मरिके, एडुआर्ट : ( ८ सप्टेंबर १८०४ – ४ जून १९७५ ). थोर जर्मन भावकवी. जन्म स्वेबिया ह्या जर्मन प्रदेशातील लुडविग्ज बर्ग येथे. ट्याबिगेन त्याने ईश्वरशास्त्राचे अध्ययन केले ( १८२२ – २६ ). काही काळ धर्मोपदेशक म्हणून काम केल्यानंतर तो सेवानिवृत्त झाला. १८५१ मध्ये मार्गारेट फोन स्पीथ ह्या स्त्रीशी त्याचा विवाह झाला, त्यानंतर स्टटगार्ट येथील एका मुलींच्या शाळेत त्याने जर्मन साहित्याचे अध्यापन केले ( १८५१ – १८६६ ). मरिकेची प्रकृत्ती ठीक नसे वैवाहिक जावनही सुखाचे नव्हते. आयुष्याच्या अखेरीस आपल्या पत्नीपासून तो विभक्त झाला होता. स्टटगार्ट येथे विपन्नावस्थेत तो निधन पावला.
मरिकेच्या कवितांचा पहिला संग्रह गेडिश्ट ( १८३८ ) ह्या नावाने प्रसिद्ध झाला. आपल्या जन्मग्रामाच्या आसमंतातील सुंदर निसर्गाबद्दल त्याला वाटणारे प्रेम त्यातील कवितांतून त्याने उत्कटपणे व्यक्त केलेले आहे. लोकगीतांचा साधेपणा त्याच्या उत्तम कवितांत आढळून येतो. त्याची कविता उदात्तगंभीर असली, तरी तीत मार्मिक विनोदाची प्रचीतीही अनेकदा येते. अनेक काव्यप्रकार त्याने यशस्वीपणे हाताळले आहेत. प्राचीन ग्रीक – रेमन कवींचे संस्कारही त्याच्या कवितेवर झाल्याचे दिसून येते. मरिकेच्या कवितेची आरंभी उपेक्षा झाली तथापि नंतर विख्यात जर्मन कवी गटे ह्याच्या तोलाचा भावकवी म्हणून त्याला मान्यता मिळाली.
मरिकेने गद्यलेखनही केले. मालर नोल्टेन ( १८३२, इं. शी. पेंटर नोल्टेन ) ही कादंबरी आणि मोत्सार्ट आउट डेअर राइस नाख प्राग ( १८५६, इं. शी. मोत्सार्ट ऑन हिज जर्नी टू प्राग ) ही त्याची दीर्घकथा सूक्ष्म मनोविश्लेषण आणि कलात्मक व्यक्तिचित्रण ह्या दृष्टींनी उल्लेखनीय आहे. मालर नोल्टेन वर गटेच्या विल्हेल्म माइस्टर … चा प्रभाव जाणवतो. मोत्सार्ट आउफ…मध्ये मोत्सार्ट ह्या जगद्विख्यात संगीतकाराच्या जीवनातील एका दिवसाचे अत्यंत प्रभावी असे चित्रण केलेले आहे.
संदर्भ : Mare, Margaret, Edward Morike : The Man and the poet, London, 1957.
देसाई, म. ग.