हाइझ, पाउल योहान लूटव्हिख फोन : (१५ मार्च १८३०–२ एप्रिल १९१४). जर्मन कवी, कादंबरीकार, नाटककार, भाषाशास्त्रज्ञ व परंपरावादी म्यूनिक साहित्यवर्तुळातील प्रमुख लेखक. १९१० मध्ये नोबेल प्रतिष्ठानाने त्यांना नोबेल पारितोषिक देऊन त्यांच्या साहित्यातील कामगिरीचा गौरव केला.

हाइझ यांचा जन्म बर्लिन, प्रशिया (जर्मनी) येथे झाला. त्यांनी बर्लिन व बॉन विद्यापीठांत अभिजात व रोमान्स भाषांचा शास्त्रीय अभ्यास केला. त्यानंतर ते स्वतंत्र प्रज्ञेचे विद्वान म्हणून ओळखले जाऊ लागले. बव्हेरियाचे राजे दुसरे मॅक्सिमिल्यन यांनी त्यांना म्यूनिकला येण्यासाठी निमंत्रण दिले. हाइझ १८५४ मध्ये म्यूनिकला गेले व अखेरपर्यंत तेथेच राहिले. फ्रांट्झ इमॅन्युएल गीबेल (१८१५–८४) हे कवी सदर राजाच्या दरबारातील साहित्यिकांचे प्रमुख होते (१८५२–६८). नंतर गीबेल व हाइझ म्यूनिक साहित्यिक संप्रदायातील प्रमुख साहित्यिक झाले. हा संप्रदाय साहित्यातील परंपरागत कलात्मक मूल्यांचे समर्थन करीत असे. त्यामुळे राजकीय मूलतत्त्ववाद, जडवाद व वास्तववाद्यांच्या कलात्मक मूल्यांवर होणाऱ्या आक्रमणापासून त्यांचे रक्षण करण्यासाठी या संप्रदायाचे साहित्यिक प्रयत्न करीत असत. कलेचे इतिहासकार असलेले फ्रांट्झ कुग्लर (१८०८–५८) हे हाइझ यांचे सहकारी होते व नंतर हाइझ यांनी कुग्लर यांच्या मुलीशी विवाह केला.

हाइझ सावधपणाने बेतलेल्या कथा लिहिणारे निष्णात लेखक होते. Gesammelte Novellen in Versen (1864), Meraner Novellen (1867), Deutscher Novellenschatz (187076), Novellen vom Gardasee (१९०२) इ. त्यांचे कथासंग्रह आहेत. ‘लाराबियाटा’ (१८५५) ही त्यांची एक सर्वोत्कृष्ट कथा. तिच्यामुळे त्यांना विशेष लोकप्रियता लाभली. त्यांच्या कथांची पार्श्वभूमी, घटना व पात्रे इटली व दक्षिण फ्रान्समधील आहेत. हाइझ यांनी डी किण्डर डेअर वेल्ट (१८७३, इं. शी. ‘चिल्ड्रन ऑफ द वर्ल्ड’), Im Paradiese (१८७५), Merlin (१८९२) या कादंबऱ्या लिहिल्या असून त्यांनी पन्नासाहून अधिक नाटकेही लिहिली. संगीतरचनाकार हूगो फिलिप याकोब वोल्फ (१८६०–१९०३) यांच्यासाठी हाइझ यांनी अनेक भावकविताही लिहिल्या. हाइझ यांच्या अनेक साहित्यकृतींमधून अभिजन पात्रांमधीलप्रेम व संघर्ष यांचा मानसशास्त्रीय अभ्यास केल्याचा प्रत्यय येतो.

जूझेप्पे ज्यूस्ती (१८०९–५०), ⇨ जाकोमो लेओपार्दी (१७९८–१८३७) व इतर इटालियन कवींच्या साहित्यकृतींचा हाइझ यांनीजर्मन भाषेत अनुवाद केला. त्यांची ही सर्वोत्कृष्ट साहित्यिक कामगिरी मानली जाते.

हाइझ यांनी आदर्शवादाला वाहून घेतले होते आणि जीवनाची काळी बाजू चितारण्यास त्यांचा विरोध होता. त्या काळात निसर्गवादी लेखकांची संख्या वाढत होती आणि हाइझ त्यांचे कडवे विरोधक होते. मात्र, नोबेल पारितोषिक जाहीर होईपर्यंत हाइझ यांची लोकप्रियता खूपच कमी झाली होती.

म्यूनिक (जर्मनी) येथे त्यांचे निधन झाले.

ठाकूर, अ. ना.