ॲव्होकॅडो: (इं. ॲलिगेटर पीअर, बटर फ्रुट, सोल्जर्स बटर लॅ. पर्सिया अमेरिकाना कुल—लॉरेसी). सु. १५—१८ मी. उंच वाढणाऱ्या या वृक्षाचे मूलस्थान मेक्सिको किंवा दक्षिण अमेरिका असून तो मध्य अमेरिकेत व वेस्ट इंडीजमध्ये अनेक वर्षे मोठ्या प्रमाणावर लागवडीत आहे. भारतात कर्नाटक, केरळ, तमिळनाडू, गोवे, महाराष्ट्र (पुणे, खडकी, फलटण) इ. ठिकाणी त्याची लागवड केली जाते. त्याचे ग्वाटेमाला, वेस्ट इंडियन व मेक्सिकन असे तीन मुख्य प्रकार असून इतरही अनेक उपप्रकार ओळखले जातात. पाने लांबट (४० सेंमी.), आयत किंवा दीर्घवृत्ताकृती-भाल्यासारखी फुले लहान, हिरवट असून दाट परिमंजऱ्यांवर मार्च—एप्रिल व नोव्हेंबर—डिसेंबरामध्ये येतात. मृदुफळे मोठी, अंडाकृती, गोलसर (५—२० सेंमी. लांब), हिरवी पिवळी अगर जांभळट अशी दोन प्रकारची, भिन्न झाडांवर, ऑगस्ट-सप्टेंबर व मे—जूनमध्ये येतात. ती काढल्यावर ४—५ दिवसांनी मऊ होतात. प्रत्येक झाडावर १००—१२० फळे येतात. व्यापारात ‘कॅलॅवॉस’ या नावाने ती ओळखली जातात. फळात मोठे मांसल व एकच बी असते. [→ लॉरेसी] फळाची साल जाड व आत फिकट किंवा पिवळट व रुचकर आणि घट्ट लोण्यासारखा खाद्य मगज (गर) असतो, त्यावरून काही इंग्रजी नाव पडली आहेत. मगज खरवडून तसाच किंवा मिरी, मीठ आणि शिर्का घालून खातात. तो पौष्टिक असतो कारण त्यात चरबी, प्रथिने, कार्बोहायड्रेटे, खनिजे व जीवनसत्त्वे भरपूर असतात. खराब फळांचे तेल काढतात. ते दाट व चवीला ⇨हॅझलनटासारखे असून त्याला मंद वास येतो. त्याचा उपयोग भाज्यांना स्वाद व चव आणण्यास व सौंदर्यप्रसाधने, साबण, औषधे इत्यादींकरिता करतात. उरलेला चोथा जनावरांना खुराक किंवा जमिनीस खत म्हणून घालतात. पाने व सालीपासून बाष्पनशील तेल (टॅरॅगॉन तेलासारखे) मिळते. लाकूड भुरकट, हलके (वजन दर घ.मी.ला. ५६०—६४० किग्रॅ.) असते, पण फारसे टिकाऊ नसल्याने व्यापारी दृष्ट्या महत्त्वाचे नाही. 

जमदाडे, ज. वि.

ॲव्होकॅडो

ॲव्होकॅडो भारतामध्ये पहिल्याने १९४१ साली श्रीलंकेमधून आणून पुणे येथील गणेशखिंड फळ- बाग केंद्रात लावण्यात आले. हे फळझाड वर्षात ७५—१९० सेंमी. पावसाच्या समशीतोष्ण भागात व चांगल्या निचऱ्याच्या जमिनीत चांगले वाढते. लागवड रोपे किंवा कलमे ७·५—९ मी. अंतरावर लावून करतात. फळे येऊन ती पक्व होण्यासाठी   ऊनवाऱ्यापासून संरक्षण, पाणी आणि हवामाना- तील आर्द्रता यांची जरूरी असते. झाड ७—१० वर्षांचे होईपर्यंत त्याच्या जमिनीस टेकणाऱ्या फांद्या छाटून त्याला आकार देतात. राखलेल्या फांद्यांचे शेंडे कापीत नाहीत कापल्यास फळे लागत नाहीत.

फुले आल्यापासून सु. ५ महिन्यांनी फळे तयार होतात. तयार फळांतल्या गरात चरबीचे प्रमाण काही जातींत ७—१० आणि काहींत १५—२० टक्के असते. पुणे येथील अंजिरी (जांभळट) रंगाच्या फळातील गरात १७ टक्के तेल असते आणि अ, ब, क ही जीवनसत्त्वे व १—४ टक्के प्रथिने असतात.

चौधरी, रा. मो.