करपा कीड : ही भातावरील महत्त्वाची कीड असून ती भात पिकविणार्‍या बहुतांशी देशांत थोड्याफार प्रमाणात आढळते. महाराष्ट्रात भंडारा, कुलाबा, ठाणे इ. जिल्ह्यांत ह्या किडीचा अधूनमधून प्रादुर्भाव होतो. तिचे शास्त्रीय नाव हिस्पा आर्मिजेरा असून तिचा समावेश क्रायसोमेलिडी कुलात होतो.

करपा कीड : (१)अळी, (२)कोष, (३)प्रौढ भुंगेरा.

हे कीटक आकाराने साधारणतः चौकोनी असून त्यांची लांबी १५ – २० मिमी. असते. रंग गर्द निळा किंवा काळसर असून पंखांवर सर्वत्र काटे असतात. ह्यांचे भुंगेरे व अळ्या पानांच्या शिरांच्या बाजूने पानांचा हिरवट भाग खातात. त्यामुळे पानांवर पांढर्‍या रंगाचे लांबट पट्टे उमटतात व ती वाळू लागतात. त्यांचे आक्रमण प्रायः पीक लोंबीवर येण्याच्या अगोदर होते. उन्हाळ्यात ते पाणथळीच्या जागी वाढणार्‍या गवतावर उपजीविका करतात. शेतात भाताचे पीक वाढू लागले म्हणजे जुलै-सप्टेंबरमध्ये ते त्यावर जोरदार आक्रमण करतात. ह्यांच्या माद्या पानांच्या टोकांवर अंडी घालतात. लहान अळ्या पानांवर उपजीविका करतात व तेथेच कोषावस्थेत जातात आणि भाताच्या पिकाच्या हंगामापर्यंत त्यांच्या दोन-तीन पिढ्या पूर्ण होतात. त्यांच्या नियंत्रणासाठी दहा टक्के बीएचसी हेक्टरी वीस किग्रॅ. या प्रमाणात उडवतात.

बोरले, मु.नि.