्सिस पेंटॅफायलागा. गायनँड्रा कुल–कॅपॅरिडेसी). सुमारे ०·६–१·२ मी. उंच असलेली ही वर्षायू (एक वर्ष जगणारी) ⇨ ओषधी भारतात उष्ण भागात तसेच सर्व उष्ण व उपोष्ण देशांत शेतात किंवा ओसाड जागी तणाप्रमाणे वाढलेली आढळते. हिचे सर्वच शरीर केसाळ, चिकट आणि प्रपिंडयुक्त (ग्रंथियुक्त)असून खोड व फांद्या रेषांकित असतात. पाने संयुक्त, हस्ताकृती, ३–५ दलांची, एकाआड एक दले भिन्न आकारांची, व्यस्त अंडाकृती व दीर्घवृत्ताकृती. हिला पांढरी किंवा जांभळट फुले मंजरीवर जूनमध्ये येतात. पाकळ्यांना लांब देठ असून सहा जांभळी केसरदले लांबट किंजधराच्या (किंजपुटाखालील दांड्याच्या) मध्यावर चिकटलेली असतात [→ फूल]. बोंड गोलसर, लांबट (५–९ सेंमी. व्यासाचे), रेषांकित असून बिया तपकिरी किंवा काळ्या आणि मूत्रपिंडाकृती असतात. इतर सामान्य लक्षणे  वरुण कुलातल्याप्रमाणे [→ कॅपॅरिडेसी] असतात.

मोहरीतील किंवा लसणातील उग्र वासाच्या तेलाप्रमाणे तिळवणीच्या पानांत बाष्पनशील (उडून जाणारे) तेल असते. वासाकरिता पाने कालवणात घालतात किंवा त्यांचे लोणचे करतात. इंडोनेशियात जनावरांना चारा म्हणून ही वनस्पती घालतात. ऑस्ट्रेलियातील क्वीन्सलँडमध्ये मेंढ्या व कोंबड्यांना त्यापासून विषबाधा झाल्याचे आढळून आले आहे. चुरगळलेल्या पानांनी कातडी लाल होते व फोड येतात. तथापि डोकेदुखी, गळवे, मज्जातंतुव्यथा, संधिवात व इतर स्थानिक वेदनांवर चोळणे किंवा पोटीस बांधणे याकरिता पाने वापरतात. कानदुखीवर पानांचा रस तेलातून घालतात. काही पित्तविकारांवर हा रस पोटात घेतात. मुळांचा काढा तापावर व बिया जंतावर देतात बियांचे पोटीस जखमेवर लावतात व त्यांचे चूर्ण तेलातून उवांच्या नाशाकरिता डोक्यास चोळतात. बियांचा फांट (थंड पाण्यात भिजवून काढलेला अर्क) खोकल्यावर उपयुक्त असतो.

परांडेकर, शं. आ.