महाळुंग : (१) पानाफुलांसह फांदी, (२) फुलाचा उभा छेद (पुष्पमुकुट काढून टाकलेला), (३) फळ, (४) फळाचा आडवा छेद, (५) बिया.महाळुंग: (हिं. बिजौरा, दुरंज गु. बीजोरूं क. मादळ सं. अम्लकेशर, मातुलुंग, महाफल, बीजपूर्ण इं. सिट्रोन, ॲडम्स ॲपल लॅ. सिट्रस मेडिका कुल-रूटेसी). सुमारे ३ मी. उंच वाढणारा हा कोटेरी व सदापर्णी वृक्ष मूळचा बहुधा भारतातील असून सध्या तो चितगाँग, सीताकुंड, खासी आणि गारो टेकड्यांच्या भागात रानटी अवस्थेत आढळतो. दहाव्या शतकातील एका पर्शियन वैद्यक ग्रंथात महाळुंगाचा उल्लेख आहे कौटिलीय अर्थशास्त्रात व द्रविड वाङ्‍मयात (इ. स. चौथे व पाचवे शतक) महाळुंगाचा (मातुलुगाचा) निर्देश आढळतो. यावरून त्याचे भारतीयत्व सिद्ध करण्यास आधार मिळतो. कोवळे भाग जांभळट असून पाने, फुले व फळे इत्यादींची सामान्य लक्षणे ⇨ सिट्रस प्रजातीत व ⇨ रूटेसी अथवा सताप कुलात वर्णन केल्याप्रमाणे असतात. पाने लांबट व मोठी असून फुले एकलिंगी, किंचित लालसर व पांढरी असतात. फळ गोलसर लांबट व टोकदार, मोठे, ओबडधोबड व जाड सालीचे असून पिकल्यावर पिवळे दिसते. मोठे (गर) सुगंधी, फिकट, थोडा व आंबूस कडवट असतो. रस प्रशीतकर (थंडावा देणारा) व स्तंभक (आकुंचन करणारा) असतो. विशेष प्रकारे जतन केलेली फळाची साल आमांशावर देतात. तापावर पानांचा फांट [विशिष्ट प्रकारे बनविलेला काढा ⟶ औषधिकल्प] देतात. उलट्या थांबण्यास मूळ उगाळून देतात.

फळांचे लोणचे, मर्मालेड, मुरंबा, सरबत इ. पदार्थ करतात. पाकविलेली साल मिठाईत घालतात. काही प्रकारांची फळे गोड, सुगंधी व काही प्रकारांची आंबट असतात. पक्व फळ पथ्यकर, रुचकर व पित्तशामक असून महाळुंग पाक शक्तिवर्धक असतो. बिया दीपक (भूक वाढविणाऱ्या) व बल देणाऱ्या असतात.

व्यापारी दृष्ट्या महाळुंगाची लागवड हल्ली भूमध्य सामुद्रिक प्रदेशात करतात. भारतातील ओलसर व उबदार भागात कोठे कोठे महाळुंगाची लागवड करतात. विशेषेकरून उत्तर भारतातील पन्हेरीवाले लोक संत्र्या-मोसंबीचे डोळे भरून कलमे करण्यासाठी खुंट म्हणून महाळुंगाच्या रोपांचा फार मोठ्या प्रमाणावर उपयोग करतात परंतु अशी कलमे खुरटी राहतात आणि फळे कमी लागतात व फळांचा दर्जाही कमी असतो.

झाडाचे लाकूड पांढरे, कठीण व भारी असते. त्याचा उपयोग शेतीची अवजारे करण्यासाठी करतात आणि फांद्यांपासून हातात धरण्याच्या काठ्या तयार करतात.

ठोंबरे, म. वा. परांडेकर, शं. आ.