मान, हाइन्‍रिख: (२७ मार्च १८७१–२ मार्च १९५०). जर्मन कादंबरीकार आणि निबंधकार. जगद्‌विख्यात कादंबरीकार ⇨ टोमास मान ह्याचा वडील बंधू. ल्यूबेक येथे जन्म. त्याचे आरंभीचे शिक्षण ल्यूबेक येथे झाले. पुढे बर्लिन विद्यापीठात त्याने प्रवेश घेतला. १८९१ मध्ये त्याच्या वडिलांचे निधन झाल्यानंतर तो बर्लिनमध्येच राहू लागला परंतु परदेशांत त्याचे बरेच वास्तव्य असे. हाइन्‍रिखने आपले साहित्यसेवेला वाहिले होते.

हाइन्‍रिखच्या विशेष उल्लेखनीय कादंबऱ्या अशा : इन द लँड ऑफ कॉकेन (१९००, इं. भा. १९२९), ‘प्रोफेसर उनराट’ (१९०५. इं. शी.), द लिट्ल टाउन (१९०९. इं. भा. १९३०) आणि ‘द एंपायर’ (३ खंड. १९१७ – २५ इं. शी.). ‘द एपांयर’ ह्या कादंबरीच्या तीन खंडांची नावे – सर्व इं. भा. – अशी : द पूअर (१९१७, इं. भा. १९१७). द पॅट्रिअटिअर (१९१८, इं. भा. १९२१) आणि द चीफ (१९२५, इं. भा. १९२५). त्याचप्रमाणे यंग हेन्‍री ऑफ नाव्हारे (१९३५, इं. भा. १९३८) व हेन्‍री, किंग ऑफ फ्रान्स (१९३७, इं. भा. १९३९) ह्या दोन ऐतिहासिक कादंबऱ्याही त्याने लिहिल्या.

तीव्र राजकीय-सामाजिक जाणीव हे हाइन्‍रिखच्या कादंबरीलेखनाचे लक्षणीय वैशिष्ट्य होय. इन द लँड ऑफ कॉकेनमध्ये त्याने दुसऱ्या विल्हेल्मच्या साम्राज्यातील उच्च मध्यमवर्गीयांच्या उथळपणावर  कठोर  टीका केली, तर  द लिट्ल  टाउनमध्ये  इटलीतील एका  लहानशा  नगरात  राहणाऱ्या  लोकांवर, तेथे आलेल्या एका फिरत्या नाटकमंडळीचा कसा परिणाम होतो, त्यांच्या सुप्त भावना चेतवल्या जाऊन अखेरीस त्यांचा कसा स्फोट होतो हे प्रत्ययकारीपणे दाखविले. ‘प्रोफेसर उनराट’ ह्या त्याच्या कादंबरीला विशेष कीर्ती लाभली. नाइट क्लबातील एका तरूण नर्तकीपासून आपल्या विद्यार्थ्यांना वाचवण्यासाठी आरंभी  धडपडणारा  शिस्तप्रिय प्राध्यापक  उनराट  हा शेवटी स्वतःच तिच्या मोहात कसा पडतो आणि त्याचा अधःपात कसा होतो. हा ह्या कादंबरीचा विषय. द ब्लू एंजल हा ह्या कादंबरीवर आधारलेला चित्रपटही गाजला. ‘द एंपायर’ ह्या त्याच्या कादंबरीतील सामाजिक-राजकीय उपरोध फारच तीव्र आहे. स्वामित्वप्रधान (ऑथॉरिटेरिअन) राजवटीचा सामाजावर होणारा परिणाम ह्या कादंबरीत त्याने प्रभावीपणे दाखविले आहे.

फ्रान्सचा राजा चौथा हेन्‍री ह्याच्या जीवनावरील त्याच्या उपर्युक्त दोन ऐतिहासिक कादंबऱ्यांतून त्याने मानवतावादाची प्रशंसा केली. फ्रान्सच्या मानवतावादी आणि लोकशाही परंपरांचा चौथा हेन्‍री हा प्रमुख प्रतिनिधी होय, अशी हाइन्‍रिखची धारणा होती.

हाइन्‍रिखने निबंधलेखनही केले. ‘माइट अँड मॅन’ (१९१९, इं. शी.) आणि ‘स्पिरिट अँड ॲक्ट’ (१९३१, इं. शी.) हे त्याचे निबंधसंग्रह निर्देशनीय आहेत. साहित्य आणि राजकारण ह्या दोन गोष्टी अलग नाहीत लेखकांनी वैचारिक आणि राजकीय स्वातंत्र्याचा पुरस्कार केला पाहिजे असे हाइन्‍रिखला वाटत होते. सहिष्णुता आणि मानवतावाद ह्यांवर त्याची श्रद्धा होती. त्याच्या निबंधांतून त्याच्या विचारांचे स्पष्ट प्रतिबिंब पडलेले आहे.

जर्मनीत नाझी सत्तेवर आल्यानंतर हाइन्‍रिखला १९३३ मध्ये विजनवास पतकरावा लागला. प्रथम तो फ्रान्समधील नीस येथे होता. पुढे १९४० मध्ये तो अमेरिकेत आला. तेथेच कॅलिफोर्निया राज्यातील सांता मोनीका येथे तो निधन पावला. 

कुलकर्णी, अ. र.