मलयाळम् साहित्य : केरळ हा भारतीय द्वीपकल्पाचा अगदी दक्षिणेकडचा चिंचोळा भूखंड आहे. भारताच्या इतर भागांपासून एका बाजूला पडल्यामुळे केरळला फार प्राचीन काळापासून आपल्या स्वतःच्या संस्कृतीचे एक खास रूप जपणे शक्य झाले आहे. तो जरी भारताच्या इतर भागांपासून बाजूला पडलेला असला, तरी ख्रिस्ताच्याही आधीपासून जलमार्गाने जगातील इतर संस्कृतींबरोबर त्याचे संबंध होते. ग्रीस, रोम, बॅबिलोनिया आणि ईजिप्त यांच्या बरोबर त्याचे व्यापारी संबंध होते. केरळची जनता फार सहिष्णू असल्यामुळे ख्रिस्ती, मुसलमान व ज्यू लोक केरळमध्ये आपल्या वसाहती स्थापन करू शकले. विविध प्रकारच्या भिन्न-भिन्न संस्कृती व धर्म यांच्या संगमातून निर्माण झालेली एक खास संस्कृती केरळमध्ये आहे आणि ती तेथील साहित्यामध्ये प्रतिबिंबित झालेली आहे. [⟶ केरळ].

मलयाळम् ही तमिळ, कन्नड, तेलुगू यांचा अंतर्भाव असलेल्या द्राविडी भाषा-कुलातील असल्यामुळे ती तमिळची भाषाभगिनी मानली जाते. शब्दसंग्रहाच्या बाबतीत तिने संस्कृत, इंग्रजी, अरबी, उर्दू, हिंदी, पोर्तुगीज आणि फ्रेंच यांचे ऋण स्वीकारले आहे. मलयाळम् साहित्यावर प्रारंभीच्या काळात तमिळ व संस्कृत यांचा आणि अलीकडच्या काळात इंग्रजीचा प्रभाव पडला आहे. तसेच यूरोप, रशिया, अमेरिका आणि आफ्रिका यांच्या साहित्यांमधील सर्वोत्तम गोष्टी मलयाळम् साहित्य आत्मसात करीत आहे. [⟶मलयाळम् भाषा].

 

उगम : एक बोली भाषा म्हणून मलयाळम् किमान इ.स. च्या प्रारंभापासून अस्तित्वात असली पाहिजे परतु एक स्वतंत्र व संस्कारसंपन्न भाषा म्हणून आपल्या स्वतंत्र व्यक्तिमत्वाचा प्रभाव पाडण्यास तिने सुरूवात केली, ती मात्र नवव्या शतकानंतर. त्या कालखंडापूर्वी मल्याळी लोकांच्या सर्जनशील आकांक्षेचा आविष्कार तमिळ व संस्कृतमधून होत होता. केरळमधील इळंगो अडिगळनामक तरूण राजपूत्राने शिलप्पधिकारम् हे दरबारी महाकाव्य तमिळमध्ये लिहिले होते. शक्तिभद्राचा आश्चर्यचूडामणी, कुलशेखराची मुकुन्दमाला आणि शंकराचार्यांचे अनेक ग्रंथ या संस्कृतमधील साहित्यकृती होत. ही परंपरा अजूनही चालू आहे.

प्राचीन काळी केरळवर छोट्या-छोट्या सरदारांचे वा राजांचे राज्य चालत असे आणि ते साहित्याचेही आश्रयदाते होते. कालिकत येथील मानविक्रम झामोरीन (सामूतिरी) राजाच्या दरबारात विख्यात असा एक मलयाळम् कवी आणि अठरा संस्कृत पंडित होते. ब्रिटिशांचे राज्य भारतात स्थिरावल्यानंतर केरळचा उत्तरेकडील मलबार नावाचा प्रदेश त्यांच्या प्रत्यक्ष आधिपत्याखाली आला. मधल्या आणि दक्षिणेकडील प्रदेशांवर मात्र अनुक्रमे कोचीन आणि त्रावणकोर येथील राजांचे राज्य होते. या राज्यांचे राजे कला व वाङ्‌मय यांचे आश्रयदाते होते. एकोणिसाव्या शतकात कोटुंगळ्‌ळूर हे एक विद्येचे केंद्र होते. १ नोव्हेंबर १९५६ रोजी केरळच्या भाषिक राज्याची स्थापना झाल्यानंतर साहित्याला उत्तेजन देण्याचे कार्य केरळ साहित्य अकादेमीने स्वीकारले आहे. सध्या संपूर्ण राज्यात साहित्यिक उपक्रम जवळजवळ एकजिनसी असून केरळच्या बाहेर भारतात वा परदेशात राहणारे मल्याळी लोकही मलयाळम्‌च्या विकासामध्ये अत्यंत महत्वाची भूमिका पार पाडत आहेत.

साहित्यिक कालखंड : मलयाळम्‌साहित्याचा इतिहास पुढील तीन कालखंडांमध्ये विभागणे शक्य आहे : (१) प्राचीन-प्रारंभापासून १५ व्या शतकापर्यंत (२) मध्ययुगीन-पंधराव्या शतकापासून एकोणिसाव्या शतकाच्या अखेरपर्यंत आणि (३) आधुनिक-१९०१ पासून आजपर्यंत.

प्राचीन कालखंड : या कालखंडात पद्यलेखन हे स्वाभाविकपणे गद्यलेखनापेक्षा वरचढ होते. येथे पद्यलेखनाचा प्रवाह पुढील तीन धारांमधून प्रवाहित झाला होता : (१) लोकगीते, (२) पाट्‌टू व (३) मणिप्रवाळम्‌.

लोकगीते : लोकगीतांच्या बाबतीत काळाचा निश्चित असा निर्देश करणे शक्य नाही. तुलनात्मक दृष्ट्या अलीकडच्या काळातदेखील त्यांची निर्मिती झाली आहे. या गीतांमध्ये बरीच विविधता आढळते. कर्मकांडाचे अनुष्ठान, व्यवसाय व अशाच गोष्टींशी संबंधीत अशी ही गीते आढळतात. नंतरच्या काळातील लोकगीते व पोवाडे यांच्यामधून ऐतिहासिक घटनांचे कथन आढळते तसेच विख्यात अशा नायक-नायिकांच्या विशेष पराक्रमांची पुरेपूर स्तुतीही आढळते. त्यासर्वांमधून एक निर्व्याज साधेपणा व्यक्त होतो. त्यांच्यापैकी काहींमध्ये दैनंदिन जीवनातील विदारक वास्तवतेबरोबरच विनोदबुद्धीचेही दर्शन घडते. प्रतिकात्मक महत्व असलेली गीतेही आढळतात. त्यांच्यातील छंदांची विविधता आणि संगीताचा गुणधर्म प्रशंसनीय आहे. उत्तर मलबारमधील मुस्लिमांमध्ये प्रचलित असलेल्या ‘माप्पिळप्पाट्‌टु’ नावाच्या लोकगीतांचे संगीत अंतःकरण हेलावून सोडणारे असून या बाबतीत ही गीते अतुलनीय आहेत. ही धारा अगदी मध्ययुगीन कालखंडापर्यंत चालू असल्याचे आढळते.

पाट्‌टू : रामचरित हा या कालखंडातील महत्वपूर्ण असा पहिला ग्रंथ होय. तो प्रामुख्याने रामायणाच्या युद्धकांडावर आधारलेला आहे. तो बाराव्या शतकातील आहे. त्याच्यामध्ये फक्त तमिळ भाषेतील वर्णाक्षरांचाच उपयोग केलेला आहे. साहित्यिक दृष्टिकोणापेक्षा भाषाशास्त्रीय दृष्टिकोणातूनच त्याचे महत्व अधिक आहे. चीरामन् हा त्याचा लेखक आहे. वाल्मीकीला अनुसरताना वाल्मीकीकडून जे घेतले आहे त्याचा संक्षेप वा विस्तार करणे आणि काही वेळा काही भाग गाळणे या प्रकारे त्याने आपले कथनकौशल्य व्यक्त केले आहे. या ग्रंथात १६४ विभाग आणि १,८१४ श्लोक असून त्यातील वीररस व भक्तिभावना यांचे रेखाटन कौतुकास्पद आहे.

 

या कालखंडात गद्याकडे विशेष लक्ष दिले जात नव्हते. अर्थात त्या काळातील काही कोरीव लेख सापडले आहेत. भाषाकौटलीयम् हा या कालखंडातील नोंद  घेण्यासारखा गद्यग्रंथ होय. हे कौटिल्याच्या अर्थशास्त्राचे मल्याळम् रूपांतर असून या ग्रंथामध्ये स्पष्टीकरणात्मक टीपांचा अंतर्भाव करण्यात आला आहे. लेखकाने छोट्या व मोठ्या वाक्यांचे मिश्रण करून आपले भाषाप्रभुत्व स्पष्टपणे दाखवून दिले आहे. हा ग्रंथ बाराव्या शतकातील आहे. मलयाळम्‌मधील गद्याचा विकास हा धार्मिक मूल्यांच्या प्रसाराशी निगडित राहिलेला आहे.

निरणम् ग्रंथ: एकाच कुटुंबातील तीन कवींच्या ग्रंथांना एकत्रितपणे त्या कवींच्या जन्मस्थानावरून ‘निरणम् ग्रंथ’ असे म्हटले जाते. राम पणिक्कर, माधव पणिक्कर आणि शंकर पणिक्कर हे ते तीन कवी होत. राम पणिक्कर यांनी रामायण, भारत (महाभारत) भागवत यांचे मलयाळम्‌मध्ये रूपांतर केले आहे. याखेरीज त्यांनी शिवरात्रिमाहात्म्य हा ग्रंथ लिहिला असून त्यामध्ये शिवाला वाहिलेल्या रात्रीचे महत्त्व स्पष्ट केले आहे. माधव पणिकर यांनी भगवद्‌गीतेचे  मलयाळम्‌मध्ये भाषांतर केले आहे. भारतमाल हा शंकर पणिक्कर यांचा ग्रंथ म्हणजे महाभारताचे दुसरे रूपांतर होय. या कवींनी केलेला संस्कृत भाषेच्या वर्णमालेतील सर्व वर्णाक्षरांचा उपयोग हा संस्कृतच्या मलयाळम्‌वरील वाढत्या प्रभावाचा द्योतक आहे. तरीही त्यांनी प्रादेशिक वातावरण अबाधित ठेवले आहे, ते प्रामुख्याने द्रविड यमके व तालबद्धता यांचा वापर करून.


हे कवी चौदाव्या आणि पंधराव्या शतकांतील असल्याचे मानले जाते. ते तिघेही शब्दालंकार व अर्थालंकार यांचा वापर आणि विविध रस व भावना यांचा आविष्कार यांबाबतीत पुरेपूर कौशल्य व्यक्त करतात. यांतील राम पणिक्कर हे कवी म्हणून इतर दोघांहून श्रेष्ठ आहेत.

रामकथाप्पाट्‌टू : हा ग्रंथ चौदाव्या व पंधराव्या शतकांतील असल्याबद्दलची विविध मते विद्वानांनी मांडली आहेत. या ग्रंथाचा लेखक  अय्यपिळ्‌ळा आशान हा त्रिवेंद्रमजवळील कोवलम् या गावचा होता. हे लोकसाहित्याच्या परंपरेतील एक उत्कृष्ट महाकाव्य आहे. उत्तरकांड वगळलेल्या या काव्यात सु. २५ हजार ओळींमध्ये रामकथा सांगितलेली आहे. लेखकाने  तमिळ, मलयाळम् आणि संस्कृत शब्दांचे अनुरूप असे मिश्रण केले असून त्याने वाल्मीकीच्या आधारे आपल्या स्वतःच्या रामायणाची रचना केली आहे. संक्षेप, विस्तार तसेच काही भाग गाळणे आणि काही ठिकाणी मूळ भागाला बगल देणे या बाबतींत त्याने सुरेख कलाभिज्ञता दाखविली आहे. या काव्यामध्ये मौखिक व लिखित महाकाव्याच्या गुणधर्माचा मिलाफ आढळतो. आशान यांनी नाटककाराची अलिप्तता स्वीकारली आहे विविध वृत्तांचा उपयोग केला आहे योग्य ठिकाणी इष्ट अशा रसांचा आविष्कार केला आहे वर्ण्यविषयाला साजेशा पद्धतीने शैलीला आकार दिला आहे मुख्य कथानकामध्ये घटना अत्यंत कौशल्याने गुंफल्या आहेत आणि रीतीने मलयाळम्‌मध्ये एक अपूर्व साहित्यकृती सादर केली आहे.

मणिप्रवाळम् : पाट्‌टूच्या बरोबरीने ‘मणिप्रवाळम्’ नावाची दुसरी एक साहित्यिक चळवळ अस्तित्वात होती. मणिप्रवाळ या साहित्यप्रकारात मलयाळम् व संस्कृत शब्दांचे मुक्तपणे मिश्रण केले जाई. या संप्रदायाचे कवी प्रादेशिक भाषेच्या माध्यमातून संस्कृत भाषेच्या काव्यसंस्कृतीचे दर्शन घडविण्याचा प्रयत्नच करीत होते. ही प्रवृत्ती बहुसंख्य भारतीय भाषांमध्ये आढळून येत होती. ही चळवळ त्या कालखंडातील विख्यात गणिकांची प्रशंसा करण्याकडे खास लक्ष देत होती, हे तिचे एक लक्षणीय वैशिष्ट्य होय. या चळवळीतील लेखनाचा विस्तार प्रचंड असला पाहिजे, हे एका अज्ञात लेखकाने चौदाव्या शतकात लिहिलेल्या लीलातिलकम् या ग्रंथावरून ध्यानात येते. या ग्रंथात मणिप्रवाळ या साहित्यप्रकाराची व्याख्या व उदाहरणे दिली आहेत. या संमिश्र भाषेतील अनेक ग्रंथांची तुलना केली असता असे दिसून येते, की मलयाळम् काव्याने आपल्या स्वतःच्या परंपरेचा वारसा जपताजपताच संस्कृतमधील उत्तम गोष्टीही आत्मसात केल्या आहेत.

वैशिकतन्त्रम् : वैशिकतन्त्रम् हे एका अज्ञात लेखकाचे पुस्तक तेराव्या शतकातील आहे. गणिकांची कला व कसब यांविषयीची ही सु. २६० श्लोकांची एक पुस्तिका आहे. आविष्काराचे सौंदर्य आणि अर्थवाहिता यांमुळे तिला काव्याचा दर्जा प्राप्त झाला आहे. त्या काळी अशाच प्रकारचे साहित्य संस्कृतमध्ये आणि बहुधा इतर भारतीय भाषांमध्येही निर्माण होत होते. या पुस्तकाचा एकूण सूर नीतिबाह्य आहे. लेखकाला जगरहाटीची चांगली जाण होती, असे दिसते. हे पुस्तक दैनंदिन जीवनातून उचललेल्या चित्रात्मक उपमांनी भरलेले आहे.

प्रारंभीची चंपूकाव्ये (गद्यपद्यमिश्रित काव्ये) : प्रारंभीच्या मणिप्रवाळ कालखंडातील अज्ञात लेखकांची तीन चंपूकाव्ये आढळतात. उणिण्‌यच्चीतचरितम्, उणिणच्चिरचरितम् आणि उणिणयाटीचरितम् ही ती तीन चंपूकाव्ये होत. या काव्यांना ज्यांची नावे देण्यात आली आहेत, त्या नायिकांच्या स्तुतिप्रीत्यर्थ ही सर्व काव्ये लिहिली आहेत. त्या नायिका विख्यात अशा गणिका होत्या. वर्णनाच्या ओघात ही काव्ये तत्कालीन समाजस्थितीचे ओझरते दर्शन घडवितात. सर्वच मलयाळम् चंपूंमधील गद्यभाग देखील तसे पाहू जाता लयबद्ध आणि काहीसा मलयाळम् वृत्तसदृशच रचलेला आहे. या चंपूंमधूनही हे वैशिष्ट्य आढळते.

वेगवेगळ्या संस्कृत वृत्तांमधील २९२ श्लोकांचे पद्यरत्नम् हे गणिकांच्या स्तुतीला वाहिलेले प्रारंभीच्या मणिप्रवाळ शैलीतील कवितांचे एक संकलन आहे. या कविता लिहिणाऱ्या अनामिक कवींनी शृंगाररसाचे विविध पैलू कौतुकास्पद रीतीने प्रकट केले आहेत.

संदेशकव्या : कालिदासाच्या मेघसंदेशावर (मेघदूतावर) बेतलेली आणि त्याचे अनुकरण करणारी अशी या प्रकारची अनेक काव्ये मलयाळम् या दोन्ही भाषांमध्ये लिहिली आहेत. त्यांपैकी लक्ष्मीदासाचे संस्कृतमधील शुकसंदेश आणि एका अज्ञात कवीचे मलयाळम्‌मधील उण्णुनीलिसंदेश ही दोन काव्ये अत्यंत महत्त्वाची आहेत. ती दोन्ही चौदाव्या शतकातील आहेत. उण्णुनीलिसंदेशात मंदाक्रांता वृत्तातील २४२ श्लोक आहेत. त्यातील अभिव्यक्ती उत्कृष्ट असून त्यामध्ये विरहभावना प्रभावी रीतीने व्यक्त झाली आहे. येथे दूत हा एक राजपुत्र आहे आणि नायिका ही एक गणिका आहे. हे काव्य मेघसंदेशाच्या मांडणीचे अनुकरण करणारे आहे परंतु मेघसंदेशाच्या प्रारंभी नसलेली प्रस्तावना याच्या प्रारंभी नसलेली प्रस्तावना याच्या प्रारंभी आहे. या प्रकारातील कोकसंदेश हे अपूर्ण काव्यदेखील महत्त्वाचे आहे.

आशय आणि हाताळणी या दोन्ही दृष्टींनी चंद्रोत्सवम् ही एक खास साहित्यकृती आहे. त्यामध्ये चंद्रासाठी साजऱ्या केल्या जाणाऱ्या एका उत्सवाचे वर्णन आहे. या उत्सवाचे संचालन मेदिनीवेण्णिलावू नावाची एक विख्यात गणिका करीत असे. ५ सर्ग आणि संस्कृत वृत्तांतील ५६९ श्लोक असलेले हे एक खंडकाव्य आहे. त्यातील कवीच्या भाषाप्रयोगातील चटकन जाणवणारी सहजता आणि मलयाळम् आणि संस्कृत यांचे सुरेख मिश्रण विशेष प्रशंसनीय आहे.

पूनम नंपूतिरी या कवीच्या नावावर असलेले पंधराव्या शतकातील मापारामायणचंपु हे काव्य म्हणजे रामायणाचे चंपूशैलीतील कथन आहे. आपल्या ग्रंथाचा आधार म्हणून एखाद्या गणिकेचे जीवन निवडण्याऐवजी एक महाकाव्य निवडताना पूनम कवीने रूढ मार्ग सोडून दिल्याचे दिसते. पुराणांतील कथा मौखिक पद्धतीने सादर करण्याच्या पाठकम् नावाच्या एका मनोरंजक कलाप्रकारात एकेकाळी या चंपूचा उपयोग केला जात असे. यातील सर्व वर्णने भडक रंगात आहेत. पूनम कवीचे संस्कृत व मलयाळम् या भाषांवरील प्रभुत्व खरोखरच कौतुकास्पद आहे.

नल व दमयंती यांची कथा सांगणारे भाषानैषधचंपु हे आणखी एक महत्त्वपूर्ण चंपूकाव्य होय. ‘मळमंगलम्’ हा या चंपूचा लेखक सतराव्या शतकात होऊन गेला. पूनमप्रमाणेच त्यालाही विनोदाची चांगली जाण आहे. सामान्यतः चंपूकाव्यांचे लेखक मोठ्या प्रमाणात विद्वत्ता व प्रतिभा प्रकट करतात परंतु काही वेळा त्यांचे लेखन केवळ पांडित्यपूर्ण बनते.


चेरूश्शेरी नंपूतिरी यांचे पंधराव्या शतकातील कृष्णगाथा हे सर्वार्थाने एक उत्कृष्ट महाकाव्य आहे. ते मलयाळम् वृत्तामध्ये रचलेले असून प्रामुख्याने भागवताच्या दशम स्कंधावर आधारलेले आहे. त्याची भाषा बहुतांशी आधुनिक आहे. लेखक जरी संस्कृतचा उत्तम जाणकार असला, तरी त्याचे काव्य देशी प्रतिमेशी पूर्णपणे सुसंगत आहे. एका साध्या, प्रवाही, नम्र. परंतु वेळोवेळी अलंकृत अशा शैलीमध्ये त्याने आपल्या काव्याचा प्रमुख रस म्हणून शांतरसाचा परिपोष प्रभावी रीतीने साधला आहे. प्रारंभीची वात्सल्यभावना आणि रासक्रीडेच्या वर्णनातील शृंगाराभास (शृंगारामध्ये विवाहबाह्य वगैरे प्रकारच्या रतीचे वर्णन) अत्यंत आकर्षक आहेत. कृष्णगाथा या काव्यामध्ये लोकगीतांचा निर्व्याज साधेपणा आणि दरबारी महाकाव्याची अभ्यासपूर्ण कृत्रिमता यांचा मिलाफ झालेला आहे.

मध्ययुगीन कालखंड : एळुत्तच्छन : पंधराव्या व सोळाव्या शतकांत मलयाळम् साहित्याचा विकास झपाट्याने झाल्याचे दिसते. कृष्णगाथा या काव्याच्या रूपाने मलयाळम्‌मध्ये काव्याच्या भाषेला एक आदर्श स्वरूप प्राप्त झाले, असे म्हणता येईल परंतु आधुनिक मलयाळम्‌चे जनक मानले जातात ते एळुत्तच्छन हेच. ‘रामचरितम्’, ‘निरणम्’ काव्ये आणि चेरूश्शेरी यांचे काव्य यांमध्ये जिचे अस्पष्टसे दर्शन घडत होते, त्या भक्तीचा बहर आपणाला एळुत्तच्छन यांच्या काव्यामध्ये आढळतो. मल्याळी लोकांची भक्ती संस्कृतमधूनही आविष्कृत झाली आहे. मेल्‌पत्तूर नारायण भट्टतिरी यांचे नारायणीयम्‌ हे काव्य त्याचे एक उत्तम उदाहरण होय. संस्कृत उपसर्ग, प्रत्यय वगैरेंचा अभाव असलेले संस्कृत शब्द आणि मलयाळम् शब्द यांच्या सुखद मिश्रणाने तयार झालेल्या एका काव्यशैलीचा विकास, हे एळुत्तच्छन यांनी मलयाळम् भाषेला दिलेले योगदान होय. अनुकरणातीत असलेल्या या शैलीमध्ये एळुत्तच्छन यांनी रामायणमहाभारत या दोन महाकाव्यांचे मलयाळम् भाषेत रूपांतर केले. भक्तिभावनेला अनुरूप ठरण्याच्या दृष्टीने त्यांनी आपल्या काव्याचा आधार म्हणून वाल्मीकिरामयाणाऐवजी अध्यात्मरामायणाची निवड केली. महाभारताची रचना करताना मूळ ग्रंथाचे सारभूत लेखन करण्याच्या बाबतीत त्यांनी लक्षणीय कौशल्य दाखविले असून त्या महाकाव्याचे अंतःसत्त्व मलयाळम्‌मध्ये उतरविण्यास ये यशस्वी झाले आहेत. रामायणम्‌ इरूपत्तीनालुवृत्तम्‌, हरिनामकीर्तनम्‌ आणि भागवताचे एक भाषांतर हे एळुत्तच्छन, यांच्या नावावर असलेले इतर ग्रंथ होत. शब्द वा ध्वनी आणि अर्थ यांच्या संरचनेत त्यांनी लक्षणीय कौशल्य दाखविले आहे. त्यांच्या काव्यातील लयबद्धता आकर्षण आहे. त्यांनी आपल्या कवितांसाठी ‘किळिप्पाट्‌टु’ नावाच्या द्रविड वृत्ताचा उपयोग केला आहे. ते भक्तिसंप्रदायाचे अध्वर्यू असल्यामुळे विशिष्ट असे जीवितकार्य मानणारे कवी असूनही कलाक्षेत्राचे निकष पाळण्यात ते सदैव तत्पर होते. त्या काळी ब्राह्मणेतरांना वैदिक विद्या उपलब्ध नव्हती तथापि ब्राह्मणेतर असूनही वेद व उपनिषदे यांवर प्रभुत्व मिळविण्यात ते यशस्वी झाले.

नंपूतिरी ब्राह्मण असलेले पुंतानम्‌ हे भक्तिकाव्य रचण्यात सर्वश्रेष्ठ होते. भावनेच्या उत्स्फूर्ततेबाबत त्यांची ज्ञानेश्वरांशीच तुलना करणे शक्य आहे. ते काही संस्कृतचे फार मोठे पंडित नव्हते परंतु त्यांची काव्यरचना हा त्यांच्या अंतःकरणाचा उत्कट आविष्कार आहे. भाषाकर्णामृतम्‌, संतानगोपालम्‌ आणि ज्ञानप्पान हे मलयाळम्‌मधील त्यांचे प्रमुख ग्रंथ होत. पहिला ग्रंथ हे एक कृष्णस्तोत्र आहे. दुसरा ग्रंथ भागवतातील एका उपाख्यानावर आधारलेला आहे. तिसऱ्या ग्रंथात कवीचे परिपक्व शहाणपण प्रतिबिंबित झाले आहे. प्रत्येक वस्तू क्षणभंगूर आहे आणि त्यामुळेच प्राणिमात्राच्या दृष्टीने वास्तव, अपरिवर्तनीय आणि शाश्वत असे एकमेव सत्य म्हणजेच भगवान कृष्ण हे असून तेच त्यांचे शरणस्थान आहे, असे ते म्हणतात.

 

चाक्यार नावाचा समाज मंदिरांतून जमलेल्या प्रेक्षकवर्गापुढे संस्कृत नाटके आणि त्यांतही प्रामुख्याने भासाची नाटके सादर करीत असे. ही नाटके ‘कूटियाट्टम्‌’ नावाच्या नृत्यनाट्य प्रकारात सादर केली जात. क्रमदीपिक आणि आट्‌टप्रकारम्‌ नावाच्या अनेक गद्यग्रंथांतून नाटक कसे सादर करावे, याचे तपशीलवार स्पष्टीकरण करण्यात आले आहे. चाक्यार ‘कूत्तू’ नावाचे प्रयोगही सादर करीत असत. कूटियाट्टम्‌प्रमाणेच या प्रयोगंतही वाचिक अभिनयाला अत्यंत महत्त्व होते.

आट्टक्कथ : सतराव्या शतकात कथकळी नावाचा दृश्यकलेचा एक नवा प्रकार उदयास आला [⟶ कथकळि नृत्य]. हा प्रकार रंगभूमीवर सादर करण्यासाठी लिहिल्या गेलेल्या संगीतिकेच्या पुस्तकाला ‘आट्टक्कथ’ म्हटले जाई. कोट्टारक्कर तंपुरान हे या कलेचे आद्य प्रवर्तक होते. आठ भागांत रचलेले आणि रामायणावर आधारलेले त्यांचे रामनाट्‌टम्‌ हे पहिले आट्टक्कथ होय. कृष्णनाट्‌टम्‌ या नृत्यनाट्याकडून त्यांना प्रेरणा मिळाली होती. या नृत्यनाट्यात कृष्णाचे चरित्र रेखाटलेले असून ते कालिकतच्या मानवेद ह्या झामोरीन वंशाच्या राजाने रचलेले आहे. या काळातील प्रयोगीय लोककलांचे अनेक घटक कथकळीने आत्मसात केले आहेत वा त्यांच्याशी समायोजन साधले आहे. जसजसा काळ लोटत गेला, तसतशी ही कला निश्चितपणे परिष्कृत होत गेली आहे.

बहुतेक आट्टक्कथांची साहित्यिक गुणवत्ता निकृष्ट दर्जाची आहे. आट्टक्कथांचा कथनात्मक आणि प्रास्ताविक भाग हा बहुधा निरपवादपणे संस्कृत श्लोकांमध्ये रचलेला आहे. ‘पदम्‌’ हे नाव असलेले संवाद द्रविड वृत्तांमधून रचलेले आहेत. या संवादांना भरतांनी नाट्यशास्त्रात सांगितलेल्या हस्तमुद्रांची जोड नट देतात. त्याच वेळी मागच्या बाजूने या संवादाचे वाद्यसंगीताच्या साथीवर गायन केले जाते.

 

मलबारमधील उत्तर कोट्‌टयम्‌ येथील कोट्‌टयम्‌ तंपुरान या राजपुत्राने कथकळीमध्ये अनेक नव्या गोष्टी आणल्या आणि हा कलाप्रकार लोकप्रिय बनविला. त्यानी वकवधम्‌, कल्याणसौगंधिकम्‌, किर्मीरवधम्‌ आणि कालकेयवधम्‌ या चार आट्टक्कथांची रचना केली आहे. त्या सर्व महाभारतावर आधारलेल्या आहेत. दुष्ट शक्तींशी लढा देणे आणि त्यांना ठार करणे हा आट्टक्कथांमधील एक लोकप्रिय असा महत्त्वपूर्ण विषय आहे. साहित्यिक गुणवत्तेच्या बाबतीत कोट्‌टयम्‌ तंपुरान हे कोट्‌टारक्कर तंपुरान यांच्यापेक्षा वरचढ आहेत.

सतराव्या शतकाचा शेवट आणि अठराव्या शतकाचा प्रारंभ हा आट्टक्कथांच्या लेखकांमध्ये सर्वश्रेष्ठ असलेल्या उण्णायी वारियर यांचा जीवनकाल होय. त्यांचा चार भागांतील नळचरितम्‌ हा ग्रंथ एक वाङ्‌मयीन कृती म्हणून देखील अप्रतिम आहे. इतर आट्टक्कथांमधून प्रमुख रस कोणता आहे याची फिकीर न करता प्रत्येक दृश्यामध्ये एका विशिष्ट रसाचा−प्रामुख्याने शृंगाररसाचा वा वीररसाचा−सर्वाच्य बिंदूपर्यंत परिपोष साधला जातो. नळचरितम्‌मध्ये उत्तम रचना असलेल्या एखाद्या संस्कृत नाटकाप्रमाणे मुख्य रस म्हणून सर्व पैलूंनिशी शृंगाररसाचे वर्णन आले आहे आणि इतर रस मुख्य रसापुढे गौण बनविले आहेत. वारियर यांनी नृत्य, नाट्य व संगीत यांना सुसंवादी स्वरूपात सादर केले आहे. मानवी मनाचा वेध घेणारी मर्मदृष्टी आणि भाषेवरील प्रभुत्व त्यांनी त्यांना अमर बनविले आहे. वारियर यांनी नलाच्या कथेतील शोकात्म घटकांचा पुरेपूर उपयोग करून घेतला आहे आणि प्रमुख वा गौण अशा प्रत्येक पात्राचे सूक्ष्म असे गुणविशेष समर्थपणे आविष्कृत केले आहेत.

या कालखंडातील इतर महान साहित्यिक पुढीलप्रमाणे : कार्तिक तिरूनाळ रामवर्मा महाराजा (१७२४−९८), अश्वती तिरूनाळ इळय तंपुरान (१७५६−९४), इरयिम्मन्‌ तंपी (१७८३−१८६३), किळिमानूर विद्वान कोयित्तंपुरान (१८२५−५७), व्हि.कृष्णन्‌तंपी (१८९०−१९३८) इत्यादी.

रामपुरात्तू वारियर (१७०३−५३) हे त्रावणकोरच्या दोन राजांचे दरबारी कवी होते. त्यांचे स्मरण केले जाते, ते त्यांच्या कुचेलवृत्तम् वंचिप्पाट्‌टु या ग्रंथासाठी. या ग्रंथात कुचेलाने द्वारकेला दिलेली भेट व कृष्णाने संपत्ती देऊन त्याच्यावर केलेली कृपा या उपाख्यानाने वर्णन आहे. वारियर यांचे दारिद्र्य आणि त्यांच्या आश्रयदात्यांचा दानशूरपणा या गोष्टी या काव्यात एका वेगळ्या स्वरूपात प्रतिबिंबित झाल्या आहेत आणि त्यामुळे या काव्याला वास्तवाचा स्पर्श जाणवतो. नौकागीतासाठी म्हणून वापरल्या जाणाऱ्या एका लोकप्रिय व अत्यंत संगीतात्मक अशा वृत्तामध्ये त्याची रचना झालेली आहे.


कुंचन नंप्यार (सु. १७०५−सु. ६५) यांना ‘ओट्‌टन तुळूळल’ नावाच्या प्रयोगीय नृत्यप्रकाराचा शोध लावल्याचे श्रेय दिले जाते. हा नृत्यप्रकार त्यांनी शोधून काढला की नाही, हे संदिग्ध असेल, तरी त्यांनी त्या प्रकारास प्रोत्साहन दिले आणि त्याला लोकप्रिय बनविले एवढे मात्र निश्चित. त्यांनी प्रामुख्याने रामायण, महाभारत भागवत यांवर आधारलेल्या चाळीसहून अधिक ‘तुळूळल’ कृतींची रचना केली आहे. त्यांनी केरळच्या विविध भागांतून आपले आयुष्य व्यतीत केले होते तसेच, त्यांनी राजेलोकांची सेवाही केली होती. जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात ऱ्हास होत असलेल्या त्या काळातील लोकांच्या प्रवृत्तींचे त्यांनी सूक्ष्म निरीक्षण केले. त्यांना अशा जीवनाची मनस्वी चीड आली आणि त्यामध्ये सुधारणा झाली पाहिजे असे वाटले. त्यासाठी त्यांनी उपरोध, वक्रोक्ती व विनोद यांची पद्धत स्वीकारली. त्यांचे उपरोधी लेखन अतुलनीय आहे. सर्वसामान्य लोकांच्या निकृष्ट अशा सांस्कृतिक पातळीची जाणीव असल्यामुळे त्यांनी त्या लोकांना सहज समजेल अशा भाषेचा वापर केला.

नृत्य करण्याची पद्धत आणि नटाच्या वेषाचे स्वरूप यांच्या आधारे तुळूळल या नृत्यप्रकाराचे ‘ओट्‌टन’, ‘शीतंकन’ आणि ‘परयन्’ असे तीन प्रकार करण्यात आले आहेत.

 

स्यमंतकम्, घोषयात्रा, किरातम्, कल्याणसौगंधिकम्, ध्रुवचरितम्, हनुमदुद्‌भवम्, कीचकवधम्, दक्षयागम् या नंप्यार यांच्या काही तुळ्‌ळलकृती होत. त्यांनी इतर ग्रंथही लिहिले असून त्यांपैकी श्रीकृष्णचरितम् हा सर्वांत महत्त्वाचा ग्रंथ होय. काही विद्वानांनी नंप्यार आणि संस्कृत पंडित रामपाणिवाद य दोन व्यक्ती वेगळ्या नसून एकच होत्या, असे मत मांडले आहे परंतु हे मत निर्णायक मानले जात नाही.

 

नंप्यार यांच्या नंतरचा कालखंड : नंप्यार यांच्या मृत्यूनंतर जवळजवळ एक शतक मलयाळम् काव्यात उल्लेखनीय निर्मिती झाली नाही. गद्याचा विकास मात्र होऊ लागला. केरळोत्पत्तीचे विविध वृत्तान्त म्हणजेच केरळच्या उत्पत्तीबद्दलची दंतकथात्मक वर्णन मांडली जाऊ लागली. या कालखंडातील गद्याच्या विकासाला ख्रिस्ती धर्मप्रचारकांनी बरेच योगदान दिले आहे.

अठराव्या शतकाकडून एकोणिसाव्या शतकाकडे जाणाऱ्या संक्रमणाच्या कालखंडात साहित्याच्या विकासात काही वैशिष्ट्यपूर्ण सुधारणा झाल्याचे आढळत नाही. प्राश्चात्त्य प्रभाव अधिकाधिक दिसू लागला होता. एक नवा विषय म्हणून इंग्रजी शिकविण्यास आणि शिकण्यास सुरूवात झाल्यामुळे सांस्कृतिक, शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रांमध्ये मात्र क्रांतिकारक बदल झाले.

पूर्वीच्या त्रावणकोर संस्थानातील स्वाती तिरुनाळ (१८१३−४७) हे आधुनिकीकरणाच्या प्रक्रियेचे प्रतिनिधी होत. त्यांनी या संस्थानातील आधुनिक शिक्षणाचा पाया घातला. स्वतः अनेक कलांमध्ये निष्णात असलेले तिरुनाळ कलांचे आश्रयदातेही होते. मलयाळम्, संस्कृत आणि हिंदुस्तानी यांसारख्या भारतीय भाषांमध्ये त्यांनी गीतरचना केली आहे. इरयिम्मन् तंपी (१७८३−१८५६) हे त्यांनी आश्रय दिलेल्या लेखकांपैकी एक होत. तंपींच्या आट्टक्कथरचना खूपच लोकप्रिय आहेत. भाषेवरील प्रभुत्व, संगीत व लय यांची उत्कृष्ट जाण आणि कथकळीतील सूक्ष्म भेदांचे सखोल ज्ञान यांमुळे तंपींना आट्टक्कथांचे लेखन व गीतांचे संगीतकार म्हणून संस्मरणीय बनविले आहे.

वेण्‌मणी संप्रदाय : मलयाळम्‌मधील संस्कृत शब्दांच्या अतिरेकी मिश्रणाविरूद्ध बंड म्हणून वेण्‌मणी संप्रदायाचा उदय झाला. ते शुद्ध मलयाळम्‌चे समर्थक होते. लोकांमध्ये प्रचलित असलेले संस्कृत शब्द ते आपल्या मलयाळम्‌मध्ये वापरत असत परंतु नवखे व कठीण शब्द आणि संस्कृत प्रत्यय मात्र टाळत असत. मलयाळम्‌भाषेची एक लौकिक शैली विकसित करण्याच्या उत्सुकतेपोटी त्यांनी बोलीभाषेतील अनेक शब्द आणि वाक्‌प्रचार साहित्यात आणले. त्यांना शृंगारसाची खास ओढ होती आणि ती ओढ कधीकधी अश्लीलतेच्या सीमेवरही पोचत असे. जीवनाकडे पाहण्याचा हलका-फुलका दृष्टीकोन ठेवून ते आपल्या लेखण्या चालवीत असल्यामुळे त्यांचे लेखन विनोदाने खमंग बनले आहे. मोहक सुस्वरतेमध्ये परिणत होणारा एक अखंडित प्रवाह त्यांच्या कवितांमध्ये होता. जीवनाच्या सखोल व गंभीर समस्यांची त्यांना तमा नव्हती, हे खरे आहे.

‘पच्चमलयाळप्रस्थानम्‌’ हा या चळवळीच्या अनुषंगाने निर्माण झालेला एक काव्यप्रकार होय. या प्रकारात संस्कृतचे सर्व शब्द वगळण्यात आले आणि फक्त द्रविड भाषेतून निर्माण झालेले शब्द तेवढे वापरले गेले. हा काव्यप्रकार वापरून अगदी थोड्याच कविता लिहिल्या गेल्या आहेत. 

 

वेण्‌मणी संप्रदायातील महत्त्वाचे कवी पुढीलप्रमाणे आहेत : वेण्‌मणी अच्छन्‌ नंपूतिरी (१८१७−९१), त्यांचा मुलगा वेण्‌मणी महन्‌ नंपूतिरी (१८४४−९३), पूंतोट्‌टम्‌ अच्छन्‌ नंपूतिरी (१८२१−६५), पूंतोट्‌टम्‌ महन्‌ नंपूतिरी (१८५७−१९४६) आणि कोटुंगळ्‌ळूर राजवाड्यातील अनेक व्यक्ती. वेण्‌मणी अच्छन्‌ यांचे द्वितीय पुत्र कुंचिक्‍कुट्‌टन्‌ तंपुरान यांच्याकडे या व्यक्तींचे नेतृत्व होते. या कालखंडातील बहुतेक इतर सर्व कवींवर या कवींच्या शैलीचा प्रभाव पडला होता. या कवींपैकी चौघांनी वैशिकतन्त्रम्‌ या काव्याला अनुसरून अंबोपदेशम्‌ नावाचे प्रत्येकी एक काव्य रचले आहे यावरून त्यांच्या ग्रंथांचा नीतिबाह्य सूर सूचित होतो. त्यांच्या लेखी साहित्यात हे मनोरंजन होते. समस्यापूरण, उत्स्फूर्त व सामुदायिक रचना आणि भाषांतर यांसारख्या विविध साहित्यिक उपक्रमांमध्ये ते मग्‍न होते. वर्तमान कवींची महाभारत रामायण यांच्यातील पात्रांशी आणि फुले, पशू व पक्षी यांच्याशी तुलना करणे, हा मयलाळम्‌मधील एक खास उपक्रम होता. कविभारतम्‌, कविरामायणम्‌, कविपुष्पमाला, कविमृगावलि आणि कविपक्षिमाला ही या प्रकारातील ग्रंथांची नावे होत. पूरप्रबंधम्‌ हा या कवींचा अत्यंत प्रातिनिधिक असा ग्रंथ होय. 

 

कोटुंगळ्‌ळूर कोविलकम्‌ हा कुंचिक्‍कुट्टन्‌ तंपुरान यांच्या नेतृत्वाखालील कवींच्यासाठी तयार केलेला अक्षरशः एक आखाडाच होता. तंपुरान यांचे आयुष्य कवितेला वाहिलेले होते. ते जरी वयाच्या ४९ व्या वर्षी वारले, तरी त्यांनी मागे ठेवलेल्या लेखसंग्रहावर विस्ताराच्या बाबतीत सहजासहजी कोणाला मात करता येणार नाही. त्यांनी हरिवंशासह संपूर्ण महाभारताचे मयलाळम्‌मध्ये रूपांतर केले. श्लोकाला श्लोक आणि गद्याला गद्य या स्वरूपाचे एक लक्ष पंचवीस हजार श्लोकांचे हे भाषांतर त्यांनी ८७४ दिवसांच्या छोट्याशा कालखंडात पूर्ण केले. या भाषांतराने त्यांना ‘केरळव्यासन्‍’ ही उपाधी मिळवून दिली. त्यांच्या दृष्टीने श्लोकरचना ही श्वासोच्छ्‌वासाइतकी स्वाभाविक गोष्ट होती. 


मयलाळम्‌साहित्याचे आधुनिकीकरण घडवून आणण्यास मदत करणारे घटक पुढीलप्रमाणे होते. : इंग्रजी शिक्षणाचा प्रसार ख्रिस्ती धर्माच्या प्रसारासाठी ख्रिस्ती धर्मप्रचारकांनी चालविलेले उपक्रम शब्दकोश, व्याकरणे, भाषा-साहित्यांचे इतिहास आणि विश्वकोश यांसारख्या संशोधनसाधनांची निर्मिती वृत्तपत्रे व नियतकालिके यांचा प्रारंभ पाठ्यपुस्तकसमित्यांची स्थापना विज्ञान व तंत्रज्ञान यांचा विकास औद्योगिकीकरणाचा प्रसार आणि सामाजिक व राजकीय जागृती. आधुनिकीकरणाबरोबरच मयलाळम्‌ साहित्याचा विकास उफाळून आला आणि त्याची प्रत्येक शाखाही विकसित होऊ लागली. 

 

आयिल्यम्‌तिरूनाळ रामवर्मा (१८३२−८०) हे त्रावणकोरचे महाराजा साहित्याचे आश्रयदाते होते आणि गद्यलेखनास प्रोत्साहन देण्यात त्यांना विशेष रस होता. आधुनिक धर्तीवर गद्याचा विकास करण्यास ते किती उत्सुक होते, ते त्यांच्या मीनकेतनचरितम्‌ आणि भाषाशाकुंतलम्‌ या ग्रंथांवरून दिसून येते. 

आयिल्यम् तिरूनाळ यांचे उत्तराधिकारी विशाखम् तिरूनाळ रामवर्मा (१८३७−८५) हे महाराजा देखील साहित्याचे आश्रयदाते होते. त्यांनीही लेखनाला उत्तेजन दिले आणि स्वतः लेखन करून आदर्श घालून दिला. बेंजामिन बेले (१८०५−७१), जोसेफ पीट, रिचर्ड कॉलिन्स आणि जॉर्ज माथेन यांसारख्या ख्रिस्ती धर्मप्रचारकांनी गद्याच्या विकासाला बरेच योगदान दिले. आर्य डीकन कोशी (१८२६−१९००) यांनी अनेक ग्रंद्यग्रंथ संकलित केले. मलयाळम्‌च्या आधुनिक धर्तीवरील विकासाला सर्वांत लक्षणीय असे योगदान दिले, ते डॉ.हेरमान गुंडर्ट (१८१४−९३) या जर्मन धर्मप्रचारकाने. त्यांच्या लेखणीतून २० हून अधिक ग्रंथ उतरले आहेत. त्यांपैकी मलयाळम्-इंग्रजी शब्दकोश, मलयाळम्‌चे व्याकरण आणि पाठमाला हे ग्रंथ महत्त्वपूर्ण होत. गुंडर्ट यांच्या व्याकरणानंतर अशाच प्रकारची इतर पुस्तकेही तयार झाली. वैक्कम् पाच्‍चू मूत्ततू (१८१४−८३) यांनी लिहिलेले मलयाळम्‌चे व्याकरण (१८७६) आणि कोवुण्णी नेडुंगडी (१८३१−८९) यांनी लिहिलेली केरळकौमुदी (१८७८) हे त्यांपैकी सर्वांत महत्त्वाचे ग्रंथ होत. 

 

आधुनिक कालखंड : एकोणिसाव्या शतकाच्या शेवटी नवयुगाच्या पहाटेची चाहूल लागली. नव्या शतकाने आपल्या मागोमाग मलयाळम्‌मधील स्वच्छंदतावादाचे आंदोलन निर्माण केले. 

काव्य : मलयाळम्‌मधील महाकाव्ये ही नवअभिजाततावादाची निर्मिती आहे. नवअभिजाततावादाचा इतिहास मधल्या स्वच्छंदतावादाच्या कालखंडातून आधुनिक कालखंडापर्यंत येऊन पोहोचतो. अळकत्तू पद्मनाम कुरूप (१८६९−१९३२) यांनी मलयाळम्‌मधील पहिले महाकाव्य लिहिले. हे महाकाव्य संस्कृत साहित्यशास्त्रकारांनी दिलेल्या व्याख्येला तंतोतंत अनुसरणारे आहे आणि या अर्थाने ते पहिले आहे. रामचन्द्रविलासम् असे त्याचे नाव आहे. त्याच्या मागोमाग इतर अनेक महाकाव्ये लिहिली गेली.उळळूर एस्. परमेश्वर अय्यर (१८७७−१९४९) यांचेउमाकेरळम्, पंतळम् केरळ वर्मा यांचे रूक्मांगदचरितम्, वळ्‌ळत्तोळ नारायण मेनन (१८७८−१९५८) यांचे चित्रयोगम् आणि के. सी. केशव पिळ्ळा यांचे केशवीयम् ही महाकाव्ये अत्यंत महत्त्वाची आहेत. महाकाव्य हा साहित्यप्रकार प्रतिभावंत कवीला एका विशाल चित्रफलकावर सर्व प्रकारची विविधता व संमिश्रता यांच्यासह जीवनाचे चित्रण करण्यास भरपूर वाव देत असूनही मलयाळम्‌ कवींनी त्याचा पुरेपूर उपयोग करून घेतलेला नाही. मलयाळम्‌मध्ये या प्रकारची आणखी दहा-बारा महाकाव्ये लिहिली गेली आहेत. संस्कृतमधील महत्त्वाची अशी बहुतेक सर्व महाकाव्ये मलयाळम्‌मध्ये भाषांतरित झाली आहेत. मल्याळी कवींनी संस्कृतमध्येही महाकाव्ये लिहिली आहेत.

स्वच्छंदतावादाचे आंदोलन सुरू झाल्याबरोबर भावगीतांच्या निर्मितीमध्ये आकस्मिक रीत्या वाढ झाली. नवअभीजाततावादाचे प्रवक्ते असलेल्या केरळवर्मा वलियकोयिल तंपुरान (१८४५−१९१४) यांनी देखील भावगीतांची काही गुणवैशिष्ट्ये असलेल्या दैवयोगम् नावाच्या काव्याची रचना केली. के. सी. केशव पिळ्ळा यांच्या आसन्नमरणचिन्ताशतकम् (एका मरणोन्मुख माणसाची चिंतने) या काव्यातून स्वच्छंदतावादी काव्याचे आत्मतत्त्व उत्कृष्टपणे व्यक्त होते. परंतु या आंदोलनाचा खरा फुलोरा आशान, उळ्ळूर आणि वळ्ळत्तोळ या कवी-त्रिमूर्तीमध्येच आढळून आला. ए.आर्. राजराज वर्मा (१८६३−१९१८) यांनी या आंदोलनाला सैद्धांतिक अधिष्ठान प्राप्त करून दिले. द्वितीयाक्षरप्रासाचा (चार चरणांच्या श्लोकातील प्रत्येक चरणातील दुसरे अक्षर तेच ठेवून साधल्या जाणाऱ्या यमकाचा) प्रयोग करावा की नाही, या बाबतीत झालेला तीव्र मतभेदही य आंदोलनाला पोषक होता. वर्मा यांनी स्वतः मलय पर्वताचे आत्मनिष्ठ वर्णन करणारे मलयविलासम् नामक काव्य लिहिले. 

 

मलयाळम्‌मध्ये विलापिका हा काव्यप्रकार भावगीतांची एक शाखा म्हणून विकसित झाला आहे. सी. एस्. सुब्रहाण्यम् पोट्टी (१८७५−१९५४) यांची ओरू विलापम् ही या प्रकारातील पहिली विलापिका होय. स्वच्छंदतावाच्या आंदोलनातील पहिले भावगीत म्हणून मान्यता पावलेले कुमारन आशान यांचे वीण पुवु (१९०७) नावाचे काव्य ही एका दृष्टीने एका विलापिकाच आहे कारण त्याच्यामध्ये स्थानावरून गळून पडलेल्या एका फुलाविषयीचा प्रतीकात्मक विलापच आहे. व्ही.सी. बालकृष्ण पणिक्कर (१८८९−१९१५) यांची ओरू विलापम्, नालप्पाट्‌टू नारायणमेनन (१८८७−१९५४) यांची कण्णुनीर्-तुळिळ, के.के. राजा (१८९३−१९६८) यांची बाप्पांजलि, कुमारन आशान यांची प्ररोदनम् आणि बालमणी अम्म यांची लोकांतरंगळिल् या मलयाळम्‌मधील महत्त्वपूर्ण अशा इतर विलापिका होत.

कुमारन आशान (१८७३−१९२४) यांना मलयाळम्‌मधील स्वच्छंदतावादी आंदोलनाचे अग्रदूत मानले जाते. त्यांनी काही काळ कलकत्यामध्ये अध्ययन केले तेव्हा बंगालमधून प्रबोधन युगाचे अंतःसत्त्व त्यांनी आत्मसात केले. तसेच, इंग्रजी पुस्तकांच्या वाचनाने त्यांना प्राश्चात्त्य जगातील उदारमतवादी कल्पना व आदर्श यांचे चांगले ज्ञान झाले. याचा परिणाम म्हणून त्यांनी मलयाळम्‌ काव्याचा संकल्पनेमध्ये क्रांती घडवून आणली. यी वेळेपर्यंत काव्य हे मनोरंजनाचे एक साधन मानले जात होते. कवीला एक द्रष्टेपणा आणि एक जीवितकार्य सार्थ करावयाचे असेत, हे त्यांनी ओळखले. ‘एस्.एन्.डी.पी. योगम्’ या संस्थेची १९०३ मध्ये स्थापना झाल्यापासून पुढे सु. १६ वर्षेपर्यंत ते तिचे संघटक सचिव होते. ही संघटना मागास वर्गांच्या उत्थानाच्या हेतूने सुरू करण्यात आली होती. केरळचे महान आध्यात्मिक नेते नारायणगुरू (१८५४−१९२८) हे तिचे अध्यक्ष होते. आशान यांनी काव्याच्या क्षेत्रात जशी अमोल कामगिरी केली, तशीच पददलितांच्या उद्धारासाठीही केली.

उळ्‌ळूर एस्. परमेश्वर अय्यर हे पंडित कवी होते. या दृष्टीने त्यांची मराठीतील मोरोपंतांशी तुलना करता येईल. त्यांचे गद्यलेखन प्रचंड आहे. त्यांनी शासनातील अनेक अधिकारपदे सांभाळली होती. त्यांची दीर्घोद्योगी वृत्ती अनुकरणीय आहे. त्यांनी लिहिलेल्या महाकाव्याचा आधीच उल्लेख आला आहे. त्यांनी काही खंडकाव्ये व छोटी छोटी असंख्य भावगीतेही लिहिली आहेत. ते प्रामुख्याने अभिजाततावादी असले, तरी त्यांनी स्वच्छंदतावादी कविताही लिहिल्या आहेत तसेच वास्तववादी प्रकारातील लेखनही करून पाहिले आहे.

पूर्वी उल्लेखिलेल्या त्रिमूर्तीपैकी वळ्ळत्तोळ नारायण मेनन हे तिसरे कवी होत. आशान यांचे नळिनि हे काव्य ज्या वर्षी प्रकाशित झाले, त्याच वर्षी एक महाकाव्य लिहून वळ्ळत्तोळ यांनी देखील एक अभिजाततावादी कवी म्हणून आपल्या काव्यरचनेस प्रारंभ केला अखेरीस मात्र ते स्वच्छंदतावादी झाले. त्यांची काव्यरचना हे स्वातंत्र्यलढ्यासाठी आपल्या बांधवांना जागृत करण्याकरिता फुंकलेले रणशिंग होते. या घटनेने त्यांना खूप लोकप्रियता मिळवून दिली. त्यांची शैली साधी, अनलंकृत व लालित्यपूर्ण होती. काव्यातील अभिव्यक्तीच्या कलेमध्ये सर्वांगीण परिपूर्णता असावी, असे त्यांना वाटत असे. त्यांच्या सर्वच रचनांतून उपजत प्रतिभासंपन्न अशा एका कुशल कारागिराचे दर्शन घडते. साहित्यमंजरि नावाने त्यांच्या सर्वोत्तम भावगीतांचा संग्रह बारा भागांत करण्यात आला आहे. त्यांनी जीवनावर उत्कट प्रेम केले आणि हे प्रेम त्यांच्या कवितांमधूनही प्रतिबिंबित झाले आहे. शृंगाररस आणि वात्सल्यभावना यांचे चित्रण करण्यामध्ये ते निष्णात आहेत. आपल्या काव्यातील ऐंद्रिय संवेदनशीलतेचा त्यांना अभिमान वाटत असल्याचे दिसते.


त्रिमूर्तीनंतर : आशान, उळ्ळूर आणि वळ्ळत्तोळ यांपैकी वळ्ळत्तोळ यांना अनेक अनुयायी होते. त्यांपैकी काही पुढीलप्रमाणे : नालप्पाट्‌टू नारायण मेनन, कुट्टिप्पुरत्तू केशवन् नायर (१८८२−१९५९), जी. शंकर कुरूप, वेण्णिक्कुरळम् गोपाल कुरूप (१९०२-  ),पी. कुंजिरामन् नायर (१९०९−७८), पाल नारायणन् नायर (१९११− ), एम्.पी. अप्पन् (१९१३− ) आणि बालमणी अम्म. त्यांच्यापैकी अनेकांनी नंतर स्वतःची स्वतंत्र शैली विकसित केली. चिंतनपर भावगीते लिहिण्यात नालप्पाट्‌टूंची हातोटी आहे. कुट्टिप्पुरत्तू केशवन् नायर हे शहरी जीवनाच्या कृत्रिमतेने न डागळलेल्या ग्रामीण जीवनाची गौरव गीते गातात. पळ्ळतू रामन् (१८९२−१९५०) यांच्या कविता नारायणगुरू यांच्या आदर्शांच्या प्रभावाने सामाजिक सुधारणांचा पाठपुरावा करीत होत्या. सरदार के. एम्.पणिक्कर (१८९५−१९६३) हे प्रामुख्याने इतिहासकार व कादंबरीकार होते तथापि त्यांनी विविध प्रकारांत मोडणार्या  कवितांचीही रचना केली आहे. 

 

‘जी’ ह्या लोकप्रिय नावाने विख्यात असलेल्या जी.शंकर कुरूप (१९०१−७८) यांनी आपल्या कवित्वाची मार्गक्रमणा त्रिमूर्तीच्या काव्याने प्रभावित होऊन केली असली, तरी लवकरच त्यांच्यावर टागोरांचा प्रभाव दिसू लागला. त्यांनी गूढवाद, प्रतीकवाद, वास्तववाद आणि प्रागतिक वास्तववाद या प्रकारांत मोडणारे लेखन करून पाहिले आहे परंतु ह्या अनंत विश्वाची गुंफण करणाऱ्या गूढ शक्तीच्या सामर्थ्यामुळे होणाऱ्यापरा परमानंदाचे वर्णन करताना त्यांचे सर्वोत्तम कवित्व प्रकट होते. त्यांना १९६५ साली पहिला ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला. 

वेण्णिक्कुळम् गोपाल कुरूप हे आयुष्यभर वळ्ळत्तोळांच्या संप्रदायामध्ये राहिले आहेत. त्यांना अभिव्यक्तीची वेधकता साधली आहे परंतु त्यांची कविता उदात्त अशा उंचीपर्यंत झेपावू शकत नाही. पी. कुंजिरामन् नायर हे जन्मजात भावकवी आहेत. भारताच्या आणि विशेषतः केरळच्या प्राचीन संस्कृतीचे दर्शन घडविण्यात त्यांना अत्यानंद वाटतो. केरळची सृष्टी, निसर्गसौंदर्य आणि संस्कृती यांतून त्यांची विपुल व समृद्ध अशी प्रतिमासृष्टी उभी राहिली आहे.वालमणी अम्म (१९०९− ) यांना चिंतनपर काव्य लिहिण्यात विशेष रूची आहे. दैनंदिन कौटुंबिक जीवनातील छोट्या-छोट्या गोष्टी घेऊन त्यांना त्या तात्विक रूप देतात. 

एटप्पळ्ळी राघवन् पिळ्ळा (१९०९−३६) आणि चांगम्पुळ कृष्ण पिळ्ळा (१९१३−४७) हे दोघे एकाच ठिकाणचे रहिवासी होते आणि दोघांचे स्वभावही समानच होते. या दोघांपैकी पहिल्या कवीने प्रेमप्रकरणातील अपयशामुळे आत्महत्या केली. या घटनेने चंगम्पुळ यांना रमणन् नावाची गोपगीतात्मक विलापिका लिहिण्यास प्रवृत्त केले. ही विलापिका एकेकाळी अत्यंत लोकप्रिय झाली होती. स्वच्छंदतावादी भावगीत हा काव्यप्रकार या कवींच्या काव्यामध्ये अगदी परमोत्कर्षास पोहोचल्याचे दिसते. 

एटप्पळ्ळी संप्रदायातील कवींनंतर मलयाळम्‌मध्ये वास्वववादाचा शिरकाव झाला. एटश्शेयरी गोविंदन् नायर(१९०६−७४) यांचे एक समर्थ कवी म्हणून वर्णन केले जाते कारण त्यांनी त्या काळातील ज्वलंत समस्या जोमदारपणे व वास्तववादी दृष्टीने हाताळल्या. स्वच्छंदतावादाचे आवरण न घेताही ते साध्या, सरळ व समर्थ भाषेत आपला आशय थेट वाचकांच्या हृदयापर्यंत नेऊन भिडवतात. 

भाषेची घडण आणि रचनाकौशल्य या दृष्टींनी वैलोप्पिळ्ळिल श्रीधर मेनन (१९११− ) हे अभिजाततावादी आहेत. स्वच्छंदतावादाच्या प्रभावातून वाचलेले वैलोप्पिळ्ळिल प्रागतिक विषय कौतुकास्पद रीतीने हाताळतात. पी. भास्करन्, राम वर्मा वयलार आणि ओ.एन्.व्ही. कुरूप यांच्यामध्ये एटप्पळ्ळी संप्रदायाची काही गुणवैशिष्ट्ये आढळतात. एटश्शेरी यांच्या काहीशा रांगड्या आणि निर्भीड शैलीला एन्.व्ही.कृष्ण वारियर (१९१५− ), आक्कित्तम् अच्युतन् नंपूतिरी (१९२६− ), ओळप्पमण्ण (१९२३− ), ओ. एम्.अनुजन्(१९२८− ) इ. प्रतिनिधी मिळाले. 

अलीकडील मलयाळम् काव्यावर आधुनिक कवींच्या एका मोठ्या समूहाचे प्रभुत्व आहे. त्यांपैकी काही जणांवर टी.एस्.एलियटचा प्रभाव आहे. उदा., के.अय्यप्प पणिक्कर (१९३०− ), एम्.गोविंदन् (१९१९− ), सच्चिदानंदन् (१९४६− ), सुगतकुमारी (१९३४− ), एन्. एन्. कक्काड (१९२७− ), पालूर (१९३२− ) इत्यादी. 

नाटक : प्रारंभीच्या मलयाळम् रंगभूमीवर तमिळ संगीत नाटकाचा प्रभाव होता. कालांतराने तिच्यावर पाश्चात्त्य नाटकाचा प्रभाव दिसू लागला. केरळ वर्मा यांनी केलेल्या कालिदासकृत शाकुंतलाच्या  भाषांतरामागोमाग संस्कृत आणि इंग्रजीमधून अनेक भाषांतरे झाली. संस्कृत नाट्यरचना डोळ्यापुढे ठेवूनही काही नाटके लिहिली गेली. चक्कीचंकरम्, पी.राम कुरुप आणि के.सी. नारायणन् नंप्यार यांनी तर भाषांतरे, अनुकरणे आणि रूपांतरे यांच्या हव्यासायर उपरोधात्मक टीका केली आहे.

पोर्तुंगीजमधील अद्‌भुत नाटके (बायबलमध्ये घटना) ‘चविट्‌टू नाटकम्’ नावाच्या प्रयोगीय कलेचा उदय होण्यास कारणीभूत ठरली. या प्रकारची काही नाटके लिहिली गेली आणि रंगभूमीवर सादरही करण्यात आली, तरीदेखील या घटनेचा केरळच्या रंगभूमीवर फारसा प्रभाव पडला नाही. प्रारंभीच्या काळातील काही नाटककार पुढील प्रमाणे :सी.व्ही.रामन् पिळ्‌ळा (१८५८−१९२२), कोच्चुण्णी तंपुरान (१८५८−१९२६), के.सी.केशव पिळ्‌ळा (१८६८−१९१३) कंटत्तिल् वर्गीस् माप्पिळ (१८५८−१९०४),कोच्ची‌प्पन् तरकन् (१८६१−१९४०) आणि के.पी.करुप्पन् (१८८५−१९३८). त्यांच्यापाठोपाठ आलेले नाटककार पुढीलप्रमाणे : ई.व्ही.कृष्ण पिळ्ळा, एन्.पी.चेल्लप्पन् नायर, टी.एन्.गोपीनाथन् नायर, कैनिक्कर पद्मनाभ पिळ्‌ळा, कैनिक्कर कुमार पिळ्‌ळा, कुट्‌टनाट्‌टू रामकृष्ण पिळ्‌ळा आणि इतर काही. 

इब्सेनच्या प्रभावामुळे मलयाळम् नाटकात प्रचंड बदल घडून आले. ए.बालकृष्ण पिळ्‌ळा, सी.नारायण पिळ्‌ळा आणि सी.जे.टॉमस यांनी इब्सेनच्या काही नाटकांचे मलयाळम्‌मध्ये भाषांतर केले. या टप्प्यावर पोचल्यानंतर नाटक हे दुष्ट रूढी व चालीरीतींचा धिक्कार करून सामाजिक जागृती साधण्याचे एक समर्थ माध्यम बनले. या दृष्टीने व्ही.टी.भट्‌टतिरिप्पाटू (अटुक्क्ळपिल निन्नु‌म् अरन्नत्तेक्कु-१९३०) आणि एम्. पी. भट्‌टतिरिप्पाटू (ऋतुमति) हे प्रमुख नाटककार असून यांनी नंपूतिरी (नंबुद्री) स्त्रियांच्या बंधमुक्तीवरलक्ष केंद्रित केले. के.दामोदरन् यांचे पाट्‌टबक्कि् (१९३८) हे एक सामाजिक-राजकीय असे प्रचारी नाटक आहे. एटश्शेसरींचे कूट्‌टूकृपि (१९५०) यातही अशाच प्रकारचा प्रचारकी संदेश आहे. या नाटककारांमध्ये इब्सेनचे अंतःसत्त्व यशस्वी रीत्या आत्मसात करणारे नाटककार म्हणून एन्.कृष्ण पिळ्‌ळा उठून दिसतात. भग्नाभवनम् (१९४२), कन्यका (१९४४) आणि बलाबलम्(१९४६) ही त्यांची काही नाटके होत. ते कुशाग्र बुद्धिमत्ता असलेले एक समीक्षकही आहेत. सी. जे. टॉमस, पुळिमान परमेश्वरन् नायर, सी.एन्. श्रीकंठन् नायर व तोप्पिल् भासी या नाटककारांनी नाट्यवाङ्‌मयाला लक्षणीय योगदान दिले आहे. आधुनिक कालखंडातील प्रयोगवादी नाटककार म्हणून एन्.एन्. पिळ्‌ळा, के.टी. मुहंमद, जी. शंकर पिळ्‌ळा, कावालम् नारायण पणिक्कर इत्यादींचा निर्देश करता येईल. 

 

कादंबरी : एकोणिसाव्या शतकाच्या शेवटच्या चरणात प्रामुख्याने प्राश्चात्त्य प्रभावाचा परिणाम म्हणून मलयाळम्‌मध्ये कादंबरी उदयास आली. घातकवधम्, मिसेस कॉलिन्स, पुल्लेलि कुंचु, आर्यं डीकन कोशी आणि काही भाषांतरित कादंबऱ्या हे वा क्षेत्रातील अगदी प्रारंभीचे लेखन होय. नेटुन्नाटी यांची कुंदलता (१८८७) ही पहिली कादंबरी होय. या कादंबरीतील घटना व पात्रे ही प्रत्यक्ष जीवनाशी असंबद्ध असल्यासारखी वाटतात. अप्पू नेटुन्नाटी यांच्यावर बंगाली कादंबरीचा प्रभाव होता. 


एकोणिसाव्या शतकाच्या शेवटी आणि विसाव्या शतकाच्या प्रारंभी चट्टंपी स्वामिकळ (१८५३−१९२४) आणि नारायणगुरू यांनी एक धार्मिक प्रबोधन घडवून आणले. त्या दोघांच्याही मनावर वेदपूर्व संस्कृतीचे अंतःसत्त्व ठसलेले होते आणि त्यांनी त्या अंतःसत्त्वाचा वैदिक संस्कृतीच्या अंतःसत्त्वाशी मेळ घालण्याचे कार्य केले. त्यांचे जीवन आणि विचार यांनी साहित्याच्या क्षेत्रातील मतप्रणालीमध्ये क्रांती घडविण्याचा मार्ग सुलभ केला. 

 

ओ.चंतू मेनन (१८४७−१९००) यांची इंदुलेखा ही पहिली कादंबरी लॉर्ड बेकन्सफील्ड यांच्या हेन्रीलट्टा टेंपल या कादंबरीचे रूपांतर करण्याच्या प्रयत्नामधूनच निर्माण झाली होती. मलबारमधील नायर समाजामध्ये सुधारणा घडवून आणणे, हा या कादंबरीचा आशय स्पष्ट आहे. व्यवसायाने न्यायाधीश असल्यामुळे त्यांना या समाजात चालणाऱ्या  कज्जेनदलालीची जवळून माहिती होती. त्यांची शारदा (१८९२) ही दुसरी कादंबरी अपूर्ण राहिली आहे. 

 

सी.व्ही.रामन् पिळ्‌ळा हे बहुधा मलयाळम्‌मधील सर्वश्रेष्ठ कादंबरीकार असून त्यांचे समकालीन असलेले चंतू मेनन हे त्यांचे निकटचे प्रतिस्पर्धी होते. सी. व्हीं.च्या सर्व कादंबऱ्या ऐतिहासिक असून त्या त्रावणकोरच्या इतिहासावर आधारलेल्या आहेत. सी.व्ही. हे मानवी मनाचे गुंतागुंतीचे व सूक्ष्म व्यापार सहजपणे रेखाटू शकत आणि त्यासाठी राजकीय कारस्थाने असलेले गुंतागुंतीचे कथानक गुंफत असत. मार्तोंड वर्मा (१८९१), धर्मराज (१९१३) आणि राम राज बहादूर (२ खंडांत−१९१८−२०) या त्यांच्या अत्यंत महत्त्वपूर्ण कादंबऱ्या  होत. त्यांनी समाजावर टीका करण्यासाठी काही प्रहसनेही लिहिली. 

 

काही विख्यात कादंबरीकार व त्यांच्या कादंबऱ्या यांची माहिती पुढीलप्रमाणे: पी. केशवदेव: ओट्‌यिल् निन्नु (१९४२), नटि (१९४६), आर्कु वेटि (१९५०) वैक्कम् मुहंमद वषीर: बाल्यकालसखि (१९४४), शब्दंगळू (१९४७), न्टुप्पाप्पेक्कोमरानेंटारन्नु (१९५१),पात्तुम्मयुटे आटु (१९५७) तकळी शिवशंकर पिळ्ळा :तोटिटयुटे मकन् (१९४७),चेम्मीन् (१९५६) एस्. के. पोट्टेकट्ट : विपकन्यक (१९४८) पी.सी.कुट्टिकृष्णन् : उम्माच्चु (१९५५), सुंदरिकळुम्सुंदरन्मारम् (१९५८).  

प्रामुख्याने के. सुरेंद्रन्, पुन्ना टिल् कुंजब्दुल्ल, नंदनार, कोविलन्, पारप्पुरत्तू आणि इतर अनेक जणांचे सध्याच्या कादंबरी क्षेत्रावर प्रभुत्व आहे.

लघुकथा :  लघुकथा हीदेखील प्राश्चात्त्य साहित्याच्या प्रभावाखाली निर्माण झालेली शाखाच आहे. मलयाळम्‌मधील प्रारंभीच्या कथा म्हणजे अनेक उपाख्याने असलेल्या छोट्या कादंबऱ्या होत्या. त्यांचा भर कथानक गुंफण्यावर होता. चरित्रचित्रण हे त्यांच्या दृष्टीने दुय्यम होते. प्रारंभीचे लेखक नियतकालिकांना साहित्य पुरविण्याच्या गरजेतून लिहिण्यास उद्युक्त झाले होते. वेन्नयिल् कुंजुरामन् नायनार (१८६१−१९१५), अंपाटी नारायण पोतुवाळ (१८७१−१९३६), मूर्कोत्तू कुमारन (१८७४−१९४१), के. सुकुमारन (१८७६−१९५६) आणि ‘एम्. आर्. के. सी.’ या टोपणनावाने प्रसिद्ध असलेले चेंकुळतू कुंजिराम मेनन (१८८२−१९४०) हे या क्षेत्रातील अग्रदूत होते. नव्या प्रकारची लघुकथा १९३० च्या सुमारास विकसित होऊ लागली.  

 

या कालखंडातील लेखकांचा वास्तववादाकडे कल होता. साहित्याने जीवनातील ज्वलंत समत्यांचे विवेचन केले पाहिजे, असा त्यांचा दृष्टिकोन होता. त्यांच्यापैकी बहुतेक सर्वांनी कादंबऱ्या ही लिहिल्या आहेत. कारूर नीलकंठ पिळ्‌ळा (१८९८−१९७४), पी. केशवदेव (१९०२− ), पोन्‌कुन्नम् वर्क्की (१९०८− ), वैक्कवम् मुहंमद बषीर (१९१२− ), एस्. के. पोट्टेकट्ट (१९१३− ), ⇨तकळी शिवशंकर पिळ्ळा (१९१४− ), पी. सी. कुट्टिकृष्णन् (१९१५− ), लळिताम्बिका अंतर्जनम् (१९०९− ) आणि के. सरस्वती अम्मक (१९१९−७४) यांनी  लघुकथेच्या विकासाला मोठे योगदान दिले आहे. त्यांच्यापैकी बहुतेकांची निर्मिती आता क्षीण होऊ लागली आहे. सध्याच्या लेखनावर नव्या पिढीतील अनेक लेखकांचे प्रभुत्व आहे.  

 

एम्. टी. वासुदेवन् नायर, टी. पद्मवनाभन्, ओ. व्ही. विजयन्, माधविकुट्टी (कमलादास), पुन्नाटिल् कुंजब्दुल्ल, काक्कनाटन्, एम्. मुकुंदन् आणि इतर अनेक जण या साहित्यशाखेमधून मलयाळम्‌ची सेवा करीत आहेत. 

 

समीक्षा :  मलयाळम् नियतकालिके १८९० च्या सुमारास सुरू झाली आणि त्यामुळे साहित्यसमीक्षा व निबंधलेखनास चालना मिळाली. नियतकालिकांतून येणाऱ्या ग्रंथसमीक्षणाच्या स्वरूपात समीक्षेला प्रारंभ झाला. ज्या ग्रंथाचे समीक्षण करावयाचे त्या ग्रंथातील खरेखुरे गुणदोष दाखविण्याच्या बाबतीत तत्कालीन ग्रंथसमीक्षक अत्यंत मनमोकळे व स्पष्टवक्ते होते. सी. पी. अच्युत मेनन यांनी आपल्या विद्याविनोदिनीमधून हे कार्य अगदी प्रशंसनीय पद्धतीने केले आहे.  

 

व्याकरणकार, समीक्षक, कवी व भाषांतरकार असलेले ए. आर्. राजराज वर्मा यांची समीक्षक व व्याकरणकार म्हणून ख्याती आहे. द्वितीयाक्षरप्रास नाकारण्याच्या बाजूने त्यांनी केलेले युक्तिवाद साहित्याच्या रम्याद्‌भुत पैलूचे त्यांचे आकलन काहीसे अस्पष्ट असल्याचे सुचवितात. त्यांनी मलयाळम् आणि संस्कृत या दोन्ही भाषांमध्ये कविताही लिहिल्या आहेत.  

 

विसाव्या शतकाची सुरूवात होण्याच्या सुमारास प्राश्चात्त्य विचारसरणीचा प्रभाव अधिकाधिक दिसू लागला. समीक्षक प्राश्चात्त्य निकषांच्या आधारे ग्रंथांचे मूल्यमापन करू लागले. परंतु त्याबरोबरच त्यांचे भावबंध मात्र संस्कृतशी जडलेले होते. साहित्यसमीक्षेच्या क्षेत्रातील जडण-घडणीचा हा  कालखंड होता. 

 

साहित्यपंचानन पी. के. नारायण पिळळा (१८७८−१९३७) हे या कालखंडाचे उत्तम प्रतिनिधी होत. एळुत्तच्छन, नंप्यार आणि चेरुश्शेरी यांच्यासारख्या मळयाळम् साहित्यातील क्षेष्ठ साहित्यिकांच्या लेखनाची त्यांनी समीक्षणे केली आहेत. त्यांनी प्राश्चात्त्य व पौर्वात्य समीक्षेचे मानदंड आत्मसात करण्याचा प्रयत्न केला होता, हे त्यांच्या या समीक्षणांतून स्पष्ट होते. स्वदेशाभिमानी के. रामकृष्ण पिळ्ळा (१८७८−१९१६)  आणि सी. अंतप्पायी या समीक्षकांचा प्राश्चात्त्य संकल्पनांकडे अधिक कल होता. ए.बालकृष्ण पिळ्ळा (१८८९−१९६०) यांनी अनेक प्राश्चात्त्य संकल्पना मलयाळम् साहित्यसमीक्षेमध्ये आणल्या. त्यांनी प्राश्चात्त्य देशांतील साहित्यिक आंदोलने व साहित्यप्रकार यांच्याशी मल्याळी लोकांचा परिचय करून दिला. मुंटश्शेरी जोसेफ (१९०१−७७) यांनी प्राश्चात्त्य आणि पौर्वात्य समीक्षानिकषांचा समन्वय साधण्याचा प्रयत्न केला. कुट्टिकृष्ण मारार (१९००−७३) यानी प्रामुख्याने पौर्वात्य संकल्पनांवर आधारलेले असे आपले स्वतःचे समीक्षेचे एक तत्त्वज्ञान विकसित करण्याचा प्रयत्न  केला. एम्‌. एस्‌. देवदास आणि के. दामोदरन्‌ हे त्या कालखंडातील मार्क्सवादी समीक्षक म्हणून विख्यात होते. कादंबरी, लघुकथा इत्यादींविषयी प्रामुख्याने समीक्षेच्या प्राश्चात्त्य निकषांवर आधारलेले सैद्धांतिक अध्ययन सादर करण्याचे काम एम्‌. पी. पॉल यांनी हाती घेतले. 


निबंध व चरित्र-आत्मचरित्र : बहुतेक सर्व समीक्षक हे चांगले निबंधलेखकही होते. आणि मलयाळम्‌ निबंधाची शाखा−विशेषतः आधुनिक कालखंडात−चांगली विकसितही झाली आहे.

चरित्रलेखन ही आधुनिक कालखंडात विकसित झालेली साहित्याची आणखी एक शाखा होय. चरित्रलेखनाचाच एक भाग म्हणून आत्मचरित्रलेखनही विकसित झाले आहे. कवी, राजकारणी व्यक्ती, सामाजिक कार्यकर्ते इत्यादींनी आत्मचरित्रे लिहिली आहेत. विख्यात अशा बहुतेक सर्व व्यक्ती चरित्रलेखनाचा विषय बनल्या आहेत.

ललितेतर साहित्य : या क्षेत्रातही आधुनिक कालखंडात प्रचंड विकास झाल्याचे आढळते. भाषाविषयक अध्ययनाच्या राज्यसंस्थेने (‘स्टेट इन्स्टिट्यूट ऑफ लँग्वेज’ या संस्थेने) तत्त्वज्ञान, वैद्यक, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, भौतिकी, रसायनशास्त्र, जीवशास्त्र आणि मानव्यविद्या यांसारख्या शास्त्रीय विषयांवरील अनेक विवेचक ग्रंथ प्रकाशित केले आहेत. राज्यशासनाच्या आश्रयाने ‘मलयाळम्‌ विश्वकोशा’चे काम चालू असून केरळ विद्यापीठाच्या आश्रयाने एका शब्दकोशाचेही काम चालू आहे. साहित्याचे इतिहास लिहिले गेले असून उळ्ळूर एस्‌. परमेश्वर अय्यर यांनी लिहिलेला केरळ साहित्य चरित्रम्‌ हा विशालकाय ग्रंथ त्या सर्वामध्ये अधिक महत्त्वाचा आहे.

साहित्यिक संस्था आणि नियतकालिके : मलयाळम्‌ साहित्याच्या विकासाला हातभार लावणाऱ्या संस्थांची व नियतकालिकांची संख्या मोठी आहे. त्यामुळे त्यांची सर्वसमावेशक सूची येथे देणे अशक्यच आहे. येथे फक्त प्रमुख अशा काही संस्थांचा व नियतकालिकांचा निर्देश केला आहे.

(१) केरळ साहित्य अकादेमी : दुसऱ्या कोणत्याही साहित्य अकादेमीप्रमाणेच केरळ साहित्य अकादेमी देखील परिसंवाद भरविते, ग्रंथ प्रकाशित करते, साहित्यिकांना पुरस्कार−पारितोषिक प्रदान करते आणि ग्रंथप्रकाशनासाठी अनुदान देते. (२) राज्य भाषा−संस्था : मलयाळम्‌ भाषेमध्ये महाविद्यालयीन पातळीवरची क्रमिक पुस्तके तयार करणे, हे या संस्थेचे प्रमुख कार्य होय. (३) राज्य विश्वकोश-प्रकाशन-संस्था : या संस्थेने मलयाळम्‌ भाषेत वीस खंडांचा विश्वकोश प्रकाशित करण्याचा प्रकल्प हाती घेतला आहे. त्याचे सहा खंड यापूर्वीच प्रकाशितही झाले आहेत. या संस्थेने साहित्यकोश प्रकाशित करण्याचा प्रकल्पही हाती घेतला आहे. (४) मलयाळम्‌ शब्दकोश : हा केरळ विद्यापीठाने हाती घेतलेला एक प्रकल्प आहे. ऑक्सफर्ड इंग्लिश डिक्शनरीच्या धर्तीवर अनेक खंडात्मक असा एक बृहत्काय शब्दकोश तयार करणे, हे या प्रकल्पाचे स्वरूप आहे. आतापर्यंत त्याचे तीन खंड प्रकाशित झाले आहेत. (५) प्राच्यविद्या संशोधन संस्था आणि हस्तलिखित-ग्रंथालय : हा केरळ विद्यापीठाचाच आणखी एक विभाग होय. ही संस्था मलयाळम्‌ व संस्कृत या भाषांमध्ये ग्रंथ प्रकाशित करण्याचे काम करते व त्यासाठी दुर्मिळ हस्तलिखितांच्या संग्रहामधून ग्रंथांची निवड केली जाते. (६) केरळ साहित्य परिषद आणि शास्त्रसाहित्य परिषद : या संस्थाही मलयाळम्‌ साहित्याच्या विकासामध्ये क्रियाशीलपणे भरीव कार्य करत आहे. ‘कविसमाजम्‌’ या संस्थेची १८९२ साली, ‘केरळ साहित्य परिषदे’ची १९२७ साली, तर ‘जीवत्‌ साहित्य समिती’ची १९३७ साली स्थापना झाली. हे एक प्रागतिक आंदोलन होते आणि १९४४ साली ‘प्रागतिक साहित्य परिषदे’च्या स्थापनेमध्ये त्याचे पर्यावसान झाले. या सर्व परिषदांनी साहित्याच्या प्रगतीसाठी आपापली भूमिका पार पाडली आहे.

मलयाळम्‌मध्ये अनेक लोकप्रिय नियतकालिके प्रकाशित केली जातात. या नियतकालिंकामधून लघुकथा, कादंबऱ्या, कविता आणि साहित्यविषयक लेख प्रकाशित केले जातात. उदाहरणादाखल मातृभूमी, कलाकौमुदी, देशाभिमानी इ. नियतकालिकांचा निर्देश करता येईल. परंतु गंभीर स्वरूपाच्या लेखनाची आवड असलेल्या वाचकांची साहित्यिक गरज भागविणारी नियतकालिक प्रकाशनेही मोठ्या प्रमाणात आढळतात. त्यांत खालील नियतकालिके उल्लेखनीय होत :

 

(१) भाषासाहिती : केरळ विद्यापीठाच्या मलयाळम्‌ विभागातर्फे प्रकाशित होणारे एक त्रैमासिक आहे. या त्रैमासिकाच्या माध्यमातून संशोधनमूल्य असलेले लेख निरपवादपणे सतत प्रकाशित होत असतात. (२) भाषापोषिणी : मलयाळमनोरमा या वृत्रपत्रगटाचे (कोट्‌टयम) हे प्रकाशन द्वैमासिक आहे. भाषापाषिणी या नावाच्याच एका जुन्या प्रकाशनाचे पुनरूज्जीवन करून हे द्वैमासिक चालविले जात आहे. या द्वैमासिकामधून कविता, लघुकथा, लघुकादंबऱ्या आणि गंभीर लेख या प्रकारचे साहित्य वाचकांसाठी सादर केले जाते. (३) साहित्यलोकम्‌ : हे केरळ अकादेमीचे मुखपत्र आहे. (४) विवेकोदयम्‌ : हे नियतकालिक देखील साहित्य, कला, समाजशास्त्र आणि तत्सम विषयांवरील उच्च दर्जाचे लेख प्रकाशित करते. मलयाळम्‌मध्ये अशाच प्रकारची इतरही अनेक प्रकाशने आहेत.

 

बक्षिसे, पारितोषिके आणि सन्मान : भारताच्या राष्ट्रपतींनी डॉ सूरनीट्‌टू कुंचन पिळ्‌ळा यांना ‘पद्‌मश्री’ ही पदवी देऊन गौरविले आहे. त्यांचा हा सन्मान करण्यात आला आहे, तो प्रामुख्याने त्यांनी मलयाळम्‌ शब्दकोशाचे संपादक या नात्याने बजावलेल्या कामगिरी बद्दलच होय. 

जी. शंकर कुरुप यांना त्यांच्या ओतक्कुळल्‌ (१९५०) या काव्यसंग्रहाबद्दल १९६५ मध्ये पहिला ‘ज्ञानपीठ पुरस्कार’ देण्यात आला आहे. एस्‌. के.पोट्टेकट्ट यांना त्यांच्या ओरू देशातीनटे कथा या कादंबरीसाठी हाच पुरस्कार १९८० मध्ये देऊन गौरविण्यात आले.

‘वयलार राम वर्मा पारितोषिक’ हे मलयाळम्‌मधील सर्वांत अधिक मानाचे पारितोषिक होय. दिवंगत कवी वयलार राम वर्मा यांच्या स्मृत्यर्थ हे पारितोषिक दरवर्षी दिले जाते. आधीच्या पाच वर्षांतील सर्वोत्तम ललित कृतीला ते दिले जाते. गेल्या काही वर्षांत ते चार कादंबरीकारांना व दोन कवींना देण्यात आले आहे. मल्याळी साहित्यिकांना केरळ साहित्य अकादेमीची पारितोषिकेही मिळाली आहेत डॉ. के. एम्. जॉर्ज यांना नुकतेच ‘भारतीय भाषा परिषद पारितोषिक’ देण्यात आले आहे. सुविख्यात साहित्यिकांच्या स्मृत्यर्थ इतरही पुष्कळ पारितोषिके दिली जातात. काही नियतकालिकांच्या व्यवस्थापनाकडूनही अशा प्रकारची पारितोषिके दिली जातात.

ग्रंथप्रकाशनाला वाहून घेतलेली मलयाळम्‌ साहित्यिकांची सहकारी संस्था : या क्षेत्रातही केरळ राज्य आघाडीची भूमिका पार पाडत आहे. ‘साहित्य प्रवर्तक सहकार संघम्‌’ ही या प्रकारची सर्वोत्तम संस्था होय. ही एक साहित्यिकांची सहकारी संस्था आहे. सर्व केरळभर या संस्थेची पुस्तकविक्रीकेंद्रे आहेत. ही संस्था साहित्यिकांना जास्तीत जास्त स्वामित्वशुल्क (रॉयल्टी) देते. ही रक्कम २८ टक्क्यांइतकी देखील असते. हा साहसी उपक्रम यशस्वी झाल्यामुळे प्रोत्साहान मिळून अशा प्रकारच्या इतर अनेक संस्थाही उदयास आल्या आहेत परंतु त्या तितक्याशा नीट चाललेल्या नाहीत.

संदर्भ : 1. Achuta Menon, Chelanatt, Ezuttachan and His Age, Madras, 1940.

            2. Chaitanya, Krishna, A History of Malayalam Literature, New Delhi, 1971.

            3. Chatterji, S. K. Languages and Literatures of Modern India, Calcutta, 1943.

            4. George, K. M. A Survey of Malayalam Literature, Bombay, 1968.

            5. George K. M. Western Influence on Malayalam Literature, New Delhi, 1972.

            6. Govind. M. Ed. Poetry and Renaissance : Kumaran Asan Birth Centenary Volume, Madras, 1974.

            7. Panikar, Ayyappa, A Short History of Malayalm Literature, Trivandrum, 1977.

            8. Parameswaran Nair, P. K. History of Malayalam Literature, New Delhi, 1958.

            9. Ramchandran Nair, K. Early Manipravala : A Study, Trivandrum, 1971.

          10. Srinivas Iyengar, K. R. Ed. Indian Literature Since Independence : A Symposium, New Delhi, 1973.

भास्करन्‌, टी. (इं.) साळुंखे, आ. इ. (म.)