कृष्ण पिळ्ळा, ई. व्ही.: (१८९५–१९३८). मलयाळम्‌मधील प्रसिद्ध विनोदी लेखक. त्यांचा वकिलीचा व्यवसाय होता. त्यामुळे त्यांना नाना प्रकारच्या व्यक्ती व प्रसंग यांचा जवळून परिचय घडला. त्यांनी त्यांचे चित्रण आपल्या साध्या, विनोदी व प्रसन्न शैलीत केले आहे. त्यांची गणना मलयाळम्‌मधील उत्कृष्ट गद्यलेखकांत केली जाते. चिरियुम् चिंतयुम्  (चौथी आवृ. १९५३, ‘हंसू व विचार’) हा त्यांच्या उत्कृष्ट विनोदी आणि विचारप्रवर्तक ललित निबंधांचा संग्रह होय.

त्यांच्या कथालेखनाने मलयाळम् कथेस नवे वळण लागले. त्यांच्या कथा केळिसौधम्  नावाने दोन खंडांत (पहिला खंड, दुसरी आवृ. १९३४ व दुसरा खंड, १९५१) संगृहीत आहेत. सूक्ष्म मानसचित्रण, मार्मिक विनोद, उठावदार व्यक्तिचित्रण व समर्पक शैली हे त्यांच्या कथेचे विशेष असून त्यांनी मलयाळम् कथेस खोली व प्रतिष्ठा मिळवून दिली. त्यांच्या विनोदी कथा करमणूकप्रधान आहेत.

ऐतिहासिक व विनोदी नाटके लिहिणाऱ्यांत ई. व्हीं. चे स्थान वैशिष्ट्यपूर्ण आहे. त्यांची सीतालक्ष्मि (१९२६), राजा केशवदासन् (चौथी आवृ. १९५३) आणि इरक्कट्टिविप्विळ्ळा (१९३३) ही सुरुवातीच्या काळात लिहिलेली ऐतिहासिक नाटके दर्जेदार आहेत. ऐतिहासिक नाटकांनंतर ते विनोदी नाटकांकडे व प्रहसनांकडे वळले. बी. ए. मायावी (१९३४), प्रणय कमिशन (तिसरी आवृ. १९४९), मायामानुषन् (१९३५) आणि पेण्णरशुनाटु (तिसरी आवृ. १९५३) ह्या त्यांच्या सुखात्मिका उल्लेखनीय होत. वाचकांना केवळ हसविणे हाच त्यांच्या लेखनामागील हेतू आहे व तो कमालीचा यशस्वीही झाला आहे. केरळमध्ये आणि केरळबाहेरही अनेक वर्षे त्यांच्या ह्या नाटकांचे प्रयोग गाजत होते. त्यांनी जीवितस्मरणकळ (१९४७) हे विनोदी आत्मचरित्रही लिहिले आहे. विनोदी लेखक म्हणून मलयाळम् साहित्यात त्यांचे स्थान महत्वपूर्ण मानले जाते.

 नायर, एस्. के. (इं) सुर्वे, भा. ग. (म.)