गटे, योहान वोल्फगांग फोन : (२८ ऑगस्ट १७४९–२२ मार्च १८३२). अठराव्या शतकाच्या उत्तरार्धातील जगद्विख्यात जर्मन साहित्यिक. जन्म फ्रँकफुर्ट येथे एका मध्यमवर्गीय कुटुंबात. त्याचे वडील वकील होते. घरातील संपन्न ग्रंथालय आणि उत्तम चित्रसंग्रह यांच्या प्रेरक सहवासात गटे वाढला. गटेची आई विख्यात जर्मन चित्रकार लूकास क्रानाख (१४७२–१५५३) ह्याच्या वंशातील. आईवडिलांच्या बाजूने गटेला उत्तम सांस्कृतिक पार्श्वभूमी लाभली होती. कॉर्नेलिया ही बहिण वगळता,गटेची सर्व भावंडे अल्प वयांतच वारली. ….Dichtung und Wahrheit (इं.शी.पोएट्री अँड ट्रुथ..) ह्या आपल्या आत्मचरित्रात कॉर्नेलियाबरोबरच्या आपल्या व्यामिश्र भावनिक संबंधाचे सूक्ष्मोत्कट दर्शन गटेने घडविले आहे. त्याच्या वाङ् मयात इतरत्र आढळणाऱ्या बहीणभाऊसंबंधांच्या सूक्ष्म चित्रणाचे मूळ त्यात शोधता येते. सप्तवार्षिक युद्धाच्या वेळी फ्रान्सने जर्मनीचा बराचसा मुलूख व्यापिला. फ्रेंच सैन्यासह फ्रेंच नाटकमंडळ्याही आल्या. लहानपणी आजीने दिलेल्या डुलत्या बाहुल्यांनी त्याच्या मनात नाटकांची आवड निर्माण केली होतीच. ह्या नाटकमंडळ्यांची नाटके पाहून ती वृद्धिंगत झाली. १७६५ मध्ये गटे लाइपसिक विद्यापीठात कायद्याच्या अभ्यासासाठी दाखल झाला. तथापि तीन वर्षांनंतर गंभीर आजारामुळे तेथून त्याला परतावे लागले. लाइपसिक येथे असताना त्याच्या ज्ञानोपासनेस जोराने चालना मिळाली. तेथे त्याने फ्रेंच वाङ्‌मयाचे वाचन केले. वास्तुकलेतील रोकोको कलासंप्रदायाचा त्याच्यावर प्रभाव पडला. रुग्णावस्थेत असताना त्याला किमया, फलज्योतिष, जादू अशा गूढविद्यांचा खूप नाद लागला होता. आजारपणातून उठल्यानंतर त्याने स्ट्रॅसबर्ग विद्यापीठात प्रवेश घेतला. तेथे असताना विख्यात जर्मन तत्त्वज्ञ आणि साहित्यिक ⇨हेर्डर ह्याच्याशी त्याचा परिचय झाला. त्याच्या सहवासाचा आणि व्यक्तिमत्त्वाचा खोल ठसा गटेवर उमटला त्यामुळे होमर, पिंडर, शेक्सपिअर ह्यांसारख्या श्रेष्ठ साहित्यिकांचा त्याचा अभ्यास अधिक डोळस आणि सखोल झाला. हेर्डरच्या प्रभावाने सुरू झालेल्या ‘स्टुर्म उंड ड्रांग’ (इं. शी.स्टॉर्म अँड स्ट्रेस) ह्या वाङ्‌मयीन आंदोलनाचे नेतृत्व गटेने केले [→ जर्मन साहित्य]. स्ट्रॅसबर्गला कायद्याचा अभ्यास करीत असतानाच वास्तुशास्त्रातील गॉथिक शैलीने त्याला प्रभावित केले. शरीरशास्त्र, रसायनशास्त्र, वैद्यक ह्या विषयांचीही गोडी लागली. एका धर्मगुरूच्या मुलीच्या प्रेमात तो पडला. या पार्श्वभूमीवर त्याच्या काही भावोत्कट कवितांची निर्मिती झालेली आहे.

गटे

स्ट्रॅसबर्ग विद्यापीठातून कायद्याची पदवी घेतल्यानंतर (१७७१) गटे वकिली करू लागला. तथापि सामाजिक आणि वाङ्‌मयीन कार्यातच तो गुरफटलेला होता. व्हेट्स्लार येथे जर्मनीच्या सर्वोच्च न्यायालयात  वकिली करण्यासाठी तो गेला परंतु तेथेही वाङ्‌मयीन ओढच प्रबल ठरली. Die Leiden des jungen Werthers (१७७४, इं.शी. द सॉरोज ऑफ यंग वेर्थर) ह्या त्याच्या जगप्रसिद्ध कादंबरीला कारणीभूत झालेला, शालर्ट बुफवरील निष्फळ प्रेमाचा अनुभवही त्याला येथेच आला. तेथे असताना एका श्रीमंत मुलीशी त्याचा वाङ्‌निश्चयही झाला होता परंतु तो पुढे मोडला.

१७७५ मध्ये व्हायमारच्या ड्यूकने गटेला खास आमंत्रण देऊन आपल्या मंत्रिमंडळात घेतले. व्हायमारला प्रयाण ही गटेच्या आयुष्यातील अत्यंत क्रांतिकारक घटना. त्यानंतरचे सारे आयुष्य त्याच्या इटलीच्या प्रवासाचा काही काळ वगळता, व्हायमारलाच गेले. ड्यूकच्या नोकरीत बऱ्याच शासकीय जबाबदाऱ्या त्याला पार पाडाव्या लागल्या. अर्थ, शेतकी, खाणी इ. विषयांत लक्ष घालावे लागले. तद्‌विषयक तांत्रिक बाबींचा अभ्यास करीत असताना त्याची विज्ञानविषयक आस्था वाढली. प्रकाशकी, रंग इ. विषयांत त्याने संशोधन केले.

दरबारातील एका अधिकाऱ्याच्या पत्नीशी त्याचे स्नेहसंबंध निर्माण झाले. त्याच्याशी समान बौद्धिक पातळीवरून संवाद करणारी ही स्त्री होती. गटे तिच्या प्रेमात पडला परंतु तिने मात्र त्याच्याशी बंधुत्वाचे नाते ठेवून त्याच्या प्रेमभावनेचे उदात्तीकरण करण्याचीच दृष्टी ठेवली.

ह्या काळात आपल्या व्यक्तिमत्त्वाला त्याने शिस्तबद्धता प्राप्त करून दिली. १७७५ ते १७८६ हा कालखंड जीवनावर स्वामित्व मिळविण्याच्या त्याच्या धडपडीचा. Wilhelm Meisters Lehrjahre (४ खंड, १७९५–९६, टॉमस कार्लाइलचे इं. भा. व्हिल्हेल्म माइस्टर्स अप्रेंटिस्‌शिप, १८२४) ह्या त्याच्या पुढच्या कादंबरीचे शीर्षक ह्या दृष्टीने अर्थपूर्ण ठरते. १७८६–८८ ह्या काळात तो इटलीत होता. तेथेच त्याच्या कलादृष्टीला वेगळे वळण मिळाले. प्रबोधनकालीन कलेचे उत्तमोत्तम नमुने त्याने तेथे पाहिले. अभिजाततावादी कला-साहित्य-परंपरांविषयी त्याला आस्था आणि आदर निर्माण झाला. साहित्यकृतीचा घाट आणि रूप ह्यांबद्दल इटलीतील वास्तव्यात त्याला झालेली नवी जाणीव Egmont (१७८८), Iphigenie auf Tauris (१७७९, संस्करण १७८७, इं. शी. इफिजेनी इन टॉरिस), Torquato Tasso (१७९०) ह्यांसारख्या नाट्यकृतींवर त्याने केलेल्या संस्कारांतून प्रत्ययास येते.

१७८८ मध्ये जर्मनीला परतल्यानंतर तेथील सामाजिक आणि वैचारिक जीवनापासून आपण वेगळे पडत चालल्याची तीव्र जाणीव गटेला झाली. १७९० मध्ये तो पुन्हा इटलीस गेला, तेव्हा त्याचा भ्रमनिरास झाला. फ्रेंच क्रांतीसारख्या घटनांनीही त्याला अस्वस्थ केले.

क्रिस्टिआने व्हुल्पिउस नावाच्या एका मुलीच्या प्रेमात गुंतून तिला त्याने १७८८ मध्ये आपल्या घरात आणले. तिला त्याच्यापासून मुले झाली पण त्याच्याबरोबरचा तिचा विवाह मात्र १८०६ मध्ये झाला. ह्या दरम्यानच्या काळात जे प्रवाद निर्माण झाले, त्यामुळे काही निष्ठावंत मित्र वगळता, अनेक व्यक्तींशी असलेल्या त्याच्या स्नेहसंबंधांत दुरावा निर्माण झाला. १७९१ मध्ये ड्यूकच्या दरबारातील सर्व शासकीय जबाबदाऱ्यांतून त्याने स्वतःला मुक्त करून घेतले. १७९१ पासून १८१७ पर्यंत ड्यूकच्या नाट्यगृहाच्या (व्हायमार थिएटर) संचालकपदी तो होता.

एका नियतकालिकातील लेखनाच्या निमित्ताने १७९४ मध्ये गटे आणि विख्यात जर्मन कवी व नाटककार ⇨शिलार  ह्यांचा पत्रव्यवहार सुरू झाला. त्याचे रूपांतर लवकरच गाढ मैत्रीत झाले. गटेच्या यानंतरच्या वाङ्‌‌मयावर आणि वाङ्‌‌मयीन दृष्टिकोनावर विशेषतः ⇨फाउस्ट  (दोन खंड, १८०८, १८३२) ह्या त्याच्या सर्वश्रेष्ठ कृतीवर, शिलरचा ठसा उमटलेला आहे.

शिलरच्या मृत्यूनंतरची (१८०५) वर्षे म्हणजे गटेच्या आयुष्यातील शेवटचा कालखंड. Die Wahlverwandtschaften (१८०९, इं. शी. द इलेक्टिव्ह ॲफिनिटीज) ही कादंबरी, Aus Meinem Leben : Dichtung und Wahrheit (४ खंड, १८११–३३, इं.शी. पोएट्री अँड ट्रूथ फ्रॉम माय ओन लाइफ) आणि फाउस्टचा दुसरा भाग हे ह्या काळातील त्याचे महत्त्वाचे लेखन. व्हायमार येथेच तो निधन पावला. ‘अजून थोडा प्रकाश…’ हे आपल्या मृत्यूपूर्वी त्याने काढलेले उद्‌गार त्याच्या साऱ्याच जीवनावर प्रकाश टाकतात. त्याच्या साहित्यावरून त्याच्या प्रदीर्घ जीवनाची अनुभवसंपन्नता व अर्थपूर्णता लक्षात येते आणि त्याचे जीवन माहीत असले, की त्याच्या साहित्याची गोडी अनेक पटींनी वाढते. अशा प्रकारे त्याच्या जीवनाचे आणि साहित्याचे धागे एकमेकांत अविभाज्यपणे गुंफले गेले आहेत.

आपल्या त्र्याऐंशी वर्षांच्या आयुष्यात १४३ खंड भरतील एवढे प्रंचड लेखन गटेने केले. त्यातील बहुतेक सर्व पहिल्या दर्जाचे असून जर्मन तसेच यूरोपीय साहित्यावर प्रभाव पाडणारे आहे पण गटेचे सारसर्वस्व सामावलेले आहे ते त्याच्या द सॉरोज ऑफ यंग वेर्थर, व्हिल्हेल्म माइस्टर्स…व फाउस्ट ह्या तीन साहित्यकृतींमध्ये.

द सॉरोज ऑफ यंग वेर्थर ही गटेची कादंबरी स्वच्छंदतावादी कल्पनांचा आदर्श ठरावी, अशी आहे. वेर्थर नावाच्या अतिसंवेदनाशील कविमन असणाऱ्या तरुणाचे शार्लट ह्या तरुणीवरील असफल प्रेम, हा ह्या पत्रात्मक कादंबरीचा विषय. पत्रलेखनात अभिप्रेत असलेल्या मानसिक जवळिकेचा कौशल्यपूर्ण उपयोग करून घेऊन वेर्थरच्या मनातील सूक्ष्म व हळुवार आंदोलनांचे प्रत्ययकारी चित्रण गटेने केले आहे. ‘दिर्घ कबुलीजबाब’ असे त्याने ह्या कादंबरीचे वर्णन केले असले, तरी कार्लाइल म्हणतो त्याप्रमाणे तत्कालीन यूरोपीय तरुणांच्या मनांतील अनामिक अस्वस्थता ह्या कादंबरीत उत्कटतेने व्यक्त झाली आहे. आदर्शाची तरुण मनाला वाटणारी अदम्य ओढ आणि त्याची दुष्प्राप्यता ह्यांचा तीव्र अनुभव वेर्थरच्या असफल प्रेमकथेमध्ये प्रतीकरूप झाला आहे. ह्या कादंबरीच्या प्रकाशनानंतर सु. ३०–३५ वर्षे यूरोपातील हळवे तरुण प्रेमाचे श्रेष्ठत्व वैफल्यातच असते, असे मानीत असत. नेपोलियनसारख्या वास्तववादी योद्ध्यानेदेखील ही कादंबरी आपण सात वेळा वाचली, असे मोठ्या अभिमानाने सांगितले आहे.

व्हिल्हेल्म माइस्टर्स… ही गटेची दोन भांगात लिहिलेली कादंबरी (Wilhelm Meisters Lehrjahre आणि Wilhelm Meisters Wanderjahre,१८२१, संस्करण १८२९, इं.शी. व्हिल्हेल्म माइस्टर्स ट्रॅव्हल्स). वास्तवाच्या जगात स्वतःचे स्थान शोधणारा आणि स्वतःच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास प्रत्यक्ष अनुभवांच्या आधारे साधू पाहणारा व्हिल्हेल्म ह्या कादंबरीच्या पहिल्या भागात दिसतो. वाचकाला गुंतविणाऱ्या अनेक घटना आणि व्यक्तिरेखा ह्या भागात आहेत. ठिकठिकाणी जीवनावर प्रगाढ भाष्य केलेले आहे.

व्हिल्हेल्म माइस्टर्स…चा दुसरा भाग प्रसिद्ध झाला तेव्हा औद्योगिक क्रांतीचे वातावरण होते. वर्तमानाची जाणीव ठेवून भविष्याचा वेध घेणाऱ्या गटेने तांत्रिक ज्ञानाच्या पायावर उभ्या राहणाऱ्या आधुनिक समाजाचा मोकळ्या मनाने स्वीकार केल्याचे ह्या भागात प्रत्ययास येते. औद्योगिक क्रांतीमुळे बेकार झालेल्या कारागिरांना व शेतकऱ्यांना नव्या जगातील (अमेरिकेतील) नवे, विकासक्षम जीवन जगण्यासाठी तयार करणारा व्हिल्हेल्म आणि त्याचे सहकारी येथे दिसतात. Gotz von Berlichingen (१७७३), Clavigo (१७७४), Egmont, Iphigenie auf Tauris, Torquato Tasso ह्यांसारख्या आपल्या नाट्यकृतींतून त्याने धीरोदात्त नायकांच्या जीवनातील निर्वाणीच्या प्रसंगांवर लक्ष केंद्रित करून अभिजात परंपरेला शोभतील अशा साहित्यकृती निर्माण केल्या. तथापि त्याला वाङ्‌मयात अजरामर करून ठेवले आहे, त्याच्या फाउस्ट ह्या काव्यात्म नाटकाने.

ऐहिक सुखांच्या प्राप्तीसाठी स्वतःचा आत्मा मेफिस्टोफीलीझकडे गहाण टाकणाऱ्या डॉक्टर फॉस्टसची मिथ्यकथा यूरोपात फार जुन्या काळापासून प्रचलित आहे. तीच गटेने फाउस्टचा विषय म्हणून घेतली. स्वतःची सारी प्रतिभा पणाला लावून सूक्ष्म जीवनदर्शन घडविणारे एक भव्य रूपक ह्या नाट्यकृतीद्वारे त्याने जगाला बहाल केले. स्वतःच्या व्यक्तिगत जीवनातील अनेक घटनांचा प्रगत आलेख प्रतिबिंबित करीत असतानाच येऊ घातलेल्या जडवादी युगाचे व आधुनिक मानवाच्या तोंडवळ्याचे दर्शन त्याने ह्या नाटकातून घडविले आहे. ऐन तारूण्यात, चोविसाव्या वर्षी, हाती घेतलेल्या या नाटकावर गटे आयुष्यभर परिश्रम घेत होता. त्यामुळे जे जे खास गटेचे म्हणून ओळखले जाते, ते ते ह्या नाटकात आहेच.

गटे हा श्रेष्ठ कवी आहे, हे त्याच्या इतर कामगिरीपुढे कमी महत्त्वाचे ठरते हे खरे तथापि त्याने फक्त Romische Elegien (१७९५, इं.शी.रोमन एलिजीज) लिहिल्या असत्या, तरी जर्मन साहित्यात त्याला अढळ स्थान मिळाले असते. गटेच्या आत्मवृत्ताबद्दल व एकरमानबरोबर (हा त्याचा चिटणीस होता) झालेल्या त्याच्या संभाषणाबद्दलही हेच म्हणता येईल. स्वतः एकरमानने हे संभाषण नमूद करून ठेवले आहे. गटेचे साहित्य आणि जीवन हा केवळ यूरोपीय विद्यापीठांचा प्रांत राहिलेला नाही. नेपोलियनप्रमाणेच गटेतही अनेक चांगल्या गुणांचे आणि अद्वितीय यशाचे देखणे प्रतीक सर्वांना आढळते. १८०८ मध्ये त्याची नेपोलियनशी भेट झाली असता अखेर एक खराखुरा माणूस भेटल्याचे समाधान नेपोलियनने व्यक्त केल्याचे प्रसिद्ध आहे.

उत्कट स्वच्छंदतावादी प्रवृत्ती आणि अभिजाततावादाची परिपक्व जाण ह्यांचा यशस्वी समन्वय त्याच्या जीवनात आणि वाङ्‌मयीन कर्तृत्वात झालेला आहे. Italienische Reise (१८१६-१७, इं. शी. इटालियन जर्नीज) हे त्याचे प्रवासवृत्त त्या दृष्टीने वाचण्यासारखे आहे. वैज्ञानिक संशोधनाबद्दल गटेला उत्कट आस्था होती. कधी कधी आपल्या साहित्यिक कर्तृत्वापेक्षा त्याला आपले वैज्ञानिक संशोधनच अधिक महत्त्वाचे वाटे. त्या क्षेत्रातील त्याच्या कर्तृत्वाच्या मर्यादा स्पष्ट असल्या, तरी वैज्ञानिक निष्कर्षापर्यंत पोहोचण्याच्या प्रक्रियेची सूक्ष्म जाण त्यातून निश्चितच प्रत्ययाला येते. आधुनिक शारीरातील पुरःऊर्ध्वहन्वस्थीचा (प्रीमॅक्सिला) शोध गटेने प्रथमच लावलेला नसला, तरी त्याबाबतचे संशोधन मात्र त्याने अगदी स्वतंत्रपणे केलेले होते. आपला एक पूर्वसूरी म्हणून डार्विनने त्याचा गौरव केला होता. Entoptische Farben (इं. शी. ऑन एंटॉप्टिक इमेजिस) आणि Metamorphose der Pflanzen (१७९०, इं. शी. अटेम्ट टू एक्सप्लेन द मेटमॉर्फसिस ऑफ प्लँट्स) हे त्याचे अनुक्रमे मनःशारीरक्रिया विज्ञान (सायकोफिजिऑलॉजी) व वनस्पतिविज्ञान या विषयांतील लक्षणीय लेखन,आकारविज्ञानाचा (मॉर्‌फॉलॉजी) तर गटे हा जनक होय.

गटे पेगन नव्हता पंरतु त्याची धार्मिक वृत्ती कधीच एकारलेली नव्हती. म्हणूनच निरनिराळ्या धर्मांचे आस्थापूर्वक आकलन करून त्यांतील समान दुव्यांचा शोध घेण्याचा त्याने प्रयत्न केला. कवी म्हणून मी अनेकेश्वरवादी असलो. तरी वैज्ञानिक म्हणून चराचरेश्वरवादी आहे आणि एक नैतिक व्यक्ती म्हणून मलाही व्यक्तिगत परमेश्वराची गरज भासतेच, ह्या आशयाचे त्याचे उद्‌गार त्याच्या ईश्वरविषयक भूमिकेवर प्रकाश टाकतात.

संदर्भ : 1.Brandes, Georg, Wolfgang Goethe, 2 Vols., New York,1924.

2. Fairley, Barker, Goethe as Revealed in His Poetry, Chicago, 1932.

3. Hatfield, H.C.Goethe: A Critical Introduction , Norfolk, Conn., 1963.

4. Lewis, G. H. The Life of Goethe, 18th Ed., London, 1903.

5. Magnus, Rudolf, Goethe as a Scientist, New York, 1949.

6. Peacock, Ronald, Goethe’s Major Plays, Manchester, 1959.

7. Reiss, H.S.Goethe’s Novels, London, 1969.

8. Wilkinson, E.M. Willoughby L.A. Goethe : Poet and Thinker, London, 1962.

कुलकर्णी, अनिरूद्ध परांजपे, प्र. ना.