उटा : (यूटा). अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांपैकी पर्वतविभागातील एक राज्य. क्षेत्रफळ २,२०,९७४ चौ. किमी. लोकसंख्या १०,५९,२७३ (१९७०). ३७ उ. ते ४२ उ. आणि १०९ ३’ प. ते ११४ ४’ प. याच्या दक्षिणेस ॲरिझोना, पश्चिमेस नेव्हाडा, उत्तरेस आयडाहो व वायोमिंग आणि पूर्वेस वायोमिंग व कोलोरॅडो ही राज्ये असून आग्‍नेय कोपऱ्यात चार राज्यांच्या सीमा एकत्र येणारा देशातला एकमेव बिंदू आहे. सु. ५५० किमी. लांब आणि ४२० किमी. रुंद असलेल्या या राज्याची राजधानी सॉल्ट लेक सिटी आहे. 

भूवर्णन : सिएरा नेव्हाडा व रॉकी पर्वतांदरम्यानच्या उंच डोंगराळ पठाराचा हा भाग पर्वतराजींनी आणि प्राचीन प्रवाहांनी कोरलेल्या खोल घळ्यांनी (कॅन्यन) युक्त आहे. पूर्वेकडचा तृतीयांश भाग कोलोरॅडो पठारापैकी असून, तो ग्रीन, कोलोरॅडो, सॅन वॉन आणि व्हर्जिन या नदीखोऱ्यांनी बनलेला आहे. त्यांत खनिजे सापडतात. याच्या पश्चिमेस दक्षिणोतेतर ८० ते ९६ किमी. रुंदीचा रॉकी पर्वतविभाग व उत्तरेकडे यूइंटा पर्वताचा फाटा आहे. यूइंटा पर्वतात ४,००० मी.हून अधिक उंचीची अनेक शिखरे आहेत. ती बरेच दिवस हिमाच्छादित असतात. वॉसॅच या दक्षिणोत्तर मुख्य रांगेमुळे पॅसिफिक महासागराकडून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यांपासून पाऊस पडतो. या पावसाच्या आधारानेच उत्तर भागात शेतीवाडी व दाट वस्ती झाली आहे. राज्याचा अगदी पश्चिमेकडचा तृतीयांश भाग ‘ग्रेट बेसिन’ या वैराण मुलुखाचा भाग असून त्याला ‘ग्रेट अमेरिकन डेझर्ट’ म्हणतात. त्यातील जलप्रवाह वाळून लुप्त तरी होतात किंवा क्षारांच्या कुंडांत विलीन होतात. ‘ग्रेट सॉल्ट लेक’ व त्याच्या तीरावरचे त्याच नावाचे वाळवंट अतिप्राचीन बॉनव्हिल सरोवराचे अवशेष आहेत. उत्तरेच्या बेअर, वेबर व जॉर्डन या नद्या सॉल्ट लेकला मिळतात. ग्रेट सॉल्ट लेक सु. ८० किमी. रुंद व १३० किमी. लांब असून कोठेही ११ मी. पेक्षा खोल नाही. त्याची क्षारता २५% असून त्यापासून मीठ मिळते. पूर्वभागातील ग्रीन नदी कोलोरॅडोला मिळते. कोलोरॅडो पूर्वसीमेच्या मध्यावर राज्यात प्रवेश करून दक्षिण सीमेच्या मध्यावर राज्याबाहेर पडते. उटा राज्य खनिजांनी संपन्न आहे तांब्याचे उत्पादन देशात दुसऱ्या क्रमांकाचे असून जगातील सर्वांत मोठी उघडी तांब्याची खाण राज्यात बिंगॅम कॅन्यय येथे आहे. सोन्याच्या उत्पादनातही राज्याचा देशात दुसरा क्रमांक असून शिसे व चांदीत तिसरा व जस्तात चौथा आहे. पेट्रोलियम व युरेनियमही अलीकडे सापडले आहे. मीठ, कोळसा, पोटॅशियम, संगमरवर, मध्यम मूल्यवान खडे, ऑनिक्स, गंधक, लोहधातुक, फॉस्फेट ही खनिजेही येथे सापडतात. 

येथील हवामानात स्थानपरत्वे फार फरक पडतो. दक्षिणेच्या उष्ण व कोरड्या भागात उन्हाळा कडक, थंडी सौम्य, तर पठारावर आणि पर्वतात थंडी कडक व उन्हाळा सुसह्य असतो. पर्वतभागातले हवामान एकाएकी बदलून आत्यंतिक होऊ शकते. डोंगरपायथ्यांच्या सुपीक भागात तपमान किमान  -१७·८ से. व कमाल ३२·२ से. आणि आर्द्रता कमी असते. वार्षिक सरासरी पर्जन्य वाळवंटात १२·५ सेंमी. पासून पर्वतभागात १०० सेंमी. पर्यंत असते. या राज्यात वारा, उष्णता, पाऊस, आर्द्रता इ. अनेक विदारणकारकांमुळे वालुकाश्माचे उंच सुळके, चित्रविचित्र आकाराचे खडक, नैसर्गिक पूल, खिडक्या वगैरे विविध रम्य, भीषण व भव्य दृश्ये निर्माण झालेली आहेत. राज्याच्या भूभागाच्या सु. १७% प्रदेश वनाच्छादित असून त्यात फर, स्प्रूस, पाईन, ज्यूनिपर,  पिनॉन, सीडार इ. जातींचे वृक्ष वाढतात. भूमीच्या उंचसखलपणामुळे व विविध हवामानामुळे वृक्षापासून गवतझुडपापर्यंत येथे सर्व प्रकारच्या वनस्पती आढळतात. हरिण, एल्क, प्यूमा, सालिंदर, खोकड, लिंक्स, कोल्हा, स्कंक, बॅजर, वीझल, मिंक, मार्टेन क्वचित अस्वल, रानमेंढा, रानरेडा, कासव, सर्प, उंदीर, सरडे, गोफर, चिपमंक, मार्मट, प्रेअरी डॉग, खार, उडती खार हे प्राणी राज्यात असून राखीव पाणथळ-विभागात अनेक जातींचे पाणपक्षी, डोंगरी भागात विविध जातींचे पक्षी आणि नद्यातळ्यांस मुद्दाम पैदास केलेले मासे आढळतात. 

इतिहास व राज्यव्यवस्था : १८४३ मध्ये सेनापती जॉन फ्रीमाँटने किट कार्सन या वाटाड्यासोबत ग्रेट सॉल्ट लेकची पुरी पाहणी केली. त्याआधी थोड्याच लोकांनी हा प्रदेश पाहिलेला होता. १८४७ साली ब्रिगम यंग सॉल्ट लेक खोऱ्यात दाखल झाला व त्याला वॉसॅच पर्वताचे उतार नव्या वसाहतीस अनुकूल दिसले. बहुपत्‍नीकत्वासारख्या तत्त्वांच्या हट्टामुळे इतरत्र अप्रिय झालेले मॉर्मनपंथीय लोक आपल्या धर्ममतानुसार राहण्यासाठी नवा प्रदेश शोधीत होते. ब्रिगम यंगने सॉल्ट लेक सिटी येथे मध्यवर्ती वसाहत व दुसरीकडे अनेक शाखा स्थापन केल्या. १८४८ मध्ये हा प्रदेश मेक्सिकोने अमेरिकेला दिला, त्यावेळी या वसाहतवाल्यांनी डेझेरेट हे स्वतंत्र राज्य स्थापून उटाखेरीज शेजारच्या राज्यांचे प्रदेशही त्यात सामील केले. १८५० मध्ये संघराष्ट्रात डेझेरेटला प्रदेश म्हणून प्रवेश मिळाला आणि ब्रिगम यंगची पहिला गव्हर्नर व इंडियानांशी व्यवहाराचा आयुक्त म्हणून नेमणूक झाली. तथापि स्थिरस्थावर होण्याआधीच १८४९ मध्ये कॅलिफोर्नियात सापडलेल्या सोन्यासाठी धावणारे पेंढार या प्रदेशातून आरपार जाऊ लागले. मॉर्मनांना त्यांच्या पुढाऱ्यांनी सोन्याच्या लोभापासून परावृत्त केले, पण सोन्यासाठी लोटणाऱ्या गर्दीला अन्न व गरजेच्या जिनसा विकून मॉर्मनांनी भरपूर नफा मिळविला. नेव्हाडात सोन्यासाठी झगडे सुरू झाले व नेव्हाडा प्रदेश वेगळा करण्यात आला. १८६१ साली कोलोरॅडो अलग झाला व वायव्येकडील भाग वायोमिंगकडे जाऊन १८६८ मध्ये उटाचा सध्याचा आकार कायम झाला. १८५३ पासून अनेक वेळा रेड इंडियनांचे उठाव झाले पण १८६७ पर्यंतत्यांचा पुरता बंदोबस्त झाला. मॉर्मनांनी बहुपत्‍नीकत्वाचे तत्त्व सोडून दिल्यावरच १८९६ साली राज्याला संघराष्ट्रात प्रवेश मिळाला. दरम्यान स्थानिक भांडवल वाढत गेले पूर्वेकडील भांडवलाचा ओघ इकडे वळला व ब्रिगम यंगच्या कल्पनेतील साधी, धार्मिक, कृषिप्रधान अर्थव्यवस्था हलकेहलके बदलून ती आजची कारखानदारी–खाणधंदा–शेतीवाडी– व्यापारी स्वरूप पावली. कृषी आणि कारखानदारी उत्पन्नाची बहुमोल साधने राज्यात असली, तरी त्यांचे वैभव वाढविण्याची सर्वाधिक क्षमता त्याच्या अजूनपर्यंतच्या अविकसित खाणींत, विशेषतः खनिज क्षारांत, आहे.

१८९५ च्या सुधारलेल्या संविधानाप्रमाणे चार वर्षांसाठी निवडलेला गव्हर्नर व चार खातेप्रमुख कारभार पाहतात. दर दोन वर्षांनी निम्मे याप्रमाणे निवृत्त होणारे ३० सीनेटर चार वर्षांसाठी आणि ६९ प्रतिनिधी वर्षाआड निवडलेले असतात. यांची विधिमंडळे विषमांकी वर्षी राजधानी सॉल्ट लेक सिटी येथे भरतात. न्यायव्यवस्थेत दहा वर्षांसाठी निवडलेले सर्वोच्च न्यायालयाचे पाच न्यायमूर्ती, जिल्हावार ७ न्यायाधीश व स्थानिक शांती-न्यायधिकारी असतात. राष्ट्रसंसदेवर राज्यातर्फे दोन सीनेटर व दोन प्रतिनिधी निवडून जातात. 

आर्थिक व सामाजिक स्थिती : प्रथमपासूनच पाटबंधाऱ्यांवरील कृषिव्यवसाय राज्याच्या अर्थव्यवस्थेचा पाया होता. एकूण जमिनीपैकी १९७१ मध्ये १७·२%वनाच्छादित असून, ३९.३ टक्के जमीन लागवडीखाली होती. १३% लोक गुरे, मेंढरे, कोंबड्या, दूधदुभते, अंडी, गहू, बार्ली, ओट, मका, बटाटे, फळे, साखरबीट, घासचारा व लोकर या मालाचे भरपूर उत्पादन काढतात. कारखानदारीत १२ टक्के लोक बीटसाखर, लोकर व पेट्रोलियमचे पदार्थ, शुद्ध तांबे, रसायने, पोलाद आणि डबाबंद खाद्यपदार्थ या मालाची निर्मिती करतात. खाणींचे उत्पन्न मुख्यतः तांबे, कोळसा, कच्चे लोखंड व युरेनियम या धातूंचे असून सोने, पेट्रोलियम, शिसे, चांदी, जस्त ही खनिजेही मिळतात. पर्यटनव्यवस्था हा धंदाही आता किफायतशीर होत आहे. १९७१ मध्ये राज्यात लोहमार्ग ४,८०० किमी., रस्ते ६०,८०० किमी., मोटारी ५·०७ लक्ष, ८९ विमानतळ होते. याशिवाय ३२ नभोवाणी व चार दूरचित्रवाणी केंद्रे, ४ प्रमुख दैनिके, शिवाय अन्य नियकालिके ही लोकसंपर्कसाधने आहेत. धर्म ख्रिस्ती असून प्रॉटेस्टंटांपैकी बहुसंख्य मॉर्मन, थोडे रोमन कॅथलिक आणि अल्पसंख्य यहुदी आहेत. लोकवस्ती ८०·४% शहरी असून ती बहुतांशी राज्याच्या उत्तर भागात आहे. गौरेतर इंडियन व निग्रो मिळून १० टक्क्यांपेक्षाही कमी भरतात. मुख्य शहर सॉल्ट लेक सिटी होय. हे ग्रेट सॉल्ट लेक जवळ असून सर्वांत मोठे शहर, राजधानी, मॉर्मन पंथाचे आद्य पीठ व उद्योग–व्यापार–वाहतूक–केंद्र आहे. ऑग्डेन, प्रोव्हो, लोगॅन ही इतर शहरेही उत्तर भागात आहेत. शिक्षण ६ ते १८ वयापर्यंत मोफत व सक्तीचे आहे. शाळांत १९७० साली ३,०४,००२ विद्यार्थी होते. राज्यात १९७०-७१ मध्ये तीन विद्यापीठांत ५६,३४० व नऊ महाविद्यालयांत ७७,४८५ विद्यार्थी होते. राजधानीत ग्रंथालये, कलासंग्रह असून तेथे वार्षिक संगीतसभा भरतात. राज्यात सृष्टिचमत्कारांची व निसर्गसौंदर्याची तेरा राष्ट्रीय उद्याने आहेत.

ओक, शा. नि.