कृष्ण पिळ्ळा, चंगम्पुळ : (१९१४–१९४८). आधुनिक मलयाळम् कवी. जन्म कोचीनजवळील इटप्पल्ली ह्या गावी. ⇨एटप्पळ्ळी राघवन् पिळ्ळा (१९०९–३६) हे प्रसिद्ध कवीही येथीलच रहिवासी होते व चंगम्पुळांचे लहानपणापासून परम मित्र होते. चंगम्पुळांनी दारिद्र्याशी झगडतच आपले पदव्युत्तर शिक्षण संपादन केले. लहानपणीच त्यांनी काव्यरचनेस सुरुवात केली. त्यांच्या कवितेने अल्प काळात सर्वच स्तरांतील वाचकांचे लक्ष वेधून घेतले. त्यांची कविता प्रामुख्याने स्वच्छंदतावादी भावकविता आहे. लोकसंगीतातील चालींचे त्यांनी आपल्या भावकवितेत पुनरुज्जीवन केले. उच्च प्रतीचे संगीत आणि तरुण मनाच्या साध्याभोळ्या आशा-आकांक्षांचा मधुर शब्दांतील आविष्कार त्यांच्या कवितेत आढळतो. त्यांचे परम मित्र एटप्पळ्ळी राघवन् पिळ्ळा यांच्या आत्महत्येने चंगम्पुळांच्या मनावर मोठा आघात झाला. ह्या मित्राच्या मृत्यूवर त्यांनी रमणन् (१९३६) नावाची जानपद स्वरूपातील एक विलापिका लिहिली. त्यांची ही विलापिका इतकी लोकप्रिय झाली, की तिच्या केवळ पाच वर्षांत सु. पस्तीस आवृत्त्या निघाल्या. दुसऱ्या महायुद्धात आघाडीवर लढणारे केरळीय सैनिक तिच्यातील ओळी गात गात तीत वर्णिलेल्या सुखदुःखांशी समरस होत. मलयाळम् साहित्यात त्यांच्या प्रस्तुत विलापिकेचे स्थान अनन्यसाधारण आहे. अल्पावधीतच चंगम्पुळांची कीर्ती सर्वत्र होऊन त्यांना विपुल पैसाही मिळाला. तथापि दारूचे व्यसन जडून तारुण्यातच क्षयरोगाने त्यांचे निधन झाले.

चंगम्पुळांनी विपुल काव्यलेखन केले. त्यांचे लहानमोठे सु. चाळीस काव्यग्रंथ आहेत. त्यांच्या सुरुवातीच्या काव्यात सुंदर आत्माविष्कार आढळत असला, तरी नंतरच्या काव्यात मात्र त्यांनी सामाजिक दोष व अनिष्ट रूढी यांविरुद्ध आवाज उठविलेला दिसतो.

यूरोपीय स्वच्छंदतावादी काव्याचा त्यांच्यावर विशेष प्रभाव होता. सरलता, हृद्य संगीतमयता, उत्कृष्ट शब्दकळा आणि अभिव्यक्तीतील कमालीचा साधेपणा यांमुळे त्यांचे काव्य सर्वसामान्य जनतेत अत्यंत लोकप्रिय झाले. रमणन्  ह्या विलापिकेव्यतिरिक्तचे त्यांचे उल्लेखनीय काव्यग्रंथ पुढीलप्रमाणे होत : बाष्पांजलि (सहावी आवृ. १९५२), मोहिनि (१९४४), हेमंतचंद्रिका (तिसरी आवृ. १९४७), संकल्पकांति (तिसरी आवृ. १९४६), तिलोत्तम (तिसरी आवृ. १९४७), पाटुन्न पिशाचु (१९४९), मानसेश्वरि (१९४१) व रक्तपुष्पंगळ (तेरावी आवृ. १९४२). काव्याशिवाय त्यांनी काही गद्य लेखनही केले आहे. त्यात कथारत्नमालिका (दुसरी आवृ. १९४१), शिथिल हृदयम् (१९५०) इ. कथासंग्रह अनश्वर गानम् (१९४६), मानसांतरम् (१९४८), विवाहालोचन (दुसरी आवृ. १९५१) इ. नाटके आणि काही एकांकिका यांचा अंतर्भाव होतो.

नायर, एस्. के. (इं) सुर्वे, भा. ग. (म.)