सूर्यावर्त : (हिं. सुबाली क. ओखडी सं. सूर्यावर्त लॅ. क्रोझोफोरा प्लिकॅटा कुल-यूफोर्बिएसी). या सु. ०·६ मी. उंच भुरकट व वर्षायू ओषधीचा प्रसार स्पेन, उत्तर आफ्रिका आणि भारतामध्ये गुजरात, पंजाब व महाराष्ट्रात आहे. भात शेतात पावसाळ्यानंतर ही आढळते प्रधान मूळ लांब, सरळ व बारीक पाने दाट, फिकट, सुरकुतलेली, विविध आकार व स्वरुपाची आणि केसाळ फुले एकलिंगी, फुलांच्या मंजऱ्यावर दाट तारकाकृती केस असून फुले एप्रिलमध्ये येतात. पुं-पुष्पात संदले व प्रदले ५ आणि केसरदले १५, स्त्री-पुष्पात परिदले तशीच बोंडे केसाळ असतात. संथाळ लोक सालीपासून चिवट वाख काढतात टर्नसोलसारखे फिकट जांभळे रंजकही यापासून मिळते. पाने शुद्घीकारक, मुळाच्या स्पर्शाने त्वचेवर फोड येतात. याचे भस्म मुलांना खोकल्यावर देतात. बिया रेचक असतात.

पहा : यूफोर्बिएसी.

जमदाडे, ज. वि.