पीट : (जीर्णक). मृत वनस्पतींचे अवशेष हळूहळू कुजून नाश पावणे ही एक ⇨ ऑक्सिडीभवनाची  प्रक्रिया असते. यामध्ये पाणी, कार्बन डाय-ऑक्साइड इत्यादींसारख्या काही अत्यंत साध्या पदार्थांत वनस्पतींचे रूपांतर होते. केव्हा काही कारणांमुळे ही प्रक्रीया पूर्ण होत नाही आणि अर्धवट कुजलेले (किंवा न कुजलेले) पदार्थ व साचलेले पाणी यांमुळे एक प्रकारची  दलदल बनते, यालाच इंग्रजीत ‘पीट’ म्हणतात. पिटाची निर्मिती होण्यास विशिष्ट हवामान व इतर काही कारणे असतात. कडक थंडी, पाणी साचून राहणे, हवेतील दमटपणा, पाण्यात अम्लतेचे किंवा क्षारीयतेचे (अल्कलायनीटीचे) प्रमाण अधिक असणे, सूक्ष‌्मजंतूंचा व ऑक्सिजनाचा अभाव इत्यादींनी युक्त अशा ठिकाणी वनस्पतींच्या मृतावशेषांचे पिटामध्ये जलद रूपांतर होते याशिवाय वार्षीक तापमान ७ से.च्या खाली असल्यास  कुजण्याची प्रक्रिया फार मंदगतीने चालते. भारतात व इतर उष्ण प्रदेशांत वार्षीक तापमान अधिक असल्याने कुजण्याची प्रक्रिया जलद होते व पीट तयार होत नाही. पाण्यात अम्लता अधिक असेल, तर ‘अम्ली रुतण’ [→ दलदल] प्रकारचे पीट बनते. हे पीट अनेकदा एखाद्या जाड गालिच्याप्रमाणे पसरलेले असते, याला ‘आवरण-रुतण पीट’ म्हणतात. डोंगराळ प्रदेशात उतरणीवर हे बनलेले आढळते. उथळ सरोवरच्या किंवा तत्सम खोलगट ठिकाणी चुन्याचे प्रमाण अधिक असल्याने ‘फेन पीट’ तयार होते. हे काळपट रंगाचे असून निचरा केल्यावर तेथे उत्तम पिकाऊ जमीन बनते. बोरू, लव्हाळे, मोथे [→ मोथा] व सॅलिक्स [→ सॅलिकेसी] आणि अँल्नस [→ बेट्यूलेसी] यांच्या काही जाती या वनस्पतींपासून ते बनते. आवरण-रुतण पीट पिवळसर ते पिंगट असते. त्यात स्फॅग्नम, अँड्रोमेडा, हिपनम, ऱ्हॅकोमिट्रियम  इ. शेवाळी [→ शेवाळी], गवते आणि लव्हाळी आढळतात. हजारो वर्षांनंतर पिटाचे रूपांतर कोळशात होते [→ कोळसा, दगडी]. आयर्लंड, ब्रिटन, यूरोप, उ. अशिया व उ. अमेरिका येथील अनेक चौ. किमी. क्षेत्र पिटाने व्यापलेले आहे. जगातील पिटाने व्यापलेल्या मुख्य प्रदेशातील क्षेत्रांच्या मर्यांदा पुढीलप्रमाणे आहेत ( आकडे  हेक्टरमध्ये) : रशिया १६,९०,००० कॅनडा ९,६२,००० फिनलंड ७,८०,००० स्वीडन ४,९४,००० अमेरिकेची संयुक्त संस्थाने २,९१,२००. आयर्लंडमध्ये दरवर्षी ६० लक्ष टन हवेत सुकविलेले पीट तयार करतात व जगातील हे सर्वांत मोठे उत्पादन आहे. भारतात फारच थोडे पीट सापडते. हिमालयाच्या पायथ्याशी, काश्मीरमधील झेलमच्या खोऱ्यात, गंगेच्या खोऱ्यात, निलगिरीतील डोंगराळ भागात, पाँडिचेरीच्या जवळपास पीट सापडल्याचा उल्लेख आहे. पिटाचे बहुधा १–३ मी. जाडीचे निक्षेप (साठे) आढळतात परंतु १५–१८ मी. जाडीचे थरही असतात.

पिटापासून बनलेली गर्द रंगाची कार्बनी जमीन ‘मक’ या नावाने ओळखली जाते. समशीतोष्ण प्रदेशातील अशा जमिनी पिकाकरिता काही सुधारणा (उदा., पाण्याचे नियंत्रण व खनिजांची पूर्तता) करून वापरतात.

रुतण-पिटामधील शेवाळांचे कार्य फारच भिन्न असते, कारण ते आपली परिस्थिती आपल्या सोयीप्रमाणे बदलत राहतात. त्यांच्या कोशिकांची (पेशींची) आवरणे (भित्ती) धातूंचे आयन (विद्युत् भारित अणू) शोषून घेतात व हायड्रोजनाचे आयन पाण्यात सोडून देतात त्यामुळे तेथे अम्लता उत्पन्न  होते व कुजण्याची प्रक्रिया मंदावते. यात शेवाळी फार जलद वाढतात. स्फॅग्नम व तत्सम शेवाळांची वाढ फक्त वनस्पतींच्या वरच्या टोकास होते ती जसजशी वाढत जाईल  तसतसा त्यांचा खालचा भाग निर्जीव होतो. हा निर्जीव भाग बराच साचल्यावर त्यातील सर्वांत खालच्या थरांवर वरच्यांचा दाब वाढून तो चेपला जातो व त्याचे पीट बनते. मृत कोशिकांच्या पोकळ्या पाण्याने भरून जातात. ह्यांच्या राशी वाढून दोन किंवा अधिक राशींमध्ये पाण्याने भरलेले खळगे बनतात व त्यांत अधिक जलप्रिय स्फॅग्नमाच्या जाती वाढतात. हळूहळू यांचा नवीन थर व नंतर राशी बनतात. पाण्याचे प्रमाण कमी होईल तशा कमी जलप्रिय जाती वाढू लागतात. पुढे पहिल्यापेक्षा त्यांच्या जातीच्या राशी उंच होऊन नव्या व जुन्या यांमध्ये पुन्हा खळगे तयार होतात. हा प्रकार वर्षानुवर्षे चालतो. येथे क्षारांचे प्रमाण समतोल नसल्याने दुसऱ्या वनस्पतींच्या काही विशेष जातीच सापडतात. नायट्रोजन कमी असल्याने ⇨ कीटकभक्षक वनस्पती  आढळतात तर काही ठिकाणी  ⇨ हीदर जातीच्या वनस्पती उगवतात.

रासायनिक दृष्ट्या पिटामध्ये मुख्यतः वनस्पतींच्या कोशिकांची आवरणे असल्याने सेल्युलोजाचे प्रमाण जास्त आणि लिग्निन व स्निग्ध पदार्थांचे कमी असते राखेचे व नायट्रोजनाचे प्रमाण कमी असते यामुळेच सूक्ष‌्म जंतूंची क्रिया अत्यल्प असते.

बऱ्याच देशांत पिटाचा उपयोग जळणासाठीही करतात. सुकविल्यावरही १७ ते १८ % पाणी त्यात शिल्लक राहते. सुकलेल्या पिटात शेकडा सु. ५७ भाग कार्बन, ३३ ऑक्सिजन, ६ हायड्रोजन, १ नायट्रोजन व ३ राख असते. राखेचे प्रमाण २–१५ % असू शकते व त्यात मृत्तिका (माती), वाळू व थोड्या प्रमाणात फेरिक ऑक्साइड, चुना, मॅग्नेशिया इत्यादींचा समावेश होतो. सुकलेल्या पिटाचे कॅलरीमूल्य ५,५५० कॅलरी / ग्रॅ. असते पण उघड्यावर साठविलेल्या पिटाचे मात्र, ४,२७५ कॅलरी / ग्रॅ. असते.

पिटापासून अनेक पदार्थ बनविता येतात. त्यापासून कोळसा करतात व साध्या लाकडी कोळशापेक्षा याचा दर्जा अधिक उच्च असतो. यूरोपात कोठे कोठे पीटापासून ⇨ प्रोड्यूसर वायू बनवितात, तर कोठे पॉवर अल्कोहॉल बनवितात. कापड, कागद, स्ट्राॅबोर्ड बनविण्याचे प्रयत्न चालू आहेत. खतासारखा उपयोग करण्यास ते मातीत व इतर खतात मिसळून बरेच दिवस कुजवावे लागते. तबेल्यात पीट पसरून ठेवल्यास तेथील घाण व सांडपाणी शोषले जाऊन वातावरण स्वच्छ राहते आणि त्यानंतर चुनखडी व पाचोळा मिसळून उघड्यावर पसरतात आणि शेवटी खत म्हणून वापरतात. काकवी मिसळून पिटाचा उपयोग गुरांना चारा म्हणून करतात. १९७४ सालानंतर इंधन समस्या अधिकाधिक गंभीर होऊ लागल्याने या नैसर्गिक इंधनाचा जास्तीत जास्त काटकसरीने उपयोग करण्यासंबंधी रशिया, अमेरिका व इतर देशांत प्रयत्न सुरू आहेत. पीट जाळून त्यापासून विद्युत् ऊर्जा मिळविणे अथवा त्याचे कृत्रिम इंधन वायूत रूपांतर करणे या दृष्टीने योजनाही आखण्यात आलेल्या आहेत.

डेव्हिड, एस्. बी.