युंगर, एर्न्स्ट : (२९ मार्च १८९५− ). जर्मन कादंबरीकार आणि निबंधकार. आज पश्चिम जर्मनीत असलेल्या हायडल्‌बर्ग येथे जन्मला. १९१३ साली घरातून पळून जाऊन त्याने फ्रेंच सैन्यात (फ्रेंच फॉरिन लिजन) नोकरी स्वीकारली. पुढे पहिल्या महायुद्धात त्याने स्वेच्छेने भाग घेतला आणि पश्चिम आघाडीवर बहादुरी गाजवली. पुढे त्याने लाइपसिक आणि नेपल्स येथे प्राणिशास्त्र आणि तत्त्वज्ञान यांचा अभ्यास केला. दुसऱ्या महायुद्धात जर्मन सैनिकी अधिकारी म्हणून बरेच दिवस तो पॅरिसमध्ये होता. १९४१ ते ४४ ही वर्षे त्याने फ्रेंच कैदेत काढली. १९४४ मध्ये त्याची सुटका झाली.

इन श्टालगेविटरन (निबंध−१९२०, इं. भा. द स्टॉर्म ऑफस्टील, १९२९), डेर काम्फ अल्स इनरेस एरलेबनिस (१९२२, निबंध−इं. शी. द स्ट्रगल ॲज द इनर एक्सपिरिअन्स) आणि वेल्डषन १२५ (निबंध−१९२५, इं. भा. ए लिट्ल फॉरेस्ट, १९३०) या पहिल्या महायुद्धानंतर प्रसिद्ध झालेल्या आणि गाजलेल्या त्याच्या तीनही साहित्यकृतींतून त्याने युद्धाचा गौरवच केलेला दिसतो. युद्धाच्या ऐतिहासिक सत्याकडे हेतुपूर्वक डोळेझाक करून आणि माणुसकीशून्य दृष्टिकोणातून त्याने युद्ध म्हणजे बूर्झ्वा पद्धतीला शह देणारी आणि सुव्यवस्था स्थापन करणारी शक्ती, असे म्हटले आहे. युद्धातील अनुभव, सैनिकाची जीवनविषयक दृष्टी आणि सैनिकी अधिकाऱ्याची उच्चभ्रू धाटणीची विचारसरणी या गोष्टी त्याच्या लेखनातून आढळतात. भावनाशून्य नेमकेपणाने त्याने युद्ध आणि युद्धनीती यांचे वर्णन केले आहे. नाझींना तो जवळचा वाटला परंतु हिटलरच्या राजवटीसंबंधी त्याची भूमीका टीकाकाराचीच राहिली.

नेमकेपणा, अचूकपणा हे त्याच्या लेखनाचे वैशिष्ट्य त्याच्या सर्व लेखनात दिसून येते. दि टोटाल मोबिलमाखुंग (१९३१, इं. शी. द टोटल मोबिलायजेशन) आणि डेर आरबायटर (१९३२, इं. शी. द वर्कर) हे त्याचे राजकीय विचारात्मक लेखन. त्यातून संपूर्ण सेनासज्जतेची आणि श्रमिकाची (तंत्राधिष्ठित जगातील केवळ एक पूर्णांक ही) त्याची संकल्पना सर्वंकष सत्तावादाला उचलून धरणारी होती. युंगरने ह्या दोन ग्रंथांतून वर्तवलेली नव्या युगाची भविष्ये आणि कल्पना दुर्दैवाने भयंकर स्वरूपात हिटलरच्या कारकीर्दीत खऱ्या ठरल्या. शारीरिक आणि मानसिक पातळीवरचे बेधडक साहस ही त्याच्या लेखनामागची प्रेरणा होय.

दस आबेनटॉयरलिब हेर्झ (१९२९, इं. शी. द ॲडव्हेंचरस हार्ट) या त्याच्या निबंधसंग्रहात आणि आफ्रिकानिश श्पील (१९३६, इं. शी. आफ्रिकन गेम्स) या अनुभवकथनात त्याची सैनिकी आणि धडाडीची वृत्ती दिसून येते.

दीर्घकथा, कादंबरी असे लेखनही त्याने केले. आओफ देन मारमोरक्लीपन (१९३९, इं. भा. ऑन द मार्बल क्लिफ्‌स, १९४७), हेलिओपोलिस (१९४९) आणि दि ग्लेजर्नन बीनन (१९५७ इं. भा. द ग्लास बीज, १९६१) या त्याच्या तीन साहित्यकृतींतून तत्कालीन राजकीय प्रश्न आणि त्यांवरचे आदर्शवादी तोडगे आढळतात. दुसऱ्या महायुद्धाच्या आधी लिहिलेल्या त्याच्या निबंधांतून व रोजनिशांमधून तो कृतिवंताच्या भूमिकेतून बाहेर पडून निरीक्षकाच्या भूमिकेकडे वळताना दिसतो.

युद्धाचा गौरव करणाऱ्या युंगरने दुसऱ्या महायुद्धानंतर मात्र शांतता आणि स्वातंत्र्य यांचा पुरस्कार केला. ‘देर फ्रीड’ हा त्याचा लेख (लेखन १९४३ प्रकाशित १९४८, इं. भा. द पीस) ख्याती पावला. कलादृष्ट्या श्रेष्ठ आणि शांततेचा पुरस्कार करणारे त्याचे स्फुट लेख−देर वाल्डगांग (१९५१, इं. शी. द वॉक थ्रू द फॉरेस्ट)−बरेच गाजले.

युंगरच्या लेखनात आत्मानुभवावर विशेष भर आहे. ह्याचा एक परिणाम असा, की त्याच्या कथा-कादंबऱ्यांतील व्यक्ती, स्थळे आणि प्रसंग वास्तवातील व्यक्ती, स्थळे आणि प्रसंग ह्यांच्याशी स्पष्टपणे जोडलेले आढळतात तसेच त्याच्या लेखनातील विचारमंथन ‘मी’ शी जोडलेले असते.

महाजन, सुनंदा