अळू : (हिं. आर्वी, काचालू गु. अळवी क. श्यामी, शावे, केसु सं. कच्वी इं. तारो, ॲरम, एलेफंट्स इयर लॅ. कोलोकेशिया अँटिकोरम कुल-ॲरॉइडी). ही ⇨ओषधीय  वनस्पती पाणथळ जागी भारतात सर्वत्र आढळते शिवाय भाजीकरिता लागवडही करतात. ही मूळची आग्नेय आशियातील असून पुढे पॅसिफिक महासागरातील बेंटांत पसरली उष्णकटिबंधात बहुतेक सर्वत्र, कंदातील पिठूळ गराकरिता पिकविली जाते. घनकंदापासून मोठी, छत्राकृती, अंडाकृती व तळाशी त्रिकोणी खाच असलेली पाने येतात. देठ भक्कम व तळाशी खोबणीसारखा (आवरक) ⇨पुष्पबंध  स्थूलकणिश ⇨ॲरॉइडी  कुलात वर्णिल्याप्रमाणे व त्यावर फिकट पिवळा, नावेसारखा व टोकदार महाछद कणिशाच्या दांड्यावर सर्वांत खाली स्त्री-पुष्पे, मध्ये वंध्य-पुष्पे व त्यावरच्या भागावर पुं.-पुष्पे ⇨फुलात केसरदले ३–५ किंजपुटात एक कप्पा असून बीजके ५ मृदुफळे लहान असतात. देठ व पानांच्या शिरा जांभळट असलेली जाती ‘काळे’ अळू व ते भाग हिरवे असलेली जाती ‘पांढरे’ अळू असे दोन प्रकार पिकवितात. देठाचा रस रक्तस्तंभक, उत्तेजक व चर्मरक्तकर (कातडी लाल करणारा) कंदाचा रस चाईवर लावतात कंद व पाने खाद्य असून भाजीकरिता वापरतात [→ आर्वी-२].                                                                                                                                           वैद्य, प्र. भ.

अळूची पाने

 

अळू. (१) पाने व खोडासह ओषधी, (२) फुलोरा, (३) महाछद काढलेला फुलोरा.

अळूच्या जुन्या पिकाचे गड्डे डिसेंबरमध्येकाढून बेण्यासाठी थंड जागी नीट साठवून ठेवतात. अळूकरिता कसदार, निचऱ्याची जमीन चांगली. जमीन नांगरून भरपूर खत घालून कुळवून ३·६ X १·८ मीटरचे वाफे करतात. काढून ठेवलेले गड्डे वाफ्यांत फेब्रुवारी-मार्च महिन्यांत प्रत्येकी ४० प्रमाणे लावून पाणी देतात. अळूला पाणी फार लागते. सांडपाण्यावर ते चांगले पोसते. लागणीपासून तीन महिन्यांत पानांची पहिली कापणी नंतर पुढे दर चौथ्या दिवशी कापणी करतात. हेक्टरामधून वर्षाला ८,०००–१०,००० किग्रॅ. अळूची पाने मिळतात.

पाटील, ह. चिं.

रोग : अळूच्या पानांवर फायटॉफ्थोरा कोलोकेशी  या कवकामुळे तांबूस काळसर डाग पडतात. पावसाळ्यात रोगाचे प्रमाण जास्त आढळते. आर्द्रता वाढल्याने देठावर व गड्ड्यावरही रोग पसरतो. यासाठी रोगमुक्त गड्डे लावतात. तसेच रोगास आळा बसण्यासाठी रेझीनयुक्त साबण, ३ : ३ : ५०० कसाच्या बोडों मिश्रणात मिसळून फवारा मारतात.

कुलकर्णी, य. स.