टँस्ली, आर्थर जॉर्ज : (१८७१–१९५५). ब्रिटिश वनस्पतिवैज्ञानिक. वनस्पति-शारीर (वनस्पतीची अंतर्रचना), आकारविज्ञान (संरचना व आकार यांचा अभ्यास करणारे शास्त्र), मानसशास्त्र आणि वनश्री यांसंबंधीच्या ज्ञानात त्यांनी महत्त्वाची भर टाकली आहे. लंडन येथील युनिव्हर्सिटी महाविद्यालयात (१८९३–१९०६) व केंब्रिज विद्यापीठात (१९०६–२३) अध्यापक आणि ऑक्सफर्ड विद्यापीठात (१९२७–३७) शेरार्दियन प्राध्यापक म्हणून त्यांनी काम केले. केंब्रिजमधील ट्रिनिटी महाविद्यालयाचे सन्मान्य फेलो म्हणून १९४४ मध्ये त्यांची निवड झाली. वनस्पतींतील परिस्थितिविज्ञानाच्या विकासावर त्यांच्या कार्याचा बराच प्रभाव असून १९०२ पासून पुढे तीस वर्षांपर्यंत न्यू फायटॉलॉजिस्ट या नियतकालिकाचे ते संपादक होते, त्याचे व सर्व्हे अँड स्टडी ऑफ व्हेजिटेशन याच्या मध्यवर्ती समितीचे (१९०४) ते संस्थापक होते यातूनच (१९१४) पुढे इकॉलॉजिकल सोसायटी उदयास आली. नेचांतील वाहक तंत्रांच्या (पाणी आणि अन्नरसाची ने-आण करणाऱ्या घटक समूहांच्या) क्रमविकासासंबंधीची (उत्क्रांतीची) महत्त्वाची माहिती त्यांनी प्रसिद्ध केली होती, तसेच टाइप्स ऑफ व्हेजिटेशन (१९०८) आणि द ब्रिटिश आयलंड्स अँड देअर व्हेजिटेशन (१९३८) हेही ग्रंथ त्यांनी प्रसिद्ध केले. १९१५ मध्ये ते रॉयल सोसायटीचे फेलो झाले व त्याच वर्षी लिनियन सोसायटीने त्यांना सुवर्णपदक दिले. १९५० मध्ये त्यांना ‘सर’ हा बहुमानाचा किताब मिळाला.

जमदाडे, ज. वि.