परळ : (१) संयुक्त पानाचा वरचा भाग, (२) फुलोरा, (३) पुप्पमुकुट व केसरदले, (४) किंजपुटाचा आडवा छेद, (५) बोंड.

परळ : (पाटल, पहाड हिं. परूळ, पदेर क. हुडे, हुळवे सं. पाटल, पाटल कुसुम, अंबुवासिनी इं. ट्रंपेट फ्लॉवर लॅ. स्टेरीओस्पर्मम पर्सोनेटम, स्टे. स्वॅव्हीओलेन्स कुल-बिग्नोनिएसी). हा सु. ९–१८ मी. उंचीचा पानझडी वृक्ष भारतातील शुष्क प्रदेशांत सर्वत्र आढळतो पण श्रीलंकेत लावलेला आढळतो. कर्नाटक व महाराष्ट्र येथील मोसमी व पानझडी जंगलांत हा सापडतो. ⇨ पाडळ  व हा वृक्ष एकाच वंशातील व ⇨ बिग्नोनिएसी  कुलातील (टेटू कुलातील) असल्याने त्यांच्या अनेक लक्षणांत साम्य आहे. परळाचे सर्वच भाग लवदार असून कोवळ्या भागांवर चिकट केस असतात. साल करडी असून तिचे सपाट तुकडे सोलून निघतात. पाने मोठी, संमुख (समोरासमोर), संयुक्त, विषमदली (दले सारखी नसलेली), ३०–६० सेंमी. लांब असून दले ७–९ असतात. या वृक्षाला मार्च ते एप्रिलमध्ये केसाळ परिमंजरीवर [फुलोरा →पुष्पबंध] सुगंधी जांभळट फुले येतात. संवर्त केसाळ व घंटेसारखा आणि पुष्पमुकुट तुतारीसारखा (त्यावरून इंग्रजी नाव पडले), द्व्योष्ठक (दोन ओठांसारखा), २·५ सेंमी. पेक्षा अधिक लांब व लवदार असून खालच्या तीन पाकळ्या वरच्या दोन्हीपेक्षा अधिक लांब असतात, केसरदले चार असून त्यांच्या तळाशी केस नसतात [→फूल] बोंडे (शेंगेसारखी दिसणारी) लांबट (३०–६० x १·८ सेंमी.) असून ती नोव्हेबर ते डिसेंबरात येतात ती गोलसर व सरळ असून त्यांवर कंगोरे व बारीक फोड असतात बिया अनेक व प्रत्येकीच्या दोन्ही टोकांस लांबट पातळ पंख असतात.

याचे लाकूड पिवळे करडे, फार कठीण व टिकाऊ असते ते घरबांधणीत वापरतात ते जळणास चांगले असून त्यापासून उत्तम कोळसा बनतो. त्याच्यापासून लहान पडाव व चहाच्या पेट्या (खोकी) तयार करतात. मुळाची साल पौष्टिक, शीतक (थंडावा देणारी), मूत्रल (लघवी साफ करणारी) व मूळ ‘दशमुळां’पैकी एक आहे फुले मधाबरोबर उचकीवर देतात त्यांचा अवलेह (चाटण) वाजीकर (कामोत्तेजक) असतो. पाला गुरांना (म्हशींना व रेड्यांना) खाऊ घालतात. सालीपासून डिंक मिळतो. नवीन लागवड बिया व छाट कलमे लावून करतात.

देशपांडे, सुधाकर