स्वामीरामभद्राचार्य : (१४ जानेवारी १९५०). हिंदू धर्मनेते, शिक्षणतज्ज्ञ, संस्कृत पंडित, अनेक भाषाकोविद (२२ भाषा ते बोलू शकतात ), कवी, गद्यलेखक, तत्त्वज्ञ, संगीतरचनाकार आणि गायक. त्यांचे मूळ नाव गिरिधर मिश्र जगद्गुरू ही उपाधी त्यांना पुढे प्राप्त झाली (१९८८).

रामभद्राचार्य हे वसिष्ठगोत्री ब्राह्मण. जौनपूर जिल्ह्यातील (उत्तर प्रदेश) रांडी (खुर्द) ह्या गावी ते जन्मले. त्यांच्या आईचे नाव शचिदेवी, तर वडिलांचे नाव पंडित राजदेव मिश्र. जन्मानंतर केवळ दोनच महिन्यांनी गिरिधर मिश्र खुपरीच्या (ट्रॅकोमा) विकारामुळे दृष्टिहीन झाले. २४ मार्च १९५० हा तो दिवस. त्यावेळी अशा विकारांवर उपचार मिळणे अवघड होते तथापि जे उपचार उपलब्ध होते, ते करण्यात आले पण कशाचाही फायदा झाला नाही. दृष्टी गेली ती गेलीच. रामभद्राचार्य लिहूवाचू शकत नाहीत कारण ब्रेल लिपीचा उपयोग त्यांनी कधी केला नाही. ते ऐकून ऐकून शिकले. आपल्या कविता उतरवून घेण्यासाठी त्यांनी लेखनिकाचे साहाय्य घेतले आणि आजही घेतात.

गिरिधरांना आरंभीचे शिक्षण त्यांच्या आजोबांकडून (वडिलांचे वडील) मिळाले. रामायण-महाभारतातील अनेक कथा आजोबांनी त्यांना सांगितल्या. गिरिधरांनी आपली पहिली कविता अवधी भाषेत (हिंदीची एक बोल भाषा) लिहिली आणि आजोबांना ऐकवली. वयाच्या अवघ्या पाचव्या वर्षी गिरिधरांनी संपूर्ण गीता पाठ केली होती, तर सातव्या वर्षी ⇨ तुलसीदासांचे रामचरितमानस पूर्णतः पाठ केले होते. वेद, उपनिषदे आणि भागवत पुराण ही त्यांना पाठ होते. थोडक्यात, गिरिधरांना कसलेही औपचारिक शिक्षण मिळाले नसताना, बालवयातच त्यांनी अनेक ग्रंथ अभ्यासिले होते. त्यांना अंधांसाठी असलेल्या विशेष शाळेत घालण्याचा विचार पुढे आला होता, परंतु तेथे अंधांना नीट वागवीत नाहीत, अशा भावनेने त्यांच्या आईने तो विचार मोडून काढला. त्यानंतर १९६७ मध्ये त्यांनी जौनपूर जिल्ह्यातील सुजनगंज येथे असलेल्या ‘आदर्श गौरीशंकर संस्कृत कॉलेजा ‘त प्रवेश घेतला. तेथे संस्कृत व्याकरणाखेरीज हिंदी, इंग्रजी, गणित, इतिहास, भूगोल असे विषयही शिकवले जात. ह्या कॉलेजातून संस्कृतमधील उत्तरा माध्यमा (Higher Secondary) ही परीक्षा ते पहिल्या वर्गात उत्तीर्ण झाले. १९७१ मध्ये गिरिधरांनी वाराणसी येथील ‘संपूर्णानंद संस्कृत विद्यापीठा ‘त प्रवेश घेतला. तेथून त्यांनी शास्त्री (बी.ए.) ही पदवी विशेष प्रावीण्यासह प्राप्त केली. १९७६ मध्ये त्यांनी याच विद्यापीठातून आचार्य (एम्.ए.) ही पदवी परीक्षेत सर्वप्रथम येऊन मिळविली. १९८१ मध्ये त्यांनी विद्यावर्धिनी (पीएच्.डी.) ही पदवी प्राप्त केली. १९९७ मध्ये त्यांनी विद्यावाचस्पती (डी.लिट्.) ही पदवी मिळविली. ही पदवी त्यांना भारताचे तत्कालीन राष्ट्रपती के. आर्. नारायणन् ह्यांच्या हस्ते प्रदान करण्यात आली.

१९७६ मध्ये गिरिधरांनी विवाह न करता आजन्म ब्रह्मचारी राहण्याचा निर्णय घेतला. रामानंद संप्रदायाचे ते अनुयायी झाले (१९८३). तेव्हापासून ते रामभद्रदास म्हणून ओळखले जाऊ लागले. १९८७ मध्ये रामभद्रदासांनी चित्रकूटमध्ये ‘तुळसीपीठ’ ही एक धार्मिक आणि समाजसेवी संस्था स्थापन केली. १९८८ मध्ये काशी विद्वत् परिषदेने त्यांची तुळसीपीठ आसनस्थ जगद्गुरू रामभद्राचार्य म्हणून निवड केली. १९९५ मध्ये आवश्यक ते विधी करून ह्या निवडीला अधिकृत करण्यात आले. त्यानंतर ते ‘जगद्गुरू रामानंदाचार्य स्वामी रामभद्राचार्य’ म्हणून मान्यता पावले.

अलाहाबाद उच्च न्यायालयात रामजन्मभूमी आणि बाबरी मशीद ( मस्जिद) वाद सुनावणीसाठी आला असताना धार्मिक क्षेत्रातले एक तज्ज्ञ म्हणून त्यांनी साक्ष दिली होती.

२३ ऑगस्ट १९९६ रोजी स्वामी रामभद्राचार्य ह्यांनी चित्रकूट (उत्तर प्रदेश) येथे ‘तुलसी स्कूल फॉर द ब्लाइंड’ ह्या अंधशाळेची स्थापना केली. तसेच २७ सप्टेंबर २००१ रोजी चित्रकूट येथेच ‘जगद्गुरू रामभद्राचार्य विकलांग विश्वविद्यालया ‘ची त्यांनी स्थापना केली. हे विश्वविद्यालय म्हणजे केवळ अपंगांसाठी असलेले जगातले पहिले विद्यापीठ होय. स्वामी रामभद्राचार्य यांची ह्या विद्यापीठाचे तहहयात कुलगुरू म्हणून उत्तर प्रदेश शासनातर्फे नियुक्ती केली गेली. या विद्या-पीठात निरनिराळ्या विषयांचे पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण मिळते (संस्कृत, इंग्रजी, हिंदी, समाजशास्त्र, मानसशास्त्र, चित्रकला, संगणक इत्यादी). पीएच्.डी.चीही सोय आहे. ग्रामीण भागात सामाजिक जाणीव निर्माण करण्यासाठी तसेच अपंग बालकांच्या विकासासाठी त्यांनी ‘जगद्गुरू रामभद्राचार्य विकलांग सेवा संघ’ ही संस्था काढली.हिचे मुख्यालय मध्य प्रदेशात आहे. तुलसीदासांच्या रामचरितमानसची चिकित्सक आवृत्ती त्यांनी काढली. त्यांची गद्यपद्य ग्रंथसंपदा सु. ५० इतकी आहे.

कुलकर्णी, अ. र.