सानू, एम्. के. : ( २७ ऑक्टोबर १९२८– ). प्रसिद्घ अष्टपैलू मलयाळम् लेखक. त्यांचा जन्म मध्यमवर्गीय कुटुंबात थंपोली (जि. अलेप्पी, केरळ) येथे झाला. बालपणीच त्यांचे वडील वारले (१९३९). त्यामुळे घरची जबाबदारी त्यांच्यावर पडली. त्यांनी एम्. ए. ही पदवी मलयाळम् भाषा विषयात संपादन केली. त्यांनी सुरुवातीस कोल्ल्म येथील श्री नारायण महाविद्यालयात अधिव्याख्याता म्हणून अध्यापन केले (१९५५-५६). त्यानंतर ते एर्नाकुलमधील महाराजा महाविद्यालयात अधिव्याख्याता झाले (१९५६). मलयाळम् भाषा विभागाचे प्रमुख म्हणून त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली (१९८३) आणि उर्वरित जीवन लेखन-वाचनाच्या व्यासंगात व्यतीत करण्याचा निर्धार केला. अध्यापन करीत असताना त्यांनी लेखनास प्रारंभ केला. त्यांचे पहिले अनुवादित पुस्तक अंचू शास्त्र नायकन्मार १९५८ मध्ये प्रकाशित झाले आणि त्यानंतर त्यांनी एकामागून एक चरित्रे व समीक्षाग्रंथ लिहिले. मलयाळम् साहित्यात पाश्चात्त्य समीक्षाप्रणालीचा अवलंब करणारे सानू हे एक प्रमुख समीक्षक होत.

त्यांनी विपुल लेखन केले. २०११ पर्यंत त्यांचे छत्तीस स्वतंत्र ग्रंथ असून, अनुवादित चार ग्रंथ व संपादित दहा ग्रंथ आहेत. त्यांचे बहुतेक सर्व लेखन मलयाळम्मध्ये आहे. त्यांच्या ग्रंथांपैकी अष्टमिक्कथवेलिचम् (१९६२), नारायण गुरु स्वामी (१९७६), सहोदरन अय्यप्पन (१९८०), चंगम्पुळ्ळ कृष्ण पिळ्ळा (१९८९), मृत्युंजयम् काव्यजीवितम् (१९९६), पार्वती अम्मा: असरानारुदे अम्मा (२०००), एम्. गोविंदन् (२००२), बशीर : एकन्थ वीधियिले अवधूथन् (२००७) ही सर्व चरित्रे कात्तुम वेंलिचवूम (१९६०), राजवीडी (१९६५), अवधरनम् (१९८४), अनुभूतियूडे निरंगल (१९८५) हे समीक्षाग्रंथ विश्वसाथी लेक्कूवीन्दम् (१९५८), अमेरिकन साहित्यम् (१९६६), ही अनुवादित पुस्तके थझवरयिले संध्या (दोन खंड,१९९३) हा शब्दचित्रांचा संग्रह इ. प्रसिद्घ होत. यांशिवाय त्यांनी सहोदर सप्तति (१९६०), सहोदरन्ते पद्यकृतिकल (१९८१), कुसुथिते कृतिकल (१९८९) इ. सुप्रसिद्घ ग्रंथांसह अन्य काही ग्रंथ संपादिले आहेत. त्यांचा नियतकालिकांशी, मान्यवर संस्थांशी संपादक, सदस्य, अध्यक्ष इ. नात्यांनी संबंध आला. कुमकुमन ह्या मलयाळम् साप्ताहिकाचे (कोल्ल्म) ते मुख्य संपादक होते (१९९१–२०००). ते पुरोगामी कला साहित्य संघम्चे अध्यक्ष होते (१९८४), तसेच केरळ साहित्य अकादेमीचे अध्यक्ष होते. आंतरराष्ट्रीय मानवा-धिकार आयोगाचेही ते सदस्य आहेत. महात्मा गांधी विद्यापीठातील (कोट्टायम) श्री नारायण अध्यासनावर त्यांची संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली (१९९७). याशिवाय ते एर्नाकुलम् मतदारसंघातून केरळ राज्याच्या विधानसभेवर निवडून आले होते (१९८७– ९१).

त्यांना अनेक मानसन्मान लाभले, त्यांपैकी केरळ साहित्य अकादेमी (१९८५), अबुधाबीशक्ती (१९८८), कुसुम (१९८९), वयलार (१९९२), श्री नारायण जयंती (१९९३), के. टी. अच्युथन (१९९४), सहोदरन (२००२), केरळ साहित्य अकादेमी (एकूण वाङ्‌मयीन कामगिरीसाठी ) (२००३), व्ही. के. राजन (२००९), केंद्र शासनाचा साहित्य अकादेमी (२०११) वगैरे काही प्रतिष्ठेचे पुरस्कार-सन्मान होत.

वृद्घापकाळीही त्यांचे लेखन-वाचन चालू आहे.

भटकर, जगतानंद