कात्यायन – २ : (इ.स.पू.सु.पाचवे शतक). शुक्ल यजुर्वेदाच्या पंधरा शाखांपैकी एका शाखेचा प्रवर्तक. या शाखेचे ब्राह्मण महाराष्ट्रात अजून आहेत. `कात्यायन’ हे गोत्रनाम असून ह्यांचे विशेषनाम बहुधा `पारस्कर’ असावे, असे कात्यायनीय परिशिष्टाच्या एका टीकेमधील एका उल्लेखावरुन म्हणता येते. ह्याचे सव्वीस अध्यायांचे श्रौतसूत्र आहे, तसेच स्वतंत्र गृह्यसूत्रही आहे. ह्याच्या गृह्यसूत्राला पारस्कर गृह्यसूत्र म्हणतात. यूपलक्षण, छागलक्षण, प्रतिज्ञा, अनुवाकसंख्या, चरणव्यूह, श्राध्दकल्प, शुल्ब, ऋश्यजुष, पार्षद, इष्टकापूरण, प्रवराध्याय, मूल्याध्याय, उंच्छशास्त्र, निगम, यज्ञपार्श्व, हौत्रिक, प्रसवोत्थान आणि कूर्मलक्षण असे अठरा परिशिष्टग्रंथ ह्याच्या नावाने प्रसिध्द आहेत. तसेच भोजनसूत्र, स्नानसूत्र, त्रिकंडिकासूत्र इ. सूत्रग्रंथही ह्याच्या नावाने मिळतात.

पारस्कर गृहासूत्रावर कर्क, गदाधर इत्यादिकांच्या टीका प्रसिध्द असून ह्याच्या श्रौतसूत्रावरील कर्काची टीका विख्यात आहे. अठरा परिशिष्टांपैकी दहा परिशिष्टांवरील विषमपदालंक्रिया नावाची टीका मुळासह पंडित श्रीधर अण्णशास्त्री वारे ह्यांनी संपादित केली असून, `माध्यंदिन मध्यवर्ती मंडळ’, पुणे ह्यांनी प्रसिध्द केली आहे.

जोशी, लक्ष्मणशास्त्री