विसर्पपुष्पी : (यष्टिशाक, इं. कॉमन ॲग्रिमोनी, कॉकल्बर, लॅ, ॲग्रिमोनिया, युपॅटोरिया, ॲ. ऑफिसिनॅलिस, कुल-रोझेसी) फुलझाडांपैकी (⟶वनस्पति, आवृतबीज उपविभाग) सु.०·६ ते ०·९ मी. उंच, चिवट केसाळ, बहुवर्षायू (अनेक वर्ष जगणारी) व झुबक्यांनी वाढणारी ही मूळची युरोपीय ⇨ औषधी असून ती उ.समशीतोष्ण गोलार्धात व इराण ते अटलांटिक, सायवीरिया, जावा व उ. अमेरिका आणि हिमालयात (काश्मीर ते पंचमढी ते सिक्कीम २,१७० – ३,१०० मी. उंचीपर्यंत) व आसामातील खासी टेकड्यांत (१२४० – १८६० मी. उंचीपर्यंत) आढळते. बागेत ही पौष्टिक चहाकरिता लावतात. हिचे मूलक्षोड [खोडाचा मुळे असलेला व बहुधा जाडजूड असा भाग, ⟶ खोड] आखूड असून जमिनीवरच्या खोडावर एकाआड एक, सोमपर्ण (तळाशी उपांग असलेली), संयुक्त पिसासारखी, विषमदली (दले ७ – ९ दातेरी) व सुगंधी पाने असतात. हिच्या फाद्यांच्या टोकास कणिशासारख्या मंजऱ्या (⟶ पुष्पबंध) येतात व त्यावर सच्छदक (तळाशी उपांगे असलेली), लहान व पिवळी फुले येतात. प्रत्येक फुलात पाच सुट्या पाकळ्या व त्याखाली पाच संदलांचा भोवऱ्यासारखा संवर्त असतो.केसरदले (पुं – केसर) ५ – १५ सुटी व किंजदले (स्त्री – केसर) दोन आणि संवर्ताने वेढलेली असून बीजक (अपक्क बीज) एकच असते. (⟶फूल), कृत्स्नफळे [न तडकणारी ,शुष्क व एक बीजी, ⟶ फळ] १–२ व कठीण असतात. ती ताठर केस व आकड्यासारख्या लहान राठ केसांच्या वर्तुळाने वेढलेल्या व सतत राहणाऱ्या सवंर्तात असतात. इतर सामान्य शारीरिक लक्षणे रोझेसी कुलात (गुलाब कुलात, ⟶रोझेलीझ) वर्णन केल्याप्रमाणे असतात.

विसर्पपुष्पी : (१) संयुक्त सोपपर्ण पान, (२) फुलोऱ्याचा भाग, (३) फूल, (४) छदक, (५) फुलांचा उभा छेद, (६) फळाचा छेद, (७) दलांचा केसाळ भाग.

ह्या वनस्पतींची नवीन लागवड वसंत ऋतूत मुलक्षोडाचे तुकडे लावून करतात. ही वनस्पती यकृताच्या जुनाट तक्रारीवर फार पूर्वीपासून उपयोगात आहे. पाने कृमिनाशक, मूळ स्तंभक (आंकुचन करणारे), पौष्टिक व मूत्रल (लघवीस साफ करणारी) आणि वनस्पती आर्तवजनक (विटाळ सुरू करणारी) व रक्तातिसार (शौचावाटे रक्त पडत असल्यास) गुणकारी असते, मुळांचा काढा खोकला व साधा अतिसार (हगवण) यांवर देतात.खोड व पाने यांपासून सोनेरी रंग काढतात. पोर्तुगालमध्ये ह्या वनस्पतीच्या पानांचा अघिकृत रीत्या औषधी उपयोग करतात. तसेच इंडोचायना, यूरोप, उ. अमेरिका व द. अफ्रिका येथेही वनस्पती औषधात वापरतात. झुलू जमातीचे लोक पानांचे चूर्ण पट्टकृमींच्या विकारांवर घेतात. हॉटेनटॉट लोक या वनस्पतीचा पाण्यात अर्क काढून भूक वाढविण्यास वापरतात.अँ. ओडोरॅटा ही त्याच प्रजातीतील (वंशातील) जाती इटलीतील असून अमेरिकेत कोठे कोठे लावलेली दिसते.

संदर्भ : 1. Bailey, L. H. The Standard Cyclopaedia of Horticulture, Vol. I, New York, 1961.

        2. Kirtikar, K.R., Basn, B. d. Indian Medicinal Plants, Vol. II, Delhi, 1975.

        3. Rendle, A. B.The Classification of Flowering plants. Vol. II, Cambridge, 1963.

परांडेकर,शं.आ.