बोके : (बोक हिं. पनियाला, भिल्लर, कीन क. निलिमर, गोब्रानेरले इं. रेड जावा सीडार, व्हिनेगर वुड, बिशप वुड लॅ. बिशोफिया जावानिका, बि. ट्रायफोलिॲटा कुल-यूफोर्बिएसी) फुलझाडांपैकी द्विदलिकित वर्गातील [⟶ वनस्पती, आवृतबीज उपविभाग] ह्या वनस्पतीच्या बिशोफिया या वंशातही एकच जाती असून हिचा प्रसार भारत ते पॉलिनीशिया या प्रदेशात आहे. हा सु. ९-१२ मी. उंच व ३० सेंमी. घेर असलेला, डेरेदार व मोठा पानझडी वृक्ष भारतात (बेळगाव, कोकण, उ. कारवार येथील सदापर्णी वृक्षांच्या जंगलात) मुख्यतः ओढे व नाले यांच्या काठाने दिसतो शिवाय अंदमानात, उष्ण कटिबंधीय हिमालयात, कुमाऊँच्या पूर्वेस, आसामपासून दक्षिणेस निलगिरीपर्यंत, श्रीलंकेत व ब्रम्हदेशात हा आढळतो हा शोभिवंत वृक्ष आहे. याचे खोड सरळ व गोल आणि फांद्या पसरट असून साल खरबरीत, गर्द करडी-तपकिरी असून खवल्यांनी सोलली जाते. पाने संयुक्त, एकाआड एक, त्रिदली (क्वचित पंचदली), २०-३० सेंमी. असून दले आखूड देठाची, भाल्यासारखी लांबट निमुळती व करवती किनारीची असतात. पानांच्या बगलेतील शाखायुक्त फुलोऱ्यावर [परिमंजरीवर ⟶ पुष्पबंध] फेब्रुवारी ते एप्रिलमध्ये लहान, एकलिंगी, हिरवी आणि पाकळ्या नसलेली फुले येतात. पुं-पुष्पे व स्त्री-पुष्पे स्वतंत्र वृक्षांवर येतात संदले फक्त पाच [⟶ फूल] पुष्पे बारीक आणि आखूड देठाची असून मृदुफळ लहान बोराएवढे (७.५ मिमी.), मांसल, गोलसर, तपकिरी किंवा काळे आणि बिया ३-४, चकचकीत, तपकिरी, सु. ०.४ सेंमी. लांब, सपुष्क (गर्भाबाहेर अन्नांश असलेल्या) व गुळगुळीत असतात. इतर सामान्य शारीरिक लक्षणे ⇨ यूफोर्बिएसीत (एरंड कुलात) वर्णिल्याप्रमाणे असतात.

प्रथम बियांपासून रोपे बनवितात ती ३-४ महिन्यांनी ठरल्या ठिकाणी लावतात. वाढ जलद होते. सौम्य दहिवराचा परिणाम होत नाही (थोडी सावलीही चालते कापून राखलेल्या खुंटांपासून नवीन खोडे येतात व ती चांगली वाढून उपयोगात येतात. याच्या पानांचा रस जखमा, चट्टे व व्रण यांवर लावण्यास उपयुक्त सालीतील लाल रंग वेताच्या टोपल्या रंगविण्यास व साल कातडी कमाविण्यास वापरतात, कारण सालीत १६% टॅनीन असते. या वृक्षाचे लाकूड गर्द लालसर तपकिरी व कठीण असते ते सागवानाइतके बळकट, खरबरीत व मध्यम प्रतीचे, जड व टिकाऊ असते. कापण्यास ते सोपे असून चांगले गुळगुळीत करता येते. त्याला प्रथम शिर्क्याचा (व्हिनेगरचा) तीव्र वास येतो त्यावरून ‘व्हिनेगर वुड’ हे नाव पडले आहे. ते चांगले टिकाऊ होण्यास त्यावर विशेष प्रकारचे संस्कार करतात. विशेषतः ते पूल बांधणी, खांब, शिळेपाट, फळ्या, पेन्सिली, जळण, होडगी, खाणकाम, वल्ही, जू, चाकाचे आरे इत्यादींसाठी वापरतात. बंगाल व आसाममधून मोठ्या प्रमाणात व तमिळनाडूतून कमी प्रमाणात याचा पुरवठा होतो. बियांत स्थिर तेल असते व पानांत क जीवनसत्त्व आढळते.

संदर्भ : Kirtikar, K. R. Basu, B. D. Indian Medicinal Plants, Vol. III, Delhi, १९७५.

जमदाडे, ज. वि. परांडेकर, शं. आ.