रेमार्क, एरिख मारिआ : (२२ जून १८९८–२५ सप्टेंबर १९७०). मूळ नाव, एरिख पाऊल रेमार्क. जर्मन कादंबरीकार. ओस्नाब्ऱ्युक येथे जन्मला. वयाच्या अठराव्या वर्षी तो जर्मन सैन्यात दाखल झाला. १९३१ साली तो जर्मनी सोडून स्वित्झर्लंड येथे गेला. १९३३ मध्ये जर्मनीत त्याच्या ग्रंथांवर बंदी घालण्यात आली. १९३८ मध्ये, हिटलरच्या कारकीर्दीत त्याला जर्मन नागरिकत्व नाकारण्यात आले. १९३९ मध्ये तो अमेरिकेस गेला. १९४७ साली त्याला अमेरिकेचे नागरिकत्व देण्यात आले. १९४८ पासून पोर्तो रोंक आणि न्यूयॉर्क येथे त्याचे वास्तव्य होते. आस्कोना (स्वित्झर्लंड) येथे त्याचे निधन झाले.

रेमार्कची कीर्ती मुख्यतः इम वेस्ट निष्टस् नॉएस (१९२९, इं. भा. ऑल क्वाएट ऑन द वेस्टर्न फ्रंट, १९२९) ह्या त्याच्या कादंबरीवर अधिष्ठित आहे. पहिल्या महायुद्धावरील ती एक प्रातिनिधिक आणि सर्वोत्कृष्ट कादंबरी मानली जाते. युद्धातील सैनिकांच्या दैनंदिन जीवनाचा तो एक वास्तव वृत्तांतच होता. युद्धातील अनुभवांचा भेदकपणा ह्या कादंबरीने परिणामकारकपणे दाखवून दिला. त्यात नोंदवलेली सामान्य माणसाची तक्रार आणि युद्धाला असलेला विरोध यांमुळे या पुस्तकाचा खूपच गाजावाजा झाला. या कादंबरीच्या यशानंतर त्याने देऽर वेग त्सुऱ्युक (१९३१, इं. भा. द रोड बॅक, १९३१) आणि द्राय कामराइन (१९३८) या युद्धकादंबऱ्या लिहिल्या. त्याने आपल्या कादंबऱ्यांतून समकालीन समाजातील अपप्रवृत्तींवर टीका केली. युद्धाला आणि फॅसिझमला प्रखर विरोध केला. पहिल्या व दुसऱ्या महायुद्धांत यूरोपमध्ये झालेल्या सामाजिक राजकीय उलथापालथीच्या यातना भोगणारे लोक त्याने काही कादंबऱ्यांतून दाखविले. १९४५ मध्ये प्रकाशित झालेले आर्क दे ट्रियोम्फ (इं. शी. आर्क ऑफ ट्रायम्फ) हे पुस्तक त्या दृष्टीने उल्लेखनीय आहे. त्याच्या अन्य उल्लेखनीय पुस्तकांत लिबऽदाइनन नेखस्टन् (१९४१), देऽर फुंकऽ लेब्न् (१९५२, इं. भा. स्पार्क अँड ऑफ लाइफ, १९५२),त्साईट त्सु लेबन् उंट त्साईट त्सु श्टेर्बन (१९५४, इं. भा. ए टाइम टू लिव्ह अँड टाइम टू डाय, १९५४), देऽर हिमेल केन्ट् काईनऽग्युन्स्टलिंगऽ (१९६१, इं. शी. द हेव्हन इज नॉट नो एनी फेवरिट्‌स), शाटन इन पाराडिस, (१९७१, इं. शी. शॅडॉज इन पॅरडाइझ) ह्यांचा अंतर्भाव होतो.

महाजन, सुनंदा