रघुवीर, डॉक्टर : (३१ डिसेंबर १९०२-१४ मे १९६३). वैदिक संस्कृत, तिबेटी, चिनी, मंगोलियन, बाली बेटातील कवि-भाषा इ. भाषांचे जाणकार आणि कोशकार. जन्म, आज पाकिस्तानात असलेल्या रावळपिंडी येथे. रघुवीर यांचे शिक्षण लाहोर, लंडन आणि उत्रेक्त (हॉलंड) येथील विद्यापीठांत झाले. लंडनला ते पीएच्‌.डी. व उत्रेक्तला डी.लिट्. व डि.फिल्‌. झाले. चीन, मंगोलिया, थायलंड, इंडोचायना वगैरे प्रदेशांत त्यांनी दूरवर अभ्यासदौरेही केले. त्या देशांतून त्यांनी जमा केलेली प्राचीन हस्तलिखिते दिल्ली येथे भारतीय संस्कृतीच्या आंतरराष्ट्रीय अकॅडमीत सुरक्षित आहेत. भारतीय संस्कृती आशियात इतरत्र कशी पसरली, ह्याचे त्यांनी केलेले संशोधन मोलाचे आहे. नागपूर येथील ‘इंटरनॅशनल अकॅडमी ऑफ इंडियन कल्चर ह्या संस्थेचे ते संस्थापक आणि संचालकही होते. पैपलाद शाखेच्या अथर्ववेद संहितेची पहिली वीस कांडे डॉ. रघुवीरांनी १९३६ ते १९४० ह्या काळात प्रसिद्ध केली. त्यांनी प्रसिद्ध केलेल्या शब्दकोशांत Alikalibijaharam नावाचा संस्कृत तिबेटी-मंगोलियन कोश (१९४१) असून मंगोलियन-संस्कृत कोशाचा पहिला भाग (१९५८) अंतभूर्त आहे. इंग्रजी-भारतीय भाषांतील पारिभाषिक व तंत्रविषयक शब्दांचा एक कोशही त्यांनी तयार केला (१९५०). काँप्रेहेन्सिव्ह इंग्लिश-हिंदी डिक्शनरी ऑफ गव्हर्नमेंट अँड एज्युकेशनल वर्ड्‌स अँड फ्रेजीस (१९५५) हा त्यांचा कोशही उल्लेखनीय आहे. Fan Fan Yu हा भारतीय भौगोलिक नावांचा चिनी भाषेतील कोश (१९४३) आणि कवी बालिनीज देवनागरी स्क्रिप्ट मॅन्यूअल (१९५५) हे त्यांचे अन्य निर्देशनीय ग्रंथ.

केंद्रीय शासनाच्या साह्याने डॉ. रघुवीर यांनी सर्व भारतीय भाषांना वापरता येईल असा पारिभाषिक शब्दांचा कोश तयार करताना संस्कृत उपसर्ग, प्रकृती, प्रत्यय यांचा उपयोग केला. भारतातील सर्व भाषा संस्कृताधिष्ठित असल्यामुळे त्या सर्वांना एकच संस्कृतजन्य परिभाषा असावी, अशी त्यांची भूमिका होती. शास्त्रीय पद्धतीने त्यांनी सु. सहा लाख शब्द तयार केले. राष्ट्रभाषेची ही मोठीच सेवा होती पण असे शब्द बनविताना काही ठिकाणी कृत्रिमता आल्यामुळे या परिभाषेस विरोध झाला. तरीही ह्या दिशेने केलेला आरंभीचा प्रयत्न म्हणून डॉ. रघुवीर यांचे कार्य स्तुत्यच होय.

डॉ. रघुवीर ह्यांच्या कार्यामुळे त्यांना १९५२ मध्ये आणि १९५६ मध्ये असे दोनदा राज्यसभेचे सदस्य म्हणून नियुक्त केले गेले. ते काँग्रेसचे क्रियाशील सदस्य होते आणि स्वातंत्र्यलढ्यात त्यांनी कारावासही भोगला होता. भारतीय अर्थविकास आणि काँग्रेसमधील वैचारिक मतभेद ह्यांवरही त्यांनी सडेतोड लेखन केले होते. अखेरीस काँग्रेस सोडून ते जनसंघाचे सदस्य झाले आणि त्या पक्षातही आपल्या विचारांची छाप त्यांनी बसवली. त्या पक्षाच्या प्रचारकार्यासाठी प्रवास करीत असताना त्यांचे अपघाती निधन झाले.

कोपरकर, द. गं.