सुमाक : फुलझाडांपैकी [⟶ वनस्पति, आवृतबीज उपविभाग] ⇨ नाकार्डिएसी (आम्रकुल) कुलामधील ऱ्हस या प्रजातीतील सर्वच क्षुपे व वृक्ष ‘सुमाक’या सामान्य इंग्रजी नावाने ओळखले जातात. ह्या प्रजातीत सु. १९० जाती असून त्यांचा प्रसार दक्षिण यूरोप, आशिया व पूर्व अमेरिकेत आहे. खोडामध्ये राळयुक्त दुधी चीक असून कोरड्या हवेशी संपर्क येताच तो सुकतो. फांद्या सांबराच्या शिंगासारख्या पाने एकाआड एक, संयुक्त, पिसासारखी आणि शेंड्याकडे लहान व पंचभागी फुलांचे झुबके फळे लहान, लाल, लवदार आणि एकबीजी असतात. श्माल्‌ट्‌झिया (सु. ३० जाती) या संबंधित प्रजातीचा अंतर्भाव ऱ्हस प्रजातीत कधीकधी केलेला आढळल्याने, त्याचाही निर्देश येथे केला आहे. ह्यांना साधी किंवा संयुक्त पाने, कणिशासारखे फुलोरे व फळांचे घोस असतात.

दक्षिण यूरोपातील ऱ्हस कोरिरिया ही सुमाकची जाती व्यापारी दृष्ट्या महत्त्वाची असून कातडी कमाविण्याच्या उद्योगांत फार वर्षांपासून उपयोगात आहे आणि उत्तर अमेरिकेतही कित्येक जातींचा उपयोग त्यासाठीच केला जात असे. तसेच काहींचा उपयोग फक्त शोभेकरिता होतो. श्मा. क्रेनॅटा ची पाने सुगंधी असल्याने व श्मा. ट्रायलोबॅटा ची पाने दुर्गंधी असल्याने त्यांना तशी विशेषणे लावतात. टॉक्सिकोडेंड्रॉन व्हर्निक्स ही जाती विषारी आहे. सुमाकापासून विविध उपयुक्त वस्तू (रंग, औषधे, जळण, पेये इ.) बनवितात. जमिनीस स्थिरपणा आणण्यास व उजाड (नापिक) क्षेत्रात पुन्हा वनस्पतींचे उत्पादन करण्यास सुमाक उपयुक्त असतात. उ. भारतात सुमाक (ऱ्ह. पर्विफ्लोरा ) पंचमढी (मध्य प्रदेश) व प. हिमालयात ( सस.पासून ७,७५० मी. उंचीपर्यंत) आढळतो. याशिवाय सुमाकच्या ८-९ जाती हिमालयात आढळतात.

सुमाकचे काही उपयोग व त्यासाठीच्या उपयुक्त जाती पुढीलप्रमाणे आहेत : (१) कातडी कमाविण्यास उपयुक्त टॅनीन असलेल्या ऱ्ह. चायनेन्सिस, ऱ्ह. मायसुरेन्सिस (अमोणी), ऱ्ह. पंजाबिएन्सिस, ऱ्ह. कोटिनस आणि ऱ्ह. सक्सिडॅनिया ⟶ काकडशिंगी]. (२) खाद्य फळे ( ऱ्ह. चायनेन्सिस, ऱ्ह. मायसुरेन्सिस आणि ऱ्ह. पंजाबिएन्सिस ). (३) रोगण व मेण ( ऱ्ह. व्हर्निसिफेरा आणि ऱ्ह. सक्सिडॅनिया ). (४) औषधे (ऱ्ह. पर्विफ्लोरा, ऱ्ह. चायनेन्सिस, ऱ्ह. इन्सिग्निस, ऱ्ह. पंजाबिएन्सिस, ऱ्ह. वॉलिची आणि ऱ्ह. सक्सिडॅनिया). (५) लाकूड (ऱ्ह. वॉलिची या जातीचे लाकूड कुऱ्हाडीचे दांडे व संगीत वाद्ये तयार करण्यासाठी आणि ऱ्ह. कोटिनस याचे लाकूड कातीव व जडावाचे कामास उपयुक्त असते ). (६) शोभेकरिता ( ऱ्ह. चायनेन्सिस, श्मा. इंटेग्रिफोलिया, श्मा. ओव्हॅटा आणि ऱ्ह. टायफिना, ऱ्ह. कोपॅलिनाऱ्ह. ग्लॅब्रा या तीन जाती उत्तर अमेरिकेत विशेषेकरून वापरतात).(चित्रपत्र).

सुमाक : (अ) स्टॅनहॉर्न सुमाक (ऱ्हस टायफिना), (आ) ड्‌वार्फ सुमाक (ऱ्हस कोपॅलिना), (इ) पॉयझन सुमाक (टॉक्सिकोडेड्रॉन व्हर्निक्स). १. संयुक्त पान, २. फळांचे घोस.

परांडेकर, शं. आ.