चेरी पाय: (इं. कॉमन हेलिओट्रोप लॅ. हेलिओट्रोपियम पेरुव्हियानम, हे. आर्बोरेसेन्स कुल-बोरॅजिनेसी). समशीतोष्ण आणि उष्ण कटिबंधांत बागेतून सामान्यपणे शोभेकरिता लावले जाणारे हे सु. ३०–४६ सेंमी. उंचीचे, केसाळ व बहुवर्षायू (अनेक वर्षे जगणारे) क्षुप (झुडूप) मूळचे पेरूमधील आहे. याची पाने साधी, गर्द हिरवी, एकाआड एक किंवा काहीशी समोरासमोर, लांबट आणि भाल्यासारखी असतात. याची फुले लहान, सुगंधी, पांढरी ते जांभळ्या छटांची असून फांद्यांच्या टोकांस काहीशा गुंडाळीसारख्या फुलोऱ्यावर येतात. सामान्य शारीरिक लक्षणे  बोरॅजिनेसी अथवा भोकर कुलात वर्णिल्याप्रमाणे. फळे बारीक, शुष्क व द्विबीजी. नवीन लागवड बिया लावून व कलमांनी करतात. फुलांपासून काढलेला नैसर्गिक किंवा कृत्रिम सुगंधी अर्क व्यापारी महत्त्वाचा आहे. भुरुंडी (हे. इंडिकम ) व सीतेचे केस (हे. स्ट्रायगोनम ) या भारतातील रानटी जाती औषधी असून भारतात सर्वत्र आढळतात. भुरुंडी मूत्रल (लघवी साफ करणारी) असते व्रण, गळवे, जखमा, कीटकदंश इत्यादींवर तिची पाने बांधतात अथवा एरंडेलातून रस लावतात. घसा सुजला असता याचा क्वाथ (औषधाचा काढा) गुळण्यांकरिता व पोटात देतात. सीतेचे केस ही वनस्पती सारक आणि मूत्रल असून तिचा रस नेत्रविकारात व हिरड्या सुजल्यास लावतात. चेरी पायच्या बिया सप्टेंबर–ऑक्टोबरात (डोंगराळ भागात मार्च–एप्रिलात) लावतात. साधारणपणे तीन महिन्यांनी फुले येतात. याला भरपूर सूर्यप्रकाश व सकस जमीन आवश्यक असते.

 चेरी पाय : (अ) फुलोऱ्यासह फांदी (आ) भुरुंडी : (१) फुलोऱ्यासह फांदी , (२) फूल, (३) फळ.

परांडेकर, शं. आ.