सील्झ फील्ड, शार्ल : (३ मार्च १७९३— २६ मे १८६४). जर्मन-अमेरिकन कादंबरीकार. लेखन जर्मन भाषेत. जन्म बोहीमियात. तिथल्या एका मठात संन्यासी म्हणून काही काळ जीवन व्यतीत केल्यानंतर तो तिथून पळाला. १८२३ मध्ये अमेरिकेच्या लुइझिॲना राज्यातील न्यू ऑर्लीअन्स ह्या प्रसिद्घ शहरी जर्मन आप्रवासी (इमिग्रंट) म्हणून तो आला. अमेरिकेत त्याने भरपूर प्रवास केला अनेक अनुभव गोळा केले आणि ते आपल्या लेखनातून प्रकट केले. अमेरिकेतील पेनसिल्व्हेनिया राज्यातील किटॅनिंग येथे त्याने आपले मुख्यालय ठेवले असले, तरी तो प्रवासानिमित्त अनेकदा बाहेर असे. वर्तमानपत्राचा बातमीदार म्हणून तो काम पाहत असे, तसेच लंडन आणि पॅरिसमध्ये तो खाजगी रीत्या काही राजकीय कामेही करीत असे. सील्झफील्डने आयुष्यभर आपली खरी ओळख यशस्वीपणे लपवून ठेवली. त्याचे खरे नाव कार्ल आंटॉन पॉस्टल आहे, हे त्याच्या मृत्यूनंतर उघड झाले.

सील्झफील्डने १८३४— ४१ ह्या कालखंडात अमेरिकन विषयांवर अनेक कादंबऱ्या लिहिल्या. अमेरिकेतील दक्षिणेकडील आणि नैर्ऋत्येकडील राज्यांचा त्याला चांगला अनुभव होता. नदी, मळे ह्यांच्या परिसरातले जीवन, शर्यती, मासेमारी, शिकार, रानावनांतली साहसे ह्यांनी त्याच्या निरीक्षणाला आणि कल्पनाशक्तीला भरपूर वाव दिला. Das Kajutenbuch (१८४१, इं. भा. द कॅबिन बुक ऑर स्केचिस ऑफ लाइफ इन टेक्सास, १८४४) हे त्याचे अत्यंत लोकप्रिय आणि उत्तम गणले गेलेले पुस्तक. बोटीच्या एका निवृत्त कप्तानाच्या घरात जमलेल्या मंडळींनी सांगितलेल्या कथा ह्यात आहेत. ह्या कप्तानाच्या घराचा आकार बोटीच्या कॅबिनसारखा असल्याने पुस्तकाला द कॅबिन बुक … असे नाव दिलेले आहे. त्याच्या अन्य अनुवादित पुस्तकांत अमेरिकन्स ॲज दे आर (१८२८), द युनायटेड स्टेट्स ॲज दे आर (१८२८), टोकीआ ऑर द व्हाइट रोझ (१८२८) आणि फ्रंटियर लाइफ (१८५६) ह्यांचा समावेश होतो.

स्वित्झर्लंडमध्ये तो निधन पावला.

कुलकर्णी, अ. र.