परिभाषेंदुशेखर :  संस्कृत व्याकरणावरील महत्त्वाचा ग्रंथ. नागोजीभट्टाने तो अठराव्या शतकाच्या सुरुवातीस पाणिनीय संप्रदायातील परिभाषांच्या स्पष्टीकरणासाठी लिहिला आहे. परिभाषांचा प्रामुख्याने उपयोग पाणिनीच्या सूत्रांचा अर्थ व व्याप्ती निश्चित करण्यासाठी किंवा दोन वा दोहोंपेक्षा अधिक सूत्रे एकाच उदाहरणात एकदम प्रवृत्त होत असल्यास सूत्रांचे बलीयस्त्व ठरविण्यासाठी होत असतो. एकंदर परिभाषा पाचशेहून अधिक असल्या, तरी पाणिनीय संप्रदायाला मान्य असलेल्या १३३ परिभाषांचा अंतर्भाव या ग्रंथात केलेला आहे. या परिभाषांपैकी सु. चाळीस परिभाषा कात्यायनाने व साठांपेक्षा अधिक पतंजलीने नमूद केल्या आहेत. हा ग्रंथ पुरुषोत्तमदेवाचा परिभाषापाठ (बारावे शतक) व सीरदेवाची परिभाषावृत्ति (बारावे शतक, उत्तरार्ध) यांवर आधारलेला आहे. नागोजीभट्टाच्या शिष्यप्रशिष्यांनी पंचवीसापेक्षा अधिक टीका या ग्रंथावर लिहिल्या आहेत. महत्त्वाच्या टीका अशा : वैद्यनाथ पायगुंडे यांची गदा (अठराव्या शतकाचा उत्तरार्ध), भैरवमिश्रांची भैरवी (एकोणिसाव्या शतकाचा प्रथमार्ध), राघवेंद्राचार्य गजेन्द्रगडकरांची त्रिपथगा (एकोणिसाव्या शतकाचा उत्तरार्ध). या ग्रंथाचे संपादन आणि इंग्रजी भाषांतर फ्रांट्रस कीलन‌्होर्न याने केले आहे (आवृ. दुसरी, १९६०). या ग्रंथाचा उत्तम मराठी अनुवाद ना. दा. वाडेगावकर यांनी केला आहे (१९३६).

जोशी, शि. द.