गेर्हार्ट हाउप्टमानहाउप्टमान, गेर्हार्ट : (१५ नोव्हेंबर १८६२–६ जून १९४६). जर्मन नाटककार आणि कादंबरीकार. जन्म ओबेरसाल्झब्रून, सायलीशिया येथे. काही वर्षे त्याने ‘ब्रेस्लो आर्ट इन्स्टिट्यूट’ मध्ये शिल्पकलेचाअभ्यास केला (१८८०–८२) आणि त्यानंतर येना विद्यापीठात विज्ञान आणि तत्त्वज्ञान ह्या विषयांचे अध्ययन केले. १८८३-८४ मध्ये रोम-मध्ये त्याने शिल्पकार म्हणूनही काम केले. पुढे बर्लिनमध्ये असताना (१८८४-८५) कवी आणि नाटककार होण्याचा निर्णय त्याने घेतला. एका सुखवस्तू स्त्रीशी विवाह करून एर्क्नर या बर्लिनच्या एका उपनगरात तो स्थायिक झाला. तेथे त्याने अभिनयाचे काही शिक्षण घेतले. तसेच निसर्गवादी आणि समाजवादी विचारांकडे ओढल्या गेलेल्या एका गटाततो सामील झाला. ‘कार्निव्हल’ (१८८७, इं. शी.) ही कादंबरिका त्याच्या वाङ्मयीन कारकिर्दीच्या आरंभीच्या काळातली एक साहित्यकृती होय तथापि फोर झोन्नेनआउफगांग (१८८९, इं. शी. ‘बिफोर डॉन’) ह्या त्याच्या सामाजिक नाट्यकृतीने एका रात्रीत त्याला प्रसिद्धीच्या झोतात आणले. समकालीन सामाजिक समस्यांचे उघडेवाघडे चित्रण करणाऱ्याह्या नाट्यकृतीने एका रूढ पद्धतीने लिहिल्या जाणाऱ्या तोवरच्या जर्मन नाटकांची अखेर जवळ आल्याचा संदेश दिला. ‘द पीस फेस्टिव्हल’ (१८९०, इं. शी.), ‘लोन्ली लाइव्ह्ज’ (१८९१, इं. शी.) डी वेबर (१८९२, इं. शी. ‘द वीर्व्ह्स’) अशी काही निसर्गवादी तंत्राने रचिलेली नाटके त्याने लिहिली. ‘द वीव्हर्स’ मध्ये गरीब विणकरांच्या दुःखाचे सहानुभूतिपूर्ण चित्रण त्याने केले आहे. ‘द पीस फेस्टिव्हल’ मध्ये एका मज्जाविकृत कुटुंबातील व्यक्तींचे विस्कटलेले नातेसंबंध त्याने नाट्यबद्ध केलेले आहेत. ‘बिफोर डॉन’ आणि ‘द वीर्व्ह्स’ ह्या दोन नाटकांमध्ये नायक नाही. ‘लोन्ली लाइव्ह्ज’ मध्ये आपली पत्नी आणि एक तरुण स्त्री ह्यांच्या संबंधांत दुभंगलेल्या एका बुद्धि-मंताची शोकांतिका त्याने दाखवली आहे. ऐतिहासिक नाटकातही निसर्ग-वादाचा प्रयोग करण्याच्या हेतूने त्याने फ्लोरिआन गायर हे नाटक लिहिले. ते फारसे यशस्वी झाले नाही. निसर्गवादाच्या मर्यादा त्याला जाणवू लागल्या. हान्नेलेस हिम्मेलफार्ट (१८९४, इं. शी. ‘ॲसंप्शन ऑफ हान्नेल’) ह्या नाट्यकृतीपासून तो प्रतीकवादाकडे वळला. डी फरझुंकेन ग्लोक (१८९६, इं. शी. ‘द संकन बेल’) हे त्याने प्रतीकवादी तंत्राने लिहिलेले एक श्रेष्ठ नाटक होय.

 

‘द बीव्हर कोट’ (१८९३, इं. शी.) ही त्याची यशस्वी सुखात्मिका. बर्लिनच्या बोलभाषेत ती लिहिलेली असून एक लबाड, चुणचुणीत,चोरटी मुलगी आणि तिने मूर्ख प्रशियन अधिकाऱ्याला यशस्वीपणे दिलेले तोंड ह्या विषयावर ती केंद्रित झालेली आहे. नाटककार म्हणून हाउप्टमानच्या कारकिर्दीचा कळस त्याने लिहिलेल्या डी आट्रिडेनटेट्रालॉजी (१९४१–४८) ह्या नाट्यकृतिमालिकेत झाला. ग्रीक मिथ्य-कथांच्या आधारे त्याच्या काळातील भयकारी क्रूरतेचे दर्शन तीतून त्याने घडविलेले आहे.

 

हाउप्टमानने कथा, कादंबऱ्या आणि दीर्घकाव्येही लिहिली. डेअरनार इन क्रिस्टो, इमानुएल क्विंट (१९१०, इं. भा. द फूल इन ख्राइस्ट,इमानुएल क्विंट) ह्या कादंबरीत ख्रिस्ताच्या जीवनाला समांतर असे आधुनिक काळातील एका सुताराच्या मुलाचे उत्कट धर्मपरायणतेनेभारलेले जीवन त्याने चित्रित केले आहे. डेअर केट्त्सर फोन सोआना (१९१८, इं. शी. ‘द हेरिटिक सोआना’) ह्या अत्यंत प्रसिद्ध कथेतमात्र ख्रिस्ती धर्मश्रद्धेचा त्याग करून ग्रीक देवता इरॉस हिच्या पंथाचा स्वीकार करून पेगन होणारा एक धर्मोपदेशक त्याने दाखविला आहे.

 

लेखक म्हणून आपल्या कारकिर्दीच्या उत्तरकाळात हाउप्टमानने विपुल लेखन केले पण त्याची गुणवत्ता मात्र सर्वत्र सारखी राहिलीनाही. जर्मनीवर नाझींचे वर्चस्व येईपर्यंत त्याची वाङ्मयीन ख्याती अतुलनीय राहिली. नाझी त्याच्या बाबतीत फारसे सहिष्णू राहिले नाहीत आणि नाझी सत्तेमुळे जर्मनीबाहेर गेलेल्यांची त्याच्याबद्दलची भावना, तो जर्मनीतच राहिला म्हणून निषेधाची राहिली.

 

विसाव्या शतकाच्या आरंभकाळातील हाउप्टमान हा एक ठळक नाटककार तर होताच पण जागतिक पातळीवरील आधुनिक नाटककारां-मध्येही त्याने आपले स्थान प्राप्त करून घेतले आहे. मुकाटपणे सामाजिक अन्याय सोसणाऱ्या माणसांबद्दल वाटणारी तीव्र सहानुभूती त्याच्या सर्व साहित्यातून प्रकट होताना दिसते. त्याची नाटके, विशेषतः निसर्गवादी तंत्राने लिहिलेली नाटके, अजूनही रंगभूमीवर येत असतात.

 

१९१२ सालचे साहित्याचे नोबेल पारितोषिक देऊन त्याच्या साहित्यसेवेचा गौरव केला गेला.

 

१९०४ मध्ये त्याने आपल्या पहिल्या पत्नीपासून घटस्फोट घेतला होता. त्यानंतर एका व्हायोलिनवादक महिलेबरोबर विवाह करून सायली- शियातील ॲग्नेटेनडॉर्फ येथे एका घरात तो राहत होता. तेथेच त्याचे निधन झाले.

 

पहा : जर्मन साहित्य.

राऊत, अमोल