नोव्हालिस : (२ मे १७७२–२५ मार्च १८०१). श्रेष्ठ जर्मन भावकवी आणि जर्मन साहित्यातील स्वच्छंदतावादाचा एक प्रणेता. खरे नाव फ्रीड्रिख फोन हार्डेनबेर्ख. प्रशियन सॅक्सनीमधील ओबरव्हीडरस्टेड्ट ह्या स्थळी एका उमराव घराण्यात त्याचा जन्म झाला. तो प्रॉटेस्टंट असून त्याच्या घरातील वातावरण धार्मिक होते. येना, लाइपसिक व विटनबर्ग येथे त्याचे शिक्षण झाले. कायदा, इतिहास आणि तत्त्वज्ञान ह्या विषयांचा त्याने अभ्यास केला. १७९५ मध्ये सोफी फोन कून ह्या तरुणीशी त्याचा विवाह जमला तथापि त्यानंतर दोनच वर्षांनी तिचे निधन झाले. तिच्या मृत्यूचा खोल ठसा नोव्हालिसच्या मनावर उमटला. त्याच वर्षी तो फ्रायबेर्ख येथे खाणकामाच्या तंत्राचा अभ्यास करण्यासाठी गेला. त्यानंतर मिठाच्या एका खाणीत अधिकारी म्हणून त्याची नेमणूक झाली (१८००). सोफीच्या निधनानंतर त्याने एका तरुणीशी विवाह ठरविला होता तथापि तो घडून येण्यापूर्वीच नोव्हालिसचे वायझेनफेल्स येथे क्षयाने निधन झाले.

येना आणि लाइपसिक येथे शिकत असतानाच शिलर व फ्रीड्रिख फोन श्लेगेल ह्यांचा स्नेह आणि सहवास नोव्हालिसला लाभलेला होता. १७९८ मध्ये फ्रीड्रिख फोन श्लेगेल, त्याचा बंधू आउगुस्ट व्हिल्‌हेल्म फोन श्लेगेल आणि लूटव्हीख टीक ह्यांसारख्या साहित्यिकांसमवेत नोव्हालिसने जर्मन स्वच्छंदतावादी संप्रदायाच्या उभारणीत भाग घेतला आणि ह्या संप्रदायाच्या आथेनेउमनामक मुखपत्रात बरेचसे लेखनही केले.

नोव्हालिसमधला श्रेष्ठ भावकवी सोफीच्या निधनामधून त्याला स्फुरलेल्या रात्रसूक्तांतून (ह्युमनेन आन डी नाख्ट, १८००) विशेषत्वाने प्रत्ययास येतो. प्रकाशाचे जग आणि रात्रीचे जग ह्यांचा संयोग घडवून आणणाऱ्या आणि प्रेमाच्या सर्जनशील शक्तीभोवती केंद्रित होणाऱ्या अनंतत्वाचे स्वप्न नोव्हालिसने त्यात पाहिले आहे. त्याने कांदबरीलेखनही केले. हायन्‍रिश फोन ओफ्टरडिंगेन (अपूर्ण, १७९९–१८००, इं. भा. १८४२) ही त्याची महत्त्वाची कादंबरी. नीलपुष्पाच्या शोधात असलेला नायक नोव्हालिसने ह्या कादंबरीत दाखविलेला आहे. अप्राप्य ध्येयासाठी झुरणे हे स्वच्छंदतावाद्यांचे एक लक्षणीय वैशिष्ट्य. ह्या कादंबरीतील नीलपुष्प हे एका अप्राप्य ध्येयाचेच प्रतीक होय. मध्ययुगाच्या पार्श्वभूमीवर लिहिलेल्या ह्या कादंबरीत अद्‌भूताचे आणि परीकथेचे वातावरण आहे. स्वच्छंदतावादी संप्रदायातील एक वैशिष्ट्यपूर्ण साहित्यकृती म्हणून ह्या कादंबरीचे स्थान आहे. 

डी ख्रिस्टेनहाइट ओडर ऑयरोपा (१७९९, इं. शी. ख्रिश्चॅनिटी ऑर यूरोप ?) ह्या आपल्या निबंधात धर्मसुधारणेच्या चळवळी आणि बुद्धिवाद ह्यांमुळे यूरोपीय संस्कृती विघटित झाली असून तिची एकता पुन्हा प्रस्थापित करण्याची आवश्यकता त्याने प्रतिपादन केली आहे त्यासाठी एका वैश्विक चर्चची कल्पनाही मांडली आहे. मध्ययुगात धर्म हाच सर्व बाबींचा मूलस्रोत होता. तसेच वातावरण असणारे मध्ययुग नव्याने अवतरावे, अशीही इच्छा नोव्हालिसने व्यक्त केलेली आहे. नंतरच्या स्वच्छंदतावाद्यांवर त्याच्या साहित्याचा लक्षणीय प्रभाव पडलेला आहे.

कुलकर्णी, अ. र.