टोळ : ऑर्‌थॉप्टेरा गणातील लोकस्टिडी (ॲक्रिडिडी) कुलातील टोळ हे महत्त्वाचे आंतरराष्ट्रीय उपद्रवी कीटक मानले जातात. त्यांच्या धाडी येऊन ते पिकांचे व वनस्पतींचे फार नुकसान करतात. टोळांमुळे होणाऱ्या नुकसानीचे वर्णन ईजिप्शियन, हिब्रू भाषिक व ग्रीक लोकांनी प्राचीन काळी नमूद केले आहे. बायबलमध्येही पुष्कळ ठिकाणी टोळांचा उल्लेख आढळतो. टोळांचे इंग्रजी नाव ‘लोकस्ट’ हे लॅटिन भाषेतून आले असून त्याचा अर्थ ‘जळालेली जमीन’ असा आहे. टोळधाड येऊन गेल्यावर तेथील प्रदेशाचे वर्णन यथार्थपणे या शब्दांत व्यक्त होते. याखेरीज उत्तर आफ्रिका, अरबस्तान, इराण, अफगाणिस्तान, उत्तर भारत आणि भूमध्य समुद्रातील बेटे या प्रदेशांत टोळधाडींमुळे वेळोवेळी अतोनात नुकसान झाल्याबद्दलचे उल्लेख प्राचीन वाङ्‌मयात मिळतात.

जाती : जगातील कोणताही मोठा भूखंड टोळांच्या उपद्रवापासून मुक्त नाही. जगाच्या निरनिराळ्या भागांत टोळांच्या निरनिराळ्या जाती आढळतात. पुढील तीन जातींमुळे भारतातील पिकांचे व वनस्पतींचे वेळोवेळी फार नुकसान झाले आहे : (१) वाळवंटी टोळ (शिश्टोसर्का ग्रिगेरिया), (२) प्रवासी टोळ (लोकस्टा मायग्रेटोरिया) (३) मुंबई टोळ (पॅटंगा सक्सिक्टा).

वाळवंटी टोळ : वरील तीन जातींपैकी वाळवंटी टोळ भारतात सर्वांत जास्त नुकसानकारक आणि नियंत्रण करण्यास सर्वांत अवघड आहेत. पोर्तुगालपासून आसामपर्यंत जवळजवळ ४·१४ कोटी चौ.किमी. प्रदेशातील ६० देशांना या जातीच्या टोळांचा उपसर्ग पोहोचतो व त्यांत दक्षिण पोर्तुगाल, जिब्राल्टर, वायव्य, पूर्व आणि ईशान्य आफ्रिका, अरबस्तान, इझ्राएल, रशिया, इराक, इराण, तुर्कस्तान, अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि भारत या देशांचा अंतर्भाव आहे यांपैकी कोठल्या तरी एका अगर जास्त देशांत दरवर्षी या जातीच्या टोळांमुळे नुकसान होते. त्यांच्या विणीची स्थळे विखुरलेली असतात व त्यांच्या धाडींमध्ये नियमितपणा नसल्यामुळे त्यांचे नियंत्रण अवघड असल्याचे आढळून आले आहे. या टोळ्यांच्या धाडी भारतात वायव्येकडून येतात व पुढे इतरत्र पसरतात. दक्षिण भारतात अद्याप त्यांचा शिरकाव झालेला नाही.

प्रवासी टोळ : हे यूरोप, आफ्रिका, पाकिस्तान, पूर्व आशिया, भारत व ऑस्ट्रेलियात आढळतात. भारतात ते १९५४ मध्ये बंगलोरकडे व १९५६ मध्ये राजस्थानात व उत्तर गुजरातेत आढळले. १९५९ नंतर ते फारच तुरळक प्रमाणात होते.

मुंबई टोळ : हे भारताचा गुजरात ते तमिळनाडूपर्यंतचा भाग, श्रीलंका व मलेशियात आढळतात. १८३५ ते १९३८ या काळात चार वेळा या टोळांचा प्रादुर्भाव विशेष आढळून आला व राजस्थानात १९५६ मध्ये आणि मध्य प्रदेशात १९६० मध्ये ते आढळले होते.

आ. १. वाळवंटी टोळ

सर्वसाधारण वर्णन : चावण्यायोग्य मुखांगे (तोंडाचे अवयव) असलेले मध्यम लांबीचे हे कीटक असून डोक्याकडील भाग व डोळे मोठे असतात. शृंगिकांची (सांधेयुक्त स्पर्शेंद्रियांची) लांबी शरीराच्या लांबीपेक्षा कमी असते. पंखांच्या दोन जोड्या असतात. पुढील जोडी कठीण व चकचकीत असून त्याखाली मागील पंख असतात. उडण्यासाठी मागील पंखांचा उपयोग होतो. पूर्ण वाढ झालेल्या टोळांचा रंग पिवळा असून लांबी ४६ ते ६० मिमी. असते. मादीच्या अंडनिक्षेपकाला (अंडी घालण्याच्या साधनाला) बोटासारखे पुढे आलेले चार टोकदार अवयव असतात. अंडी घालण्यासाठी अंडनिक्षेपक मातीत खुपसण्याकरिता या अवयवांचा उपयोग होतो.

आ. २. अंडी घालण्याची प्रक्रिया : (अ) अंडी घालताना टोळाची मादी : (१) पुढील पंख, (२) अंडनिक्षेपक, (३) अंडी (आ) मादीने अंडी घालण्यासाठी पाडलेली भोके.

जीवनक्रम : टोळांचा जीवनक्रम नाकतोड्यांच्या जीवनक्रमाप्रमाणेच असतो. त्यांच्या जीवनक्रमात तीन टप्पे असतात : (१) अंडी, (२) उड्या मारणारी पिले, (३) पंखांचे टोळ. मादी ओलसर जमिनीत ७·५ ते १५ सेंमी. भोक करून ३ ते ६ महिन्यांच्या काळात एकूण ३०० ते ५०० अंडी घालते. त्यातून १२–१४ दिवसांत बिनपंखांची पिले बाहेर पडतात. ती ४ आठवड्यांच्या काळात ५ वेळा कात टाकतात व प्रौढावस्थेत जातात. प्रत्येक कात टाकण्याच्या वेळी पिलांचा आकार वाढतो व पंखांची लांबीही वाढते. प्रौढावस्थेत आल्यापासून एका आठवड्यात टोळ सामुदायिक रीत्या उड्डाण करतात. वर्षाकाठी टोळांच्या २ ते ४ पिढ्या होतात.

टोळांच्या अवस्था : एकाच जातीचे टोळ वाढीच्या परिस्थितीप्रमाणे दोन निरनिराळ्या अवस्थांत आढळून येतात. एका अवस्थेला एकलेपणाची अगर एकाकी अवस्था असे म्हणतात व दुसऱ्या अवस्थेला थव्याची अगर सांघिक अवस्था असे म्हणतात. एकाकी अवस्था ही टोळांच्या प्रत्येक जातीची नैसर्गिक अवस्था असून त्या त्या जातीचे टोळ जगाच्या विवक्षित भागात नेहमीच या अवस्थेत आढळून येतात व त्यांच्याकडे उपद्रवी कीटक म्हणून पाहिले जात नाही. ज्या वेळी टोळांची पिले अगर प्रौढ संघ गर्दी करून राहतात त्या वेळी ते उपद्रवी अवस्थेत असतात. एकाकी अवस्थेतील टोळ काहीसे सुस्त असतात, तर सांघिक अवस्थेतील टोळ नेहमी अस्थिर वृत्तीचे व काहीसे प्रक्षुब्ध स्थितीत असतात. सांघिक अवस्थेतील टोळांच्या पिलांना एकएकटे वाढविल्यास त्यांच्यात एकाकी आणि एकाकी अवस्थेतील टोळांच्या पिलांना सांघिक अवस्थेला अनुकूल अशा कृत्रिम वातावरणात वाढविल्यास त्यांच्यात सांघिक अवस्थेतील लक्षणे दिसून येतात. एकाकी अवस्थेतील टोळांची पिले हिरवी असून त्यांच्या अंगावर थोड्या काळ्या रंगाच्या खुणा असतात. त्यांचे प्रौढ टोळ आकारमानाने लहान, करड्या रंगाचे व लहान पंख असलेले असे असतात. याउलट सांघिक अवस्थेतील पिले गुलाबी काळ्या रंगाची असून त्यांच्या डोक्यावर व शरीरावर मधोमध पुसट काळी रेघ असते. या अवस्थेतील प्रौढ टोळ आकारमानाने मोठे, पिवळे अगर तांबूस छटा असलेले आणि करड्या खुणा असलेले असतात. त्यांचे पंख व पाय मजबूत व मोठे असतात. तांबूस अवस्थेतील टोळांची धाड फारच नुकसानकारक असते. पिवळ्याअवस्थेतील प्रौढ अंडी घालण्यासाठी योग्य अशा ओलसर रेताड जमिनीच्या शोधातच जमिनीवर उतरतात. एकाकी अवस्थेतील प्रौढ टोळांची काही कारणांमुळेच एका ठिकाणी गर्दी झाली, तर त्यांच्यात सांघिक अवस्थेतील लक्षणे दिसू लागतात व त्यांचा रंग प्रथम गुलाबी, मागाहून करडा आणि शेवटी पिवळा होतो.


भ्रमण अवस्था : टोळांच्या सांघिक भ्रमणाला टोळधाड असे नाव आहे. उड्या मारणारी पिले एखादे मोठे सैन्य पुढे सरकते त्याप्रमाणे लाखोंच्या संख्येने (कित्येक चौ. किमी. क्षेत्रावर) दिवसा वाटचाल करतात. वाटेत मिळेल त्या झाडाझुडपांची आणि पिकांची पाने खातात. ज्या वेळी दिवसाचे तापमान वाढते त्या वेळी ही पिले मिळेल त्या झाडावर अथवा झुडपावर विश्रांती घेतात व तापमान कमी झाल्यावर पुन्हा चालू लागतात. ढगाळ हवामानामुळे अगर जोराच्या वाऱ्यामुळे पुढे सरकण्यात खंड पडतो. तसेच संध्याकाळी चालीचा वेग कमी होतो व रात्री झुडपांच्या बुंध्यापाशी टोळांची पिले दाटीदाटीने विश्रांती घेतात. ती एका दिवसात सु. १·५ किमी. या हिशेबाने एकूण ३२ किमी. अंतर कापतात. कात टाकण्यापूर्वी, टाकतेवेळी आणि टाकल्यानंतर काही वेळपर्यंत टोळांची पिले काही खात नाहीत.

आ. ३ उडणारा वाळवंटी टोळी : (१) पुढील पंख, (२) मागील (उड्डाणाचा) पंख.

टोळांच्या प्रौढांच्या दिनक्रम पुष्कळसा त्यांच्या पिलांप्रमाणे असतो. ते रात्री झाडांवर अगर झुडुपांत विश्रांती घेतात. दिवसा तापमान वाढल्यावर ते हवेत उड्डाण करतात व भ्रमण करतात. भ्रमण करणाऱ्या थव्यांचा (टोळधाडीचा) विस्तार ८०० चौ. किमी.पर्यंत असू शकतो. आकाशातून टोळांचे भ्रमण चालू असताना सूर्यप्रकाश मंद होतो. टोळ जमिनीपासून ३०० ते ६०० मी. उंचीवरून आणि सर्वसाधारणपणे १८ किमी. वेगाने भ्रमण करतात. जोराचा वारा वाहत असल्यास उड्डाणाचा वेग जास्त असतो. पावसामुळे, तापमान कमी झाल्यामुळे अथवा रात्रीच्या वेळी भ्रमण बंद राहते. टोळांचे थवे त्यांच्या उत्पत्तीच्या क्षेत्राबाहेर शेकडो किमी. दूर जातात, ते केवळ अन्नाच्या शोधार्थ जात नाहीत. वाढत्या तापमानामुळे थव्यातील टोळांची वाढती अस्वस्थता व हालचाल या गोष्टी त्यांच्या भ्रमणाला मुख्यत्वे कारणीभूत असतात. उड्डाण करणाऱ्या थव्यांची दिशा ही सर्वसाधारणपणे वाहणाऱ्या वाऱ्यांचीच दिशा असते. ताशी १६ ते २० किमी. पेक्षा जास्त वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांच्या विरुद्ध दिशेने टोळ उड्डाण करु शकत नाहीत. निरनिराळ्या दिशांनी वाहणारे वारे जेथे एकत्र मिळतात तेथे टोळही जास्त संख्येने जमा होतात. ५७° से. तापमानास १५ मिनिटे राहिल्यास टोळ जिवंत राहू शकत नाहीत. उडणाऱ्या टोळांचे थवे दूरवर ऐकू येणाऱ्या पाण्याच्या धबधब्याप्रमाणे आवाज उत्पन्न करतात. ते रोज ८ ते ४० किमी. (केव्हा केव्हा ८० किमी. पर्यंत) आणि एका ऋतूत १६० ते ८०० किमी. अगर त्याहून जास्त अंतरापर्यंत भ्रमण करतात. किनाऱ्यापासून २,००० किमी. दूर अंतरावर समुद्रावर टोळांचे थवे आढळून आले आहेत. १८६९ मध्ये वाळवंटी टोळांचा थवा इंग्लंडपर्यंत पोहोचला होता. गुलाबी अगर तांबडे टोळ बराच वेळ फिरल्यास ते पिवळे होतात, असे सिद्ध झाले आहे. या स्थितीतील टोळ अंडी घालण्याच्या स्थितीत असतात.

मेलेल्या अगर जखमी टोळांचा इतर टोळ खाऊन फडशा उडवितात. मात्र निरोगी टोळाच्या वाटेस ते जात नाहीत. टोळांवर मनुष्याने हल्ला केल्यास क्वचित प्रसंगी ते मनुष्याला (विशेषतः त्याचे कपडे घामाने भिजलेले असल्यास आणि तो निद्रिस्त असल्यास) चावतात.

नुकसान : टोळ (पिल्ले अथवा प्रौढ) फार अधाशीपणाने खातात. त्यांचे खाणे सूर्योदयानंतर थोड्या वेळाने सुरू होते व ते सूर्योस्तापर्यंत चालते. प्रत्येक टोळ आपल्या वजनाइतके (सु. दोन ग्रॅ.) अन्न खातो. एक चौ. किमी. क्षेत्राच्या थव्यातील टोळांचे वजन साधारणपणे ११६ टन असते व एक टोळधाड सु. २५ चौ. किमी. विस्ताराची असल्यास टोळधाडीमुळे होणाऱ्या नुकसानीचा अंदाज करता येतो. टोळधाडीचा विस्तार ८०० चौ. किमी. पर्यंत असू शकतो व १८८९ मध्ये एक टोळधाड सु. ५,००० चौ. किमी. विस्ताराची होती असा उल्लेख आढळतो.

टोळधाडीचे विघटन : वाळवंटी टोळांच्या पिलांचे थवे त्यांच्या नैसर्गिक शत्रूंच्या हल्ल्यामुळे, जोराच्या वाऱ्यामुळे अगर मानवी प्रयत्नामुळे नाश पावतात अथवा त्यांची (पिलांची) संख्या कमी होते. उडणाऱ्या टोळांचे थवे पुढील कारणांमुळे लहान आकारमानाचे होतात अगर नाश पावतात. (१) सोसाट्याने वाहणारे धुळीचे लोट, (२) प्रतिकूल हवामान, (३) उत्पत्तीला अयोग्य अशा भूखंडांत प्रवेश, (४) समुद्रात बुडून मृत्यू, (५) डोंगराळ भागात अडकून पडणे, (६) नैसर्गिक शत्रूंचा हल्ला व (७) मानवी प्रयत्न. फार लहान थव्यांतील टोळ शेवटी एकाकी अवस्थेत जातात.

उत्पत्तीचे ऋतू : वाळवटी टोळांची उत्पत्ती (वीण) निरनिराळ्या देशांत निरनिराळ्या ऋतूंत होते. पश्चिम आशियातील इराणसारख्या देशात ती जानेवारी–जूनच्या दरम्यान होते. यातून उत्पन्न झालेले प्रौढ टोळ पूर्वेकडे पाकिस्तान व भारतात पावसाळ्याच्या सुरुवातीला पोहोचतात. या सुमारास या भागात अंडी घालण्यासाठी जमिनीची योग्य परिस्थिती निर्माण होते व त्या वेळी उडून आलेले टोळही पूर्ण वाढलेले व अंडी घालण्याच्या अवस्थेत असतात. राजस्थान, सिंध व गुजरातच्या वाळवंटी प्रदेशांत टोळ अंडी घालतात व त्यांतून निर्माण झालेले बिनपंखी टोळ (पिल्ले) खरीप पिकांचे फार नुकसान करतात. पावसाळ्याच्या शेवटी ते प्रौढावस्थेत जातात आणि पूर्वेकडून वाहणाऱ्या वाऱ्यांबरोबर ते पुन्हा पश्चिमेकडे जातात. जाताना वाटेत तयार खरीप पिकांचे आणि कोवळ्या अवस्थेतील रबी पिकांचे नुकसान करतात. शेवटी हे टोळ परत पश्चिम आशियातील देशांत पोहोचतात व हिवाळा तेथे काढून जानेवारी ते जून हंगामात पुन्हा अंडी घालतात व हे चक्र पुन्हा सुरू होते. जे टोळ भारतातच मागे राहतात ते थंडीचे कठीण दिवस येथेच काढतात व वसंत ऋतूत त्यांची पुन्हा उत्पत्ती सुरू होते.

टोळधाडीचे चक्र : टोळांची वाढ काही वर्षांत फार मोठ्या संख्येने होते व ही स्थिती ५–१० वर्षे टिकते. नंतर त्यांच्या संख्यावाढीस उतार लागतो व परत काही वर्षांनी (१ ते ८) त्यांची संख्या वाढू लागते. मध्यंतरीच्या काळात हे टोळ मर्यादित क्षेत्रात थोड्या संख्येने एकाकी अवस्थेत राहतात. एखाद्या अनुकूल वर्षात या एकाकी टोळांच्या संख्येत वाढ होते व ते इतस्ततः विखुरलेले असतात. पुढील वर्षात अवर्षणामुळे मुबलक अन्नाचे क्षेत्र कमी झाले, तर हे टोळ लहानशा क्षेत्रात गर्दी करतात व त्यातूनच भ्रमण करणाऱ्या टोळांचे थवे निर्माण होतात. हे थवे उत्पत्तीच्या क्षेत्राबाहेरील भागांत उड्डाण करतात व तेथील पिकांचे व वनस्पतींचे नुकसान करतात. भारतात गेल्या शंभर वर्षांत प्रत्येक वेळी ५ ते ७ वर्षे टिकणाऱ्या १० टोळधाडींची नोंद करण्यात आली आहे व त्यांतील अगदी अलीकडील धाड १९५९–६२ या काळातील होती.

टोळांचे नैसर्गिक शत्रू : (१) सर्कोफॅजिडी कुलातील माश्या टोळांच्या शरीरावर उड्डाणांच्या अवस्थेत देखील अळ्या सोडतात व त्या टोळांच्या शरीरात घुसून आपली उपजीविका करतात, (२) हिंगे टोळांची अंडी खातात, (३) कॅरॅबिडी कुलातील भुंगेऱ्यांचे डिंभक (अळीसारखी अवस्था) व प्रौढ रात्रीच्या वेळी टोळ खातात, (४) कृंतक (उंदीर, खारीसारखे कुरतडणारे प्राणी), (५) अनेक प्रकारचे पक्षी, (६) इतर प्राणी उदा., सर्प, सरडे, पाली, (७) विविध प्रकारचे रोग.


नियंत्रण : मनुष्य टोळधाडींचा प्रतिकार शेकडो वर्षे करीत आला आहे. फार पुरातन काळी टोळापासून पिकांचे नुकसान होऊ नये म्हणून ईश्वराची प्रार्थना करीत असत. त्यानंतर निरनिराळ्या उपायांचा अवलंब करण्यात येऊ लागला. यांत जमीन नांगरून टोळांच्या अंड्यांचा नाश करणे, चर खणून त्यांत टोळांची पिले गोळा करून अथवा चरात पाणी भरून ती मारणे, धूर करून अगर जळत्या मशालींच्या साहाय्याने टोळांचा नाश करणे, टोळधाड पिकावर उतरू नये म्हणून पत्र्याचे डबे वाजविणे अथवा पांढरी फडकी हवेत हालविणे या सर्व उपायांचा अंतर्भाव होतो. सूर्यास्तापासून सूर्योदयापर्यंत टोळ शांत राहतात व रात्रीच्या वेळी ते काही खात नाहीत. अशा वेळी झाडूच्या साहाय्याने त्यांना गोळा करून मारणे सोपे असते. ज्वालाक्षेपक यंत्रांचाही या कामी वापर करण्यात येतो. आधुनिक कीटकनाशकांचा शोध लागल्यापासून टोळधाडीच्या नियंत्रणामध्ये क्रांती झाली आहे. बीएचसी, आल्ड्रिन आणि डिल्ड्रीन यांचा या कामी विशेष वापर करण्यात येतो. हेप्टॅक्लोर व पॅराथिऑन ही कीटकनाशकेही परिणामकारक असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे टोळांच्या उडणाऱ्या  थव्यांवर दिवसा आणि विश्रांती घेणाऱ्या थव्यांवर रात्री विमानातून औषधांचा फवारा मारून टोळधाडीचे जास्त परिणामकारक नियंत्रण करणे शक्य झाले आहे. अशा फवारणीसाठी १०% डिल्ड्रीन अगर आल्ड्रीनचा उपयोग निष्कास (फवारा ज्यातून बाहेर पडता त्या) तोटीतून केल्यास फारच परिणामकारक झाल्याचे आढळून आले आहे.

टोळधाडींचे नियंत्रण ही शासनाची जबाबदारी असून त्याचा कोणताही खर्च शेतकऱ्यांकडून वसूल केला जात नाही. परंतु शेतकरी आणि टोळग्रस्त भागातील इतर रहिवाशांनी सरकारला या कामी सर्वतोपरी साहाय्य करणे आवश्यक असते. तसेच या कामी आंतरराष्ट्रीय सहकार्याचीही फार जरूरी असते. एखाद्या देशात टोळांनी मोठ्या प्रमाणावर अंडी घातल्याची बातमी शेजारच्या देशांना ताबडतोब मिळाल्यास संभाव्य टोळधाडीला तोंड देण्यासाठी यंत्रणा तयार ठेवणे त्या देशांना शक्य असते. संयुक्त राष्ट्रांच्या अन्न व शेती संघटनेने या कामी पुढाकार घेतला असून भारतानेही वेळोवेळी आपली जबाबदारी पार पाडली आहे. १९६० मध्ये संयुक्त राष्ट्रांच्या खास निधीतून वाळवंटी टोळांसाठी प्रकल्प सुरू करण्यात आला असून त्यांत टोळासंबंधी संशोधन, सर्वेक्षण, प्रशिक्षण आणि निरनिराळ्या टोळग्रस्त भागात योजावयाच्या उपायांची चाचणी यांचा अंतर्भाव आहे. भारतानेही या प्रकल्पात भाग घेतला आहे.

उपयोग : टोळ केवळ उपद्रवीच आहेत असे नाही. ते काही बाबतींत उपयोगीही आहेत. मासे पकडण्यासाठी गळाला लावण्यासाठी ते फार उपयुक्त आहेत. कोंबड्यांना ते आवडतात. पुष्कळ देशांतील लोक (विशेषेकरून मेक्सिको, जपान व फिलिपीन्समध्ये) त्यांचा खाद्यान्न म्हणून उपयोग करतात. भारतात राजस्थानच्या वाळवंटी भागात टोळधाड आल्यास रात्रीच्या वेळी पोतीच्या पोती टोळ गोळा करून तीन महिन्यांपर्यंत त्यांच्यावर काही लोक गुजराण करतात.

संदर्भ:

1. Government of Maharashtra, Crop Pests and How to Fight Them, Bombay, 1960.

2. Jones, G. W. Jones, M. G. Pests of Field Crops, London, 1964.

3. Metcalf, C. L. Flint, W. P. Metcalf, R. L. Destructive and Useful Insects, New York, 1962.

4. Reddy, D. B. Plant Protection in India, Bombay, 1968.

गर्दे, वा. रा. गोखले, वा. पु.